Friday 15 July 2016

विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला

मुख दर्शन व्हावे । आता तू सकल जगाचा त्राता ।।
घे कुशीत या आता । ठेवितो पाऊली माथा ।।
माऊली माऊली ।  पुंडलिका वरदे हारी विठ्ठल ।।

आज आषाढी एकादशी , वारकर्‍यांचा अवर्णनीय आनंदाचा जल्लोष , त्यांच्या विठू माऊलीला भेटण्याची अनिवार ओढ , सर्व सुख-द:खांना पाठीशी टाकून एकमेव लाडक्या प्राणांहून प्रिय अशा सख्याला , जीवीच्या जिवलगाला भेटायसाठी उरी लागलेली अनामिक आर्तता , सदैव अमृतातेही पैजा जिंकी असे अवीट माधुर्याचे रसपान करणारी विठू माऊलीच्या चरणांची पिपासा आणि चंद्रभागेच्या तटी बेधुंद होऊन टाळ, मृदंग , वीणा, झांजाच्या तालावर थिरकणारी पावले ! 

जणू सारी संसाराची बंधने झुगारून , नाती झिडकारून  फक्त "त्या" एकमेव सावळ्या विठ्ठलाची आस उरी बाळगून  "तो " वारकरी वारी करत असतो...
म्हणूनच पंढरपूरच्या वेशीला लागताच , चंद्रभागेत "त्या"च्या प्रेमाने न्हाऊन निघता निघता वारकरी त्याच्या लाडक्या विठू माऊलीच्या दर्शनाने धन्य धन्य होतो , सुखावतो , आंतर्बाह्य ! तेव्हा देहभान हरपलेल्या ह्या जीवाला विठ्ठलाचे दर्शन भले ना होवो देवळात गाभार्‍यात भले न जाता येवो पण त्याच्या जीवनाचे सार्थक होते तो पंढरपूरच्या विठ्ठल मंदीराचा कळस पाहूनच !
खेळ मांडीयेला वाळंवटी काठी  नाचती वैष्णव गाती रे  
होतो जयजयकार गर्जत अंबर  मातले हे वैष्णव विरळे 

आणि म्हणूनच संत तुकोबा म्हणतात "तुका म्हणे सोपी केली पायवाट उतरावया भवसागर रे " 

संत तुकोबा, ज्ञानोबा, मानदेव, एकनाथ, जनाबाई, मीराबाई, कबीर , चोखामेळा , सोयराबाई अशी सारी संताची मांदियाळी एक्मुखाने, एकरवाने गर्जून "विठू माऊली" च्या नामाचा अगाध महिमा, तिच्या भक्तीप्रेमाच्या ऐश्वर्याचा गोडवा गाताना थकत नाही . हा भवसागर विना सायास तरून जाण्यासाठी सोपा एकमेव उपाय म्हणजे "त्या" च्या नामाचा !
अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग म्हणून दर्शन न घेताही सुख मानणारा आणि विठ्ठल मंदीराची पायरी ही न शिवू शकणारा (त्या काळच्या स्पृश्य-अस्पृश्य जातीभेदामुळे) तरीही विठूच्या प्रेमाने रंगून गाणारा
उंबरठ्यासी कैसी शिवू आम्ही जातीहीन, पायरीसी होऊ दंग गाऊनी अभंग  म्हणून विठूला कोणताही दोष न देता उलट त्याचे, त्याच्या प्रेमाचे गोडवेच गाणारा चोखामेळा,
दर्शन घेऊनही विठूची महती न जाणणार्‍या समाजाला विठूच्या रूपाची , त्याच्या सावळ्या रंगाची आणि प्रेमाची महती समजाविणारी सोयराबाई -
अवघा रंग एक झाला  । रंगी रंगला श्रीरंग  ।
एक तत्त्व नाम दृढ धरी  मना   । हरीसी करूणा येईल तुझी  
ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद   । वाचेसी सदगद जपे आधी 
 ही शिकवण देणारे तुकोबा,
हरी मुखे म्हणा । हरी मुखे म्हणा  । पुण्याची गणना कोण करी । म्हणून भक्तीच्या  वाटेवर बोट धरून चालविणारी   ज्ञानोबा माऊली अशा संतानी दाविलेल्या वाटेला आपले करणारे असंख्य वारकरी ह्याच "त्या"च्या चरणीच्या अनन्य भावाने शरणागत होऊन पंढरीची वाट दिंडीमधून चालतात अथकपणे, अविरत . अशाच
 बोल एका श्रेष्ठ वारकरी स्त्री भक्ताचे ( द्वारकामाई पाध्ये)  स्वानुभवाचे बोल मनाला स्पर्शून जातात -
 ज्याने धरिले हे पाय आणि ठेविला विश्वास  । त्यासी कधी ना अपाय  । सदा सुखाचा सहवास  ।



किती निर्मळ मन असते ह्या वारकर्‍यांचे, त्याच्यांसाठी त्यांची विठू माऊली म्हणजे जगातील एकमेव श्रेष्ठ नाते, भलेही संसारात, व्यवहारात आपल्या नातेवाईकांशी संबंध तुटले, दुरावले तरी त्यांना एक मात्र पुरते पक्के ठाऊक असते ते अंतिम सत्य की त्यांची माऊली त्यांना कधीच टाकणार नाही कारण "त्या " सावळ्याच्या प्रेमाने , त्यांच्या मनात एकविध भाव जागवलेला असतो , तोच त्यांना धीर देतो की -
आता नको नाती सारी  त्याचे पायी माझी वारी ।

संताचा हाच भाव , अनन्य शरणागती आपल्या सदगुरुंच्या ठायी ठेवणारा अशीच एक महान विभूती अगदी नजिकच्या काळात होऊन गेली ती म्हणजे श्रीसाईसच्चरीत ह्या महान , अपौरूषेय ग्रंथाचे विरचिते - श्री गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ साईबाबांचे लाडके हेमाडपंत !

आज १५ जुलै ! ८७ वर्षांपूर्वी १५ जुलै १९२९ साली हेमाडपंतांनी श्रीसाईबाबांच्या  चरणी  आपला देह समर्पित केला . आज ज्यांच्यामुळे परमार्थाची वाट गवसली, माझ्या जीवनाला सदगुरुंचा परीस स्पर्श लाधला त्या माझ्या अत्यंत लाडक्या हेमाडपंताची म्हणजेच श्रीसाईसच्चरितकार श्री.गोविंद रघुनाथ दाभोलकर उर्फ अण्णासाहेब ह्यांची पुण्यतिथी. त्यानिमित हेमाडपंताचे  पुण्यस्मरण करताना आजच्या दिवसाच्या योगायोगाचे नवल दाटले मनी ! 

संत जनाबाईसवे विठ्ठल दळ्ण दळू लागे अशा कथा लहानपणी आजीकडून ऐकल्या होत्या , तेव्हापासून विठ्ठल तर साक्षात देवबाप्पा ! मग तो कसा आपल्या भक्तासाठी धावून येतो आणि कसे त्याच्या कामात त्याला हातभार लावतो ह्याबद्दल अपार कौतुक मनात दाटले होते . कसा दिअसत असेल बरे हा पंढरीचा पाटील  ! हा तर वैकुंठाचा स्वामी , त्रिभुवनाचा जगजेठी , हा कसे बरे काम करेल , असे नानापरीचे कुतुहल मनात दाटे.

त्या सगळ्या गोष्टींचे साक्षात प्रत्यंतर मिळाले श्रीसाईसच्चरीत वाचताना ! हेमाडपंताच्या समर्थ , सदगुरुंच्या प्रेमाने आकंठ डुंबलेल्या लेखणीतून ! आपल्या सदगुरुची प्रत्येक गोष्ट, मग भले त्याचे हसणे, त्याचे बोलणे, त्याचे रागावणे, त्याचे चालणे ह्याचा आनंद कसा लुटाय़चा ह्याचे साग्रसंगीत रसाळ , मधुर अमृत पदोपदी चाखायला मिळतेच .

माझा सदगुरुचे चरण हेच माझ्यासाठी काशी, पंढरपूर , प्रयाग ! सर्व तीर्थक्षेत्रे माझ्या सदगुरु साईबाबांच्या चरणीच वास करतात हा अत्यंत सुंदर भक्तीचा अनन्य शरणागताचा भाव हेमाडपंताच्या प्रत्येक शब्दांतून अव्याहतपणे पाझरत राहतो. माझा गणपती तूच, , माझी सरस्वती तूच, माझा विठ्ठल ही तूच , माझा शंकरही तूच  ह्या अनन्य भावाला न्याहाळताना समोर त्या त्या देवतेचे आपसूक दर्शन सदगुरुंच्याच ठायी न घडले तरच नवल !

अशा हेमाडपंतांनी माझ्या साईनाथाने, माझ्या साईबाबाने गहू दळले कसे आणि त्या गव्हाच्या पिठातून चक्क शिरडी गावावर ओढावलेले महामारीचे संकटाचे कसे निरसन केले ह्याचे अगदी श्रीसाईसच्चरीताच्या पहिल्याच अध्यायात रसरशीत वर्णन केले आहे. मानवी पातळीवर अशक्य वाटणार्‍या गोष्टी सुध्दा माझे सदगुरु त्यांच्या  भक्तांवरील अथांग प्रेमापोटी कशा सहज लीलांद्वारे घडवून आणत व शक्यात उतरवीत ह्याची अल्पशी ओळख माझ्या सुमार बुध्दीला "त्या" घननीळ साईबाबांच्याच भक्तीने झाली होती .

तरी देखिल ह्या श्रीसाईनाथांच्या अगम्य लीलेत अजूनही अशा अगणित गोष्टींचे भांडार दडलेले असेल ह्याची पुसटशी जाणीव सुध्दा नव्हती कारण "त्या"च्या प्रेमाला पिण्याइतकी तहान लागली नव्हती, मनी ती आस, ती तृषा, ती पिपासा दाटली नव्हती. पण आजच्या ह्या आषाढी एकादशीच्या पुण्यप्रद पावन दिवशी "त्या " विठ्ठलाचे आपणही वारकरी व्हावे असा भाव मनी तीव्रतेने दाटला आणि "त्या" सावळ्याच्याच प्रेमाने,  "त्या" च्या चरणी नि:शंक मनाचे, नि:संशयी प्रेमाचे, अनन्य नाते कसे स्थापयाचे , त्याला कसे न्याहाळायचे ह्याची अमूल्य शिकवण देणारा एक लेख वाचनात आला.

माझ्या साईबाबांची प्रत्येक कृती ही कृपाच असते.कृपा म्हणजे कृतीला , क्रियेला पूर्णत्व देणारी !
माझा साईबाबा हा अनन्य प्रेमाचा , कृपेचा सागर आहेच मुळी - "कृपासिंधु"
पण माझी ती कृपा स्विकारण्याची तयारी हवी , मला त्या दृष्टीने त्याला न्याहाळता आले तर हा अगणित मोलाचा अमृतकुंभ मला गवसेल.

आपल्याला वाटेल साधे गव्हाचे दळण तर साईबाबांनी दळले , त्याचे काय एवढे कौतुक आणि त्यातून काय शिकायचे ? पण हेच जाणून घेण्यासाठी मला जो लेख अत्यंत लाख मोलाचा वाटला तो तुम्ही पण वाचून पहाच एकदा!

रोजच्या जीवनात असंख्य गोष्टी करण्याचे , एखादे कार्य करण्याचे आपण ठरवितो, त्यासाठी लागणार्‍या अनेक गोष्टींची जमवाजमव करतो तरी कधी कधी आपले कार्य नीट पार पडत नाही किंवा आपल्या गोष्टीला अपेक्षित यश मिळत नाही  वा अपेक्षित फळ मिळत नाही आणि आपण दुं:खी होतो, निराश होतो, उदास होतो. हा सर्व दुष्ट चक्रातून सुटायला मला जाणून घ्यायला हवे ते कोणत्याही कार्याच्या खर्‍या यशाचे गमक ! त्यातील बारकावे जे स्वत: माझा साईनाथ स्वत: कृतीतून मला शिकविण्यास सदातुर आहे , पण मीच करंटेपणाने त्याची उपेक्षा करतो, त्याच्या कडे दुर्लक्ष करतो आणि मग माझी झोळी फाटकी, मी कमनशिबी, मी  दुर्दैवी असे स्वत:ला दूषणे देत बसतो, त्यापेक्षा एकदा आपण फक्त थोडा वेळ काढून हा लेख वाचल्यास मला माझ्या कृतीला पूर्णत्व देणारा एकमेव रामबाण उपाय सापडेल- अगदी १०८ % सत्य !
आणि आनंदही गवसेल -
" विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला " म्हणजे नक्की काय असते ह्याचा जिवंत अनुभव !

श्रीसाईसच्चरीतात गवळीबुवांची कथा हेच आपल्याला शिकविते . "त्या" एकाच्या चरणी अनन्य भाव ! पंढरीचे वारी करणारे , आठ महीने पंढरीत आणि चार महीने गंगातटावर निवास करणारे ९५ वर्षांचे गवळीबुवा शिरडीत साईनाथांना न चुकता दरवर्षी भेटायला येत आणि त्यांच्या दर्शनाने पावन होऊन स्वत:ला धन्य धन्य मानीत आणि उद्गारत -
हाच तो  मूर्त पंढरीनाथ ।  अनाथनाथ दयाळ । 
धोत्रें नेसूनि रेशीमकानी ।  होतील काय संत कोणी ।   करूं लागती हाडांचे मणी  । रक्ताचें पाणी निजकष्टें । 
फुकाचा काय होईल देव  ।  हाचि हो प्रत्यक्ष पंढरीराव  । जग वेडें रे वेडें हा दृढ भाव ।  ठेवूनि देव लक्षावा ।। 

कारण पंढरीचा पळपुट्या विठ्ठल पाटील गवळीबुवांना भेटायला शिरडीतही साईबाबांच्या ठायी प्रकटत असे, मला असा विठ्ठ्ल भेटावा म्हणून आस लागली असेल तर "त्या" एकाला मला माझ्या सदगुरु साईबाबां मध्ये सुध्दा दर्शन घडते कारण मी त्याला भेटायला जितका तळमळतो , आतुरतो त्याच्या कैक अनंत पटींनी "तो" मला भेटायला धाव घेतो .मी एक पाऊल त्याच्या दिशेने टाकतो तेव्हा तो बाकीची ९९ पाऊले स्वत:च चालत नव्हे तर धावत येतो आणि मला कडेवर घेतो...

चला तर भेटू या आजच विठू माऊलीला आणि दळण दळताना आपण त्याच्या प्रेमाची , भक्तीची गीते गाऊ या हा लेख वाचून -
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/shree-sai-satcharitra-adhyay1-part36/

No comments:

Post a Comment

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog