Tuesday 24 November 2015

त्रिपुरारी पौर्णिमा

दीपावली असो वा कार्तिक पौर्णिमा असो दीप उजळवून अंधकाराचा नाश करण्याची शिकवण देणारे हे भारतवर्षातले सण वा उत्सव आपल्याला आपल्या आदर्श, महान भारतीय परंपरेची ओळखच करून देतात जणू काही ! दिवे लावून परमेश्वरी कृपेच्या सत्याचा उजेड आपल्या मनात पडावा यासाठी असे दीपोत्सव आवश्‍यक असतात आणि त्यांपासून प्रेरणा घ्यायची असते ती निराशाजनक वातावरणातही न डगमगता खंबीरपणे, मनोधैर्य उंचावून , "त्या" एकावर , "त्या"च्या अगाध सामर्थ्यावर अढळ , अविचल श्रध्दा ठेवून जीवनात, "त्या" भगवंताच्या तेजाचा वारसा जागवायचीच असे मला वाटते. 

आपल्या भारतवर्षातील बहुतेक सण, उत्सवांमागील कथा या दुष्ट-निर्दालनाच्या असतात. यावरून असे लक्षात येईल की आपण पराक्रमाचे पूजक आहोत. पण पूजा करून पराक्रम विसरून गेलो तर काय उपयोग? सांप्रतकाली आपली तशीच अवस्था झाली आहे असेच चित्र दिसू लागले आहे व ते पाहून संभ्रम पडतो की क्षात्रतेज आटू लागले आहे की काय? रणधुरंधर योध्दा बनून संकटाशी झुंज देण्याचे , लढवय्या वृत्तीचा परिपोष करून प्रारब्धावर मात करण्याची आम्हा भारतीयांची झुंजार वृत्ती , रणमर्दानी शक्ती कुठे लोप पावत चालली आहे का? सैन्यात जाऊन पराक्रम गाजवण्याची स्वप्ने पाहण्यापेक्षा आम्ही सुखासीनता आणि चंगळवादी भोग संस्कृतीचे पुजारी बनून अध:पतनाकडे तर नाही झुकत आहोत ना? छत्रपती शिवराय, राणा प्रताप, गुरू गोविंदसिंह, शंभू राजे, पहिला बाजीराव , सावरकर, भगतसिंग अशा क्रांतिकारक वीरांची चरित्रेच आजच्या पिढीला माहिती करून घ्यायलाच हवीत आणि त्यांच्यातील असीम पराक्रम अंगी बाळगायला हवा , त्यांची संकटांवर विजय मिळविण्याची इच्छा, तेज, साहस आणि क्षात्रवृत्ती परत नव्याने चेतवायला हवीच ....अन्यथा मरगळ आलेल्या समाजाची दैन्यावस्था पाहून -

कुसुमाग्रजांसारख्या कवीला खंत व्यक्त करण्याची दुर्दैवी पाळी ओढावते  -
सूर्यकुलाचा दिव्य वारसा, प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे। 
काळोखाचे करूनी पूजन, घुबडाचे व्रत वरू नका।।.......... 

भानु म्हणजे सूर्य त्यावरून "भारत " ह्या शब्दाचा मला भावलेला अर्थ म्हणजे - 
"भा' म्हणजे तेज आणि "रत' म्हणजे नित्य पूजन करणे. तेजाचे पूजन करणारा तो भारतीय. नुसताच भारतात राहणारा तो भारतीय असे नव्हे! म्हणूनच आपली भारतीय हिंदवी तेजोमयी संस्कृती असा दिव्य संदेश देते आपल्या सणांतून , उत्सवांतूनही !
त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा . कार्तिक महिन्यातील शुध्द पक्षातील ही पौर्णिमा "त्रिपुरारी पौर्णिमा"म्हणून साजरी केली जाते.
त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे मानवी जीवनात प्रकाश, उजेड, आनंद देणारा उत्सव. आपल्या मनातील क्रोध, द्वेष, मत्सर नाहीसा करून भगवान शिव-शंकराची पूजा करावी, आराधना करावी व सुख-शांती याची मागणी करावी. असा संदेश या उत्सवातून मिळतो.

आता त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यामागची जनमानसांतील कथा बघू या....
कार्तिक शुध्द पौर्णिमा म्हणजेच त्रिपु्रारी पौर्णिमेशी निगडीत कथेशी रांजणगाव व महागणपतीच्या आणि महडच्या वरदविनायकाचा संबंध आहे असे अष्टविनायक महात्म्य वर्णिते.

रांजणगाव - महागणपती - त्रिपुरारी पौर्णिमा 


प्राचीन काळी आपल्या भारतवर्षात गृत्समद हा एक वैदिक मंत्रद्रष्टा ऋषी होता. गृत्समद ऋषींनी पुष्पकारण्यामध्ये एका पायावर उभे राहून आणि दिवसाकाठी फक्त एक वाळलेले पान खाऊन गणेशाची घोर तपश्चर्या केली, असे वाचनात आले. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन
एके दिवशी त्याच्या समोर रिध्दी-सिध्दीसहित श्रीगणेश येऊन उभे राहिले. गृत्समदाने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. त्यावेळी गणेशाने त्यांना 
'ॐगणानां त्वा गणपतिं हवामहे। कवि कवीनामुपश्रवस्तमम्। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन: शृण्वन्नूतिभि: सीद सादनम्!'        - ऋग्वेद २.२३.१
अर्थ -गणांचा नायक, श्रेष्ठ कवी (ज्ञाता,) सर्वत्र कीर्ती पसरलेला, सर्व मंत्रांचा रक्षक, अशा हे गणपते, आम्ही तुला बोलावीत आहोत. हे आमचे आमंत्रण ऐकून, आमचे संरक्षण करण्याच्या सर्व साधनांसह तू आमच्या निवासस्थानी येऊन राहा.
हा महामंत्र सांगून त्याचे जनकत्व बहाल केले आणि वसिष्ठ, विश्वामित्र यांच्या श्रेणीत त्याची गणना केली.
त्या वेळी गणेशाने त्याला वरही दिला की 'फक्त शिव सोडून, बाकी सर्वाना अजिंक्य ठरेल असा पुत्र तुला होईल आणि तोही माझा भक्त असेल.' हा वर देऊन गणेश अंतर्धान पावला. त्या पावन भूमीवर गृत्समदाने सुंदर मंदिर बांधले. त्यामध्ये गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. भक्तांना वर देणारा म्हणून त्याचे नाव 'वरदविनायक' ठेवले. वरदविनायकाच्या या क्षेत्राला 'पुष्पक' क्षेत्र असेही म्हणतात. गृत्समदाने येथे तप केले आणि तो मंत्रद्रष्टा झाला. म्हणून या क्षेत्राला 'भद्रक' असेही म्हणतात. सध्या 'महड' नावाने हे क्षेत्र ओळखले जाते व महडचा वरदविनायक म्हणून पूजले जाते. ह्या गृत्समद ऋषीनेच ’ गणानां त्वां गणपति हवामहे...’ हा प्रत्येकाने कधीना कधी ऐकलेला वा म्हटलेला सुप्रसिध्द मंत्र आपल्या चिंतनातून परमेश्वराचा प्रसाद म्हणून सर्व जगासाठी अर्पण केलेला. 

पुढे गृत्समदाला पुत्रप्राप्ती झाली तोच 'त्रिपुर' होय. त्रिपुरासूर हा मूळचा देवांशधारी वाचक्नवी मुनींचा पौत्र (नातू) व महागाणपतश्रेष्ठ श्रीगृत्समदांचा पुत्र होय. दोषसंस्कारांच्या बीजामुळे त्याच्या ठिकाणी असुरभाव वाढत होता. तथापि मूळच्या गाणपत संगतीमुळे व गणेशमार्गाची पित्याकडून दीक्षा प्राप्त झाल्यामुळे (गृत्समदांनी त्याला 'गणानां त्वा' मंत्राचा उपदेश केला होता.) त्याने प्रत्यक्षात गणेशाची मोठी आराधना करून, खूप ऐश्वर्य प्राप्त केले. त्याने ज्या ठिकाणी गणेशाची आराधना केली आणि वरप्राप्ती झाली त्या स्थळी त्याने गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली, असे सांगितले जाते. ते स्थळ 'त्रिपुरानुग्रहदगणेशक्षेत्र' गणेशपूर या नावाने आत्ताच्या बांग्लादेशमध्ये प्रसिद्ध आहे.

गृत्समद ऋषिने आपल्या ह्या पुत्राला सर्व ज्ञान देवून, अस्त्र शास्त्रात पारंगत करून, “गणांनां त्वा गणपती.” या मंत्राचा उपदेश देऊन गणेशाची अराधना करण्यास सांगितले. त्या मुलाच्या आराधनेवर प्रसंन्न होऊन गणेशाने त्यास लोखंड, रूपे व सुवर्ण यांची तीन नगरे दिली. ज्यामुळे तो त्रिपुरासुर म्हणून ओळखू जाऊ लागला. त्याच बरोबर, “शिव शंकरा शिवाय कोणीही या नगराचा नाश करू शकणार नाही,” असा वर दिला. परंतू या वराने त्रिपुरासुर उन्मत्त झाला. त्याने अवघ्या त्रिलोकास भयभित केले. सर्व देवतांचा पराभव केला. देवांनी शंकराची प्रार्थना करून या संकटातून सोडवण्याची त्यांच्याजवळ विनवणी केली. शिवानी त्रिपुरासुर वधाची जबाबदारी स्विकारून त्यांच्याबरोबर युद्ध आरंभले पण यश येत नव्हते. तेव्हा सदगुरु नारदमुनींनी शंकरास, गणेशाचे स्मरण करण्यास सागुन “प्रणम्य शिरसा देवम्,” हे प्रसिद्ध अष्टश्लोकात्मक स्तोत्र सांगितले. शंकराने नारदाच्या सांगण्यानूसार गणेशाचे स्तवन, करून पुन्हा युद्ध केले व त्रिपुरासुराचे वध केले. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हि घटना घडली म्हणून त्यास त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात व जेथे आराधनेसाठी शंकराने गणेशाची स्थापना केली ते स्थान म्हणजे मणिपूर आज रांजणगाव म्हणून प्रसिध्द आहे.

अशीच एक दुसरी कथाही वाचनात आढळली - फार पूर्वी तारकासुर नावाचा एक राक्षस होऊन गेला. प्रयागतीर्थाच्या ठिकाणी एक लाख वर्षे तारकासुराने तपश्चर्या केली. या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि कोणताही वर माग, असे म्हणाले. त्यावर देवता, मनुष्य, निशाचर किंवा रोग यांच्यापासून आपल्याला अभय असावे, असा वर त्याने मागितला. याचाच अर्थ त्याला मरण नको होते. त्यावर ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु म्हटले. असा वर मिळाल्यानंतर मात्र त्या असुरातील उन्मत्तपणा वाढला. मिळालेला वर हा कल्याणासाठी वापरायचा असतो. पण या असुराने तसे केले नाही. तो देवदेवतांसह सा-यांनाच त्रास द्यायला लागला.

त्याने देवांच्या स्थापतीकडून म्हणजेच विश्‍वकर्म्याकडून अंतराळात तीन नगरे बांधून घेतली होती. लोखंड, तांबे आणि चांदीची ही नगरे सुंदर दिसत होती. ती त्याने आपल्या तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन अशा तीन पुत्रांना दिली. हे तिघे राक्षसपुत्र प्रजेचा आणि संपूर्ण विश्‍वाचा छळ करणारे होते. उत्पात माजवणे आणि त्रास देण्यात ते आपल्या बापापेक्षा पुढे होते. त्यामुळे गांजलेल्या लोकांनी महादेवाला साद घातली. शंकर धाऊन आले. त्यांनी कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या राक्षसांवर हल्ला केला. त्यांची तिन्ही पुरे भगवंतांनी उद्‌ध्वस्त केली आणि सर्व राक्षसांचा नायनाट केला. या दिवशी प्रदोषकाळी शिवाने त्रिपुरासुराचा वध करून देवदेवतांची त्रासातून सुटका केली. म्हणून हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. त्रिपूर संहाराचा आनंद व्यक्त करण्यासाठी दीप पेटवून ही पौर्णिमा साजरी केली जाते. घरोघरी, शिवमंदिरातून आणि इतर देवालयांमधून दीपोत्सव साजरा करतात.



दुष्टांचा संहार याच दिवशी झाला म्हणून कार्तिक पौर्णिमेला आनंदोत्सव साजरा केला जातो. त्याची आठवण म्हणून कार्तिकी पौर्णिमेला दीपप्रज्वलन केले जाते. 

दिवाळीत दिव्यांची रोषणाई करून परिसर प्रकाशमान केला जातो त्याचप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेलाही मंदिरातील दीपमाळेवर दीप लावण्यात येतात. हा एक प्रकारचा आनंदोत्सवच आहे. ज्या ज्या वेळी असुरशक्ती वाढली त्या त्यावेळी दैवी शक्ती प्रकट होते आणि असुर प्रवृत्तीचा नायनाट करते अशा प्रकारच्या कथा आपल्या संस्कृतीत आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेशी संबंधित ह्या कथा अशाच प्रकारच्या आहेत. सज्जनांचे रक्षण करून दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी दैवी शक्ती कशा उपयोगी असतात याचे चित्रण या कथांमधून आढळते.

दसर्‍याला केले जाणारे रावण दहन , होळीला केले जाणारे होलिका राक्षसीचे दहन वा त्रिपुरारी पौर्णिमेचे त्रिपुरासूर दहन ह्या सर्व परंपरा  दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट केल्याच्या आनंदाचा भाग म्हणून साजर्‍या केल्या जातात. दुष्ट प्रवृत्ती वाढल्या की त्यांचा कशा प्रकारे विनाश होतो हे या कथांमधून दिसून येते.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा वध केला असल्यामुळे त्याच्या मंदिरासमोरील त्रिपूर वातींनी उजळला जातो. पूर्वी प्रत्येक मंदिरासमोर एक दीपमाळ असायची. आताही जुन्या मंदिरांमधून ती दिसून येते. या दीपमाळेमध्ये वाती लावून त्या उजळल्या जातात. दुष्टांचा -हास कशा प्रकारे होतो याची आठवण राहावी म्हणून या दीपमाळा उजळल्या जातात. दिवाळीनंतर येणारी ही पौर्णिमा असते. या दिवशी देवस्थानातील दीपमाळा उजळतात त्याचप्रमाणे नदीच्या पात्रात प्रज्वलित दीप सोडण्याचीही प्रथा आपल्याकडे आहे.

पंचगंगा - कार्तिकी पौर्णिमा 
महाराष्ट्रात कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची समाप्ती होते. कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमेपर्यंत पाच दिवस चालणा-या तुलसी विवाहाची सांगता पौर्णिमेला होते. म्हणूनही दीपोत्सव साजरा केला जातो.

भारतवर्षात त्रिपुरारी पौर्णिमा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते.

उत्तर भारतात त्रिपुरारी पौर्णिमा " स्कंद जयंती" म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्कंद मूर्ती देवतेची पूजा करणे, दीप पेटवणे आणि आनंदोत्सव साजरा करणे असे उत्सवाचे स्वरूप आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला कृतिका महोत्सव साजरा करतात. या दिवशी भक्तगण शंकराची पूजा करतात, दीपदान करतात आणि अग्नी प्रज्वलित करून मोठ्या थाटाने हा उत्सव साजरा करतात. दक्षिणेकडे मंदिरासमोरील उंच स्तंभावर दीपप्रज्वलन करणे हासुद्धा या महोत्सवाचाच एक भाग मानला जातो.

कार्तिक महिन्यातील शुध्द वा शुक्ल पक्षात नरकासुर, त्रिपुरासुर आणि इतर राक्षसांचा देवादिकांनी वध केला. म्हणून दीपावलीपासून दीप प्रज्वलन करण्याची परंपरा आपल्याकडे सुरू झाली. त्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते.

इतर राज्यांप्रमाणे गोव्यातही त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव परंपरेनुसार केला जातो. मंदिरातील दीप मंदिराजवळच्या तळीच्या पाण्यात किंवा नदीकिनारी असलेल्या मंदिरातून नदीच्या प्रवाहात सोडणे, मंदिरातील देवदेवतांची विधिवत पूजा करून पालखीतून देवतांची मिरवणूक काढणे अशा प्रकारे तेथे हा उत्सव साजरा केला जातो.

गोव्यातील साखळी येथील विठ्ठलापूर हे प्रति पंढरपूर समजले जाते. तेथे गेल्या ३० वर्षापासून रंगवलेल्या होड्या नदीच्या पात्रात सोडण्याची परंपरा सुरू झाली.

कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावतात. महाराष्ट्रातील सर्व मंदिर अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, देवांनींच मंदिरे प्रकाशमय केली आहेत. म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला “मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी” असेही म्हण्तात.

पौराणिक महत्त्व पाहिले आता आध्यात्मिक महत्त्व पाहू या -
त्रिपुरारी पौर्णिमा याच दिवशी शिवपुत्र कार्तिकेयाचा जन्म झाला म्हणून या दिवशी कार्तिकेयाचीही पूजा केली जाते. या दिवशी कार्तिकेय यांचे दर्शन घ्यावे, गंगास्नान करावे आणि ब्राह्मणांना दीपदान करावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. मत्स्यावतारही याच दिवशी झाला.

माझे सदगुरु डॉक्टर अनिरुध्दसिंह जोशी ह्यांनी आम्हाला प्रवचनांदरम्यान सांगितले होते की -
त्रिपुरारी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, महाशिवरात्र  ह्या दिवसात परमात्मातत्वाने त्याचे maximum व्हायब्रेशन्स मोकळे केलेले असतात. त्यावेळी ते आमची capacity बघत नाही. "अचिंत्यदानी " परमात्मा आपले अनंत हस्ते उभारून मुक्तपणे प्रेमाची, भक्तीची, आनंदाची लयलूट करीत असतो. " अनंत हस्ते देता कमलावर घेशील किती दो कराने " अशीच आमची अवस्था होते!

त्रिपुरारी पौर्णिमा, रामनवमी, आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, दत्तजयन्ती, महाशिवरात्र आणि कार्तिकी एकादशी हे सात दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. ह्या दिवसाचं महत्व आम्हाला कळलं पाहिजे. ह्या दिवशी नॉन-व्हेज खायचं नाही. तसेच तीन उत्सव - गणपती (घरात असेल तर), नवरात्र (घरात असेल तर) आणि सदगुरुंच्या पादुका - उत्सवासाठी घरात असतील तर. त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस अतिशय शुभ, पवित्र आहे. हा दिवस परमशिवाच्या, त्याच्या मातेच्या,  स्मरणात घालू तर अतिशय चांगला आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेचे अजूनही एक मह्त्त्व वाचनात आले होते की -

ह्या भारतवर्षाची पुण्यभूमी परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होताच, त्याच वर्षीच्या त्रिपुरारि पौर्णिमेस भगवान श्रीपरशुराम सदगुरु श्रीदत्तात्रेयांच्या आज्ञेने नैमिषारण्याच्या सर्वोच्च ज्ञानभूमीत परत एकदा तपश्र्चर्येस बसले व बरोबर नऊ वर्षांनी त्रिपुरारि पौर्णिमेस ब्राम्ह मुहुर्तावर श्रीपरशुरामांनी सगुण निराकार रूप धारण करून अतिवाहिक स्वरूपात आदिमाता चण्डिकेच्या कार्यासाठी स्वत:स समर्पित केले होते. 

आपल्या मनातील अंधार घालवून मनाची दीपज्योत प्रज्वलित करावी, असा या उत्सवांचा हेतू आहे. आपल्या मनाची सद्बुद्धी दीपज्योतीसारखी जागवा, असे या उत्सवांचे सांगणे आहे. कलियुगाच्या चरम सीमेवर आज समाजात महागाई, भ्रष्टाचारासारखे भस्मासूर बोकाळले आहेत. असुर जाळून टाका, असे या उत्सवांतून आवाहन करण्यात आले आहे. समाजविरोधी मूल्यांचा नायनाट करा, हा यामागील यथार्थ आहे. आज अशा उत्सवातील रुपके बाजूला पडतात आणि त्यातील कर्मकांडच फक्त शिल्लक राहते. त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेमागील कथेमागची मूळ प्रेरणा आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे.

आपल्या सर्व देव-देवता या आयुधांनी सज्ज असलेल्या आहेत. या शस्त्रांचा धाक असुरांसाठी, श्रध्दाहीनांसाठी,राक्षसांसाठी असतो; श्रध्दावानांसाठी सज्जनांसाठी नव्हे. श्रध्दावान,सज्जन एकत्र आले की दैवी शक्ती निर्माण होते आणि दानव वृत्तीचा नाश करते. त्याचप्रमाणे या काळात ऋतूबदल झालेला असतो. थंडी पडू लागलेली असते. दिवे लावल्यामुळे उबदारपणा निर्माण होतो. नदीत दीपदान करण्यामागचा उद्देश, परमेश्वरी शुभ स्पंदनांचा हा प्रकाश सर्वत्र पांगावा असा असावा.


जे जे चांगले ते ते पेरावे,  वाईट तेवढे समूळ निर्दाळावे हाच खरा त्रिपुरारी पौर्णिमेचा संदेश आहे असे जाणवते. 
जीवनात तेजोमय प्रकाशाची, भक्तीची, शांतीची प्रेरणा देणारी , मनाला आनंद देणारी, उत्साह देणारी, त्रिपुरारी आपणा सर्वांना फलदायी ठरो हीच त्या भगवान शिव-शंकरापाशी मागणी.

संदर्भ : १. श्रीमदपुरुषार्थ: तृतीय खंड: - आनंदसाधना -  


1 comment:

  1. हरि ॐ सुनितावीरा.

    आपले article, just marvellous.

    अगदी मनापासुन शांत चित्ताने आत्मसात करीत वाचले. यातील आपल्या " भारत " या नावाची व्याख्या superb. रत शब्दाच्या " नित्य पूजन " या अर्थाबरोबरच एखाद्या गोष्टीत रममाण होणे, गढुन जाणे हा अर्थ सुद्धा आहे. आणि आपल्या भारतवर्षाची संस्कृती आहेच अशी की आपण त्याच्या तेजात नित्यत्वाने रममाण व्हावे.

    आपल्या आर्टिकल मधुन आध्यात्मिक तत्त्वांबरोबर पौराणिक कथांचा सखोल अभ्यास तसेच "त्या" एकावरची अविचल श्रद्धा व ओथंबलेला दृढ विश्वास दिसुन येतो. त्रिपुरारी पौर्णिमेची अभ्यासपुर्वक सखोल माहिती वाखाणण्यासारखी.

    तसेच लेखामधुन अध्यात्म वाचनाबरोबरच काव्य वाचन इ. चौकस ज्ञानही प्रस्तृत होतेय. कथांची मांडणीही क्रमबद्ध असुन आपली सहज सुलभ लेखन शैली वाचकास अंतर्मुख करणारी आहे. keep it up veera.

    भक्ती हे दुर्बलतेचे लक्षण नसुन वीरश्रीचे लक्षण आहे असे सदगुरु डॉ. अनिरुद्ध जोशी म्हणतात. आपण सादर केलेल्या लेखामधुन ते पुर्णपणे स्पष्ट जाणवते.

    अशीच भारतीय संस्कृतीवरील मरगळ दुर करणारी आर्टिकल्स सादर करावीत. आपणास पुढील लेखनास अनिरुद्ध शुभेच्छा.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog