Friday 6 November 2015

गो-वत्स द्वादशी अर्थात वसुबारस - दीपावली

दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कुणाच्या? लक्षुमणाच्या..
लक्षुमण कुणाचा? आईबापाचा..
लहान मुले मस्त फेर धरून गात होती , नाचत होती आणि त्यांना पाहून आठवले ते बालपणीचे दिवस. 


मागील वर्षी आम्ही सर्व कुटूबीयांनी गावी जाऊन दिवाळी साजरी करायची ठरवली होती आणि गावाकडच्या वाटेवर ही गाणी कानी पडली , तसे न राहवून आमच्यातल्या बच्चे कंपनीने त्यांच्या आजीला नाना प्रश्न विचारून भंडावून सोडले. आजी, हे गाणे असे काय ग ? आम्ही कधी गाई-म्हशींना ओवाळताना नाही पाहिले कुणाला, आपण तर लहान मुलांना ओवाळतो ना जसे आजी तू आई आम्हाला वाढदिवसाला ओवाळता, मग हे काय़? 
शेवटी आजीने त्यांना आणि सर्व लहान-थोरांना  दिवाळी साजरी करण्या मागच्या आपल्या वैदिक पध्द्तींची माहिती दिली. 

आजीचे बोल ऐकता-ऐकता माझे सदगुरु श्री अनिरुध्दसिंह जोशी ह्यांनी २००६ साली आम्हाला दैनिक प्रत्यक्षच्या अग्रलेखांतून दिलेली माहिती आठवली- 


काही वर्षांपूर्वी खरे पाहता दीपावलीचा पहिला दिवस हा गो-वत्स द्वादशी ह्या दिवसाने सुरु व्हायचा . गो-वत्स द्वादशी म्हणजेच लोकभाषेत वसुबारस ह्या नावाने ओळखला जाणारा अश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशी वा वद्य द्वादशीचा दिवस ! 
गावांमध्ये वसु बारस ह्या दिवशी सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठून आपल्या आंघोळी-पांघोळी आटोपून ज्यांच्या गोठयात गायी-वासरे आहेत त्यांच्या घरी सर्व मंडळी एकत्र जमायची आणि मग गायीच्या वासराला आणि त्या गोमातेला ( सवत्स- धेनूला म्हणजेच गोमातेला आणि तिच्या वासराला) दीपावलीचे पहिले अभ्यंग-स्नान घातले जायचे. (अभ्यंग-स्नान म्हणजे सुवासिक उटणे , सुगंधी तेलाने अंगाची मालिश (मसाज) करून केलेले स्नान होय.) आम्हां भारतीयांच्या मनात कायमच गोमातेला आदराचे , पावित्र्याचे स्थान आहे आणि आपल्या स्वत:च्याही आधी म्हणजेच  माणसाच्या अभ्यंग स्नानाच्याही आधी गोमातेला आणि तिच्या वासराला अभ्यंग स्नानाचा पहिला मान देऊन हे प्रेमाने पूजन केले जायचे. 

गाय हा खरोखरच सर्व प्राणीयोनीतील अत्यंत पवित्र जीव आहे. परमात्म्याच्या सृष्टिपालनाच्या नियमांमध्ये मानवाला आधारभूत अशी अनेक पवित्र प्रतिके भगवंतानेच उत्पन्न केली आहेत, आणि त्यातील गाय हे एक अत्यंत पवित्र प्रतिक आहे. भगवान श्रीकृष्णाने स्वत:ला "गोपाल" म्हणवून घेण्यातच धन्यता मानली व हा गोपालकच पुढे गिरिधारी बनून गोकुळाचे संरक्षण करता झाला व ह्या गो-कुळापासून दूर गेलेल्या द्वारकेला बुडविता झाला हे आम्हां भारतीयांस कधीही विसरून चालणार नाही.  सदगुरु श्री दत्तात्रेयांच्याही तसबिरीत आपण गाईला पाहतोच.
   
खरोखरी गोमाता किती आदरणीय , पूज्यनीय आहे, आम्हा भारतीयांसाठी !  

गोमाता! प्रत्येक श्रद्धावानाच्या मनात गाईबद्दल ‘गाय ही माता आहे’ हा सप्रेम श्रद्धाभाव असतो. प्रत्येक गाईत कामधेनुचा अंश असतो ही श्रद्धावानांची भावना असते आणि म्हणूनच गोमातेचे पूजन केले जाते.

मग आठवले की दिनांक १४-११-२०१३ रोजीच्या प्रवचनात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सांगितले होते की  “आदिमातेची सर्व मंगल करण्याची इच्छा मनुष्याला ज्या वात्सल्यनाडीद्वारे प्राप्त होते, त्या वात्सल्यनाडीसच ऋषिंनी कामधेनु म्हटले आहे.” 

गोमातेच्या चरणांचा ठसा म्हणजेच गोपद्मसुद्धा श्रद्धावान पवित्र मानतात. पूर्वी गोमयाने (गोबरने) अंगण सारवून दारासमोर, उंबरठ्यावर, तसेच देवघरात देवासमोर रोज गोपद्मं काढली जायची. आपणही रोज गोपद्मं काढू शकतो, किमान सणासुदीच्या दिवशी तरी अवश्य गोपद्मं काढावीत. ज्या घरासमोर गोपद्म काढले जाते त्या घरातील प्रत्येकाला त्याचे पुण्य लाभतेच असे म्हटले जाते. गोपद्मांकित घरात एखादी व्यक्ती अनुचित भावाने जरी आली, तरी त्या व्यक्तीची वाईट करण्याची शक्ती नाहीशी होते असेही म्हटले जाते आणि म्हणूनच गोपद्मं उंबरठ्यावर काढली जातात. ज्या घरासमोर अंगणात किंवा उंबरठ्यावर गोपद्मं असतील, त्या घरातून बाहेर जाताना घरातील प्रत्येक व्यक्ती शुभ स्पंदने आणि सामर्थ्य घेऊन जातो आणि बाहेरील व्यक्ती अशुभ स्पंदने त्या घरात आणू शकत नाही. 

बापूनी त्या दिवशीच्या प्रवचनात सांगितले, “ गोवत्सद्वादशीच्या दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी गोपद्मं अवश्य काढावीत आणि त्या दिवशी ‘ॐ श्री सुरभ्यै नम:।’  हा मंत्र कमीतकमी ५ वेळा म्हणावा. 

‘ॐ श्री सुरभ्यै नम:।’  हा कामधेनूचा श्रेष्ठ मंत्र मानला जातो. ही गोपद्मं दररोज अवश्य घरासमोर काढावीत आणि हा कामधेनूचा मंत्र आपण दररोजदेखील म्हणू शकतो. पण विशेषकरून गोवत्सद्वादशीच्या दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी गोपद्मं अवश्य काढावीत.
   
गोमातेचे स्नान झाल्यावर घरातील देवांच्या मूर्तींना अभ्यंग स्नान घालून, त्याचे पाणी कलशात ठेवून गंगामाता म्हणून त्या कलशाचे पूजन केले जायचे. भारतीयांच्या मनात ही गंगामाता गोमातेएवढीच सर्वोच्च आदराचे स्थान आणि पावित्र्याचे प्रतीक बनून राहिली आहे. हे परमात्म्याच्या चरणांचे तीर्थ ( गंगामाता म्हणून पूजिलेल्या कलशातील देवांच्या मूर्तीच्या अभ्यंग स्नानाचे जल ) मग पवित्र गंगाजल म्हणून संपूर्ण घरभर सिंचन केले जावयाचे ( शिंपडले जायचे ) आणि त्यानंतर ब्राम्हणांच्या घरी गायत्री मंत्राचे कमीत कमी तीन जप व्हाव्याचे आणि ज्यांना गायत्री मंत्र जपता येत नाही त्यांच्यासाठी मंदिरामंदिरांमधून गायत्री मंत्राचे जप आयोजित केले जात असत आणि सर्व गावकरी लोक सुध्दा श्रवण भक्तीसाठी भाविकतेने मंदिरात येत असत.
 "एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ " ह्या उक्तीची वास्तवातील प्रचितीच नाही का जणू ? 

ह्या अनुषगांने एक एक गोष्टींचे स्मरण होऊ लागले...

सदगुरु अनिरुध्दांनी "वरदा चण्डिका प्रसन्नोत्सव" ह्या आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या प्रसन्नोत्सवाच्या दरम्यान १० मे २०११ ह्या तिसर्‍या दिवशी गंगामाता पूजन केले होते. शास्त्रज्ञांनी केलेला दावा की येत्या ४०-६० वर्षात गंगा नदी ही सुकून जाईल हा ध्यानात घेता सदगुरु अनिरुध्दांनी गंगामातेचे पावित्र्य जपण्याच्या हेतूने हे पूजन केले. बापूंनी सांगितले की गंगामाता ही "गं" बीजाचा सतत उद्घोष करणारी त्रिपदागामिनी आहे जी साक्षात भगवान शिवशंकराच्या जटांमधून उगम पावते आणि महाविष्णूच्या चरणांवर लोळण घेते. गंगामाता ही भौतिक पातळीवर भागिरथी, प्राणमय पातळीवर अलकनंदा आणि मनोमय पातळीवर मंदाकिनी असून ती मानवाला भौतिक, प्राणमय आणि मनोमय अशा तीन पातळ्यांवर शुध्द्ता पुरविते. ह्या ज्ञानगंगेला पृथ्वीवर अवतीर्ण होण्यासाठी भगवान शिवशंकराचे सहाय्य लागते असे "शिवम ज्ञानेपदेष्टारम् " मध्ये वर्णन आढळते.     

सदगुरु अनिरुध्द बापूंनी भारतीयांच्या जीवनातील गायत्री मंत्राचे अनन्यसाधारण महत्त्व सामान्य जनमानसांत दृढ करण्यासाठीच श्री त्रिपदा गायत्री महोत्सव  १५ मे २००३ ते १७ मे २००३ ह्या तीन दिवसांमध्ये करवून घेतला होता. ह्या महोत्सवात दर दिवशी सकाळी ८.०० ते संध्याकाळी ७.०० ह्या कालावधीत लाखो भक्तांच्या उपस्थितीत त्रिपदा गायत्री मंत्राचा जप ३७,१२,७४० वेळा म्हटला जाई व तेही अत्यंत पुण्यप्रद व पावन अशा श्री गायत्री पुरश्चरण यागासहित !
त्रिपदा गायत्री मंत्र - 
ॐ भूर्भुव: स्व: । 
ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ।
धियो यो न: प्रचोदयात् ॐ ।।
सदगुरु श्री अनिरुध्दांनी "मातृवात्सल्यविन्दानम् अर्थात् मातरैश्र्वर्यवेद:" ह्या त्यांनी लिहिलेल्या ग्रंथातून असे प्रतिपादीत केले आहे की ’स्वंसंवेद्य’ परब्रम्हाची ’आपण परमेश्वर आहोत ’ ही जाणीव अर्थात स्पंदशक्ती (स्वभाव) म्हणजेच आत्मरूपी चित्कला अर्थात परमेश्वरी, आदिमाता. हिलाच वेदांनी ’गायत्रीमाता’ हे नामाभिधान दिलेले आहे. ही परमेश्वरी जाणीवच ॐकाररूपी परमात्म्याला परब्रम्हाच्या प्रथम स्पंदातून जन्माला घालते.  

खरेच किती सुंदर रीत्या आपल्या हाती आपल्या महान ऋषी-मुंनीनी सण साजरे करण्यामागचे उदात्त हेतू आणि महान परंपराचा वारसा सोपविला होता नाही का बरे?   

अशा प्रकारे दीपावलीची सुरुवातही ह्या भारतात गोमातेच्या अभ्यंगस्नानानेच व्हायची . फक्त गोमाताच नव्हे तर दीपावलीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच गो-वत्स द्वादशीच्या दिवशी स्थूल रूपातील गोमाता , सूक्ष्म रूपातील गंगामाता आणि तरल रूपातील गायत्री माता ह्या तीनही मातांचे पूजन घडायचे आणि पवित्र स्मरणही व्हावयाचेच आणि त्यानंतरच दिवाळीच्या जल्लोषाला सुरुवात व्हावयाची. त्यामुळेच दिवाळीचे स्वरूप केवळ दीपोत्सव , जल्लोष किंवा कार्निवलसारखे ह्या भारतात कधीच नव्हते. ज्या उत्सवाची सुरुवातच मुळी इतक्या पवित्र पध्द्तीने व्हायची , तो उत्सव अर्थातच खरोखरच आनंददायी ठरणार ह्यात संशय तो काय असणार ?

परंतु आजकाल आपण पाहतो की बहुतांशी घरांतून दिवाळीच्या दिवशी पहाटे उठणे किंवा अभ्यंग स्नान ह्या गोष्टीच बंद पडत चालल्या आहेत. मग जेथे माणसाला स्वत:लाही अभ्यंग स्नान घालणे जमत नाही तेथे गाय- वासरू ह्यांचे अभ्यंग- स्नान ही तर खूप दूरचीच गोष्ट झाली असेच म्हणावे लागेल. त्यातच शहरांमध्ये आता सवत्स गाय (गाय आणि तिचे वासरू) मिळणे तर महाकठीणच म्हणावे लागेल , नाही का बरे ? 

काळाबरोबर दैवतेही बदलतात , पूजोपचारही बदलतात आणि रूढीही बदलतात आणि मुख्य म्हणजे हे सर्व पाळणार्‍या मानवाच्या गरजा बदलतात आणि म्हणूनच प्राधान्यही बदलते. त्यातही ज्यांना सवत्स धेनू अभ्यंगस्नान आणि पूजनासाठी मिळू शकत नाही अशांसाठीही भारतीय ऋषी-मुनींनी परंपरेने दुसरा मार्ग काढून ठेवलेलाच आहे आणि तो म्हणजे एका चांगल्या आचरणाच्या गरीब स्त्रीस व तिच्या बारा वर्षाखालील मुलास घरी बोलावून त्यांना अभ्यंगस्नान घालणे व अन्न, वस्त्र आणि दक्षिणा देणे हा मार्ग प्रचलित होता. आजच्या समजा धकाधकीच्या जगात हेही शक्य नसेल तर कमीतकमी अनाथ महिलांसाठी व गरीब विद्यार्थ्यांसाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या संस्थेस देणगी देऊन आपण ही गोवत्स द्वादशी साजरी करू शकतो.  

सदगुरु श्री अनिरुध्द बापूंच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथील "गोविद्यापीठम " येथे दरवर्षी गो-वत्स द्वादशीच्या दिवशी सर्व गोमातांना सुवासिक तेल, उटण लावून अभ्यंगस्नान घातले जाते, त्यांना सुंदर कपडे, झाली घालून, आभूषणे (कवड्याच्या माळा) घालून सजविले जाते, त्यांची आरती केली जाते व त्यांना पुरणाचा नैवेद्य ही अर्पण केला जातो.

गो-पालन दुर्लक्षित झाल्यास भारताची एक चतुर्थांश आध्यात्मिक ताकद नाहीशी होईल, गंगामातेस विसरल्यास भारताची अर्धी आध्यात्मिक ताकदही नाहीशी होईल व गायत्री मंत्राची अवहेलना झाल्यास भारताची सर्वच ताकद नाहीशी झालेली असेल.    

म्हणूनच सदगुरु श्री अनिरुध्द बापूंनी आपल्या श्रध्दावान मित्रांना एक कळकळीचे आव्हान केले आहे की स्वत:च्या वैयक्तिक व आध्यात्मिक विकासासाठी तसेच मातृभूमीच्या उध्दारासाठी गोमाता, गंगामाता (नदी किंवा भगवंताचे चरणतीर्थ) आणि गायत्रीमाता ह्यांचा मार्ग कधीही सोडू नका , हे आजच्या घडीला अत्यंत महत्त्वाचे वाटते.  

ह्याची सोपी सोय व्हावी म्हणूनच कदाचित सदगुरु बापूंनी आपल्या श्रध्दावान भक्तांसाठी  सवत्स धेनू , गंगामातेच्या पवित्र जलाने (नदी किंवा भगवंताचे चरणतीर्थ) भरलेला कलश आणि गायत्री माता ह्यांना आपल्या वसुंधरा-पृथ्वीच्या पावित्र्याचे केंद्रस्थान असलेल्या श्रीगुरुक्षेत्रम मधील श्रीमद्पुरुषार्थपुरुषोत्तमयंत्रातही आदराचे स्थान दिले असल्याचे आपण दर्शन घेताना अनुभवू शकतो. 

तसेच माणसाला गंगामातेचे पूजन करायलाही जमले नाही तर त्यावरतीही बापूंनीच अजूनही एक अधिक सोपा मार्ग उपल्ब्ध करून दिला आहे तो म्हणजे रूद्रगंगा उदी अर्थात सदगुरुंच्या  हस्तस्पर्शाने पावन झालेली उदी. ही रुद्रगंगा उदी श्रध्दावानांसाठी विनामूल्य संपूण वेळ (२४ तास) उपलब्ध असते. ही पावन उदी श्रध्दावान भक्त जेव्हा आपल्या मस्तकी , भाळावर (कपाळावर) आज्ञाचक्राच्या जागी अत्यंत प्रेमाने लावतात तेव्हा ते काही अंशाने तरी रूद्रगगंगा उदीचे म्हणजेच पर्यायाने गंगामातेचे स्मरण करून पूजनच करीत असतात. 

खरोखर , अशा नितांत सुंदर पवित्र , महान भारतीय वैदिक संस्कृतीची ओळख करून देणार्‍या सदगुरु अनिरुध्दांच्या चरणी माझे वारंवार लोटांगण !!!

हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ.

संदर्भ: १. सदगुरु अनिरूध्द बापूंचा दैनिक प्रत्यक्ष मधील अग्रलेख (२००६) - गो-वत्स द्वादशी 
         २. सदगुरु अनिरुध्द बापूंचे दिनांक १४-११-२०१३ चे मराठी प्रवचन 
         ३. http://ambajnosmi.blogspot.in/2014/10/om-shree-surabhyai-namah-post-in-marathi.html
         ४. मातृवात्सल्यविन्दानम् अर्थात् मातरैश्र्वर्यवेद: 

No comments:

Post a Comment

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog