Thursday 6 August 2015

स्टेम सेल थेरपी - बायोटेक्नॉलॉजी - तंत्रज्ञानाचा नवीन आविष्कार !!!

दिनांक १९ जुलै २०१५ च्या " टाईम्स ऑफ इंडिया" ह्या दैनिक वृत्तपत्रातील एका बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले -
स्टेम सेल डोनेशन विषयी जनजागृती करण्यासाठी सायकल स्वारांची आधुनिक रॅली :
चेन्नई येथे शनिवार दिनांक १८ जुलै २०१५ रोजी दात्री फाऊंडेशन आणि कॉगनिझंट (Cognizant)  ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे २०० तरूण व वयस्क सायकल स्वारांची रॅली आयोजित करण्यात आली होती. दात्री ही स्टेम सेल रक्त दाता नोंदणी संस्था आहे, ज्यांना रक्तातील विकृतींचे आजार दूर करण्यासाठी बर्‍याचे मोठ्या संख्येने आजारग्रस्त रूग्णांना ह्या स्टेम सेलच्या दात्यांची अत्यंत मोठी गरज भासत असल्याचे निदर्शनाला आले. आपल्या भारताची लोकसंख्या १ अब्जावर आहे, तरी देखिल एवढी अवाढव्य लोकसंख्या असूनही स्टेम सेल डोनेशनच्या विषयीच्या जनजागृतीच्या अभावापाय़ी स्टेम सेलची रक्तातील विकृतींचे आजार दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असूनही खूपच उणीव भासत आहे. त्यामुळे ह्या रॅलीच्या माध्यमातून स्टेम सेलचे दान किती गरजेचे आहे ह्या बद्दल जनजागृती करण्यात आली. 

मनात अपार जिज्ञासा दाटली की काय असते ही स्टेम सेल टेकनॉलोजी ? 

त्यातूनच शोध घेताना अजूनही काही अशीच कुतूहल चाळवणारी माहिती वाचनात आली ती टाईम्स ऑफ इंडियाच्या ४ मे २००२ च्या बातमीने ! 
त्यात असे सांगितले होते की बी. जी मातापूरकर हे नवी दिल्ली येथे मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालय येथे सर्जन आहे. "ऑल इंडिया असोसिएशन ऑफ बायोटेक"च्या दक्षिणेकडील शाखेने स्टेम सेल संशोधनाशी निगडीत एक परिषद ( Conference) हैदराबाद येथे  आयोजित केली होती. बीजी मातापूरकर हे  यूएसए मध्ये एक पेटंट धारक आहेत ज्या पेटंट द्वारे त्यांनी १० वर्षांपूर्वी असे तंत्र विकसित केले होते की जे एका अवयवापासून नवीन अवयव उत्पादन करू शकत होते.

ह्या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की महाभारताच्या आदिपर्वाच्या एका ओवीने ते दिङ्मूढ झाले होते ज्यात गांधारी (महाराज धृतराष्ट्र पत्नी ) हिने एका गर्भापासून प्रत्यक्षात १०० मुलांना (कौरव ) आणि १ मुलीला जन्म कसा दिला ह्याचा उलगडा केला होता. त्यावर आपले मत मांडताना त्यांनी असे प्रतिपादन केले होते की एकच मानवी स्त्री एकाच वयाच्या १०० पुत्रांना आणि १ कन्येला कसा काय जन्म देऊ शकते? 

पुढे आणखी माहिती शोधताना असे आढळले की गांधारीने प्रसूतीनंतर पाहिले की तिने एका मांसाच्या गोळ्याला जन्म दिला आहे , तेव्हा ती भयंकर चिडली. त्या आधीच्या काळात तिने व्यास मुनींची सेवा करून १०० मुले होण्याचा वर मिळवला होता. जेव्हा गांधारी दु:खाने आणि क्रोधाने तो गर्भाचा मांसल गोळा फेकून देणार होती तेव्हा व्यास मुनी तेथे प्रकटले आणि त्यांनी दिलेला वर वृथा जाणार नाही असे समजावले. त्यानंतर त्यांनी त्या एका गर्भाचे १०१ भाग करून तेल/तूपाने भरलेल्या विशीष्ट प्रकारच्या कुंडामध्ये ( सध्याच्या Test-tube ) ठेवले आणि तब्बल २ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ते कुंड उघडले असता १०० मुले आणि १ मुलगी जन्माला आली. ती १०० मुले म्हणजेच १०० कौरव (सर्वात ज्येष्ठ पुत्र दुर्योधन , दु:शासन इत्यादी कौरव ) आणि त्यांची १ बहीण दु:शाला असे वर्णन वाचनात आले. 

ह्या कथेच्या आधारे मातापूरकरांनी असे मत व्यक्त केले होते की प्राचीन भारतवर्षात महाभारत (3000 इ.स.पू.) ह्या काळातही भारतीय ऋषी-मुनींना अत्यंत प्रगत विज्ञान अवगत होते ज्या द्वारे गर्भ विभागणी आणि चाचणी-नळीद्वारे मानवी स्त्रीच्या गर्भाशायाच्या बाहेर जाऊनही ते गर्भाला जन्म देऊ शकत होते. शास्त्रज्ञांच्या मते हे त्यांनी स्टेम सेल विज्ञान वापरूनच केले होते, ज्या मुळे मानवी स्त्रीच्या शरीरा बाहेरही ते गर्भ धारणा करवून घेऊ शकत होते. 

आता ह्या कथेवर अधिक कसे , काय , खरेच का खोटे असा अधिक उहापोह करण्यापेक्षा कमीत कमी सध्याच्या आधुनिक विज्ञानाच्या स्टेम सेल टेक्नॉलोजी बाबत माहिती करून घ्यावी असे ठरवले. " तुटे वाद तो संवाद हितकारी " अशी आपल्याला संत समर्थ रामदास स्वामी ह्यांची शिकवण आहे ना? म्हटले तीच आचरणात आणावी. 

मग  विचार केला की आणि चंगच बांधला की संगणकावर आंतर महाजाल एवढे अफाट माहिती पुरविणारे स्त्रोत असताना आपण का कचरा ? ठरवलेच की काही झाले तरी माहिती तर वाचून काढू या काय असते ही स्टेम सेल टेक्नॉलोजी ? 

चला तर जाणून घेऊ या स्टेम सेल थेरपी वा टेक्नॉलोजी - बायोटेक्नॉलॉजी - तंत्रज्ञानाचा नवीन आविष्कार !!!

स्टेम सेल ह्या मराठीत मूळ पेशी किंवा स्कंधकोशिका म्हणून ओळखल्या जातात. आता स्कंध कोशिका हा शब्द उच्चारायला मला तरी कठीण वाटतो म्हणून आपण सोयीने मूळ पेशी किंवा स्टेम सेल असाच उल्लेख ह्या पुढील लेखात करू या. 

मूळ पेशी (स्टेम सेल्स) हे नाव  अलीकडे अनेक वेळा वाचनात येते. त्याबद्दल ही थोडीशी ढोबळ माहिती वाचनात आली ती अशी -



मूळ पेशी या अशा पेशी असतात, की ज्यांच्यामध्ये विभाजन होऊन विविध प्रकारच्या नव्या पेशी आणि ऊतींची निर्मिती करता येऊ  शकते. बहुपेशीय सजीवांमध्ये या पेशी आढळतात. थोडक्यात सांगायचे, तर मूळ पेशी या शरीराच्या ‘मास्टर’ पेशी असतात आणि त्यापासून सर्व प्रकारच्या पेशींची निर्मिती करणे शक्य आहे. सस्तन प्राण्यांमध्ये मूळ पेशींचे दोन प्रमुख प्रकार आहेत. पहिला प्रकार भ्रूण मूळ पेशी (एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स). या पेशी भ्रूणापासून (एम्ब्रियो) मिळवलेल्या असतात. दुसरा प्रकार असतो पूर्ण वाढ झालेल्या पेशी (अॅडल्ट किंवा आयपीएस सेल्स). या पेशी त्वचा, हाडाचा गाभा ( bone marrow ) किंवा रक्तापासून मिळवून त्यांचे मूळ पेशींत रूपांतर करण्यात येते.

मूळ पेशींच्या स्वत:च्या नवनिर्मितीच्या विशेष क्षमतेमुळे त्यांचा उपयोग गंभीर आजारांवर उपचारांसाठी किंवा नवे अवयव, स्नायू किंवा शरीरातील काही भागांच्या निर्मितीसाठी करता येतो. त्यामुळे स्वतःच्याच शरीरातील काही पेशींपासून पेशंटच्या शरीरावर उपचार करता येऊ शकतात. 

मग ह्या मूळ पेशी किंवा स्टेम सेल मिळतात तरी कोठे असा साहजिकच प्रश्न मनात उद्भवला असेल, नाही का बरे? 


मूळ पेशींचा महत्त्वाचा स्रोत किंवा पुरवठा करणारे साधन म्हणजे नाळ म्हणजे नुकत्या जन्मलेल्या - नवजात बाळाची नाळ आणि रक्त !  दचकले असाल ना? काय क्रूर पध्दत आहे म्हणून ! येथे बाळाच्या जीवाला बिलकुल धोका नसतो असे डॉक्टर आवर्जून सांगतात.  

नीट विचार केल्यास लक्षात येते की बाळ आणि त्याची आई ह्यांना जोडणारी नाळ ही बाळाच्या जन्मानंतर कापूनच टाकली जाते. त्याच नाळेची आणि रक्ताची नीट जपणूक केली तर कितीतरी दुर्धर आजारांवर माणूस उपचार करून जीवनदान मिळवू शकतो.  तर मग अशा प्रकारे  बाळ जन्मल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने नाळेचे विशेष पद्धतीने जतन करून ठेवले, तर भविष्यात मुलाला दुर्दैवाने काही गंभीर आजार झाल्यास नाळेतील मूळ पेशींचा उपयोग उपचारांसाठी करता येऊ शकतो. याला ‘स्टेम सेल बँकिंग’ असे म्हणतात. ही पद्धत सध्या तरी आपल्या भारतात सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही असे चित्र आढळते ; पण येणाऱ्या काळात त्यात अधिक संशोधन होऊन ती सहज वापरता येऊ शकेल.

स्टेम सेल अर्थात मूळ पेशी अनेक रोगांवर उपयुक्त ठरताहेत.याबाबत लोकांमध्ये जागरुकता वाढत असून दिवसेंदिवस स्टेम सेल्स जतन करण्याकडे कल वाढत आहे. 

रक्ताचा कर्करोग, बीटा थॅलेसेमिया (thalassemia) , लिव्हर सोरॅसिस, पॅरॅलिसिस यासह विविध आजारांमध्ये स्टेम सेल्स उपयुक्त ठरल्या आहेत. त्याशिवाय अनेक आजारांमध्ये स्टेम सेल्सच्या उपयोगितेविषयी जगभर संशोधनही सुरू आहे. त्यामुळेच स्टेम सेल्स जतन करण्याचे प्रमाण सर्वत्र वाढते आहे. दिल्ली, चेन्नई, बंगलोर, 
पुणे, मुंबई अशा काही शहरांत  स्टेम सेल्सचे जतन करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या कार्यरत आहेत. 

हृदयाचे काही आजार, पार्किन्सन्स यांसारख्या काही गंभीर आजारांवर सध्या मर्यादित उपचारपद्धती उपलब्ध आहेत. शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या नव्या पद्धतीमुळे त्या आजारांवर उपचाराच्या काही नव्या पद्धती विकसित करता येणे शक्य आहे असे तंज्ञाचे मत आहे. 

एक डॉक्टर ब्रेन अॅण्ड स्पाइन तज्ञ म्हणतात की जगात असे काही विकार आहेत, ज्यात आधुनिक औषधे आणि उपचार उपलब्ध असूनही पेशंटला समाधानकारक दिलासा मिळू शकत नाही. ऑटिझम हा त्यापैकीच एक. ऑटिझमवर इतर उपचार करताना स्टेम सेल उपचारांचा एक नवीन पर्याय निर्माण झाला आहे. 

या शिवाय स्टेम सेल टेक्नॉलोजीचे तंत्र वापरून रक्ताच्या विकृतीचे काही आजार, सर्व प्रकारचे रक्ताचे कॅन्सर, रक्ताचे काही आनुवंशिक आजार ह्या सारख्या बर्‍याच आजारांवर उपचार करता येऊ शकतो तर कॅन्सरसारख्या असाध्य रोगांवरील उपचारांचा खर्च कमी करता येऊ शकतो असा काही तंज्ञाचा दावा आहे. स्टेम सेल थेरपीचा वापर करून विकृतींमुळे किंवा अपघातांमुळे सदोष (बिघाड ) झालेल्या सेलची पुन:स्थापना करता येऊ शकेल अशी वाच्यता आहे. 

स्टेम सेल आणि स्टेम सेल बँकिंग विषयी अधिक जाणून घेऊ या पुढील भागात ....

संदर्भ: 
http://timesofindia.indiatimes.com/city/chennai/Cycle-rally-pedals-awareness-on-stem-donation/articleshow/48129196.cms

http://timesofindia.indiatimes.com/india/Kauravas-were-cloned-says-scientist/articleshow/8871649.cms

http://www.biotecharticles.com/Applications-Article/Biotechnology-Foot-Prints-With%20-Indian-Epics-1207.html

मराठी विश्वकोश

www.medindia.net







5 comments:

  1. eagerly waiting for next article.

    ReplyDelete
  2. Suneetaveera Hariom, Chhan lihile aahe.

    ReplyDelete
  3. खुप चांगल्या विषयाबद्दल माहिती दिलीत. ह्या विषयाबद्दल जागरूकता तशी कमीच् आहे , आणि म्हणूनच त्याची आवश्यकता आहे. पुढील भागाची सर्वजण वाट पाहत असतील. धन्यवाद.

    ReplyDelete
  4. खूपच वेगळ्या विषयाबद्दल तुम्ही माहिती दिलीत .
    अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत .
    धन्यवाद ...


    ReplyDelete
  5. स्टेम सेल थेरपी विषयी आजवर फक्त ऐकलं होतं, पण त्या विषयी इतकी सखोल माहिती दिल्या बद्दल आभार...आणि विशेष करून ‘स्टेम सेल बँकिंग’ ची माहिती खूप उपयुक्त ठरेल..कारण हा एक असा विषय आहे कि ज्या विषयी जागरूकता वाढवणे हि भविष्याची गरज आहे...ह्या लेखा च्या पुढील भागाची वाट पाहत आहोत...

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog