Friday 20 January 2017

भगवान श्रीकृष्ण उवाच - संत सचेतन माझ्या मूर्ती ।

प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती । संत सचेतन माझ्या मूर्ती ।
दृढ भावें केल्या त्यांची भक्ती । ते मज निश्चितीं पावली ॥१॥

केल्या प्रतिमा निजकल्पना उत्तम । संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम ।
चालतेंबोलतें परब्रह्म । अतिउत्तम साधुसेवा ॥२॥
                                                                  - एकनाथी भागवत  

                                                                   

संत ह्याच माझ्या सचेतन मूर्ती आहेत असे साक्षात परमात्मा भगवंत श्रीकृष्णाचे उद्गार आहेत असे आपल्याला संत श्रेष्ठ एकनाथ महाराज सांगतात असे वाचनात आले आणि एकदम आठवली ती माझ्या आवडत्या श्रीसाईसच्चरितातील हेमाडपंताची अध्याय १४ मधील ओवी.

ऐसे हे महासाधुसंत । जयांच्या बोलात वर्ते भगवंत । 
काही न अप्राप्य तया विश्वांत ।  काही न अज्ञात तयातें । । ६१ । । 


श्रीसाईसच्चरितात सुरुवातीलाच उपोद्घात मध्ये स्वत:ला बाबांचे एक लेकरू म्हणविणारे साईबाबांचे परम भक्त काकासाहेब दीक्षित म्हणजेच श्री हरी सीताराम दीक्षित लिहीतात की श्रीसाईसच्चरित यातील ओव्या एकनाथ  महाराजांच्या ओवींच्या धाटणीवर असून, ग्रंथ वाचत असताना नाथ महाराजांच्या वाणीचे वारंवार स्मरण होते.

आपण आता बघू या की हेमाडपंत आपल्याला संत एकनाथांच्या ओवीचाच भावार्थ कसा उलगडवून देतात ते आणि मग आपल्या ध्यानात येते की संत वा सदगुरु हाच माझ्या सचेतन मूर्ती असे भगवान श्रीकृष्ण का म्हणाले असावे.        

ऐसे हे महासाधुसंत । जयांच्या बोलात वर्ते भगवंत । 
काही न अप्राप्य तया विश्वांत ।  काही न अज्ञात तयातें । । ६१ । । 



ही अध्याय १४ मधील ६१वी ओवी. अध्याय १३ मध्ये भीमाजी पाटीलांची कथा सांगून झाल्यावर हेमाडपंत म्हणतात असे हे कृपाळू संत ,उदयकाळ प्राप्त होतांच केवळ दर्शनाने सुध्दा भवाच्या जंजाळातून मुक्ती करवितात, भवसागरातून पार नेतात, काळालाही मागे परतवितात आणी आपण आता पुढील कथेंत संतासंताची एकात्मता पाहू या , जेथे स्वस्थ चित्ताने परिसणार्‍या (ऐकणार्‍या ) श्रोत्यांना साईंची व्यापकता कळून येईल.

येथे प्रत्येक अध्यायांत हेमाडपंत श्रोत्याला आणि श्रध्दावान भक्ताला वेगवेगळ्या भूमिकां मधून बोध घडवित आहेत. श्रोता म्हणजे जो भक्तीमार्गावर चालू इच्छितो आणि अजून साईनाथांच्या चरणी संपूर्ण विश्वास यायला वेळ लागू शकतो असा एक वर्ग. श्रध्दावान भक्त म्हणजे साईनाथ कोण, साईबाबा कोण आहेत ह्याचे ज्याला आकलन झाले आहे आणि ज्याने साईबाबांच्या ठायी आपला दृढ विश्वास ठेवला आहे, शेंडी तुटो की पारंबी , मी माझ्या साईंचे चरण सोडणार नाही, व्यावहारिक जगाशी , लोक काय बोलतात ह्याच्याशी मला देणे घेणे नाही असा एक वर्ग जसे दीक्षित काका , चांदोरकर , दासगणू , शामा , लक्ष्मीबाई, बायजाबाई ! असे मला वाटते.
आता त्या काळची परिस्थिती पहा , हिंदू -मुस्लीम दुही माजली आहे, भक्तीचा लोप होत चालला आहे आणी अशा खडतर काळात हा परामात्त्मा , साक्षात ईश्वर प्रकटला आहे. त्याला मानवाला त्याची हरवलेली भक्ती परतवून द्यायची आहे, देवयान पंथावर आणायचे आहे.
परंतु सामान्य माणूस हा सगुण साकाराला देव म्हणून स्विकारतो का सहजासहजी? नाही , जसे राम अवतारात त्याला वनवासी म्हणूनच हिणवले गेले, कृष्ण अवतारात त्याला गवळ्याचे पोर म्हणून हिणवले गेले , म्हणजेच माणसाला निर्गुण निराकाराला देव म्हणून पूजायची , स्विकारायाची तयारी असते , दगडांत देव पाहणे सोपे असते , कारण "तो" काही बोलत नाही, चालत नाही , आपल्याला मनाविरूध्द वागायची आज्ञा करीत नाही . परंतु प्रत्यक्षात "तो" अवतरतो देह धारण करून , मानवी स्वरूपात का तर त्याच्याच लेकरांनी "त्या" चे आचरण पाहून स्वत: तसे वागावे . अध्याय ११ मध्ये हे सगुण साकाराचे महत्त्व हेमाडपंत आपल्याला मनाच्या कळीवरून अतिशय सुंदर रीत्या पटवून देतात.
पूजक जेथवर साकारू । देहधारीच आवश्यक गुरु  । 
निराकारास निराकारू । हा निर्धार शास्त्राचा ।। १० ।।
न करितां सगुणाचे ध्याना । भक्तिभाव कदा प्रकटेना । 

आणि सप्रेम जंव भक्ति घडेना । कळी उघडेना मनाची ।। ११ ।।
तें उमलल्याविण कांहीं । केवळ कर्णिकेस गंध नाहीं ।

 ना मकरंद ना भ्र्मर पाहीं  । तेथ राहील क्षणभरी ।।१२ ।।                                                                           - अध्याय ११ , श्रीसाईसच्चरित 
असे असले तरी देखिल त्याही काळी स्वत:ला विद्बान समजणारे, आपल्या पांडित्याचा दंभ मिरवणारेही होतेच. म्हणूनच हेमाडपंत साईनाथांना स्वत: देव , भगवंत मानीत असले तरीही कुठेही तुम्ही त्याला देव माना असा आग्रह धरीत नाही, पण त्याच वेळी ते स्वत:ची भूमिका आवर्जून  मांडायला कचरतही नाही. दशग्रंथी ब्राम्हण असलेले खापर्डे सारखीं मोजकी मंडळी होती , पण बहुसंख्य समाज हा साईबाबांना फकीर समजून , कफनी घालतात , मशिदीत राहातात , हिंदूना बाटवितात, लोकांच्या दारी भिक्षा मागतात, दक्षिणा घेतात असे आरोप करून डावलत होता. हेमाडपंतांना अशा सार्‍या समाजाला आणि येणार्‍या कलियुगाच्या काळातही सदगुरुंना स्विकारण्यासाठी मानवाची मनाची भूमिका घडवायची होती, त्यात भक्तीचे बीज पेरायचे होते , जी साईनाथांचीच इच्छा होती आणि म्हणूनच "श्रीसाईसच्चरित" हा अपौरूषेय ग्रंथ प्रकटला साईंच्या अनिरूध्द कृपेतून आणि हेमाडपंताकडून विरचिते झाला.
प्रवचनांत ऐकले होते की हा ग्रंथ सात वेगवेगळ्या पातळ्यांवर कार्य करतो.
हेमाडपंत स्वत:ची भूमिका ठामपणे मांडतातच की कुणा काही वाटू माझ्यासाठी हा माझा साक्षात भगवंतच आहे
कोणी म्हणोत भगवद् भक्त   । कोणी म्हणोत महाभागवत । 
परी आम्हांसी ते साक्षात भगवंत । मूर्तिमंत वाटलें ।। २५ ।।
                                                          - अध्याय ११ , श्रीसाईसच्चरित 


पण दुसर्‍या क्षणी ते साईबाबांची  संत म्हणूनही ओळख सांगतात , गुरु म्हणूनही दावितात , त्याच क्षणी नियत आणि अनियत गुरुं मधला फरकही स्पष्ट करतात , तर इतर मायिक देवां मध्ये आणि माझ्या साईबाबां मध्ये कसा फरक आहे हेही सांगायला ते विसरत नाही. कोणाला जसे स्विकारायचे तसा स्विकारा , पण "तो" हा "तो"च ! हेही ते स्पष्ट्पणे सांगतात .
इतर देव सारे मायिक । गुरुचि शाश्वत  देव एक ।
चरणीं ठेवितां विश्वास देख l 'रेखेवर मेख मारी' तो ll ४ ll
                                                           – अध्याय १०, श्रीसाईसच्चरित

"तो" साक्षात ईश्वर आहे हेच ते पदोपदी पटवून द्यायचा प्रयास करतात. "तो" माणसासारखा दिसतो, वेशभूषा धारण करतो, फाटके तुट्के कपडे घालतो, भिक्षा मागायला तुमच्या दारात येतो म्हणून तुम्ही त्याला तुमच्या सारखा सामान्य माणूस समजू नका ही कळकळ आहे, तळमळ आहे, जो ऋषी-मुनींना हजारो वर्षांच्या कठोर, उग्र तपानंतर ही क्षणैक काळ दिसतो , ज्याचे दर्शन अप्राप्य आहे असा ’तो’ माझा महाविष्णू, परम शिव आमच्या उध्दारासाठी आज माणूस बनून आलाय "त्या"ला जाणा , "त्या" अवघा स्विकारा, एकमात्र "त्या" ला शरण जा , त्यातच आपल्या सर्वांच्या "मानव" देहाचे, नरजन्माचे खरे प्रयोजन आहे ही हेमाडपंताची अटाटी आहे , जी "त्या"च "साई-निवास" मध्ये आपण बापूंच्या मीनावैनींमध्ये अनुभवली होती.
आज अनुभवसंकीर्तन , बापूंचे गुणसंकीर्तन करणारे जाणतात की सर्वसामान्यांना बापूंची महती पटविणे हे म्हटले तर किती सोपे आणि म्हटले तर किती शिवधनुष्य पेलण्याचेच कार्य आहे.
हेमाडपंत सांगू इच्छितात ते ह्याच कळकळीने , तळमळीने की "तो" मानवी देहात आहे की तुमच्या माझ्यासारखा आहे, दिसतो, वागतो, बोलतो ह्यापलिकडे जाऊन "तो " खूप विलक्षण आहे, "तो" संताचे आराध्य असलेला महासंत, संतावसंत , महान भगवंत आहे "त्या"ला जाणा , संत, साधु ज्याला नमन करतात वारंवार , लोटांगण घालतात ज्याच्या पदी "तो" हा महान परमेश्वर आहे.
परंतु जसे आपल्याला सदगुरु अनिरूध्द  बापूंनी स्वत:च सांगितले, ग्रंथात सहीनिशी  लिहीले के मी अनिरूध्द आहे. होतो आणि  अनिरूध्दच राहणार. मी कोणाचाही अवतार नाही . तसेच सदगुरु म्हणा वा भगवंत म्हणा त्याच्या सगुण साकार देहधारी प्रत्येक अवतारात "तो" हेच सांगतो. राम कधीही म्हणाला नाही मी भगवंत आहे , ना कृष्ण म्हणाला , ना साई . पण त्यांचे श्रध्दावान जाणतात की हा "तो"च !

परि हासता , स्मित दिसता ह्यासी ओळखिले थोरांनी ! 
हाचि नववा नववा आगळा सजीव बनला पंढरीचा पुतळा !
काय गरज होती गौळीबुवांना हाच पंढरीचा राणा असल्याची ग्वाही देण्याची , काय गरज होती येवल्याच्या आनंदनाथांना "हा हिरा " म्हण्ण्याची ! कारण "त्या"ची "तो" देहात असताना होत असलेली उपेक्षा त्यांना सहन झाली नाही म्हणून त्यांचे जीव कळवळले.
म्हणूनच मीना वैनी ( हेमाडपंताची नातसून) सांगून गेल्या "जे आले ते तरूनी गेले , जे न आले ते यसेच राहिले "

महासाधुसंत हा शब्द अर्थांच्या पलिकडचा आहे, भावनेतून , मनाच्या प्रेमाच्या गाभार्‍यातून शोधायचा ! श्रीसाईसच्चरित हे असेच अर्थापलिकडचे , शब्दातीत आहे त्याला फक्त "त्या" एकमेव प्रेम करणार्‍या अद्वितीय प्रेमसागराच्या प्रेमात न्हाऊनच अनुभवावे लागते. शब्दांच्या पलिकडचे असे हे "त्या"चे प्रेम आपण फक्त पित राहायचे , बापूच आपल्याला आपल्या भावानुसार "त्या"चे नितनवे रंग दावित राहतात. मला जे आजवरच्या प्रवचनांतून जाणवले कधी स्पष्ट रूपाने "त्या"ने आमच्या समोर मांडले तर कधी अव्यक्त रूपाने , भावभावनांच्या नात्यांतून , रंगातून , ते मांड्ले. ज्याच्या बोलांत वर्ते भगवंत ह्याचाच मला भावलेला अर्थ म्हणजेच "तो" हाच आमचा भगवंत आणि अशा "त्या" भगवंतालाच तर अगम्य , अशक्य , अज्ञात, अप्राप्य असे ह्या विश्वांत काही नसतेच ना? मलाच ही "त्या" साईची वाणी समजून घेता आली पाहिजे. सामान्यपणे माणसाला वा असुरांना वा अन्य कोणाही सजीवाला जीवनांत काही न काही प्राप्त करून घ्यायचे असतेच ना आणि
ते अप्राप्य असते म्हनून तर सर्व खटाटोप चालू असतो. मग असा कोण आहे ज्याला ह्या विश्वांत अप्राप्य असे काहीच नाही , तर Yes "तो" आहे माझा एकमेव भगवंत , माझा देव , माझा साईच ! हो माझ्या साईबाबांना  ह्या जगात अज्ञात असेही काही नाही .मानवाच्या वा जीवाच्या असंख्य जन्मांचा एकमेव सांगाती - "तो" काय फक्त "महासाधुसंत ह्या शब्दाने व्यापता येऊ शकतो का तर मुळीच नाही . "तो" अनादी, अनंत , अगम्य , वेदही ज्याला "नेति नेति" मह्णून थकले असा "तो" हेमाडपंताची ही मोठी लबाडी आहे की ते शब्दांच्या अतर्क्य शैलीतून आम्हांला "त्या"चे अगम्य रूपाचे विवीध पैलू दावतात उलगडून तरीही "त्या"चीच मर्यादा पाळून , बंधन पाळून , कुठेही directly "त्या"च्या इच्छेनुसार तुमचे कर्मस्वातंत्र्य अबाधित राखून , तुम्हाला कोणताही दबाव आणून "त्या"ला देव म्हणा , भगवंत म्हणा असे न सांगता सहज रीत्या, प्रेमाने गळी उतरवितात - हा संतापेक्षाही वेगळा, हा साधुंहून निराळा, हा गुरु हून निराळा, हा महासाधुसंताहून आगळा - हाच "तो" नाही का बरे?

हा भगवंत असाच आहे करून सवरून नामानिराळा राहणारा , "तो" मी नव्हेच असे सांगणारा म्हणूनच "तो" मनमोहन, जगाला भुलवितो सांगून "संत माझ्या सचेतन मूर्ती " 


संदर्भ :
           १. एकनाथी भागवत 
           २. श्रीसाईसच्चरित

No comments:

Post a Comment

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog