Wednesday 19 April 2017

अणुकिरणोत्सर्गी आयोडीन -१३१ ची युरोप मध्ये गळती - आण्विक अपघाताची दाट चिंता?

काही संस्थांनी हवेच्या नमुन्यांच्या केलेल्या चाचणींमधून आयोडीन- १३१ चे धक्कादायक प्रमाण युरोपीय प्रदेशांमधील हवेमध्ये आढळले, जे आर्क्टिकच्या ध्रुवीय प्रदेशातील संभाव्य  आण्विक अपघाताच्या धोक्याची इशाराघंटा वाजवित आहे जणू ! आयोडीन १३१  हे आयोडीनचे रेडीओऍक्टीव्ह आयसोटोप (Radioactive Isotope) अणुकिरणोत्सर्गी समस्थानिक आहे जे प्रामुख्याने ( न्युक्लिअर फिजन (न्युक्लिअर विखण्डन ) ह्या प्रक्रियेमध्ये वापरले जाते. 

मार्च २०११ मध्ये फुकुशिमा येथे जी आण्विक गळती झाली त्यातून वातावरणात खूप मोठ्या प्रमाणावर किरणोत्सार झाला सल्याचे निदर्शनास आले, ज्यात आयोडीन १२९ हे दीर्घकाळ टिकणारे ( १५.७ दशलक्ष वर्षे)  व वातावरणात हजारो वर्षे तग धरून राहणारे समस्थानिक होते आणि आयोडीन १३१ हे कमी काळ टिकणारे (८ दिवस) . परंतु दोन्ही आयोडीन १२९ आणि आयोडीन १३१ ही किरणोत्सारा दरम्यान मानवाला अत्यंत घातक असे बीटा पार्टिकल्स सोडतात ज्याने थायरॉईड कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते. थायरॉईड हे मानव निर्मीत रेडीओऍक्टीव्ह आयोडीन १२९ आणि आयोडीन १३१ विषारी पदार्थ शोषून घेते. प्रत्येक आण्विक आपत्ती किंवा अपघात हे हजारो विषारी पदार्थ , जड धातुची विषारी रेडीओऍक्टीव्ह द्रव्ये बाहेर उत्सर्जित करतातच , परंतु ह्यापैकी खूप कमींची मोजणी होते आणि चर्चा होते.

थायरॉईड ही मानवाच्या शरीरातील ग्रंथी रेडीओऍक्टीव्ह  आयोडीन आणि स्थिर आयोडीन असा फरक समजू शकत नाही. त्यामुळे रेडीओऍक्टीव्ह आयोडीन १२९ किंवा आयोडीन १३१ चे  प्रमाण जेव्हा प्रमाणित प्रमाणापेक्षा अधिक वाढते , तेव्हा थायरॉईड ही रेडीओऍक्टीव्ह  आयोडीनची समस्थानिके असलेले आयोडीन १२९ किंवा आयोडीन १३१ पेशींमध्ये शोषून साठवून ठेवते आणि ते थायरॉईड हार्मोनच्या वाढीसाठी वापरते, पुढे  हेच आजूबाजूच्या पेशींना प्रत्यक्ष धोका देते आणि पुढे त्यांची बेसुमार वाढ होऊन परिणाम स्वरूप कॅन्सर होऊ शकतो.

ह्याच कारणास्तव कोणतीही आण्विक गळती वा  रेडीओऍक्टीव्ह  किरणोत्सार हा धोकादायक म्हणून पाहिला जातो आणि त्याची गंभीर दखलही घेतली जाते. म्हणून अणुकिरणोत्सर्गी आयोडीन -१३१ ची युरोप मधील गळती -  ह्या आण्विक अपघाताची दाट चिंता व्यक्त केली जात आहे.         

आयोडीन -१३१ ह्या रेडीओऎक्टीव्ह पदार्थाचे कण रशियाच्या सीमेजवळील नोर्वे येथील स्वानहोव्ड येथे जानेवारी महीन्याच्या दुसर्‍या आठवड्यात साधारणपणे ९ ते १६ जानेवारी च्या दरम्यान आढळले. असेच Radioactive पदार्थ पुढे फिनीश लॅपलॅण्ड मधील रोवनिअमी (Rovaniemi in Finnish Lapland ), पोलंड, झेक रिपब्लिक , जर्मनी, फ्रान्स, स्पेन येथे पुढील २ आठवड्यातच  आढळले. म्हणजेच थोडक्यात जानेवारी महिन्याच्या शेवटापर्यंत अणु किरणोत्सर्गी आयोडीन -१३१ चे पुराव्यांचे प्रमाण अगदी नगण्य स्वरूपातले असले, आरोग्याला हानीकारक नसले तरी वाढलेले नक्कीच होते.
                                                                   
हवेत आढळलेले आयोडीन-१३१ चे प्रमाण हे खूप कमी तीव्रतेचे असल्यामुळे त्याने लोकांच्या आरोग्याला आणि वातावरणाला काही धोका नसल्याचे निश्चित झाले.
त्यामुळेच आपात्कालीन सज्जता पाहणार्‍या नॉर्वेजियन किरणोत्सार सुरक्षा विभागाच्या प्रमुख अधिकारी ऍसटरीड लिलॅण्ड (head of section for emergency preparedness at the Norwegian Radiation Protection Autority, Astrid Liland, ) ह्यांनी नॉर्वेने ही माहिती उघड न केल्याची कबूली  "बॅरण्टस ऑबझर्व्हर" ( Barents Observer ) ह्या इंटरनेट वेब सर्व्हीसला दिली. 

परंतु फ्रान्सने मात्र आपल्या नागरीकांना ही माहिती ताबडतोब उघड करून सांगितली.  
अशा परिस्थीतीत आयोडीन १३१ चे आढळलेले पुरावे हे कोणत्याही पूर्व काळात घडलेल्या आण्विक गळतीचे नसून ,नुकत्याच  झालेल्या आण्विक गळतीचे असल्याची दाट शक्यता वर्तवित होते. त्यामागील शास्त्रीय कारणही तसेच गंभीर आणि विचारांना चालना देणारे आहे. आयोडीन १३१ चे आयुष्यमान हे खूप कमी काळाचे म्हणजेच अवघ्या ८ दिवसांचेच असते त्यामुळे आयोडीन १३१ चे अंश सापडणे म्हणजे ते फक्त नुकत्याच घडलेल्या आण्विक गळतीमुळे होऊ शकण्याचीच दाट शक्यता दाखवित होते.  
       
अनेक संभाव्य शक्योपशक्यतेचा अभ्यास करूनही  गळतीचे कारण मात्र सापडू शकले नाही. काही संभाव्य कारणांचा अभ्यास केला गेला त्यापैकी -

१. ह्या गळतीच्या दरम्यान अमेरीकी हवाई दलाने WC-135 हे Constant Phoenix  एअरक्राफ्ट  युरोपला पाठवले होते असे आढळले. 
WC-135 हे अमेरीकन हवाई दलाचे Constant Phoenix  एअरक्राफ्ट हे वातावरणातील हवेच्या नमुन्यांमधील संभाव्य आण्विक  स्फोटाचे प्रमाण शोधून काढण्याच्या तसेच आण्विक घटनांना प्रतिसाद देता यावे , कोणत्याही प्रकारचे आण्विक उत्सर्जन घडत असल्यास ते कोणत्या प्रकारच्या आण्विक वा तत्सम शस्त्राच्या माध्यमातून घडत आहे हे शोधून काढणे, आणि स्फोटाची तीव्रता जाणून घेणे अशा  विशेष कार्याच्या उद्देशाने   निर्माण केले गेले आहे.

ट्विटर ह्या सोशल मिडीयावर U.S. Aircrafts Spots ह्यांनी प्रसिध्द केलेल्या मॅप नुसार  WC-135 चा मार्ग खालील दिल्याप्रमाणे आहे जे फ्लोरिडाहून निघून UK's Mildenhall airbaseवर उतरले .

                                                                       

अजूनही अमेरीकी मिलीटरीने "Constant Phoenix"  हे युरोपकडे का पाठविण्यात आले ह्याचे स्प्ष्टीकरण दिलेले नाही.  

२.  रशियाच्या आण्विक चाचणींचा धोका -
दुसर्‍या एका अंदाजानुसार रशियाने आर्क्टिक प्रदेशात आण्विक शस्त्रांची चाचणी पुन्हा सुरू केली असावी किंवा परमाणु बॉम्बची चाचणी करण्याची रशियाची नवी रणनैतिक खेळी असावी असा कयास बांधला जात आहे. परंतु परमाणु बॉम्बच्या चाचणीच्या संदर्भाला सहमती दर्शविणारे कोणतेही भूकंपीय पडसाद/पुरावे सापडले नाही.

अजून एका अनुमानानुसार  नॉर्वेच्या सीमेलगतच्या कारा समुद्र आणि कोला पेनिन्सुला ह्या भागातील मोठ्या प्रमाणावरील रशियाचा आण्विक कचरा आणि विघटन होऊ  घातलेल्या आण्विक पाणबुड्या ह्यासुध्दा ह्या सध्याच्या आण्विक गळतीचे कारण असण्याची संभाव्यता वर्तविली जाते.

शीत युध्दाच्या दरम्यान आणि नंतर  रशियाने प्रक्रिया न केलेल्या आण्विक वेसल्स. अणुभट्टीचे वापरलेले फ्युएल रॉड , किरणोत्सर्गी आण्विक कचरा हा आर्क्टिक प्रदेशात विल्हेवाट लावण्यासाठी डम्प केला आहे. बर्‍याच जणांनी हा किरणोत्सर्गी गळती करणारा आणि प्रदूषण वाढविणारा  टाईम-बॉम्बच  असल्याची संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे.

३. आयोडीन १३१ चा औषधोपयोगी वापर -
काही मंडळी असा दावा करीत आहेत की आयोडीन १३१ चे हवेतील प्रमाण हे आण्विक अणुभट्टीतील आण्विक प्रक्रियेमुळे असू शकते तर काहींच्या मते आयोडीन १३१ हे समस्थानिक ( isotope ) हे मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये (कॅन्सरच्या प्रतिबंधात्मक औषधांमध्ये ) वापरले जाते आणि म्हणून जगातील बहुतांशी राष्ट्रे ही आयोडीन १३१ चे जागतिक पातळीवर उत्पादन देखिल करतात, त्याच्याशी हे निगडीत असू शकते.
आण्विक अणुभट्ट्यांचे चालक वा तत्सम संस्था ज्या आयोडीन १३१ चा औषधोपयोगी वापर करतात त्या ह्या किरणोत्सर्गी वापराचा बाह्य वातावरणात उत्सर्ग करण्यासाठी डिटेक्टरचा वापर करतात, ज्यामुळे ह्याची शक्यता खूपच नगण्य असावे असा मतप्रवाह आहे. 

सद्य स्थितीत होत असलेल्या आयोडीन १३१ च्या किरणोत्सर्गी गळतीचे मूळ शोढून काढण्याच्या निष्कर्षाप्रत पोहचताआले नाही असे चित्र दिसते आहे. जरी संबंधित राष्ट्रांचे एकमेकांवरील दोषारोप आणि नकारात्मक युक्तिवाद  काहीही असले आणि त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटणारे सूर काही असतील तरी देखिल सामान्य माणसाने आण्विक दुर्घटना ही अपघाताने घडलेली असो वा मानव निर्मीत असो , त्याकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही . उलट अशा प्रकारच्या आण्विक गळतींपासून होणारे  विघातक परिणाम , त्यांपासून उद्भवणारा धोका जाणून घ्यायला पाहिजे आणि त्या आपत्तीला तोंड देण्याच्या व्यवस्थापनाची अद्ययावत सुसज्जता करूनच ठेवली पाहिजे आणि हेच वास्तवाला सभानतेने , सजगपणे सामोरे जाणे असेल जे समस्त मानवांना नैसर्गिक वा मानव -निर्मीत आपत्तींपासून तारू शकेलअसे वाटते.  

संदर्भ:

1 comment:

  1. Nuclear war is a biggest threat to mankind.radioactive isotope is very dangerous as it emits radiations which are harmful to us.radium n uranium are one of such radioactive isotopes.very nice n informative blog.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog