Saturday 15 August 2015

डॉक्टर अब्दुल पी जे. कलाम - भारतमातेला लाभलेले परमात्म्याचे अनमोल "दृष्टी " वरदान !

आज आपल्या भारत देशाचा स्वातंत्रदिन १५ ऑगस्ट . भारतभूमीला खर्‍या अर्थाने विकसित देश म्हणून नावालौकिकाला आणण्याचे नुसते स्वप्न स्वत: न पाहता, ते सत्यात उतरविण्याचा दृष्टीकोन करोडो भारतीयांना देणारा आणि त्या दिशेने भारतीयांची वाटचालही करवून आणणारे भारतमातेचे महान , थोर सुपुत्र म्हणजेच डॉक्टर अब्दुल पी जे. कलाम !
अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (ऑक्टोबर १५, १९३१ - २७ जुलै २०१५) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते .  

डॉक्टर अब्दुल पी जे. कलाम - भारतमातेला लाभलेले परमात्म्याचे अनमोल "दृष्टी " वरदान !  

भारतमाता आपल्या कुशीतून ज्या नररत्नांना प्रसवून आपले मातृत्त्व सार्थकी लागल्याचा अभिमान बाळगते, धन्यता मानते अशा थोर , महान सुपुत्रांपैकी एक म्हणजे डॉक्टर अब्दुल पी जे. कलाम होय. 
' जगण्याला जीवन म्हणावे अशी माणसे शतकातून एखाद्या वेळेला जन्माला येतात' - पु.लं.चं हे वाक्य सोदाहरण पटविते अशी काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी दुर्मिळ व्यक्तीमत्त्व आहेत आणि त्यापैकी सद्य काळातील एक म्हणजे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम !

लहानपणी बाळ ध्रुवाची गोष्ट वाचली होती की राजा पिता उत्तानपादाच्या मांडीवर बसून खेळण्याचा हक्क सावत्र माता हिरावून घेते आणि मग परमेश्वराची निश्चल भक्ती करणारी स्वत:ची माता आणि सदगुरु नारद मुनींच्या उपदेशानुसार साक्षात भगवान विष्णूची घोर तपश्चर्या करून अगदी बालवयातही ध्रुवाने आकाशातील तारामंडळात आपले अढळ स्थान बनविले, भक्तीच्या सामर्थ्यावर ! 

डॉक्टर कलाम ह्यांनी सुध्दा असेच अढ्ळ स्थान आज प्रत्येक भारतीयाच्या मनात नुसते बनवलेच आहे नाही तर कोरून ठेवले आहे जे कधीच काळाच्या प्रवाहातही पुसले जाणार नाही असे म्हटल्यास चूक ठरणार नाही. 
इस्रोच्या माध्यमातून भारताला शक्तिसंपन्न करणारा हा मिसाईल मॅन निश्चितच ईश्वराने दिलेल्या बहूमूल्य मानवी जीवनाचे खर्‍या अर्थाने सार्थक करणारा , सोने करणारा मानव असे मला तरी वाटते. प्रजापती ब्रम्हाने जेव्हा सृष्टीच्या उत्त्पत्तीमध्ये सर्वात शेवटी जी रचना केली त्याला "मानव " म्हणजे आता नव्याने काही जन्माला येणार नाही अशा अर्थाने ह्या बुध्दीप्रधान जीवाला नाव दिले असे वाचले होते. डॉ. कलाम ह्यांचे जीवन पाहता खरोखरीच पुन्हा नव्याने असा मानव जन्माला येणे केवळ अशक्य म्हटल्यास वावगे ठरणार नाही.    

डॉ.कलाम यांनी 'भारतरत्न' पुरस्काराची प्रतिष्ठा द्विगुणित केली. २००२ ते २००७ या काळात भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून डॉ.कलाम यांनी दिलेल योगदान अजोड आहे. राष्ट्रपती म्हणून डॉ.कलाम हा एकमेव आश्वासक चेहरा भारताची नवी आंतरराष्ट्रीय ओळख बनून राहिला आहे असे मत व्यक्त केले जाते ते उगाच नाही. जितक्या सहज त्यांनी राष्ट्रपतीपद संभाळले, तितक्याच सहज ते निवृत्तीनंतरचं नियमित जीवन जगले. कुठे बडेजाव नाही की भपका नाही. राष्ट्रपतीपद त्यांनी विश्वस्त म्हणून सांभाळले. आजच्या मालक म्हणून दिमाख मिरवणार्‍या बडेजावाने वावरणाऱ्यांसाठी तो उत्तम वस्तुपाठ आहे. निवडणुकीच्या राजकारणाचा तिटकारा म्हणून त्यांनी पुन्हा मिळणारी उमेदवारी नाकारली असे ऐकिवात आहे. इतका सरळ साधा सज्जन माणूस आपल्याला राष्ट्रपती म्हणून पुन्हा मिळणे केवळ अशक्यप्राय वाटते.  

“It is very easy to defeat someone, but it is very hard to win someone” असे म्हणणार्‍या कलाम साहेबांनी मात्र लहान मुले, तरूण युवा पिढी असो की मध्यमवयीन वा वयस्क मंडळी असो अगदी आबालवृध्द सार्‍यांनाच आपलेसे केले होते. आपल्या आगळ्या व अनोख्या कार्यपध्दतीमुळे लोकप्रिय झालेला सार्‍या लोकांचा हा लाडका राष्ट्रपती ! कुणा भारतीयाला आज आवडत्या राष्ट्रपतीचे नाव विचारले तर जराही वेळ न दवडता अगदी सहजपणे "डॉ. अब्दुल कलाम" हेच नाव प्रत्येक भारतीयाच्या ओठावर येईल ह्यात तिळमात्र शंका नाही, ह्यातच डॉक्टर कलाम ह्यांच्या अफाट लोकप्रियतेचे, त्यांच्या बद्दल असणार्‍या लोकांच्या मनातील आत्मीयतेचे, जिव्हाळ्याचे दर्शन घडते. 

"शुध्द बीजाचिया पोटी फळे रसाळ गोमटी" ह्या उक्तीचे प्रत्यंतर डॉक्टर कलाम ह्यांच्या लहानपणाकडे पाहिले असता कळते. त्यांचे वडील जैनुलब्दीन कलाम हे अत्यंत सात्विक वृत्तीचे, भगवंतावर अचल विश्वास आणि कोणत्याही संकटात न डगमगणारी भक्ती असणारे होते आणि त्याच बरोबरीने ते तितकेच लोककल्याण तत्पर असल्याचे कलाम ह्यांनी आपल्या " माझी जीवनयात्रा - स्वप्ने साकारताना"  ह्या पुस्तकात सांगितले आहे. डॉक्टर कलाम लिहीतात माझ्या वडिलांचं औपचारिक शिक्षण फारसं झालेलं नव्हतं किंवा त्यांना त्यांच्या दीर्घ आयुष्यात फार ऐश्वर्यही कधी लाभलं नाही, पण मला आयुष्यात ज्या अत्यंत सुज्ञ व खरोखर उदार व्यक्ती भेटल्या, त्यामध्ये माझे वडीलही आहेत. ते कुणी प्रवचनकार नव्हते की शिक्षक! स्वत:ची श्रद्धा व आपल्या धर्माच्या तत्त्वांनुसार जगणारी ती एक व्यक्ती होती. 
लहानपणीच्या वडिलांनी केलेल्या संस्काराच्या आठवणी सांगताना डॉक्टर कलाम म्हणतात एकदा आईच्या हातून भाकरी करपली तरी वडील खूप समजूतीने वागतात आणि आईवर चिडत नाही, उलट करपलेली भाकरी मला आवडते असे सांगून आपल्या बायकोला दु:खी करीत नाही. लहानग्या अब्दुल कलामांना नवल वाटते आणि ते वडीलांना रात्री तुम्हाला खरेच करपलेली भाकरी आवडते का असा बाळबोध सोपा प्रश्न विचारतात त्यावर वडीलांनी दिलेल्या उत्तराने अब्दुल कलाम ह्यांना माणुसकीने माणसे कशी जोडायची आणि इतरांची मने कशी सांभाळायची असतात ह्याचे अनमोल शिकवण दिली, जी त्यांनी आयुष्यभर आपल्या आचरणात संपूर्णपणे बिंबवलेली दिसते.   

डॉ.कलाम यांनी लिहिलेली ( काही ) ग्रंथसंपदा : 

* इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
* ‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); 
‘भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
इंडिया – माय-ड्रीम एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
* ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : माधुरी शानभाग)
* विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक :माधुरी शानभाग.
* सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
* टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
* दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)
* अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तकं :
* इटर्नल क्वेस्ट : लाइफ ॲन्ड टाइम्स ऑफ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : एस.चंद्रा)
* ’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद – मंदा आचार्य).
* ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल)
* प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक :आर के पूर्ती)
* रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां. ग. महाजन) 
       
अग्नीपंख (The WINGS OF FIRE)  - देशातील भारतरत्न हा सर्वोच्च नागर सन्मान मिळवणारे आमचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्यांचा त्यांच्या कालावधीतील १९९२ पर्यंतचा प्रवास वर्णिला आहे. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष दाखविला आहे. तर दुसर्‍या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघर पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण ही फार सहज सोप्या भाषेत सामान्य माणसाला समजेल अशा सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारत्याच्या तंत्रज्ञानाविषयक लढाईचे एक स्पंदन आहे असे मत मांडले जाते. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे. तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहर्षक खंडकाव्यच आहे.


सकारात्मक दृष्टीकोन(Positive attitude) ह्याचा अर्थ सोपा करून देणारा आणि जीवनातील नैराश्य संपवायचा महामंत्र देणारा हा महान द्रष्टा !


" Without your involvement you can't succeed. With your involvement you can't fail. " हे डॉक्टर कलाम ह्यांचे बोल म्हणजे त्यांनी मिसाईलमॅन म्हणून मिळविलेल्या कामाची गुरुकिल्ली होती असे आढळते. आणि म्हणूनच एका क्षेपणास्त्राची सफलता मिळवून त्यांनी उसंत घेतली नाही आपल्यात तत्त्वाला जागून - " Don’t take rest after your first victory because if you fail in second, more lips are waiting to say that your first victory was just luck.” 

'अग्निपंखांची भरारी'- राष्ट्रपती कलामांचं संक्षिप्त आत्मवृत्त, या नावाने मराठीत उपलब्ध आहे. कलामांवर झालेले लहानपणीचे संस्कार, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची झालेली जडणघडण, एक शास्त्रज्ञ या नात्याने त्यांची कामगिरी, यश- अपयश इत्यादीचा धावता पट सहजच या पुस्तकात उलगडत गेला आहे. आपल्या कामावर निस्सीम श्रद्धा आणि साहस यांची ही संक्षिप्त कहाणी. विज्ञान आणि तंत्रज्ञान या देशाला स्वयंपूर्ण करण्याच्या ध्यासाची ही कथा तरुणांना उद्बोधक वाटेल.



"Difficulties in your life do not come to destroy you , but to help you realize your hidden potential and power, let difficulties know that you too are difficult."

संकटांना सदैव घाबरणार्‍या माणसाला "संकटा"ची एवढी सोपी व्याख्या शिकविणारा , परमेश्वरावर नितांत श्रध्दा असल्याशिवाय असे उद्गार काढूच शकत नाही. संकटे, आपत्तींना घाबरणार्‍या माणसाला आपत्ती व्यवस्थापन शिकण्यास प्रेरीत करणारा हा खरा आपत्ती व्य्वस्थापकच !!!

अदम्य जिद्द हे पुस्तक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विविध प्रसंगी, विविध ठिकाणी केलेली भाषणे, संवाद, चर्चा यांचे संकलन आहे. रामेश्वरच्या सागरतीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या त्यांच्या विलक्षण जीवनप्रवासाचे आरशासारखे सुस्पष्ट प्रतिबिंब यात उमटले आहे. 
“Man needs difficulties in life because they are necessary to enjoy the success.”  म्हणजेच कलाम साहेबांची अदम्य जिद्द !
अदम्य जिद्द हे आहे त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचे व चिंतनाचे सार. विकसित भारताचे स्वप्न पाहणार्‍या एका थोर, द्रष्टा नेत्याचा कणखर आदर्श या पुस्तकात पाहायला मिळतो. हा आहे एका मूल्यप्रेमी, देशभक्त, सच्च्या ज्ञानोपासकाच्या नितळ काळजाचा उत्कट उद्गार! 
अनेक घटना, प्रसंग, कथा, सुविचार यांची ओघवती माला गुंफत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम येथे आपल्याला एका चिंतनशील विचारवंत, वैज्ञानिक, शिक्षक व राष्ट्रपती अशा विविध भूमिकांमध्ये भेटतात, त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे मार्गदर्शक व प्रेरणादायी असे विविध पैलू झळाळून उठले आहेत. डॉक्टर कलाम ह्यांचे हे अनमोल विचारधन सर्वानाच विचारास प्रवृत्त करणारे व आदर्शवत आहे.

'उल्ग्घु एदल्ते' या मूळ इंग्रजी पुस्तकाचा कमलेश वालावलकर यांनी मराठीत अनुवाद केला आहे, ज्याचे नाव आहे 'दीपस्तंभ'. अरुण तिवारी आणि राष्ट्रपती कलाम यांच्या जीवनाचं प्रयोजन शोधणार्‍या रोचक संवादातून परिपूर्ण झालेलं हे पुस्तक अनेक जीवनमूल्यांवर भाष्य करतं. हे 
संवाद करताना अनेक दखल घेण्याजोगे संदर्भ दिले गेले आहेत, त्यामुळे हे संवाद म्हणजे 'केवळ चर्चा' राहत नाही. संपूर्ण मानवजात सध्या बेधुंद झाली आहे. जीवनाला जीवघेणा वेग आला आहे. मनाची स्थिरता, शांती हरवत चालली आहे. अशा वेळी विश्लेषक दृष्टीने, विधायक मनाने समाधानी जीवन कसं जगता येईलर ? ईश्वरास जाणून घेणं म्हणजेच स्वत:ला जाणून घेणं' याचा नक्की अर्थ काय ? 'स्व'च्या पलीकडे जाऊन विश्वात्मक होता येईल का ? इत्यादी मुद्यांचा ऊहापोह या संवादांतून वाचता येतो. 

इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया म्हणजेच प्रज्वलित मने हे पुस्तक म्हणजे  “Ignited Minds” या डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांनी  लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद. विकसित भारतासाठी आपण काय योगदान दिल पाहिजे ? हा प्रश्न भारतीय युवा पिढीच्या मनात निर्माण होण हे या पुस्तकाच खरेखुरे यश आहे. हा देश विकसित होऊ शकतो यावर विश्वास नसणाऱ्या लोकानी तर हे पुस्तक जरुर  वाचावे असे आवर्जून सांगावेसे वाटते.

" The Ignited mind of the youth  is the most powerful resource on the earth, above the earth and under the earth "
कलाम ह्यांचे उद्गार - " तरूणांचे प्रज्वलित झालेले मन हा सर्वात शक्तिशाली स्त्रोत आहे , पृथ्वीवर , पृथ्वीच्या वर अंतराळात आणि पृथ्वीच्या आतही. " किती आश्वासक आहे ना सार्‍या युवा पिढीसाठी !
ह्या पुस्तकातील तिसर्‍या भागात “Vision ignites the minds”, मध्ये डॉक्टर कलाम ह्यांनी आधुनिक भारताचे द्रष्टे जे. आर.डी. टाटा, विक्रम साराभाई, सतीश धवन, डॉक्टर वर्गीस कुरीयन ह्यांच्याशी संवाद साधून नवा दृष्टीकोन कसे मने प्रज्वलित करू शकतो हे सिध्द केले आहे. 
एका भागात कलाम साहेब म्हणतात की - “Wisdom is a weapon to ward off destruction; It is an inner fortress which enemies cannot destroy”

ह्या पुस्तकाच्या शेवटी ते लिहीतात “Song of Youth”, with these opening words:
“As a young citizen of India , armed with technology and love for my nation, I realize, a small aim is a crime.”
किती जबरदस्त आशावाद ते शिकवितात. हे पुस्तक म्हणजे आपल्या मनामधे एक ठिणगी पेटवण्याचा प्रयत्न आहे.आता त्याचा वणवा करायचा की शेकोटी करायची हे आपल्यासारख्या सुजाण नगरिकानी ठरवायच आहे.


डॉक्टर कलाम ह्यांचे अवघे जीवन हे " जे जे आपणासी ठावे,ते ते दुसऱ्यासी शिकवावे! शहाणे करून सोडावे ,सकलजन!! " ह्या उक्तीनुसार होते असे दिसते. " ज्ञान " हे दिल्याने वाढते असे आपले पूर्वज सांगत , डॉ. कलाम ह्यांनी आयुष्यभर हे ज्ञानाचे भांडार मुक्त हस्ते उधळले.
“If you want to shine like a sun. First burn like a sun.” कलाम साहेबांचे विचार पाहता संत मुक्ताबाईंच्या 'चणे खावे लोखंडाचे । तेव्हा ब्रह्मापदी नाचे।' किंवा 'मुंगी उडाली आकाशी। तिने गिळीले सूर्याशी।'  ह्या विलक्षण विचारांची जिवंत प्रचिती येते . संत मुक्ताईचे विचार - 
ह्याचा मला भावलेला खरा अर्थ म्हणजे डॉ. कलाम ह्यांचे अफाट कार्य. 

Keep loving nature and care for its blessings Then you can see divinity all over. "
"निसर्गावर प्रेम करत राहा आणि त्याने जे इतके काही दिले आहे त्याची जाणीव ठेवा ...तर तुम्हाला ती दैवी शक्ती सर्वत्र दिसेल." येथे कलाम सरांची आध्यात्मिक मनोभूमिका स्पष्ट होते. 

“Failure will never overtake me if my definition to succeed is strong enough”. असामान्य विचारशैली ! जे स्वत: डॉक्टर कलाम  आपल्या आयुष्य़भर जगले होते अगदी पदोपदी . "टर्निंग पॉईंटस " मधून डॉक्टर कलाम ह्यांच्या असामान्य व्यक्तीमत्त्वाचे अंतरंग तर समजतेच पण प्रयत्न केले, चिकाटी ठेवली आणि आत्मविश्वास असला तर अनेक सिध्दी मिळवून, कौशल्ये आणि सामर्थ्ये मिळवून महान वारसा असलेला हा देश पुन्हा महान कसा होऊ शकेल ह्याची संकल्पना मिळते. ही गाथा आहे - एका व्यक्तीने स्वत: आणि इतरांना बरोबर घेऊन केलेल्या प्रवासाची - जो प्रवास भारताला २०२० पर्यंत आणि नंतरही एक विकसित राष्ट्र म्हणून उभे करेल.  

“All Birds find shelter during a rain. But Eagle avoids rain by flying above the Clouds.” - किती पराकोटीचा आत्मविश्वास नाही डॉक्टर कलाम ह्यांनी आपल्या शिकविला. उगाच नाही त्यांच्या मागे विद्यार्थी वेडयासारखे धावत. ते अण्णा युनिव्हर्सिटीमध्ये शिकवीत तेव्हा ६० मुलाची क्षमता असलेल्या वर्गात मुले जमत २५० ते ३००. किती दाटीवाटी झाली आणि १ तासाचा वर्ग २ ते ३ तासांचा झाला तरी विद्यार्थी कधीच कंटाळत नसत ह्यात कलाम ह्यांच्या शिक्षक ह्या प्रतिमेचे दर्शन होते. 
    
On July 22, Kalam tweeted: "An indomitable spirit stands on two feet.. vision and firm thought". जणू काही त्यांचे हे बोल त्यांचे स्वत:चे यथोचित दर्शन घडवितात असे म्हणावेसे वाटते. 

डॉक्टर कलाम हे एक प्रतिभावान कवी म्हणून कदाचित काही लोकांनाच परिचीत असतील. त्यांची "The Vision" (" दृष्टी " ) ही कविता त्यांनी पार्लमेंट्मध्ये सुध्दा वाचून दाखवली होती.

The Vision

I climbed and climbed
Where is the peak, my Lord?
I ploughed and ploughed,
Where is the knowledge treasure, my Lord?
I sailed and sailed,
Where is the island of peace, my Lord?
Almighty, bless my nation
With vision and sweat resulting into happiness

"अनंत हस्ते देता कमलावर घेशील किती दो करांनी " हे डॉक्टर कलाम ह्यांच्या जीवनात सत्याने उतरले आहे. अनंत करूणामयी परमेश्वराचे अचिंत्यदान खर्‍या अर्थाने कलाम स्वत: ही लुटू शकले आणि आपल्या भारतीय देशबांधवांनाही आपल्या आचरणातून शिकविते झाले. 



डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांची कविता - दृष्टी The Vision  ही प्रत्येक भारतीयाच्या मनात गुंजत राहो आणि डॉ.कलाम ह्यांच्या आकाशाला गवसणी घालणार्‍या उत्तुंग प्रतिभेचा आणि राष्ट्रभक्तिचा अंश या भारताच्या भूमीमध्ये अनंतपटीने रुजावा हीच परमेश्वर आणि भारतमातेच्या चरणी प्रार्थना  तरच स्वातंत्र्याची खरी पहाट आपण अनुभवू शकू !

No comments:

Post a Comment

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog