Sunday 6 December 2015

फलाशाविरहित कर्म- निष्काम कर्मयोग !!!

माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा
भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा

दैवजात दुःखांनी मनुजा पराधीन केले
त्या पतितांचे केवळ रडणे मजला ना रुचले
भूषण रामा एक पत्‍नीव्रत मला नको तसले
मोह न मजला कीर्तिचा मी नाथ अनाथांचा

रुक्मिणी माझी सौंदर्याची प्रकटे जणु प्रतिमा
किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्यभामा
तरीही वरितो सहस्‍त्र सोळा कन्या मी अमला
पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा

कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो
हलाहलाते प्राशून शंकर देवेश्वर ठरतो
जगता देण्या संजीवन मी कलंक आदरीतो
वत्सास्तव मम ऊर फुटावा वत्सल मातेचा


पं. मनोहर कवीश्वर ह्यांचे "पूर्णपुरुष भगवान श्रीकृष्ण " ह्यांच्या जीवीत-कार्याची सुंदर ओळख करून देणारे हे भावगीत आणि त्यात बाबुजींचा उर्फ सुधीर फडकेंचा स्वर्गीय माधुर्य चाखविणारा सुमधुर आवाज... 
गदिमांच्या ओघवत्या वाणीतील गीतरामायणापासून स्फूर्ती घेऊन कवीश्वरांनी गीतगोविंदची रचना केली होती व ."माना मानव वा परमेश्वर" आणि " विमोह त्यागुन कर्मफलाचा " ही दोन गीते बाबूजीनी गाऊन महाराष्ट्रभर गाजली होती. 

."माना मानव वा परमेश्वर" आणि हे गीत तसे बघायला गेले तर माझ्या खूप आवडीचे होते तरी काही काळापर्यंत कृष्णाच्या कार्याची उचित ओळख न पटल्याने कृष्णाचे अवघे आयुष्यच एक कोडे बनून राहिले होते. 

आपल्या भारतवर्षात भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण हे परमात्म्याचे दोन्ही अवतार अतिशय वंदनीय आहेत आणि पूजिले जातात. श्रीराम हा मर्यादापुरुषोत्तम , सत्यवचनी, एकपत्नीव्रत म्हणून गौरविला जातो तर निष्काम कर्मयोगाची महती गाणारी गीता अखिल मानवजातीला प्रदान करून भगवंताशी योग कसा जुळवायचा हे शिकविणारा योगेश्वर श्रीकृष्ण हा "कृष्णं वंदे जगदगुरुं " म्हणून गौरविला जातो. म्हणूनच भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण हे आजही प्रत्येकाच्या मनाला आकर्षित करणारे साक्षात महाविष्णूचे दोन श्रेष्ठ अवतार , दोन अत्यंत श्रेष्ठ महापुरुष म्हणून सदैव पूज्यनीयच आहेत. हे दोन्ही महान अवतार वेगळ्या वेगळ्या कार्याच्या उद्देश्याने ह्या वसुंधरेवर अवतरले होते. 

सुरुवातीच्या काही काळापर्यंत फलाशा , निष्काम कर्मयोग ह्या शब्दांचा अर्थच उचित पणे उमगला नव्हता आणि त्यामुळे -

"कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" ह्या भगवान श्रीकृष्णाच्या महावाक्याचे अनेकांनी लाविलेले अर्थ वाचून मी गोंधळात पडत असे. मला नेहमी कोडे पडत असे की समजा एखादा गरीब बिचारा शेतकरी वर्षभर शेतात राबून , अहोरात्र घाम गाळून शेतात धान्य पिकवितो आणि तो धान्य विकायला आल्यावर मी त्याला असा उपदेश करायचा का ? की "अरे बाबा शेतकर्‍या, शेतात अन्न पिकविणि हे तुझे कर्म आहे , ते तुला केलेच पाहिजे पण हे अन्नधान्य विकून पैसा मिळविण्याचा तुला अधिकार नाही कारण ती तर फलाशा आहे. " 
किंवा दुसरे उदाहरण बघायचे झाले तर विद्यार्थ्याला वर्षभर अभ्यास करायला सांगायचे आणि परीक्षेचा निकाल लागल्यावर तो जर नापास झाला तर त्याला सांगायचे की बाबा रे मुला/ मुली अभ्यास करणे हे तुझे विद्यार्थी म्हणून कर्तव्यच आहे, ते तुला भगवंताने नेमून दिलेले कर्मच आहे, पण परीक्षेत पास होणे किंवा नापास होणे ही फलाशा आहे , तू त्याचा मोह धरू नकोस आणि दु:खी होऊ नकोस. आणि त्यामुळेच        
काहीं ठिकाणी "मानवा तू कर्म करीत रहा , परंतु फळाची अपेक्षा ठेवू नकोस ." असा अर्थ वाचनात आला होता. परंतु मला काही हे पटत नसे भगवंत असे कसे सांगू शकतो? असा प्रश्न वारंवार सतावीत राही. 

सदगुरु हा नेहमीच अज्ञानरूपी अंध:काराचेच ज्ञानरूपी प्रकाशात रूपांतर करतो असे ऐकीवात होते आणि माझ्या जीवनाला माझ्या सदगुरु श्री अनिरुध्दसिंह जोशी म्हणजेच बापूंचा परीसस्पर्श लाधला आणि माझ्याही ह्या अज्ञानाचे सहजच निराकरण झाले त्यांच्या प्रवचनातून आणि ’श्रीमद्पुरुषार्थ: प्रथम खण्ड: - सत्यप्रवेश " वाचनातून !

कर्म केले की त्याचे फळ परमेश्वरी नियमांनुसार उत्पन्न होत असते ज्याप्रमाणे जमिनीत रोप लावले व त्याची नीट वाढ झाली तर त्याला फळे लागणारच पण त्याकरीता मला योग्य ते बी निवडावे लागते, योग्य ठिकाणी ते पेरावे लागते, त्याला योग्य त्या प्रमाणात पाणी घालावे लागते, त्याला व्यवस्थित पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल ह्याची काळजी घ्यावी लागते, तसेच उंदीर, घुशी त्याची मुळे खाणार नाही ह्याची काळजी घ्यावीच लागते. म्हणजेच ही सर्व कर्मे उचित प्रकारे करणे माझ्या म्हणजेच मानवाच्या हातात आहे. परंतु झाडाला किती फळे लागणार हे मात्र माझ्या हातात नाही. विशेष म्हणजे ज्या जातीचे बी लावले त्याच जातीची फळे येणार. मी पेरूचे झाड लावले तर त्याला पेरूच येणार , आंबे येणार नाही. मला आंबे हवे तर आंब्याचे झाड लावायला हवे. ह्याचाच अर्थ मला उचित कर्मफळ हवे तर उचित कर्म करायलाच हवे.        
             

श्रीसाईसच्चरितातील पहिल्या अध्यायात हेमाडपंत साईनाथांनी गहू दळून शिरडीवरील महामारीच्या संकटाचे कसे निवारण केले ही गोष्ट सांगताना माणूस फलाशेच्या मागे धावून कसे चुकीचे काम करून बसतो ह्याचे सुंदर रेखाटन केले आहे. सदगुरुतत्त्वाच्या लीला ह्या सामान्य माणसाला अगम्यच असतात. सदगुरु साईबाबा असेच एकदा गहू दळायला स्वत: बसतात. माझे सदगुरु एकटेच कष्ट घेतात ह्या प्रेमापोटी गावातील चार स्त्रिया ह्या बाबांच्या हातून जात्याचा खुंटा हिसकावून घेऊन स्वत: दळतात पण नंतर पायलीभर दलळेले पिठ पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटते आणि त्या बाबांना न विचारता चार वाटे करून ते पिठ स्वत:च्या घरे घेऊन जाण्याची तयारी करतात. अर्थातच साईबाबा त्यांना रागावून ते पिठ गावाच्या वेशीवर नेऊन टाकण्यास सांगतात आणि महामारीचे संकट टळते. पहिल्या अध्यायातील ह्या गोष्टीमध्ये त्या स्त्रियांनी फलाशा धरली आणि कर्म केले. मग त्यांनी नक्की फलाशाविरहीत कर्म करायला हवे होते म्हणजे काय ? ह्याचे सुंदर विवेचन मला "प्रत्यक्ष-मित्र " ह्या संकेतस्थळावर " श्रीसाईसच्चरित अध्याय १ (भाग ८) फलाशाविरहित कर्म " येथे वाचनात आले. 

कृष्णाने सांगितलेला निष्काम कर्मयोग म्हणजे काय ह्याचे सहज सोप्या भाषेत उत्तर मिळाले. भगवंताच्या , परमेश्वराच्या, सदगुरुंच्या चरणी अचल, अढळ विश्वास ठेवून आपले काम आपण करीत राहायचे, "तो" अनंत करूणामयी परमात्मा, सदगुरु हा संपूर्ण न्यायी आहेच आणि उचित वेळी "तो" माझ्या उचित कर्माला उचित फळ देणारच आहे ह्या विश्वासाने आपले कर्म करत राहणे म्हणजेच फलाशाविरहीत कर्म होय असे मला वाटते. जणू "प्रत्यक्ष -मित्र " सांगत होता भगवान श्रीकृष्ण सांगतात त्या "फलाशाविरहीत कर्मा" चा साधा सोपा सरळ अर्थ म्हणजे फक्त कर्मफलाकडे बघत राहून कर्माकडे दुर्लक्ष करू नकोस. तुझ्या कर्माच्या योग्य स्थितीनुसार तुला पूर्ण न्याय दिला जाईल , उचित फळ तुला उचित वेळी मिळणारच आहे, मात्र ते तुझ्या कलपनेनुसार असणार नाही  तर माझ्या अखिल ब्रम्हांडाला व्यापून उरणार्‍या कर्माच्या अटळ  सिध्दांतानुसारच असेल.      

आपल्या भारतभूमीला परकीयांच्या जोखडातून सोडविताना हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी अशीच आपल्या स्वत:च्या संसाराची , कोणत्याही वैयक्तिक मानापानाची, स्वार्थाची अपेक्षा न ठेवता स्वत:चे आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यवेदीवर अर्फण केले होते, आपल्या लाडक्या छत्रपती शिवरायांनी सदैव हिंदवी स्वराज्य स्थापताना " ही तो श्रींची इच्छा " असे मानूनच राज्य केले होते, श्रीरामांनी ऐन राज्याभिषेकाच्या वेळी पित्याने दिलेले वचन वृथा जाऊ नये म्हणून वल्कले धारण करून १४ वर्षे वनवास स्विकारला होता कोणत्याही राज्याचा वा राजसिंहासनचा मोह त्यागून आणि त्यांचाच आदर्श उरी बाळगून भरताने श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून सांभाळलेला राज्यकारभार , स्वत:च्या नावलौकिकाचा वा भोगी म्हणून उपहासिला जाण्याचा वा कलंक लागण्याची जराही पर्वा न बाळगता केवळ पतितांचा उध्दार करण्यासाठी नरकासुराच्या ताब्यातील बंदीवान सोळा सहस्त्र नारींना श्रीकृष्णाने वरणे - हेच ते फलाशाविरहीत कर्म असावे , नाही का बरे? 

श्रीसाईसच्चरीतातील हेमाडपंताची ओवी -
“प्रयत्न करणे माझे काम | यशदाता मंगलधाम |.अंती तोची देईल आराम | चिंतेचा उपशम होईल |”. 
ही फलाशाविरहीत कर्म म्हणजेच यशाची  गुरुकिल्ली असावी आणि मग खर्‍या अर्थाने "प्रत्यक्ष-मित्र" मदतीला धावून येतो भगवान श्रीकृष्णाचा फलाशाविरहीत कर्माला जीवनात आचरावे कसे हे समजावून देण्यासाठी....आणि मग पटते की कृष्णाने पार्थाला का उद्देश केला होता...
विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था |

संदर्भ :
१. श्रीसाईसच्चरीत 
२. श्रीमद्पुरुषार्थ: प्रथम खण्ड: - सत्यप्रवेश
३. https://youtu.be/uCPBO0Y8KNM
४. http://www.pratyaksha-mitra.com/shree-sai-satcharitra-adhyay1-part8-hindi/


2 comments:

  1. Ambadnya Suneetaveera
    Pratyaksha Mitra is really our friend for our lives teaching us falashaveerahit karma .
    Hari Om Shree Ram Ambadnya

    ReplyDelete
  2. Very elucidating post. The doubts on Karmanaye.... are obvious but with reference to Satyapravesh and Saicharita has been beautifully cleared in this post.

    Ambadnya

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog