Sunday 11 December 2016

नर देही नरसिंह | प्रगटला तरूपोटी | नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्या गती | |

नर देही नरसिंह  | प्रगटला तरूपोटी |
नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्या गती | |
रामानुजांनी लिहिलेल्या अक्कलकोट स्वामींचे स्तवनातील ह्या ओळी वाचून सदगुरुंचा मानवाचा उध्दार करण्याकरिता अविरत ,अखंडित वाहत असलेला कळवळा , त्यांचे भक्त-अभक्तांच्या हितासाठी कळवणारे मातृहृदयच दावितो. 

बहुतेक आपण सर्वांनीच भक्त प्रल्हादाची आणि त्याच्या वडिलांची म्हणजे हिरण्यकश्यपूचे कथा  लहानपणी ऐकली किंवा वाचली असेलच, ऋषी कश्यपांना दोन पत्नी होत्या. त्यांची प्रथम पत्नी अदितिमति आणि द्वितीय पत्नी दिति होती. अदितिमतिचे लावण्य अप्रतिम होते . हिमालय पर्वताच्या कुशीतील कश्यप ऋषींच्या पिता असलेल्या मरीचि ऋषिंच्या आश्रमामध्ये राहून  ती तपसाधना आणि गुरुकुलसेवा करीत असे,ज्यामुळे अदितिमतिचे सौंदर्य पवित्र तेजाने युक्त होते. ती आपल्या पतीला कश्यप ऋषींना भेटण्यासाठी येते , तेव्हा सर्व ऋषिवर व सम्राट तिला आदराने प्रणाम करतात.

कश्यप ऋषिंची दुसरी पत्नी दितिही अतिशय सुंदर होती ,पण आपले सौंदर्य जपण्यासाठी द्रव्य व औषधींचा व योगसाधनांचा नित्य उपयोग करणे ह्या तिच्या छंदामुळे तिचे लक्ष पति कश्यपाची सेवा, परमेश्वर भक्ती, य याग व गुरुकुलाची देखरेख ह्यावरून पूर्णपणे उडाले होते. अर्थातच ह्यामुळे आपल्या सवतीचे अदितिमतिची इतरांनी केलेली स्तुती पाहून दितिला खेद वाटू लागतो व ह्या खेदाचेच रूपांतर दु:खात होते. दिती सतत अदितिमतिशी स्वत:ची तुलना करू लागते. त्यातच काही काळानंतर अदितिमतिचे ३३ पुत्र कश्यपांच्या आश्रमात येतात. ह्या ३३ पुत्रांना त्यांच्या दिव्य तपोबलामुळे ’देव’ असे म्हणत. ह्या ३३ देवांचे सौंदर्य व तेज पाहून दितिचे मनातील दु:खाचे रूपांतर द्वेषात झाले. ऋषि कश्यपांनी दितिला ’अशी तुलना व स्पर्धा करू नकोस ’ असा उचित सल्ला दिला, पण ’माझे सौंदर्य विश्वात सर्वश्रेष्ठ असले पाहिजे ’ ह्या स्वसौंदर्याच्या श्रेष्ठत्वाच्या आपल्या हट्टापुढे तो दितिने धुडकावून लावला. त्यामुळे कश्यपांनी तिला तपश्चर्या करण्यास सांगितले.   

परंतु दितिचे मन खेद, दु:ख व द्वेषाने खच्चून भरून गेल्यामुळे तिला एकाग्र मनाने तपश्चर्या जमेना. ’आपण आता कधीच अदितिमतिएवढ्या सुंदर होऊ शकणार नाही ’ह्या जाणिवेने दितिच्या मनात प्रखर क्रोध व प्रचंड मत्सर निर्माण झाला. ह्या मत्सर, द्वेष , तुलनेत वाहून गेल्यामुळे दितिकडे ईश्वरभक्ती उरली नाही आणि त्यामुळे दितिचे ६६ पुत्रही तिच्यासारखेच अभक्त अर्थात श्रध्दाहीन बनले आणि जन्मत:च दितिच्या श्रेष्ठत्वाचा गर्व, क्रोध , व मत्सर ह्या गुणांनी युक्त होते,  दितिचे हे ६६ पुत्र ’दैत्य’ नावाने ओळखले जाऊ लागले. हे ६६ दैत्यही आपल्या आईप्रमाणेच मत्सरी होते आणि सतत आपल्या सावत्र भावंडांचा म्हणजेच ३३ देवांना कसे हरविता येईल ह्याच विचारांनी मोठे झाले.  

दितिच्या ह्या ६६ पुत्रांपैकी प्रथम पुत्र ’हिरण्याक्ष’, तर द्वितीय पुत्र ’हिरण्यकश्यपु’ हा होता. आपण ’दशावतराच्या आरतीत " गातो कि दाढे धरूनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी’ हे स्वत:च्या आसुरी  सामर्थ्याने  पृथ्वीला पळवून नेण्याचे कुकर्म हिरण्याक्ष दैत्याने केल्यामुळे परमात्म्याने म्हणजेच महाविष्णूने त्याचा वध केला. त्यामुळे उरलेले ६५ दैत्य नुसते श्रध्दाहीनच नव्हे, तर महाविष्णूचे शत्रू बनले. 

अर्थातच हिरण्यकश्यपु आता स्वत:च्या भावाच्या वधामुळे सूडाने पेटून उठला होता आणि त्याने आपल्या राज्यात महाविष्णूचे नाव घेण्यावर , पूजा करण्यावर बंदी घातली होती. स्वत:ला परमात्मा म्हणजेच सर्व विश्वाचा नियंता , भगवान म्हनून सिध्द करण्याची हिरण्यकश्यपुची प्रबळ इच्छा होती. ह्या हिरण्यकश्यपुचे लग्न ’कयाधु’ नावाच्या ऋषिकन्येशी झाले होते , जी महाविष्णुची निस्सीम भक्त होती . पुढे तिच्याच प्रबळ भक्तीभावातूनच त्यांच्या जगद्विख्यात पवित्र पुत्र ’प्रल्हाद’ ह्याचा जन्म झाला. 

आपल्या मातेकडून महाविष्णूच्या भक्तीचे बाळकडू मिळालेला प्रल्हादही महाविष्णुचा भक्त बनू लागला . प्रल्हाद आपल्या पित्याच्या हिरण्यकश्यपुच्या प्रचंड विरोधाला आणि अमानुष हाल-अत्याचारांनीही न भिता, डगमगता महाविष्णुची अविचल भक्ती करू लागला होता आणि शेवटी ’प्रल्हादाकारणें स्तंभी नरहरी गुर गुरसी ’ ह्या नुसार आपले भक्तवत्सल , दीनदयाळ , शरणागतवत्सल ब्रीद सदैव सांभाळणारा परमात्मा महाविष्णु आपल्या भक्ताच्या शब्दाला झेलण्यासाठी प्रगटतोच  हिरण्यकश्यपुने लाथ मारलेल्या राजमहालाच्या स्तंभातून ! 


शेवटी हिरण्यकश्यपुने ब्रम्हदेवाकडून स्वत:च्या मृत्यूबाबत घातलेल्या व त्याला अशक्य वाटणार्‍या सर्व  बंधनाना पाळूनही महाविष्णु त्याला स्वत:च्या मांडीवर घेऊन आपल्या सिंहनखांनी त्याचे पोट फाडून त्याचा वध करतोच .
वैरापोटी हिरण्यकश्यपु परमात्म्यालाच आपला शत्रू मानतो आणि मृत्युच्या दारी जातो खरा , परंतु "तो" अकारण्य कारूण्याचा पुतळा असलेला, ’लाभेवीण प्रेम आणि केवळ प्रेमच’ करणारा परमात्मा महाविष्णु त्याला मरतानाही आस्तिकाची गतीच देतो.  
नर देही नरसिंह  | प्रगटला तरूपोटी |
नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्या गती | |  

अक्कलकोट स्वामींच्या बखरीत अशा अनेक कथा वाचण्यात येतात की जेथे माणूस आपल्या ज्ञानाच्या अंहकारापोटी , पैशाच्या अभिमानापोटी साक्षात परब्रम्ह असलेल्या स्वामींची निंदा करीत, अपमान करीत . परंतु अत्यंत करूणामयी अशी सदगुरुमाऊली मात्र अशा दांभिकांना, नास्तिकांनाही त्यांच्या अंहकाराचे निर्दालन करून स्वत:च्या चरणीं शरण येण्यास भाग पाडीत. नरसिंहाप्रमाणे उग्र , कराल, भयावह रूप धारण करून क्रोध जरी धारण केला तरी नास्तिकाने वा अज्ञानापोटी अंहकाराने बरळणार्‍या माणसांना स्वामी त्वरीत वठणीवर आणीत. 

विज्ञानामुळे किंवा पवित्र चिंतनामुळे माणसाला स्वत:च्या मूळ स्थानाचा शोध घ्यवासा वाटतो , व तो तसा प्रयास करीत राहतो . कुणी त्याला सगुण साकार सावळे परब्रम्ह म्हणते तर कुणी निर्गुण निराकार म्हणून ’ त्या’ एकाचीच उपासना करतात. सत्य, प्रेम व पावित्र्य ह्या तीन मूळ गुणांवर ज्याचे अधिष्ठान आहे, जो ह्या त्रिसूत्रीचा उद्गाता आहे तेच मानावाचे मूळ स्थान आहे. कोणी त्याला आदिमाता चण्डिका म्हणून पूजते, तर कुणी दत्तगुरु तर कुणी राम , कृष्ण म्हणून तर कुणी दत्तावतार स्वामी-समर्थ  तर कुणी साईबाबा तर कुणी आदिमाता दुर्गा तर कुणी महिषासुरमर्दिनी तर कुणी गणपती तर कुणी शिव तर कुणी महाविष्णू ! अर्थात हा ज्याच्या त्याच्या मनाचा , श्रध्देचा भाग असतो. 

स्वामीसमर्थ  देवपूजा , देवाच्या नावाखाली , स्वत:च्या अज्ञानापोटी, दांभिकता मिरवणार्‍या भोंदू प्रवृत्तींवर कडाडून हल्ला चढवित. "पूजा अर्चा भस्म माळा अंतरंगी कामचाळा ऐसा मिळेना  सावळा फुका कष्टविता गळा " ह्याचे जणू जिवंत प्रत्यंतरच देत . रोकडी प्रचिती मिळाली की आपसूक विपरीत बुध्दी ताळ्यावर येत असे.

ह्या अफाट विश्वपसार्‍यात जे काही घडले, जे घडत आहे त्याच्या पाठी एक सुनिश्चित सुसूत्रता आहे , एक नियमित शिस्त आहे, तसेच एक "सत्य, प्रेम व पावित्र्य" ह्या त्रिसूत्रीला अनुसरून एक उदात्त हेतू आहे ह्याची ज्याला जाणीव होते ती "आस्तिक्यबुध्दी" तर ह्याउलट जगात जे घडते ते सर्व आपोआप घडते किंवा योगायोगाने घडते , घडले आहे असे म्हणणे म्हणजे "नास्तिक्यबुध्दी".

अक्कलकोट स्वामी समर्थांच्या बखरीतील २४५व्या कथेत आपण वाचतो की संकेश्वर मठाचे श्रीमत शंकराचार्य फिरत फिरत अक्कलकोटला येतात तेव्हा श्रीमंत मालोजीराजे त्यांची सर्व व्यवस्था योग्य रीतीने ठेवतात, षोडशोपचार पूजा करवितात, मोठ्या थाटाने भोजन समारंभ आयोजित करतात . परंतु सर्व जगाचे आदिकारण असलेल्या श्रीस्वामीसमर्थांची स्वारी चोळप्पासह तेथे जातात , तेव्हा त्या ठिकाणी ना कोणी त्यांचे आदरातिथ्य करीत ना कोणी बसण्यास साधे आसनही देत. त्यातील एक वृध्द ब्राम्हण जेव्हा स्वामींना हातांत हात धरून आदराने पाटावर बसवितो, तेव्हा सर्व ब्राम्हण आपापसांत कुजबूजतात कीं ," हे संन्यासी पाहिजे त्याकडे अन्न कातात, करितां यांचे पान पंक्तीच्या बाहेर ठेंवा. "अतिथीदेवो भव: " असलेली आपली वैदिक संस्कृती ! पण .....
पुढें चमत्कार होतो आणि संकल्प सुटायच्या वेळेला पक्वानांनी वाढलेल्या पात्रांत अन्नाऐवजी किडे बुजबुजू लागतात. तेव्हा सर्वच जण बुचकाळ्यात पडतात हे अद्भुत काय झालें? शेवटी तो वृध्द ब्राम्हण सांगतो की ," प्रत्यक्ष दत्त्ताचा अनादर झाला, म्हणून असें झालें !" हे ऐकून आचार्य सिंहासनावरून उठून श्रीस्वामीसमर्थां समोर बसून प्रार्थना करतात व क्षमा मागतात तेव्हा स्वामीसमर्थ चांगलीच कानउघाडणी करतात. अर्थातच श्रींचे भाषण ऐकून सर्व शास्त्री तोंडे खाली घालतात व एकदम जाऊंन श्रींचे चरण धरतात व अपराधाची क्षमा मागतात. तेव्हा करूणानिधन स्वामींस दया येऊन अनातील किडे नाहीसे होऊन अन्न पूर्ववत होते. 

असेच २५७व्या कथेतील मल्लिकार्जुन जंगम गर्वापोटी स्वामींना साधा पायातले पायतण काढून नमस्कारही करीत नाही तेव्हा स्वामी त्याच्या अंतरातील गर्वासहीत संशय जाणून म्हणतात ," अरे, आमची पंचाईत करूं नकोस. पायां पडलास अथवा न पडलास , तरी आम्हांस गरज नाहीं." असें श्रींचे अंतसाक्षित्त्वाचे भाषण ऐकून जंगाम पाण्यातील ढेकळांप्रमाणे विरघळतों आणि श्रींस साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना करतो.

म्हणजेच "त्या" एकमेवाद्वितीय अंतिम जगत्कारणाला न मानण्याची नास्तिक्यबुध्दी दूर करून , त्यांच्या कुमतीवरील अज्ञानापोटी त्यांनीच घातलेले मायेचे पडळ दूर सारून त्या त्या माणसांना स्वामींनी आस्तिक्यबुध्दी प्रदान केली व आस्तिकाची गती दिली होती.

अखिल जगतात आजही वंदनीय आणि पूज्यनीय असलेले "रामायण" हे अजरामर महाकाव्य लिहिणारा वाल्याकोळी हा आधी असाच नास्तिक्यबुध्दी धारण करून उदरभरणाकरिता वाटपाड्या बनला होता, अगणित दरोडे घालून आणि असंख्य माणसांना लुबाडून , मारून तो आपले व आपल्या कुटूंबाचे पोट भरीत असे. त्याच्या जीवनाला जेव्हा सदगुरु नारदमुनींचा परीस स्पर्श झाला तेव्हा त्याची नास्तिक्यबुध्दी विलयाला गेली व परमात्मा रामाच्या जन्माआधीच वाल्मिकी महर्षि बनून तो आस्तिक्यबुध्दीने "रामायण " लिहीता झाला.

अपौरूषेय ग्रंथ असलेल्या "श्रीसाईसच्चरीत " ह्या मध्येही हेमाडपंत आपल्याला रूद्राध्याय म्हणून गणल्या जाणार्‍या ११व्या अध्यायांत अशीच एका अंहकारापोटी "नास्तिक्यबुध्दी" धारण करून , मक्का -मदीना केल्याचा ताठा वाहणार्‍या दर्शनास आलेल्या वृध्द हाजी सिदीक फाळके ह्यास सदगुरु साईबाबा ९ महीने ताटकळत ठेवतात, पण प्रत्यक्ष मशीदीत येऊन दर्शन घेण्यास त्याला मनाई असते. 

मक्का- मदीना केल्याचा ताठा त्या वृध्द हाजी फाळकेला वाटत असतो. मक्का- मदीना यात्रेला प्रचंड पैसा आपण खर्च करून आपण पुण्य मिळविले म्हणजे आपण खूप पुण्यवान झालो, आपण कुराण पढतो म्हणजे आपल्याला सर्व काही ज्ञान आहे ह्या  अज्ञानापोटी व नास्तिक्यबुध्दीच्या बळावर त्याला वाटते की मला शिरडीत सहज दर्शन मिळेल. पण "कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी , हृदयातील भगवंत राहिला हृदत्यातून उपाशी " ह्या न्यायाने "भाव तोचि देव" असलेला परमात्मा साईनाथ हाजीला तब्बल ९ महीने प्रत्यक्ष दर्शन देतच नाही.

शिव हा नेहमी आपल्या लेकरांसाठी रूद्र आणि भद्र रूप एकाचे वेळी धारण करतो असे सद्गुरु डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांनी त्यांच्या पितृवचनांत दिनां ०७-०४-२०१६ रोजी सांगितले असल्याचे वाचले होते. शिव नाम सर्वात पवित्र आहे. शं बीज धारण करणारा हा शिव असतो कर्पूरगौर ! कर्पूरगौर म्हणजे कापरासारखा शुभ्र , धवल , एकही दाग नसलेला ! शं बीज धारण करणारा हा भोलेनाथ भगवान  शिव शांती देतो आपल्या श्रध्दावान भक्तांना . माणसाच्या मनात शांती नसेल तर तृप्ती आणि समाधान लाभणे दुर्मिळच असते नाही का बरे? शिव हा शं करोति इति शंकर: म्हणजे शमन करणारा शिव आहे, ’तो" दमन नाही करीत तर शमन करतो. 

शांती नसलेले मन किती बेचैन असते आपण सारेच अनुभवतो. कोणत्याही गोष्टीचे, वासनेचे, दुष्ट प्रवृतीचे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आदी माणसाच्या सहा शत्रूंचे दमन होऊन चालत नाही कारण त्या दुषप्रवृत्ती पुन्हा पुन्हा डोके वर काढून माणसाला त्रास देतात, छळत राहतात , त्यांचे शमनच व्हावे लागते. 

भगवान शिवाच्या हातात त्रिशूळ असतो. त्याचे रूद्र स्वरूप हे असुर, राक्षस , श्रध्दाहीन , दुराचारी ह्यांच्यासाठी असते तर भद्र स्वरूप हे श्रध्दावानांसाठी , भक्तांसाठी असते. एखादा माणूस जेव्हा श्रध्दावान असतो, चुका करतो, आणि मग त्याला आपली चूक कळते,  पश्चाताप होतो आणि तो भगवंताकडे माफी मागतो , क्षमा मागतो, आपल्या चुकांची , अपराधांची कबूली देतो तेव्हा हे शिवाचे भद्र स्वरूप त्याच्या मदतीला तत्काळ धावून येते.
अनसूयो अत्री संम्भूतो दत्तात्रेयो दिगंबर:   |
स्मर्तुगामी स्वभक्तानां उध्दरता भवसंकटात्   |  | 
असा हा स्मर्तुगामी  - स्मरणासवे गर्जत , धावत येणारा ! 

हाजी फाळकेच्या कथेत आपण वाचतो की साईबाबा त्यांच्या लाडक्या शाम्याकरवी हाजीला प्रश्न विचारतात की तू बारवीपलिकडील वाट चालून येशील का? हाजी स्वत:च्या अनाठायी अभिमानाने उत्तर देतो की कितीही कठीण असली तरी मी ती वाट चालत येईन.  परंतु मला प्रत्यक्ष भेट द्या आणि आपल्या चरणांनिकट बसू द्या.  वरकरणी पाहता आपल्याला वाटते की हाजी  साईनाथांच्या भेटीसाठी आसुसलेला आहे आणि तो काहीही करायला तयार आहे .

येथे मला संत तुलसीदासविरचिते सुंदरकांडातील समुद्राचे वागणे आठवते. जेव्हा रामदूत हनुमंत सीतामाईंच्या शोधार्थ रामेश्वराहून लंकेला जायला उड्डाण करतो , तेव्हा वाटेत हा समुद्र हा उड्डाण करणारा रामदूत आहे असा विचार करून ( परमात्मा श्रीरामांचे महत्त्व जाणून , त्यांच्या दूताचाही आदर करण्याच्या पवित्र भावनेने ) मैनाक पर्वताला सांगतो की तू ह्याचा थकवा दूर करणारा हो (श्रीराम दूत हनुमंताला तुझ्यावर विसावू दे.) 
जलनिधी रघुपतिदूत बिचारी  |  तैं मैनाक होहि श्रमहारी  | 

परंतु तेच साक्षात प्रभू श्रीराम आपल्या मित्र सुग्रीवाच्या नेतृत्त्वाखालील  विशालकाय वानरसैन्यासह समुद्रकिनारी पोहचतात आणि शरणागत बनून आश्रयास आलेल्या रावणबंधू बिभीषणाचा मित्रत्त्वाचा सल्ला ऐकतात. पुढे श्रीराम आपल्याला वानरसैन्यासह समुद्र ओलांडून पैलतीरी लंकेत जाण्यासाठी वाट देण्यासाठी समुद्राला नमस्कार करून विनंती करतात व समुद्रकिनारी दर्भासनावर त्याच्या उत्तराची वाट पहात बसतात, तेव्हा हाच समुद्र स्वत:चा वृथा अभिमान बाळगून तीन दिवस उलटले तरी देखिल कोणतेही उत्तर देण्यास तयार नसतो. अर्थातच पुढे श्रीरामांनी अग्नीबाण उचलताच शरणागतीचे ढोंग करून स्वत:ची सुटकाही करून घेतोच.

तसेच मला वाटते की हाजी फाळके आधी ९ महीने वाट पाहून स्वत’ची श्रध्दा व सबूरी दाखवितो असे प्रथमदर्शनी आपल्याला वाटू शकते. मग हाजीला कोणी सांगते की साईबाबांची प्रत्यक्ष भेट व्हावी म्हणून साईबाबांच्या शामाला भेट व तसे हाजी शाम्याला गळ घालतो. येथे हेमाडपंत म्हणतात शिरडीवासीयांचा भाव असतो की भगवान शंकराच्या दर्शनाआधी जसे नंदीचे दर्शन घ्यावे तशा भावाने साईबाबांच्या आधी शामाकडे जावे. 

भगवान शंकराला भेटायच्या आधी नंदीचे दर्शन - प्रत्यक्षात नंदी हा वृषभ (बैल) नसून तो प्रत्यक्षात एक श्रेष्ठ ऋषी होता, ज्याने भगवान शंकराच्या असीम भक्तीने आपण शंकराचे वाहन व्हावे असा संकल्प केला आणि तसा वर मिळविला होता.  नंदी ऋषी आपल्याला भक्तीच्या ह्याच अत्युच्च शिखराची आठवण करून देतात की मला माझ्या भगवंतासाठी , सदगुरुसाठी त्याचे वाहन होणेही मान्य असावे इतुकी भक्ती हवी. साईबाबांचा शामा असाच होता भक्तीतले अत्युच्च असे एक शिखर - जेथे फक्त माझे साईबाबा आणि मी त्यांचा हाच भाव ! निस्सीम भक्तीचे शामा एक उदाहरण आहे ज्याच्या साईनाथांच्या वरील भक्तीला कोणत्याही सीमेचे बंधनच मुळी नव्हते. माधवराव उर्फ शामाची भक्ती निराकार आहे ,सर्व दिशांनी निराकार, जिला सीमा नाही अशी अपरंपार, अनंत भक्ती! तिला कसलाही आकार नाही, या भक्तीला आपण  कुठल्याही नवविधा भक्तींमध्ये बसवू शकत नाही. 

शामाची साईबाबांवर निस्सीम भक्ती तशीच साईबाबांचे शामावर निस्सीम प्रेम होते. साईबाबा स्वत: शामाविषयी उद्गारतात अध्याय २७ मध्ये-
माझा शामा असेल खुळा  |  परी मजला तयाचा लळा  | 
लोभ लावी जीवा आगळा  |  तयाचा कळवळा मज मोठा  |  | 
ज्याला सदगुरु स्वत: माझा म्हणतो, , जो मला इतर जीवांपेक्षा आगळा लोभ लावतो असे म्हणतो त्याची भक्तीही तशीच आहे म्हणूनच ना !
म्हणूनच एकमेव शामाला साईबाबांशी सलगीने , अत्यंत लडिवाळपणाने वागण्याचा , त्यांना "अरेतुरे " करून संबोधण्याचा अधिकार साईबाबांनी स्वत:च दिला होता हे आपण श्रीसाईसच्चरितात वाचतो. 

मग हाजी शामाला भेटतो आणि शामा साईबाबांकडे हाजीला दर्शन देण्यासाठी शब्द टाकतात. पुढे शामाच्या आग्रहाखातर साईबाबा तयार होतात आणि साईबाबा शामाकरवी विचारतात की ," असो बारवीपलीकडे थेट आहे जी एक पाऊलवाट चालूनि येसील काय तूं  नीट विचार जा स्पष्ट तयातें "  पण ज्या क्षणी साईबाबा दर्शन द्यायला तयार झाल्याचे कळते तो आपला वृथा अभिमान मध्ये घुसवितो. तुम्ही काही सांगाल ते मी सर्व करेन , पण मी जे मागतो ते मला तुम्ही जर देणार असाल तर ... हा तर चक्क व्यवहार झाला ना? निष्काम सदगुरुला कशाचाच काम नसतो मुळी. 

पुढे  साईबाबा विचारतात की, " तू मला चार वेळांती चार हजार रुपये देशील का?"  ह्याचेही उत्तर हाजी कसे देतो बघा की हे काय पुसतां. देईन चाळीस लाख ही मागतां , हजारांची कथा काय ? पैशाच्या दंभाचे हे प्रदर्शन नाही का ? ज्याच्या भ्रूकुटीचा एक केस जरी इवलासा हलला तरी रंकाचा राव वा रावाचा रंक होऊ शकतो "त्या" एकमेवाद्वितीय जगज्जेठीपुढे ही अरेरावी नाही का ?
आठवा बरे दामाजी पंताच्या मदतीसाठी धावलेला विठू महार - (पुढचे पाऊल "  ह्या १९५० च्या  माणिक चित्रच्या चित्रपटातील -
झाला महार पंढरीनाथ काय देवाची सांगू मात 
नेसला मलीन चिंधोटी घेतली हातामध्ये काठी
घोंगडी टाकिली पाठी करी जोहार दरबारात
मुंडाशात बांधली चिठी फिकतो दुरून जगजेठी
दामाजीनं विकली जी कोठी त्याचं घ्यावं दाम पदरात
खळखळा ओतिल्या मोहरा घ्या जी मोजून पावती करा
ढीग बघून चमकल्या नजरा शहा घाली बोट तोंडात

"त्या" सदगुरुंपुढे मान झुकवून लीन व्हायचे, का "त्या" लाच आपण आव्हाने द्यायचे , पैशाचा माज दाखवायचा ? हाजीने नुसते चाळीस लाख  देण्याचे कबूल केले असते तर गोष्ट वेगळी होती. पण येथे तो बोलतो हजारांची कथा काय? ही स्पष्ट अंहकाराची दर्पोक्तीच नाही का?

तरीही साईबाबा पुन्हा एकवार संधी देतात की ," आज आमचा मशीदीत बोकड कापावयाचा मानस (विचार ) आहे , तुला कय गोस (बोकडाचे मांस ) पाहिजे किंवा तुला काय अस्थि पाहिजे की तुला चित्तीं वृषणवासना आहे ? शाम्याला बाबा सांगतात जा जाऊन त्या म्हातार्‍याला नक्की काय पाहिजे ते विचार,"
शामाने बाबांचा निरोप देता ह्यातील काही न मागता, हाजी सांगतो मला ह्यातले काही नको. तुमच्या चित्तीं असेल तर मला तुमच्या कोळंब्यातील तुकडा द्या, ज्याने मी कृतकल्याणता पावेन.
मग मात्र अंतर्साक्षी , सर्वांच्या हृदयातले जाणणारा साईनाथ रूद्र रूप धारण करतो. स्वत:च्या हातांनी कोळंबा व पाण्याच्या घागरी उचलून भिरकावून देतो आणि हात कराकरा चावून हाजीच्या शेजारी येतात. हाजीसन्मुख उभे राहून स्वत::च्या हातांनी आपली कफनी दोन्ही करांनी उचलून, म्हणतात , " तू काय समजलास मला  अंतरी, माझ्यापुढे फुशारी मारतोस, बुढ्ढेपणाचा तोरा दावतोस, तू असेच कुराण वाचलेस का? मक्का केल्याचा ताठा बाहतोस, पण तू मला जाणत नाहीस."
सर्वसाक्षी आहे बापू  तो काय जाणेना | 
परी  वर्ते मानव बनूनी म्हणे मी अजाणता |  | 
सदगुरु हा त्याच्या लेकरांचा बाबा, बापू ( माय बाप ) सर्वकाही असतो. त्वमेव माता पिता त्वमेव !
नंतर साईबाबांनी अवाच्य शब्दप्रहार करून हाजीची निर्भत्सना केली. त्यावर हाजी गांगरून गेला आपले पितळ उघडे पडलेले पाहून . बाबा माघारा मशीदीत परतले व अंगणी आंब्याच्या पाट्या घेऊन आलेल्या माळिणींकडून समस्त ( सर्व) आंब्याच्या पाट्या खरेदी करून ( स्वपैशाने) त्या हाजीस पाठविल्या तत्त्वतां एवढेच नव्हे तर तात्काळ तसेच ते आल्या पावली , उलट मागे फिरले आणि हाजी फाळक्यांपाशी जाऊन त्यांनी त्याला स्वत:च्या खिशांतील ५५ रुपये हातावर मोजून दिले. झालेला सर्व प्रकार अवघा विसरून हाजीला साईबाबांनी प्रेमाने जेवायला निमंत्रण दिले ...
माझा अनिरूध्द प्रेमळा  |  त्याला माझिया कळवळा |  | 
खरोखरी माझ्या सदगुरुंचे माझ्यावर अनिरूध्द गतीने धावणारे प्रेम असते , अनिरूध्द म्हणजे ज्याला कधीही , कुणीही , कुठेही कधीच रोखू , अडवू शकत नाही असा "तो" एकमेव - अनिरूध्द प्रेमळा - फक्त आपल्या भक्तांसाठी , लेकरांसाठी सदैव धाव घेणारा , अनिरूध्द गतीने धावणारा !

प्रभू श्रीराम असेच सीतामाईचा शोध घेताना, स्वत:चे पत्नीवियोगाचे असीम दु;ख पाठीवर टाकून , वाट वाकडी करून , असंख्य वर्षे वाट पाहणार्‍या शबरी मातेला भेट द्यावयास गेले होते पंपा सरोवराच्या काठी असलेल्या तिच्या कुटीमध्ये , ते असेच अनिरूध प्रेमळा बनून, अनिरूध्द गतीनेच !

महाभारत युध्द घडू नये म्हणून कौरवांना अंतिम संधी देण्यासाठी पांडवांचा दूत बनून भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाच्या राजदरबारी जातात , तेव्हा राजगृहात पाहुणचार घ्यायला न थांबता, भगवत्भेटीची आंस धरून वाट पाहणार्‍या विदूर पत्नी पारसवीच्या महालांत जातात अनिरूध्द प्रेमानेच ! असा ’तो’ सदगुरु रूपात असो की परमात्मा स्वरूपात - "तो" सदैव असतो केवळ आणि केवळ प्रेमाचा भुकेला - अनिरूध्द प्रेमळा !

म्हणूनच आपल्या लेकरांचे अक्षम्य अपराधही "तो" माफ करतोच करतो , आणि त्यांत्यातील नास्तिक्यबुध्दीचा कायापालट करून आस्तिक्यबुध्दी प्रदान करतोच कारण "तो" असतो अचिंत्यदानी , लाभेवीण प्रेम करणारा !
म्हणूनच केवळ तो आणि फक्त तोच आपल्यातील नास्तिक्यबुध्दीरूपी अंहकाराचा, हिरण्यकश्यपुचे खलमर्दन करून, विगत बनून सैरावैरा इतस्त्त: भटकणार्‍या अशांत चित्ताला, क्लांत मनाला सुगती बनविण्यासाठी, आपल्याला आस्तिक्यबुध्दी देऊन सुगती देतो - आणि त्यासाठीच तर "तो" नरसिंह रूप धारण करतो, तेही नर देहात म्हणजेच मानव बनूनच -

नर देही नरसिंह  | प्रगटला तरूपोटी |
नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्या गती | |

संदर्भ-
१. अक्कलकोट स्वामीसमर्थ स्तवन - रामानुज लिखीत
२. मातृवात्सल्यविंदानम् अर्थात् मातरैश्र्वर्यवेद: 
३. श्रीसाईसच्चरीत
४. श्रीमद्पुरुषार्थ:  ( अर्थात सत्यस्मृती ) - प्रथम: खण्ड: - सत्यप्रवेश:

  

8 comments:

  1. Ambadnya, Superb post Sunitaveera
    Anilsinh Jagtap

    ReplyDelete
  2. Khup sundar lekh... parmatmyasamor ahankar kahi kamacha nasun suddha prem ani bhaktich havi... dev bhavacha bhukela... Ambadnya

    ReplyDelete
  3. An excellent post.speechless.
    Keep it up sunitaveera.

    ReplyDelete
  4. खूपच सुरेख लिहले आहे सुनीतावीरा । श्री राम अम्बज्ञ ।

    ReplyDelete
  5. Naathsamvindh Ambadnya khupch sundar bhav aahe Sunitaveera jay jagdamb jay durge keep it up veera Ambadnya

    ReplyDelete
    Replies
    1. Hari om Shreeram Ambadnya Rekha Jadhav.My Buddhisphurandata my Sadguru Bapu has made me write . सो सब तव प्रताप बापूराया नाथ न कछु मोरी बडताई .

      Delete
  6. Naathsamvindh Ambadnya khupch sundar bhav aahe Sunitaveera jay jagdamb jay durge keep it up veera Ambadnya

    ReplyDelete
  7. Bahut hi important information hai, hindi me hai Kya Bahubhasik Logo ke liye.
    Ambadnya naathsamvidh 🙏🙏

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog