Saturday 12 December 2015

आपले आरोग्य - आरोग्यम् सुखसंपदा

आजपासून बरोबर एक वर्ष आधी म्हणजेच १३ डिसेंबर २०१४ च्या संध्याकाळी अंधेरी स्पोटर्स कॉम्प्लेक्सचा परिसर अगणित माणसांनी खचाखच भरून गेला होता ? कसली होती ही अमाप गर्दी? कसली जत्रा होती का मेळावा होता का खाद्य जत्रा होती ? का बरे एवढी लाखोंची  गर्दी लोटली होती? कारणच तसे घडले होते त्या वेळी आयोजित केले गेले होते डॉक्टर अनिरुध्द धैर्यधर जोशी ,एम. डी. (Rheumatology) ह्यांचे " SELF -HEALTH " म्हणजेच "आपले आरोग्य" ह्या विषयावर व्याख्यान !

तसे पाहता आपण आपल्या कारची , गाडीची , बाईकची , राहत्या घराची किवा कोणत्याही महागड्या वस्तुची किती काळजी घेतो ना परंतु परमेश्वराने दिलेल्या आपल्या लाखमोलाच्या मानवी शरीराच्या आरोग्याची किती काळजी घेतो ? खर्‍या अर्थाने काळजी तरी आपण करतो  का ?

एकदा वाचनात आले होते की "शरीरम् आद्य्ं खलु धर्मसाधनम् " म्हणजे आपले जीवनकार्य पूर्णत्त्वाला नेण्यासाठी आपले शरीर एक  महत्त्वाचे धर्मसाधन आहे. संतमंडळी सांगतात आरोग्यपूर्ण शरीरात सुदृढ मन वास करते, राहते , ज्यात सुमति नांदते. पण सर्वसामान्यपणे माणूस आपल्या स्वत:च्या आरोग्याकडे खूपच दुलर्क्ष करत असतो. हेच बघा ना साधी सर्दीच झाली आहे ना, नुसता खोकला येतो य ना , थोडासा बारीक तापच आहे ना , होईल बरा १-२ दिवसात असे मानून आपणच आपल्या शरीराच्या तक्रारींकडे कानाडोळा करत असतो आणि जेव्हा त्रास खूपच बळावतो आणि सहनशक्तीच्या पलीकडे जातो तेव्हाच डॉक्टरचा दरवाजा ठोठावतो. म्हणजेच आपल्याला आरोग्य बिघडले ह्याची तशी फारशी दखल घ्यावी वाटत नाही. त्यात आरोग्यावरचेच व्याख्यान म्हटले तर काय बाबा डॉक्टर हेच सांगणार हे खाऊ नका, ते खाऊ नका आणि इतकी पथ्ये पाळा, हे व्यायाम करा असे सल्ले देणार ? मग कशाला जायचे? पण त्या दिवशी मात्र गजबच घडले होते म्हणा ना? डॉक्टरांच्या ओघवत्या, मंत्रमुग्ध करणार्‍या आणि सर्वसामान्यांनाही समजेल अशा तितक्याच सोप्या भाषेतून समजावून सांगण्याच्या कौशल्यपूर्ण हातोटीने सारा समुदाय जागच्या जागी खिळून बसला होता. एरव्ही घड्याळाच्या काटेवर धावणार्‍या मुंबापुरीच्या माणसांचे वेळेचे भानच हरपले होते जणू ! अर्थातच व्याख्यान संपूच नये असेच प्रत्येकाला वाटत होते.

सांजवेळेला दिवेलागणीच्या वेळी गावांगावांतून आणि घरांघरांतून आजी-आजोबा आपल्या नातवंडासवे "शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् सुखसंपदा" अशी प्रार्थना करून भगवंताची करूणा भाकताना आढळायचे. पण नीट विचार केला तर खरेच आपण आरोग्याला आपली खरी धनसंपदा मानतो का? इंग्रजी भाषेतही " Health is divine wealth" असे म्हणतात आनि आरोग्याचा आदर केला जातो. तरी देखिल आपण सारेच "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" ह्या म्हणीनुसार न वागता, आपल्या परिवारातील, मित्र -परिवारातील एखाद्या व्यक्तीला काही आरोग्याबाबत त्रास झाला असेल तरी आपण त्या व्यक्तीचे कसे चुकले , काय चुकले आणि किती चुकले हे शोधून काढण्यातच जास्त धन्यता मानतो , पण त्यातून शहाणपणा शिकतो का आपण ? तर उत्तर बहुधा नाही असेच मिळेल. अशा सर्व प्रकारच्या दुर्लक्षित बाबींचा उहापोह डॉक्टर अनिरुध्द जोशी ह्यांनी आपल्या व्याख्यातून केला होता त्यातील काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न तर करू या-

पूर्वीच्या काळी खेडेगावापेक्षा शहरांत आजाराचे प्रमाण खूप जास्त असायचे. गावामध्ये प्रदूषण मुक्त मोकळी हवा, निसर्गाचे मुक्त सान्निध्य , आणि कष्ट करण्याची , घाम गाळण्याची  माणसाची जीवनशैली ह्यामुळे बहुधा हा फरक पडत असावा. पण आजकाल गावेही वाढत्या औदयोगिकीकरणामुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहेत आणि आजारांपासून अलिप्त राहू शकत नाहीत. सर्वसामान्यत: घराघरांतून आपल्याला एक चित्र नेहमीच आढळते ते म्हणजे -

ज्यांना आजार येतो आणि जेव्हा आजार येतो तेव्हाच तो फक्त स्वत:ची काळजी घेण्यासाठी उभा राहतो आणि त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर काळजी घेतली जात नाही. आपण घरातील सार्‍या व्यक्ती फक्त चिंता करीत राहतो. पण काळजी घेतली जात नाही. डॉक्टर अनिरुध्द जोशी ह्यांनी ह्या महत्त्वपूर्ण गोष्टीकडे लक्ष वेधून घेत सांगितले की याच कारणामुळे आजारांची-रूग्णांची संख्या वाढते. त्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकजण स्वत:चा आजार लपवून ठेवतात त्यामुळे आजाराचं प्रमाण वाढतंय. डॉक्टर जोशींनी एक खूप छान वक्तव्य केले की बिछान्याला खिळून राहणं म्हणजेच आजार ही आपली सर्वसामान्य चुकीची संकल्पना आपण सोडायला हवी. त्यांनी डॉक्टर थॉमस फुलर ( Dr. Thomas Fuller) ह्यांच एक सुंदर वाक्य सांगितले की
Health is not valued till sickness comes म्हणजे आजार येऊन बिछान्यावर जोपर्यंत खिळत नाही , तोपर्यंत आरोग्याची किंमत कळत नाही. 
आपण सारेच जण जाणतो की हे वाक्य आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत १०८ % खरे आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वी भारतातून टीबी नाहीसा होण्याच्या मार्गावर होता पण आता टीबीचे प्रंमाण पहिल्यापेक्षा जोरात वाढते कारण टीबी झाल्यावर अजूनही माणस घाबरतात आणि लपवायचा प्रयत्न करतात. वेळीच योग्य उपचार सुरु केल्यास हा आजार बरा होऊ शकतो पण योग्य औषधोपचार न केल्यास मात्र शरीरातील टीबीचे जंतू कुठल्याही औषधाला प्रतिसाद देत नाही अशी पाळी येते आनी दुर्दैवाने त्याची ट्रिट्मेंट कॅन्सर एवढीच कठीण होऊन बसते.

डॉक्टर अनिरुध्दांनी Epigenetics संबंधी माहिती देताना सांगितले की आपल्या जीन्सनुसार आपल्याला अमुकअमुक आजार होणार की नाही होणार ? हे ठरतं त्याचे हे नवीन शास्त्र उदयाला आले आहे. शास्त्र  नी हे सिध्द केले आहे की तुमच्याकडे वाईट आणि चांगली जीन्स असतात आणि ती तेव्हाच क्रियाशील होतात, जेव्हा त्यांना सदृश्य परिस्थिती शरीरात किंवा शरीराबाहेर उत्पन्न होते. हे उदाहरणावरून स्पष्ट केले की आई आणि वडील दोघांनाही जरी डायबेटीस (मधुमेह) असला तरी मुलाच्या तब्येतीची शारीरिक-मानसिक दृष्टया नीट काळजी घेतली तर मुलाला डयबेटीस होण्याचे चान्सेस वीस टक्केच उरतात. डॉक्टर अनिरुध्दांनी जेनेटीक आजारांबाबत एक खूप मोठा दिलासा देणारी गोष्ट निदर्शनास आणली की जीन्सच्या आजूबाजूची परिस्थिती जर आपण बदलू शकलो तर आपण जनेटीक विकार सुध्दा ७० % प्रमाणात कमी करू शकतो.

आपण जीन्सवर सुध्दा मात करू शकतो आणि ती ताकद भगवंताने आपल्याला Epigeneticsच्या स्वरूपात दिली आहे.
लठ्ठ्पणाची गंमत सांगताना डॉक्टर अनिरुध्दांनी स्पष्ट केले की शरीरावर जमा झालेली चरबी जेवढी वाईट त्यापेक्षा रक्तात जमा झालेली चरबी अधिक वाईट आहे. Heart attack (हृदयविकाराचा झटका), Diabetes( मधुमेह), Blood pressure (रक्तदाब), Paralysis ( अर्धांगवायू-पक्षाघात) हे आजार आणि बहुतांशी आजार हे लठ्ठपणाशी संबंधित असतात. येथे डॉक्टर अनिरुध्दांनी एक महत्त्वाची बाब सांगितली की लठ्ठ्पणाला सर्व हसतात. पण भले तुमचे वजन फक्त ५० किलो आहे आणि तुम्ही स्वत:ला बारीक समजत असाल तरी तुमच्या रक्तातील चरबी भरपूर वाढलेली असू शकते. Heart attack , Diabetes, Blood pressure, Paralysis ह्या सर्वांचा चरबीशी अत्यंत जवळचा संबंध आहे.
डायबेटीस आजारासंबंधी सांगताना डॉक्टर अनिरुध्दांनी सांगितले की ३ प्रकारच्या साखर असतात -
१. सुक्रोज ( Sucrose)
२. ग्लुकोज (Glucose)
३. फ्रक्टोज ( Fructose)
ह्या पैकी आपल्या शरीराला ग्लुकोज अत्यंत आवश्यक असते जी आपल्या मेंदूला विचार करायला लावते , विचार करायची शक्ती देते आणि श्वासोच्छ्वास शक्ती देते. मेंदू फ्रक्टोज साखर स्विकारत नाही , ते शरीरात जावून स्नायूंना ताकद देत नाही ना मेंदूला आणि शरीरात साठून लिव्हरला (यकृत) कममुवत करते. फ्रक्टोज ही शरीरासाठी अत्यंत बेकार आणि घातक साखर आहे.
आपण नेहमीच भजी, बटाटेवडे, लाडू , करंज्या, जिलेब्या , चकल्या असे पदार्थ भरपूर खातो की ज्यात तंतु-फायबर अजिबात नसतात आणि चरबी आणि साखर भरपूर असते. त्यांचा वापर कमी करायला हवा.
डॉक्टर म्हणाले की आपण फळे भरपूर खाऊ शकतो ज्यात साखर असते पण तंतु असल्याने ती बाधत नाही. ह्याचा अर्थ दिवसाला आठ-दहा आंबे खाणे किंवा आठआठ दहा दहा वाट्या आमरस पिणे हे  मात्र कधीही चुकीचेच आहे अशी हसता हसता कोपर खळीही मारायला डॉक्टर विसरले नाहीत. हसत खेळत संवाद साधत डॉक्टर अनिरुध्दांनी दैनंदिन जीवनातील आपल्या हातून कळत-नकळत घडणार्‍या चुकीच्या आणि आपल्या शरीराला  घातक , हानिकारक अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला होता.

ह्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला http://www.aarogyamsukhsampada.com/ ह्या वेबसाईटवर मिळू शकते.


चरबी वाढवणारे फॅटस हे दोन प्रकारचे असतात १. Saturated Fats २. Unsaturated Fats
त्यातील Saturated Fats  हे सूर्यफुलाचे तेल, खोबरेल तेल, शेंगदाण्याचे तेल, लोणी, बटर, चॉकोलेटस, दुधाची साय ह्यातून शरीरात जमा होतात व ते पचण्यासाठी आपल्याला भरपूर exercise (व्यायाम) करावा लागतो.
ह्यातील Unsaturated Fats मध्ये Omega 3 , Omega 6 आणि Omega 9 येतात ज्यातील हे Omega 3 कॉलेस्ट्रोल वाढण्यापासून , बल्डप्रेशर वाढण्यापासून , हृदयविकारापासून , संधिवातापासून, मानसिक आजारांपासून (depression), त्वचेच्या/कातडीच्या आजारामपासून , अस्थमापासून आपले संरक्षण करते.
मुख्य म्हणजे आतड्यांचा कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, प्रोस्टेत ग्लॅन्डचा कॅन्सर हे विकार आपल्या शरीरात Omega 3 नीट जात असेल तर होत नाहीत आणि हे Omega 3  फक्त माशांमध्ये असते. पण मासे खाण्याची आवड नसलेले लोक Cordliver Oil च्या गोळीमधून हे मिळवू शकतात असे नमूद केले.
डॉक्टर अनिरुध्दांनी आपल्याला स्थूल म्हणजेच लठ्ठ करणारे आणि आजारी करणारे काही घातक प्रकार स्पष्ट केले त्यात -
१. गर्भप्रतिबंधक गोळ्या
२. सोयाबिन  -
३. डीडीटी चा फवारा
४. बिस्फेनॉल अ ( Bisphenol A) - ह्यातील बिस्फेनॉल हे प्लॅस्टिकला कडकपणा , मजबूतपणा आणण्यासाठी वापरल जाते, जे टाळण्याचा प्रभावी उपाय म्हणजे प्लॅस्टीकचा खाण्याच्या -पिण्याच्या पदार्थांशी संबंध टाळणे म्हणजेच जेवणाचा डबा प्लॅस्टीकचा न वापरता स्टीलचा वापरणे , गरम चहा किंवा कॉफी प्लॅस्टीकच्या कपांमधून न पिणे, लहान मुलांना गरम दूध प्लॅस्टीकच्या बाटलीतून किंवा डब्यामधून न पाजणे.
गरम भाजी, गरम पाणी, गरम चहा, गरम जेवण प्लॅस्टीकच्या डब्यामध्ये ठेवल्याने Bisphenol A हे त्यात उतरते हे शरीराला अत्यंत हानीकारक आहे त्यामुळे त्याचा वापर टाळायलाच हवा.

अनारोग्य वा आजार ही माणसासाठी एक घोर आपत्तीच असते नाही का, मग ह्या घोर कष्टातून उध्दरण्यासा्ठी, आजाररूपी आपतीचे व्यवस्थापन करणेच अनिवार्य आहे. प्रज्ञापराधात रोग: असे उगाच नाही म्हणत आपले पूर्वज .... मग हा प्रज्ञा अपराध टाळायचा असेल तर मग अशाच आणखी भरपूर आरोग्यविषयक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या पुढील भागात -

डॉक्टर अनिरुध्द जोशींच्या ह्या अमूल्य मार्गदर्शनानुसार ज्यांनी ज्यांनी ते आचरणात आणायचा प्रयत्न केला त्यांना नक्कीच आरोग्याच्या सुखाची गुरुकिल्ली गवसली आहे असे ते आवर्जून सांगतात. चला तर आपणही अवलंबून बघू या आणि आरोग्यवान सुखाची प्रचिती घेऊ या...    

संदर्भ:
१. डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांचे "आपले आरोग्य" ह्या विषयावरील १३ डिसेंबर २०१४ चे व्याख्यान
२. http://www.aarogyamsukhsampada.com/
 



1 comment:

  1. Everyone of us knows well that a good health lead to the good way however no one of us take care of the health. If we are not living in discipline we can never become healthy in the life and never reach to the success.
    And you have shared such a important information to us.
    Thanks you so much. and 'आरोग्यम सुखसंपदा' -
    http://www.aarogyamsukhsampada.com/
    this is site is like a key of our good health...
    all must read it.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog