Wednesday 19 April 2017

पिपा शब्द अन तूच सारथी !

आज १९ एप्रिल. साईभक्तीत आकंठ डुंबून आपले अवघे जीवन ज्यांनी आपले सदगुरु श्रीसाईनाथाच्या, साईरामाच्या  चरणी समर्पित केले अशा महान साईभक्ताचा  आज समाधी स्थानम् स्थापना दिन सोहळा गुरुकूल , श्री क्षेत्र श्री जुईनगर येथे अनुभवण्याचे सौभाग्य आज माझ्या साईरामाने त्याच्या अनिरूध्द प्रेमाने मला दिधले आणि हा जीव साईप्रेमात , साईभक्तीत अवघा न्हाऊन निघाला, मन सर्वार्थाने तृप्त जाहले, सदगुरुंच्या प्रेमाच्या सुमधूर भक्तीने परिप्लुत अभंगाच्या श्रवणाने अवघी काया धन्य धन्य झाली. त्या महान साईभक्ताचा परिचय करवून घेणे म्हणजे खरेच जीवनी सदगुरुला कसे वसवावे , कसे "त्या"च्या प्रेमात स्वत: न्हाऊन निघावे आणि अवघ्या जनांना न्हाऊ घालावे,  ह्याची शब्दातीत, अवर्णनीय  अशी अनुभूती...
"ह्याची देही ह्याची डोळा "अनुभवून सदगुरुंच्या प्रेमाची पिपासा अनंत पटींनी वृध्दींगत झाली.  
                                                                              

        
हे साईभक्त म्हणजे आद्यपिपा श्री सुरेशचंद्र दत्तोपाध्ये ! त्यांच्या सदगुरु साईनाथांवरील अविचल भक्तीमुळे त्यांना आद्यपिपा म्हणजेच भक्तीमार्गावरील सर्वात प्रथम पिप्पलिका पांथस्थ ह्या पदाने भूषविले जाते.


दरवर्षी १९ अप्रिल ह्या दिवशी श्री जुईनगर गुरुकूल येथे श्री आद्यपिपादादा समाधीस्थानम् स्थापनादिन सोहळा साजरा करण्यात येतो अशी माहिती गुरुकूल, जुईनगर येथे समजली.

 "न्हाऊ तुझिया प्रेमे’ म्हणजेच सदगुरुंच्या भक्तांवरील अनिरुद्ध प्रेमाचा प्रेमोत्सव आणि आपण सारे श्रध्दावान तो साजरा करू शकलो ते केवळ आणि केवळ ह्या आद्यपिपांच्या पिपासेमुळे... अवघ्या काया, वाचा ,मनाला सदगुरु साईबाबांच्या अनिरुध्द प्रेमाच्या एका थेंबाने अवघे न्हाऊ घालता येते हे मर्म जाणून त्यांनी आपल्याला हा अनिरुध्द प्रेमाचा हा अमृतकुंभ त्यांच्या त्रिकालाबाधित अजरामर अशा अभंगवाणीतून नित्य पाजला आणि आजतागायत तोच प्रेमरस ते विदेही अवस्थेत असूनही पाजीतच आहेत. ह्याच आद्यपिपांच्या अभंगवाणीमुळे २६ मे २०१३ रोजी नारद जयन्तीच्या पावन पर्वावर  श्रद्धावानांची अनिरुद्धप्रेमयात्रा सुरू झाली आणि ती आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे आणि अशीच पुढे सुरु राहणार आहे अशी माहिती मिळाली.

‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ म्हणजे सुंदरकांडात जे संत तुलसीदास साक्षात महाप्रभु  महाप्राण हनुमंतांनी साक्षात आल्हादिनी भक्तिस्वरूपा जानकी मातेला कथिलेल्या "तुम ते प्रेमु रामु के दुना" ह्या ओवीची प्रचिती म्हटले तर वावगे ठरणार नाही असे जाणवले. अवघी संताची मादियाळी सुध्दा कायम आपल्याला सदगुरुंच्या आपल्यावरील अगाध , अफाट प्रेमाची महती आपल्याला वारंवार समजावून सांगतेच ना ! त्याचीच प्रचिती म्हणजे हा सोहळा!   
आद्यपिपांच्या अभंगांचे सुश्राव्य आणि सुमधूर असे भावपूर्ण गजर ऐकताना श्रध्दावान आपल्या सदगुरुंच्या  अनिरुध्द्प्रेमाने अवघे न्हाऊन निघतात, जणू सार्‍या मनीच्या भावनांना भक्तीरसात, प्रेमरसात चिंब भिजविण्याची जणू Master Key च अलगद आपल्या हातात दिली जाते. ह्या साध्या सोप्या भाषेतील अभंगाचा भावार्थ कळल्यामुळे त्या अभंगातील भाव अधिकच गहराईने हृदयात खोचला जात होता आणि त्या स्थानावरून  तसूभरही हलण्यास मन तयार होत नव्हते.

आद्यपिपांनी सदगुरु साईनाथांची भक्ती आपल्या घराण्यातून प्राप्त केलीच होती आणि पुढे सदगुरुतत्त्व हे सदैव एकच असते ह्या श्रीसाईसच्चरीतातील हेमाडपंतांनी अकराव्या अध्यायांतील डॉ पंडिताच्या कथेत कथिल्याप्रमाणे आद्यपिपांनी तेच तत्त्व आपल्या उराशी कवटाळले आणि पुढे सदगुरु डॉ अनिरूध्द जोशी ह्यांची भेट घडता तेच स्वत: प्रत्यक्षात अनुभविले आणि आजीवन जोपासिले सुध्दा ! जसे डॉ पंडितांनी आपल्या ब्रम्हीभूत झालेल्या गुरूंना "काका पुराणिक " ह्यांनाच सदगुरु साईबाबांच्या ठायी स्मरून त्रिपुंद्रलेखन त्यांच्या भाळी केले तसेच त्याच भावाने आपल्या जीवनाचे तुलशीपत्र  सदगुरु साईनाथांची भक्ती स्मरून आणि आपल्या साईरामाला सदगुरु डॉ अनिरूध्द जोशींच्या ठायी स्मरले आणि प्रकटले बोल - वाहू तुझिया चरणीं भाळ हेचि तुळशीपत्र माझे "

मानवाने आयुष्यात काय धरावे, काय टाकायचे नाही ह्याचे गमक ते आपल्या "धरलेले सोडू नको रे पकडलेले टाकू नको" ह्या अभंगाद्वारे सांगतात. माणूस आयुष्यात नेहमी स्वत:चे घर बांधायचे स्वप्न पाहतो, तकलादू घर बांधतो आणि उध्वस्त झाले की रडत राहतो, पण कळीकाळाच्या तडाख्यातही न विस्कटणारे नामस्मरणाच्या भिंतींनी बांधावयाचे घर आद्यपिपाच दावतात.

आपल्या जीवनात सदगुरुच्या येण्यानेच खरा जीवनाचा अर्थ आम्हा मानवांना उलगडतो, सदगुरुच आमच्या जीवनाची कळी फुलवितो , पुष्प उमलवितो तर मग ती कृतार्थता सदैव उरी बाळगून , पदोपदी जपत त्याच्या चरणांशी स्वत:ची तुटलेली नाळ कशी अधिकाधिक दृढ करायची व स्वत:चे जीवन "त्या"च्याच चरणी कसे समर्पित करायचे हे सहज सोपे करून दावतात आद्यपिपाच्या "जीवनी माझ्या बा अनिरूध्दा श्वासासंगे येत रहा " सदगुरुशी अखंड नाळ जुळवायची तर श्वासासंगे "त्या" एकाचेच नाव जीवनी यायला हवे -- किती किती प्रेमळा भाव आहे ... सदगुरुंच्या नामाच्या कुदळीने माणसाचे दुष्प्रारब्ध नष्ट होतेच मग अशा त्या नामाच्या कुदळीनेच माझ्या घराचा पाया खोदून तूच तर्क -कुतर्क, शंका-कुशंकाचे खड्डे गाडून टाक आणि तुझ्याच नामरूपाचे खांब लावून तूच मला घर बांधून दे म्हणून "त्या" अकारण कारूण्याची खाण असलेल्या सद्गुरुमाऊलीला आळवायचे. हे सदगुरुनाथा तूझ्या स्मरणाच्या भिंतीच चहू बाजूंनी उभ्या राहू दे आणि यायला जायला दारच ठेवू नकोस रे . म्हणजे अशा तू मला बांधून दिलेल्या घरात फक्त "तू आणि मी"च राहू --- "एक तत्व नाम दृढ धरी मना " ह्याचीच सोपी शिकवण नाही का बरे?

सदगुरुंच्या प्रेमाशिवाय जगात दुजे काही सत्य नाही म्हणूनच केवळ "त्या" एकाचीच पिपासा माझ्या जीवनी असावी आणि हे "त्या" सदगुरुविना मी करूच शकत नाही हे परम सत्य जाणून "त्या"लाच साद घालीत राहणे म्हणजेच - "जीवनी माझ्या बा अनिरूध्दा श्वासासंगे येत रहा ...." जीवीच्या जीवलगाला घराच्या वास्तुशांतीला न बोलावता , घरच बांधायला आमंत्रण देणे आणि तेही कसे तर "श्वासाच्या रथावर आरूढ करून"

या विश्‍वात फक्त माझा सद्गुरु, माझा साईनाथच  माझा सखा आहे आणि आजही "तो"च सदगुरु नवीन नाम रूपाने माझ्या जीवनी अनिरुद्ध बनून अवतरला आहे , "त्या"चे साईरूपच आज अनिरूध्दपणे माझा आधार बनून माझे अवघे विश्व व्यापून  माझा बाप माय बनून आले आहे ,माझा सदगुरु हाच माझा आहे म्हणून एकदा मी जीवनात सदगुरुला धरले तर "त्या: ला कधीच सोडता कामा नये , "त्या" एकाशी मी माझी नाळ जोडली तर ती नाळ कधीच तोडता कामा नये, पकडलेले "त्या"चे चरण कधीच टाकू नये ही तळमळ एक सच्चा भक्तच जाणू शकतो.
आणि तेच आद्यपिपा त्यांच्या दुसर्‍या अप्रतिम अभंगातून सांगतात - माय-बाप सोडून जातील काळाच्या ओघात , स्नेह संबंधी हात सोडतील पण हा "एक"च माझा आहे जो मला काळाच्या ओघातही न वहावत जाता, न बदलता साथ देतो- मी सोडले तरी "तो " मला सोडीत नाही.

श्रीसाईसच्चरित - साईबाबा जणू अवघे उतरतात आद्यपिपांच्या अभंगातून - शेळ्यांची कथा असो की साप-बेडूकाची कथा , मनुष्य जन्म असो की भोग योनी तील प्राणी जन्म - एकमात्र सदगुरुच साथ देतो हेच तत्व हा अभंग ठायी ठायी जाणीव करून देत राहतो. 

श्रीसाईसच्चरितातील  सदगुरु साईबाबांच्या शब्दांनी दामू अण्णा कासार प्रपंचात तरून गेला - कापसाच्या व्यापारात नुकसान होण्यापासून वाचला आणि परमार्थातही सदगुरुंच्या शब्दांचे पालन करून तरला गेला ह्याचीच जणू आठवण करून देतात - ह्या ओळी  - "प्रपंचात तव शब्दे तरलो परमार्थी तव शब्दे फुललो " खरेच सदगुरुंच्या शब्दातच अवघे ब्रम्ह सामावलेले असते आणि  "त्या" ला माझ्या जीवनाचा सारथी बनविला तरच जीवनातील महाभारताचा रण संग्राम मी जिंकू शकतो, जसा अर्जुनाने जिंकला भगवान श्रीकृष्णाला आपल्या जीवन रथाचे सारथ्य सोपावून ! पिपा शब्द अन तूच सारथी !

अशा पिप्पलिका पांथस्थ बनून सातत्याने भक्तीचा नंदादीप जीवनात तेवत ठेवणार्‍या आद्यपिपांच्या स्मृतीला आजीवन उरी कवटाळता येवो आणि पिपलिका (मुंगी) बनून अनिरुध्दचरणरूपी गुळालाच मुंडी तुटो वा राहो चिकटून राहता येवो हीच पिपासा अंतरी जागो !!!

4 comments:

  1. Adya pipadada showed us the correct path of sadguru bhaktichi I.e. he took us closer to sadguru through his abhangas.
    once he was shown all shrisaisatcharit in front of his eyes like a movieby bapu.
    So he not only did 4 wekly parayanas in a year but experienced shrisaisatcharit literally.he had seen all shrisaisatcharit happening in front of his eyes.
    may he continue showing ways to
    us and help us reach our goals.

    ReplyDelete
  2. हरी ओम
    पिपलिका पंथ व अनिरुद्ध गतीने आपण भक्ती मार्गात राहिलो तर सद्गुरू बापू आपल्याला हृदयाशी कवटाळून घेतात..
    अम्बज्ञ

    ReplyDelete
  3. अंबज्ञ🙏
    खुप छान सुनिताविरा....

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog