Thursday 13 April 2017

रासायनिक दहशतवादाची इशाराघंटा

दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक ०६-०४-२०१७ च्या अंकातील आंतरराष्ट्रीय बातम्या सदरात " सिरीयातील रासायनिक हल्ल्यात १०० जणांचा बळी " - जगभरातून तीव्र प्रतिक्रिया  -ह्या बातमीने काळजाचा खरोखरी थरकांप उडाला. सिरीयाच्या ’इदलिब" प्रांतातील ’खान शेखोन’ ह्या शहरात मंगळवारी अमानुष रासायनिक हल्ला झाला ज्यात किमान १०० जणांचा बळी गेला होता तर ४०० हून अधिक लोक गंभीररित्या जखमी झाले होते. गेल्या ६ वर्षांपासून सिरियामध्ये सुरु असलेल्या गृहयुध्दातील हा सर्वात भीषण रासायनिक हल्ला मानला जातो.’सरीन ’ ह्या विषारी वायूचा वापर केलेल्या रॉकेट्सचे हल्ले ह्या शहरावर करण्यात आले. जगभरातून अतिशय संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

हा अमानुष घृणास्पद हल्ला कोणीही चढविला असला तरी ह्यात स्त्रिया, लहान मुलांचाच  मोठ्या प्रमाणावर बळी गेला आहे ह्याची दखल  न घेऊन चालणार नाही. 

 

सरीन हा अत्यंत प्राणघातक विषारी नर्व्ह वायू आहे, जो पर्सिस्टन्ट किंवा सेमीपर्सिस्टन्ट द्रव पदार्थाच्या स्वरूपात उपलब्ध असतो, जो न दिसणार्‍या वाफा निर्माण करतो, या वाफांना वासही नसतो. हा वायू डोळे, श्वसनमार्ग, त्वचेतून शरीरात प्रवेश करतो. ह्याचे दृश्य परिणाम म्हणजे डोके दुखणे, छातीवर दडपण येणे/जाणवणे, डोळ्यांची बुब्बुळे लहान होणे. तसेच मज्जासंस्थेवरही ह्या वायूचा गंभीर परिणाम होऊन परिणामी मृत्युही होऊ शकतो. 

सरीन हा सर्वात घातक आणि त्वरीत प्रभावी ठरणारा रासायनिक पदार्थ आहे, जो श्वासावाटे शरीरात गेला असता किंवा त्वचेवाटे शरीरात शोषला गेला असता तात्काळ फुफ्फुसे, स्नायु, आणि मज्जासंस्थेचे भाग ह्यावर परिणाम करतो, आणि ज्यामुळे श्वासाची घुसमट सुरु होऊन गुदमरणे, आंकडी किंवा फिटस येणे, पॅरालिसीसचा झटका येणे, आणि वेळप्रसंगी मत्यु सुध्दा संभवतो.   

सरीन हे रासायनिक अस्त्र १९३८ मध्ये नाझी शास्त्रज्ञांनी शोधून काढले होते आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार  १९९३ मध्ये त्याच्या वापरावर  प्रतिबंध आणला गेला होता. असे असून देखिल सरीन ह्या विषारी वायूचा वापर युध्दात पूर्वीदेखिल केला गेला होता असे आढळते.
सिरियन सैन्याने २०१३ मध्ये दमास्कस प्रांतात केलेल्या हल्ल्यात १४०० हून अधिक लोक मारले गेले होते. ’इदलिब’ प्रांतात तर मंगळवारी झालेला रासायनिक हल्ला हा दुसर्‍यांदा झाला आहे, त्या आधी २५ मार्च रोजी ’लाताम्नेह’ शहरातील एका रूग्णालयावर झालेल्या हल्ल्यात एका डॉक्टरसह २ रूग्णांचा देखिल बळी गेला होता.

'वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशन' (WHO) च्या एका अहवालानुसार 'सरीन' हा वायू विषारी समजल्या जाणार्‍या सायनाईड वायुच्याही २६ पटीने जास्त प्राणघातक आहे ह्यावरून ह्या हल्ल्याची तीव्रता आणि होणारे विदारक दुष्परिणाम ह्यांची अवाढव्य व्याप्ती किती आवाक्याबाहेरची असेल हे ध्यानी येते.   

सिरियामध्ये ह्या आधी घडलेल्या रासायनिक हल्ल्यांची जबाबदारी ’आयएस’ ने स्विकारली होती. इराकच्या मोसूल प्रांतातील रूग्णालयातून तसेच सिरियन लष्कराच्या शस्त्रास्त्राच्या कोठारातून ’आयएस’च्या दहशतवाद्यांनी  विषारी वायू आणि रासायनिक रॉकेट्सची चोरी केल्यामुळे ’आयएस’चे दहशतवादी त्या रासायनिक शस्त्रास्त्रांचा कसा आणि कधी वापर करतील ह्याबाबत चिंतेचा घोर सार्‍यांच्याच मागे लागून राहिला आहे.      

सिरियात झालेल्या रासायनिक हल्ल्यानंतर अमेरिकेने सिरियातील हवाईतळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. भूमध्य समुद्रातल्या युद्धनौकांमधून सुमारे ६० टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा मारा केला गेला. मध्य सिरियातील सरकारनियंत्रित हवाईतळावर हा हल्ला झाला आहे. याच तळावरून सिरियन लष्करी विमानांनी रायासनिक हल्ल्यासाठी उड्डाण केले होते.

हा सर्व विध्वंस पाहता रासायनिक दहशतवादाची इशारघंटा ऐकून आपल्यावर हे संकट अजून ओढावले नाही तोवर शांत बसू असे बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही . काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननेही अफगाणिस्तान सीमेवर रासायनिक हल्ला केल्याच्या बातम्या आल्या होत्या. यानंतर भारताच्या लष्करप्रमुखांनी रासायनिक हल्ल्याविरोधात सज्ज राहण्यास भारतीय यंत्रणांना सांगितले होते. आपल्या शेजारी देशाच्या भारतद्वेषाबद्दल काही नव्याने सांगायला नको. तसेच त्या देशावरील दहशतवाद्यांचा वाढलेला प्रभाव भारतासाठी डोकेदुखी आहे. पाकिस्तानकडील अण्वस्त्रांबरोबर रासायनिक शस्त्रेही दहशतवाद्यांच्या हाती लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे भारताने अशा हल्ल्यासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे.
संदर्भ:
१. दैनिक प्रत्यक्ष दिनांक ०६-०४-२०१७
२. तिसरे महायुध्द - लेखक डॉ. अनिरूध्द धैर्यधर जोशी
३.  Disasater Management - Aniruddha's Academy of Disasater Management 

सूचना - हा लेख पहिल्यांदा दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक १३-०४-२०१७ रोजीच्या अंकात ’व्यासपीठ" ह्या सदरात प्रसिध्द झाला होता. 

1 comment:

  1. Chemical weapons are one of the lethal weapons causing mass destruction at minimum costs.terrorists groups seem to be prefering chemical weapons over other traditional weapons nowadays which is quite evident from the recent attacks in Syria.
    this incident is likely to ignite the world war 3 sooner than later n once major superpowers directly involve into this , it will spread a cross the globe within no time.on the part of the world north Korea n China are becoming major threads for the whole world.
    to get detailed idea of world war 3 we need to refer to book third world war authored by dr.Aniruddha D. Joshi as well as daily newspaper PRATYAKSHA international news.
    very nice blog.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog