Friday 21 August 2015

आसाम पूराचा तडाखा - निसर्गाचा विनाशकारी प्रकोप !

दिनांक २१ ऑगस्ट २०१५ च्या वृत्तानुसार -
गुवाहाटी – पूर्वेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आल्यामुळे सुमारे ६ लाख नागरिकांना याचा फटका बसला असून आसाममधील जवळपास २ लाख लोकांना १७७ कॅम्पमध्ये सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पूरामुळे आसामच्या १९ जिल्ह्यांना फटका बसलाय. तिथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. तर हिमाचल प्रदेशलाही अतिवृष्टीने वेढलंय. 
याच वर्षी आसाममध्ये दुसऱ्यांदा पूर आला असून अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार धेमाजी, कोकराझाड, लखीमपूर, चिरांग, बंगाईगाव, तिनसुकिया आणि दिब्रुगड जिल्ह्यातून वाहणाऱ्या सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामध्ये हजारो वाहने अडकली आहेत. मुसळधार पावसामुळे पर्वतीय भागात दरडी कोसळल्याने वाहतुकीचे मार्ग बंद झाले आहेत.
नागालँडमध्येही मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. त्यामुळे येथील जनजीवन ठप्प आहे. नागालँड आणि मणिपूर यामधील महत्त्वाच्या महामार्गासह अनेक मार्ग बंद आहेत.
ही बातमी वाचून मन सुन्न झाले काय हा निसर्गाचा प्रकोप , किती भीषण हे रौद्र स्वरूप आणि त्याचे तांडव .-






' गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून । 
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली ।
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली ।
भिंत खचली चुल विझली, होते नव्हते नेले' ।
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या कवितेची अनुभूती आसामवासी दरवर्षीच नव्हे तर वर्षातून किमान दोन ते तीन वेळा हमखास घेतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण मुसळधार पाऊस, दरडी कोसळणे, पूराने भूस्सखलन होणे, गावेच्या गावे पूराच्या पाण्याखाली वाहून जाणे , शेतीचे अमाप नुकसान ह्या गोष्टी तर आसामवासीयांच्या पाचवीलाच पुजल्या आहेत जणू काही. फक्त कुसुमाग्रजांनी म्हटलेली गंगामाईची जागा येथे ब्रम्हपुत्रा माई घेते. नदीला आपल्या भारतीय संस्कृतीत कायमच माई, आई असे म्हणून आदराने पूजले जाते. एरव्ही खळाळत वाहणार्‍या नदीचे पाणी किती आल्हाद्दायक मधुर संगीतच जणू काही ऐकवत असते. परंतु जेव्हा निसर्गाचा प्रकोप होतो आणि मानवानेच केलेल्या निसर्गाच्या मर्यादा उल्लंघनामुळे निसर्गाचे भीषण तांडव चालू होते तेव्हा मात्र विनाशकारी , प्रलंयकारी रौद्र रूपाचे दर्शनच होते जणू ....  

येथे सहज आठवली ती संतश्रेष्ठ तुलसीदासजींची ओवी !!! आपल्या "सुंदरकांड" ह्या अत्यंत महान अपौरुषेय रचनेमध्ये ते स्पष्ट शब्दांत वर्णन करतात की हजारो राक्षसांना एकट्याने मारून अशोकवनाचा विध्वंस करणार्‍या हनुमंताला रावणाचा ज्येष्ठ पुत्र इंद्रजित हा कपटाने ब्रम्हास्त्र वापरून पकडतो आणि हातपाय बांधून रावणाच्या भर दरबारात आणतो (असे चुकीचे मत अंहकारी इंद्रजितचे असते , पण वास्तविक पहाता रामकार्यासाठी महाप्रभु हनुमंतांनी हे बंधन स्वत:हून स्विकारलेले असते.) तेव्हा साक्षात हनुमंत महाप्रभू त्यांच्या स्वामीच्यां म्हणजेच भगवंत श्रीरामाच्या नामाचा महिमा गाताना रावणाला इतके स्पष्ट शब्दांत सुनावितात की - 
राम बिमुख संपति प्रभुताई । जाइ रही पाई बिनु पाई । 
सजल मूल जिन्ह सरित नाहीं । बरषि गए तबहिं सुखाई ।। १३४ ।।                          
(अर्थ- श्रीरामंना विमुख झाल्याने संपत्ती व ऐश्वर्य निघून जात रहाते , ते मिळूनही न मिळाल्यासारखे आहे. 
ज्या नद्यांचे पात्र पाण्याने भरलेले नसते म्हणजेच स्तोत्ररहित असते, त्या पावसाळा संपल्यावर परत कोरड्या पडत्तात. )
तुलसीदासजींनी सांगितलेले नद्यांचे रहस्य लक्षात घेता ब्रम्हपुत्रा नदीचे पात्र पाण्याने सदैव भरलेले असते कारण ती स्तोत्रसंपन्न नदी आहे. 

नदीचे स्तोत्र म्हणजे नदीचा मूळ उगम स्त्रोत होय.  

ब्रम्हपुत्रा ही नदी सदैव बर्फाच्छादित हिमालयातून उगम पावते आणि त्यामुळे ब्रम्हपुत्रा नदीचे पात्र सदैव दुथडी भरून वाहत असते आणि त्यामुळेच मुसळधार पावसात ती लवकरच धोक्याची पातळी ओलांडते. 

खरे पाहता पाणी म्हणजे जीवन म्हणजेच जीवन देणारे. पण पूराच्या वेळी हेच पाणी आपली मर्यादा ओलांडते आणि जीवन देण्याऐवजी जीवन घेणारे ठरते. मराठीत आपण एक म्हण नेहमी वापरतो की "तहान लागल्यावर विहीर खणून चालत नाही " तसेच ह्या आपत्ती व्यवस्थापनाचे असते मग भले तो पूर असो वा भूकंप असो वा त्सुनामी असो. प्रत्येक आपत्तीला समर्थपणे आणि यशस्वीपणे तोंड देता येण्यासाठी त्या त्या आपत्तींचे व्यवस्थापन सुध्दा उचित वेळी म्हणजेच आपत्ती येण्यापूर्वी करणे हेच सर्वतोपरीने हितकर, कल्याणकारी आणि श्रेयस्कर असते. 
        
संकट सांगून येत नाही हे जरी खरे असले तरी अचानक येणार्‍या संकटांना तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सदैव सज्ज ठेवण्याची जबाबदारी सरकारच्याच खांद्यावर असते , मग त्यात सामान्य नागरीक काय भूमिका घेणार किंवा पार पाडणार असे म्हणत सरकारला नावे ठेवत बसण्यापेक्षा सुजाण नागरिकांनी सरकारला सहाय्य करायचे ठरवले तर हे चित्र खूप मोठ्या प्रमाणावर बदलू शकते असा आशेचा अंधुकसा किरण सतत खुणावतोय असेच आशावादी चित्र नजरेसमोर तरळ राहते. 

उत्तर व ईशान्य भारतात आलेल्या पूराने आपल्या देशातील आपती व्यवस्थापन यंत्रणेच्या तयारीचा बुरखा फाडला आहे. वादळी पावसामुळे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाब, आसाम मध्ये शेकडोहून अधिकच लोकांचा मृत्यू झाला आहे.

मदतकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने राष्ट्रीय आपत्ती कारवाई दल (एनडीएएफ) बरोबरच लष्कर, इत्यादींना बोलवले जाते. परंतु पुरेसे प्रशिक्षण आणि साधनांच्या अभावी बचाव कार्य परिणामकारकरित्या होताना दिसत नाही. 

येथे मुंग्याच्या सामूहिक बुध्दीमत्तेची खरोखरी खूप दाद द्यावीशी वाटते. पावसाळा सुरु होण्याच्या खूप आधीपासून हा इवलुसा जीव किती अपार मेहनतीने आणि अथक परिश्रमाने अन्नधान्याचा साठा करून ठेवतो. मुंगी हा प्राणी कधीही स्वत:साठी काम करीत नाही. मुंग्याच्या वसाहती असतात आणि तेथे त्यात जवळपास पाच पिढ्या गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात असे वाचनात आले. मुंग्याचा मानवाने विशेष करून ध्यानात घ्यावा असा आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे की मुंग्याच्या वसाहतीतील प्रत्येक मुंगी मग ती राणी माशी असो वा सैनिक मुंगी असो वा सफाई कामगार मुंगी असो आपल्या वसाहतीसाठी, वसाहतीच्या हितासाठी स्वत:ला घट्टपणे नियमांनी बांधून घेते. समूहाचे कल्याण, समूहाची शिस्त, समूहाची सुरक्षा, समूहाचे यश आणि विकास ह्याच ध्येयाने प्रत्येक मुंगी भारावलेली असते, प्रेरीत झालेली असते. वसाहतीच्या कल्याणासाठी, विकासासाठी सदैव तत्पर असणार्‍या मुंगीकडून मानवाने आपण आपल्या समाजाला, देशाला कसे एकसंघ वृत्तीने सहाय्य करू शकतो ह्याबाबत नक्कीच धडा गिरवायला पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते. आपल्याला हीच शिकवण आपले संतही देताना आढळतात की "एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ " !

अनेकदा पूर आल्यानंतर मदतीसाठी वेळ लागतो. त्यावेळी होणारी परिस्थिती टाळण्यासाठी पावसाळा सुरू झाल्यानंतर कोरडे पदार्थ घरामध्ये ठेवावेत, महत्वाची कागदपत्रे उंच ठिकाणी ठेवावीत, परिसरात कचरा ठेवू नये त्यामुळे पाणी साचणार नाही, साचलेली गटारे,नाले ह्यांची साफसफाई करून घ्यावी अशा सूचना महापालिकेतर्फे वा नगरपालिकेतर्फे दर पावसाळ्याच्या आधी वारंवार केल्या जातात. ह्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही ह्याचे प्रत्येकाने भान राखायलाच हवे असे वाटते.

मला आठवते ती बातमी महाराष्ट्रात २०११ साली नाशिकला गोदावरी नदीकाठच्या लोकांना सातत्याने बसणार्‍या पूराच्या तडाख्याला लक्षात घेऊन महापालिकेने पथनाट्याद्वारे शहरातील नदीकाठालगतच्या सुमारे २२ झोपडपट्ट्यांमध्ये पूराला कसे तोंड द्यायचे असते ह्याबद्दल जनजागृतीचा उपक्रम राबविला होता आणि त्याला सुंदर प्रतिसादही मिळाला होता लोकांकडून...

सगळा संसारच या झोपड्यांमध्ये असल्याने जीवावर उदार होऊन हे लोक पूरातही झोपड्या सोडत नाहीत. इतक्या वर्षात महापालिकेने पहिल्यांदाच राबवलेल्या या उपक्रमामुळे झोपडपट्ट्यांना पूर परिस्थितीत नेमके काय करावे याची कल्पना आली होती. 
त्यावर्षी पूरानंतर घेतेलेल्या आढाव्यात हाती लागलेल्या काही बोलक्या  प्रतिक्रियांपैकी -
" आयुष्य झोपडीत काढलं. किती तरी वेळा पूरानं वाहून गेलेला संसार पुन्हा उभा केला. उपासमार तर व्हायचीच पण दिवस-दिवस पाण्यात राहून प्यायला पाणी मिळायचं नाही. अन्न-पाण्याचं राहू द्या, आजवर कोणी आम्हाला पूर आल्यावर जीव कसा वाचवायचा ते देखील सांगितलं नाही, " झोपडपट्टीतल्या एका आजीने डोळ्यातल्या अश्रूधारांनी आपल्या भावनाही सांगितल्या होत्या. 
" आमचं ठीक आहे पण या तान्ह्यांनी काय करायचं. आम्ही एक वेळ उपाशी राहू पण लहान मुलांची अवस्था बघवायची नाही. पूर ओसरल्यावरही कित्येक दिवस त्यांच्या आजारपणातच जायचे. या गोष्टी जर आधी कळल्या असत्या तर आमचं इतकं नुकसान झालं नसतं,"
अनेकदा पूराचे चटके सोसलेली तीन मुलांची आई सांगत होती. 
पूराशी सामना केलेल्या वयस्क नागरिकांनी आजवर पूर परिस्थितीत आलेले अनुभव यावेळी सांगितले तसेच महापालिकेचे आभारही मानले होते. म्हणूनच पावसाळा सुरु होण्याआधीच पूराच्या प्रतिबंधाचे उपाय पूर्ण केले गेलेच पाहिजेत असा आपण चंग बांधायलाच हवा, नाही का?



अनुभवांच्या आधारे आपण आता हे नक्कीच शिकायला हवे की  आपत्ती ही काही मानवाला तारीख, वार आणि वेळ तसेच प्रमाण (किती मोठ्या प्रमाणावर ) सांगून येणार मुळीच नाही. त्यामुळेच प्रशासनाने प्रत्येक पातळीवर कोणत्याही परिस्थितीत आपती आलीच तर तिला तोंड देण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. पूर नियंत्रण मंडळ दरवर्षी बचाव व्यवस्था सक्षम करण्यासाठी कोट्यावधी रुपये मंजूर करते, परंतु आपत्ती काळात आवश्यक साधने, प्रशिक्षण आणि इच्छाशक्तीचा अभाव प्रत्येक पातळीवर दिसून येतो. राज्य आणि केंद्रीय स्तरावरही दरवर्षी आपत्ती व्यवस्थापनाबद्दलचे भरपूर दावे केले जातात. बजेट तयार करण्यात येते. आपत्तीला तोंड देण्यासाठी विविध प्रकारचे उपाय सांगितले जातात. तरीही जेव्हा अशा आपत्ती येतात, तेव्हा आपल्या आपत्तीनिवारक यंत्रणा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास अक्षम असल्याचे दिसून येते. जर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा दक्ष ठेवली आणि पर्यावरणाकडे गार्ंभीर्याने लक्ष पुरविले तर जीवन-वित्ताचे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते. या संदर्भात अनेक विकसीत देशांनी अनुकरणीय उदाहरणे सादर केली आहेत. मागील बातम्यांच्या आधारे असे लक्षात आले की २० मे २०१३ साली ओक्लाहोमा या अमेरिकी शहरात मुरे नाचाचे प्रचंड विध्वसंक घडवू शकेल असे भीषण चक्रीवादळ झाले, परंतु त्याच्या भयावहतेच्या तुलनेत जीवितहानी फारच कमी होती. याचप्रकारे २०११ ह्या वर्षी जपानमध्ये प्रचंड भूकंप झाला आणि भरीस भर म्हणून त्सुनामी पण आली. परंतू प्रगत आणि दक्ष आपत्ती व्यवस्थापनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना वाचविण्यात आले. 

एवढेच नव्हे तर आपल्याच देशात फायलिन (२०१३) आणि हडहड (२०१४) ह्या भीषण विध्वसंक , प्रलंयकारी भासणार्‍या चक्रीवादळापासून खूपच प्रशंसनीय पध्दतीने आपत्ती व्यवस्थापन केले गेले होते. फायलिनच्या चक्रीवादळात सुमारे ५.५० लाखाच्या वर लोकांना विस्थापित केले गेले आणि अंदाजे ३८ लोक मृत्युमुखी पडले होते, तर हडहडच्या वेळेस सुमारे २५ लोक मुत्यु पावले होते.   

चक्रीवादळांबाबत आपली आपात्कालीन यंत्रणा दिवसेंदिवस अधिक प्रगती ,सुधारणा करीत आहे असे असले तरी देखिल आपल्या देशात आपत्ती व्यवस्थापनाचा उपयुक्त पाया पाया योग्यरित्या तयार होऊ शकलेला नाही, असे निरीक्षणांती काही सुत्रे आपले मत प्रदर्शित करताना दिसतात.  एका पाठोपाठ एक येणार्‍या आपत्तींना तोड देताना एका कटू वास्तवाला सामोरे जावेच लागते, ते म्हणजे सध्या ताबडतोब विकसीत देशांकडे आहे, तशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बनवणे शक्य होईल असे वास्तववादी चित्र दिसत नाही. याचे एक कारण म्हणजे आपण समस्या समोर आल्यानंतरच जागे होतो आणि केंद्र व राज्यांनी एकत्र मिळून करण्याच्या कामात बर्‍याच अंशी सुसंवादाअभावी अपेक्षित ध्येय गाठणे कठीण होऊन बसते. या सर्वा व्यतिरिक्त एक वास्तव असे आहे की, देशात प्रत्येक पातळीवर पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत आहे. जर या दुर्लक्षाचं सत्रं असंच सुरु राहिलं, तर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला कितीही मजबूत केले, तरी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या संकटासारख्या आपत्तीपासून वाचणे अवघड होईल. 

आपल्या सर्वांना हे विदीत आहेच की देशभर छोट्या-मोठ्या नद्यांच्या प्रवाहामध्ये अडथळे आणले जात आहेत, परंतु कोणत्याही पातळीवर नद्यांशी होत असलेली वादावादी थांबविण्याबाबत पुढाकार घेतलेला दिसून येत नाही. नद्यांच्या छेडछाडीची जी परिस्थिती मैदानी विभागात आहे, तशीच डोंगराळ विभागातही आहे असे आढळून येते.  

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू , काश्मीर, आसाम अशा पर्वतीय प्रदेशांची एक दुसरी समस्या अशी आहे की, डोंगराळ भागात उतरणीवर तसेच नद्यांच्या किनार्‍यावर सुध्दा बेसुमार बेकायदेशीर बांधकामे केली गेली. उत्तराखंडमध्ये नद्यांना जो पूर आला. त्यात अधिकांश नदी किनारी असलेल्या इमारती वाहून गेल्या. जर ही बेकायदेशीर बांधकामे झाली नसती तर कदाचित  झालेली जीवितहानी रोखता आली असती. बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध विविध प्रकारचे कायदे आहेत, परंतु अनेकदा तर नियमांत पळवाटा काढून अशा बांधकामांना परवानगी देण्यात येते. निसंशय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मजबूत बनवलीच पाहिजे, परंतु त्याबरोबरच नद्या आणि डोंगराळ भागाशी जो मानवाने स्वार्थापोटी, स्वत:च्या हव्यासापोटी चालवलेला क्रूर खेळ आता तरी थांबवलाच पाहिजे. तो प्राधान्यक्रमाने रोखणे अत्यंत आवश्यक आहे. स्वतःच्या नाहक,जीवघेण्या हव्यासापायी 
नद्या आणि डोंगरांशी खेळ करणार्‍या मानवामुळे निर्सगाचे संतुलन  ढासळते आणि मग  सामोरे जावे लागते 
अपरिमित मनुष्यहानी, वित्तहानीला !!!  

हे सर्व   माहीत  असूनही   आजतागायत  नद्या आणि डोंगरांची कत्तल सुरुच आहे. याला देशातील कोणतंही राज्य अपवाद नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागते. 

आपत्ती आल्यावर आपत्ती कशामुळे आली याचा अभ्यास सुरु होतो आणि आपत्ती व्यवस्थापनाची कमजोर बाजू किंवा अंग शोधले जाते. त्यामुळे हे पुन्हा पुन्हा असेच घडू नये यासाठी ठोस पावले उचलून याच्या कारणांचे निराकरण करणे आवश्यक आहे. आज उत्तर भारत, ईशान्य भारत  निसर्गाच्या प्रकोपाने घायाळ झाला आहे, दक्षिणेकडे आंध्र प्रदेश, ओरिसा, केरळ, महाराष्ट्रा अशा सार्‍यांनीच निसर्गाचे प्रकोप खूप वेळा अनुभवले आहेत. ही समस्या कोणा एका राज्याची नाही, ती संपूर्ण देशाची आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षण आणि आपत्ती व्यवस्थापण यंत्रणा याबाबत वेळीच गांभीर्याने पावले उचलली पाहिजेत, इतकेच.

फायलीन , हडहड ह्यासारख्या आपती व्यवस्थापनाचे दाखले आणि तत्सम काही गोष्टी साक्ष पटवितात की सरकारच्या हातात हात घालून सामूहिकपणे एकत्रित होऊन , एकजूटीने आपण सारे भारतीय उभे ठाकलो तर अशक्य असे काही ह्या जगात मुळीच उरणार नाही. आपल्याला हीच दृष्टी (Vision) आपल्या लाडक्या राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांनी दिली आहे ह्याची सभानता  आपण  सदैव उरी बाळगायला हवी. 
काय पटतयं ना ? 
ह्या अनुषंगाने एक पंक्ती शेअर करावीशी वाटते - 
खुदी को कर बुलंद इतना की आखिर खुदा भी पूछे बंदे तेरी रजा क्या है ? 

1 comment:

  1. खूपच भयंकर आणि विदारक घटना.. मा चंडिका आणि तिचा पुत्र या सर्वांचे रक्षण करो. अंबज्ञ

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog