Friday 29 July 2016

चला स्वावलंबी बनू, आत्मनिर्भर होऊ या ...

नुकताच २६ जुलै हा "कारगिल दिवस" हा भारतीयांनी अत्यंत अभिमानाने साजरा करीत आपल्या शहीद जवानांना मानवंदना देऊन त्यांच्या व असीम पराक्रम गाजविणार्‍या भारमातेच्या सुपुत्रांचा, वीरांचा उदो उदो केला. परंतु ह्याच कारगिलच्या युध्दात नामर्दपणे भेकड छुप्पे हल्ले चढविणार्‍यांवर यश मिळवायला अनेक जवानांना आपले रक्त सांडावे लागले आणि धारातीर्थी पडलेल्या आपल्या निधडया छातीच्या शूर लढवय्या वीर पुत्रांच्या बलिदानावर भारतमातेला आसवे ढाळावी लागली ती काही बाबतीत आपल्या मातृभूमीची आत्मनिर्भरता , आपली स्वावलंबी वृत्ती कमी पडल्याने असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
त्यावेळी भारताची स्वत:ची नेव्हीगेशन सिस्टीम नव्हती आणि शत्रूंच्या चौक्या हुड्कायला त्याची तर नितांत गरज होती. मैत्रीचा हात पुढे करणार्‍या अमेरीका ह्या मित्र देशाकडे आपण मागणी केली खरी , पण ती मदत नाकारली गेली. अर्थात आपल्या जवानांनी प्राणांची पर्वा न करता बाजी मारली खरी, पण स्वावलंबी असण्याची फार मोठी किंमत मोजावी लागलीच ! स्वावलंबी होण्याचा निर्धार करून मग भारताने स्वत:ची "नाविक जीपीएस यंत्रणा " विकसित केली आणि जगाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली.
                                                                    
संसार असो वा अध्यात्म माणसाने नेहमी आत्मनिर्भर असावे, स्वावलंबी असावे. "आपला हात जगन्नाथ" ही म्हण बहुधा ह्याच करीता प्रचलित झाली असावी. दुसर्‍यावर अवलंबून राहिल्याने आपल्याला अनेकदा तोंडघशी पडावे लागते, खूप मोठ्या नाचक्कीला कधी सामोरे जावे लागते. म्हणूनच खरा सदगुरु आपल्या शिष्याला, भक्ताला नेहमीच स्वावलंबी होण्याचा , आत्मनिर्भर होण्याचा कित्ता गिरवायला शिकवतो आणि तेही स्वत:च्या आचरणातून !
माणूस कोणतीही गोष्ट समोरच्या माणसाच्या कृतीतून , वागण्यातून पटकन , सहजरीत्या शिकू शकतो, पण तीच गोष्ट वाचून किंवा ऐकून समजणे कठीण बनते. म्हणूनच सदगुरु जेव्हा जेव्हा देहधारी असतात तेव्हा ते आपल्या स्वत:च्या वागण्यातून , चालण्या-बोलण्यातून ,सहज साध्या आचरणातून एखादी शिकवण आपल्या लेकरांच्या गळी सहज उतरविताना दिसतात.
आपल्या महात्मा गांधीजीनी स्वदेशीची चळवळ सुरु केली आणि आपल्या देशातील बनलेल्या खादी म्हणा सुती म्हणा कपड्यांवर भर देताना पहिल्यांदा स्वत: हातात चरखा घेऊन सूत कातले आणि मग इतरांना त्याचा मंत्र दिला होता असे इतिहास सांगतो.
तसेच आपल्याला आपले सदगुरु स्व आचरणातून शिकवण देतात.
भगवंत कृष्णाने गीतेत सांगितलेल्या "उध्दरेत आत्माना आत्मानं " ह्याचा अर्थ सदगुरुंच्या मार्गदर्शनानुसार स्वत:चा उध्दार स्वत: करावा असाच असावा.
सदगुरु साईनाथ आपल्या स्वत:च्या कृतीतून आपल्या भक्तांना अनेक शिकवणी सहजगत्या शिकवीत, कोणतेही काम ते आधी स्वत: करीत , मग दुसर्‍यांना करायला लावीत. श्रीसाईसच्चरीत ह्या ग्रंथाचे नावच मुळी साईबाबांचे आचरीत आणि त्यांच्या शिकवणीनुसार त्यांच्या भक्तांनी केलेले आचरण आहे असे दर्शविते.
हेमाडपंत ह्या अपौरूषेय ग्रंथातील प्रत्येक अध्यायांतून साईबाबांच्या ह्या लीला सहज सुंदर , सोप्या कृतीतून उलगडून दावतात. अगदी प्रथम अध्यायांत देखिल साईनाथ गहू दळायला स्वत: बसतात आणि स्वावलंबी होण्याचा, आत्मनिर्भर बनण्याचा महान संदेश स्वत:च्या आचरणातून देतात. खरेतर ह्या पहिल्या वहिल्या अध्यायांत एवढे गुपित , बाबांच्या लीलेमागील सखोल अर्थ जाणायला मी य:कश्चित पामर खरेतर समर्थ नव्हतेच. आंतरजालाच्या अजीबो गरीब गारूड्याच्या पोतडीतून अशी दुर्मिळ रत्ने कधी कधी हाती लागतात , सैरसपाटा करताना, तशीच माझी गत झाली.
श्रीसाईसच्चरीतातील साईनाथांच्या अद्भुत शिकवणीचा सखोल अर्थच लेखकाने समोर प्रस्तुत केला आणि समोर सदगुरुंच्या घरचे गारूड  उकलले गेले. उध्द्वा अजब तुझे सरकार !
ह्या सरकारची लीला लई न्यारी बघा . सत्य, प्रेम, आनंदाच्या कृपेच्या अमृताचा एखादा तरी थेंब चाखला तरी जीवन सुमधूर होते..    ह्या गुरुमाऊलीचे रूप न्याहाळायला, त्याचे रसपान करायलाच हवे नाही का बरे?
चला तर मग-
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/shree-sai-satcharitra-adhyay1-part38/

1 comment:

  1. Yes very true, self reliance is important aspect in every once life.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog