Wednesday 21 March 2018

एलॉन मस्क - द्रष्ट्या उद्योजकाची गगनभरारी !

दैनिक प्रत्यक्ष नववर्ष विशेषांक - १ जानेवारी २०१८ चा विशेषांक हा वाचकांसाठी दीपस्तंभच आहे जणू ! समुद्राच्या गर्भात दडलेल्या अनेक भीषण तटरेषा (तटरेखा),प्राणघातक उथळ पाण्याचे प्रवाह, रीफ,  बंदराच्या सुरक्षित प्रवेशासंबंधी जसे एखादा दीपस्तंभ  नाविक व स्थानिक कोळ्यांना (मासेमारी करणार्‍यांना) सूचना देत राहतो व त्यांच्या प्राणांचे अंधारातही सदैव संरक्षण करीत राहतो , त्याप्रमाणेच दैनिक प्रत्यक्षचा नववर्ष विशेषांक हा देखिल नव नवीन विषयांचे  एवढेच नव्हे तर जगात घडणार्‍या विशेष, विलक्षण आणि विक्षीप्त घटनांचे ज्ञान करवून देतो आणि त्याच वेळी काळाबरोबर वास्तवाचे भान ठेवून सजग राहायला, सभानतेने प्र्त्येक पाऊल टाकायला, चालायलाही शिकवितोच !

सर्वसामान्यत: अंधारातच माणसाचा नेहमी घात होत असतो आणि आता "तिसर्‍या महायुध्दाच्या " उभ्या ठाकलेल्या कराल काळाच्या जबड्यातून सही सलामत तरायला हा अज्ञानरूपी अंध:कार छेदणे ही अत्यावश्यक , अत्यंत निकडीची बाब आहे , हे जाणून दैनिक प्रत्यक्ष अशाच सर्वसमर्थ दीपस्तंभाची भूमिका निभावून माणसाला संकटांशी चार हात करायला खंबीर , चाणाक्ष , निडर , निर्भय बनविण्याचे महान कार्य करीत आहे , तेही तब्बल एक तप म्हणजे सातत्याने १२ वर्षे !”

                                                                      
’ एलॉन मस्क - द्रष्ट्या उद्योजकाची विस्मयकारी कथा ’ हा अंबरीष परळकर ह्यांनी लिहीलेला ७ पानांचा प्रदीर्घ लेख अशाच एका विशेष, विलक्षण आणि विक्षिप्त गोष्टींची नुसतीच आवड असणार्‍याच नाही तर तशीच स्वप्ने पाहून ती सत्यात उतरविणार्‍या एका प्रगाढ अभ्यासू वृत्तीच्या, असामान्य बुध्दीमत्तेच्या , अपार मेहनत घेण्याची , धडाडीने अशक्यप्राय वाटणार्‍या जगावेगळ्या संकल्पनांमध्ये सर्वस्व ओतण्याची अद्वितीय जिद्द अंगी बाणविलेल्या, व ते सत्यात उतरविण्यासाठी लागणार्‍या कोणत्याही स्वरूपाचा धोका देखिल पत्करण्याची तयारी व हे सर्व करण्याची अजब क्षमता देखिल असणार्‍या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करवून देतो.

अवघ्या १५ दिवसांच्या अवधीत अंतराळ, वाहन व उर्जा ह्या तीनही क्षेत्रांमधील विलक्षण संभाव्य बदल व भवितव्याचे संकेत देणार्‍या तीन घटना वाचताना त्यामागील परमेशवराने निर्मिलेल्या ह्या ’अजब मेंदू’ चा आवाका पाहून तोंड विस्मयाने विस्फारले जाते . ’गरज ही शोधाची जननी आहे’ असे वाचले होते पण दूरदृष्टीने माणूस अशी अति विशाल, उत्तुंग गगन भरारी घेऊ शकतो व जगात अशी मानवाच्या सर्वकष, सर्वांगीण विकासाचा विचार करणारी माणसे आहेत हे पाहून त्या जगन्नियत्यांच्या मानव बनविण्याच्या कृतीमागचा उद्देश्यही दृष्टीगोचर होतो.
२१ व्या शतकातील मानवाची अंतराळातील झेप किती आवश्यक आहे हे जाणवले ते त्या द्रष्ट्या उद्योजकाच्या ’स्पेसेक्स’ ने जेव्हा सप्टेंबर २०००८ मध्ये ’फाल्कन १ ’ ह्या रॉकेटने पृथ्वीबाहेरच्या कक्षेत यशस्वी झेप घेतली आणि अंतराळ युगातील एका नव्या पर्वाची सुरुवात झाली त्या मागील चित्तथरारक पार्श्वभूमी वाचताना.!
२०१० साली पहिलं ’रियुजेबल स्पेस्क्राफ्ट’ आणि त्यानंतर अवघ्या पाचच वर्षांत २०१५ साली ’रियुजेबल रॉकेटचे लॅंडींग ’ ह्या घटना केवळ ’स्पेसेक्स’ कंपनीच्या नव्हे तर अंतराळक्षेत्राच्या इतिहासातील देखिल अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.

लहानपणी आपण सारेच अनेक स्वप्ने पाहतो पण ती सत्यात उतरविण्यासाठी क्वचितच हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी माणसेच चिकाटीने, जिद्दीने, धडाडीने अपरंपार कष्ट घेतात असे चित्र समाजात दिसते. परंतु एलॉन मस्क ह्यांच्या कर्तुत्त्वाची यशोगाथा वाचताना मात्र माणूस काय करू शकतो परमेश्वरने दिलेल्या अफाट बुध्दीमत्तेच्या जोरावर ह्याचे प्रत्यंतर पदोपदी येते. लहानपणापासूनच पृथ्वीपलिकडील विश्वाने झपाटलेल्या मस्क ह्यांनी शालेय जीवनातच ह्याची सुरुवात केली होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारन त्यांनी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी ’ब्लास्टर’ नावाचा जो गेम तयार केला होता त्याची संकल्पनाच मुळी परग्रहावरून संहारक क्षेत्रे घेऊन आलेली अंतराळयाने पाडणे ही म्हणजेच अंतराळक्षेत्राशीच जुळलेली होती. आपल्या मराठीत ह्याच करिता म्हण दृढ झाली असावी -’मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.’

’टेसला मोटर्स’ ह्या एलॉन मस्क ह्यांच्याच दुसर्‍या कंपनीने जगाला दिलेली देणगी तर अतुलनीयच आहे. जगातील प्रत्येक रस्त्यावर किफायतशीर ’इलेक्ट्रीक कार’ असावी हे आपले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी एलॉन मस्क ह्यांनी ’टेसला’ कडून तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रीक गाड्यांचे तंत्रज्ञान जगातील सर्व कंपन्यासाठी खुले केले, हे करून त्यांनी वातावरणातील प्रदूषण रोखण्याचा सोपा मार्ग आमच्या समस्त मानवजातीच्या हाती सोपविला.
’सोलर सिटी’ , ’सोलर रूफ’ ह्या संकल्पना म्हणजे तर उर्जा क्षेत्राला  दिलेले वरदानच जणू ज्या योगे जगाला ’शाश्वत उर्जेच्या" दिशेने पुढे नेण्यासाठी एक नवीन पाऊल टाकून आगळी वेगळी दिशाच दाखविली होती.
’हायपरलूप’ - विमानाच्या दुप्पट वेग असणारी , हवामानाचा कोणताही परिणाम न होणारी व कमी उर्जेचा वापर असणारी वाहतूक यंत्रणा व हे तंत्रज्ञान आणि ते विकसित केल्यानंतर त्याचे पेटंट न घेता ,कोट्यावधी डॉलर्सच्या कमाईवर बिनधास्तपणे सोडलेले पाणी पाहता  एलॉन मस्क हा केवळ खोर्‍याने पैसा ओढणारा उद्योजक नसून त्याच्या संशोधनाद्वारे त्याची ठाम भूमिका , उदात्त विचारसरणी आणि मानवजातीसाठी आमूलाग्र बदल घडवून आणण्याची प्रेरणा कारणीभूत असल्याचे आढळते.

हायपरलूप व अंडरग्राउंड टनेलिंग हे तंत्रज्ञान मंगळावर वापरण्यासाठी उपयुक्त ठरेल असे एलॉन मस्क ह्यांनी संकेत दिले होते. पृथ्वीवर काहीतरी आदळून मृत्यु येण्यापेक्षा मंगळावर मृत्यु आलेला आवडेल असे म्हणणार्‍या एलॉन मस्क ह्यांनी आपल्याला ह्याच आयुष्य़ात मानवाने मंगळावर पाऊल ठेवलेले पहायचे आहे अशी बाळगलेली महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी मंगळावर आपली ’रोडस्टर’ ही ’ऑल इलेक्ट्रीक कार ’ पाठविण्याची तयारी ह्याची जबरदस्त साक्ष देते.

त्यानंतर अवघ्या सव्वा दोन महिन्यांच्या कालावधीनंतर १२ मार्च २०१८ रोजी अमेरीकेतील टेक्सास येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना एलॉन मस्क ह्यांनी तिसरे महायुध्द भडकल्यास पृथ्वीवर पुन्हा एकदा ’अंधारयुग’ येण्याची शक्यता वर्तवून , पृथ्वीवर पुन्हा  मानवी जीवनाची सुरुवात करण्यास अंतराळातील चंद्र व मंगळावरील तळ महत्त्वाची भूमिका बजावतील असा दावा केल्याचे दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक १३ मार्च २०१८ रोजीच्या ’तिसरे महायुध्द’ ह्या विशेष भागात प्रतिपादन केले आहे.

गेल्या वर्षीच एलॉन मस्क ह्यांनी चंद्रावर मानवी वस्तीचा समावेश असणारा ’मून बेस अल्फा’ व मंगळावरील मानवी वस्तीची योजना असणारा ’मार्स सिटी प्लॅन’ यांची घोषणा केली होती तर नुकत्याच १२ मार्च २०१८ रोजी ऑस्टिन शहरातील ’एसएक्सएसडब्ल्यू  कॉनफरन्स ’ मधील एका कार्यक्रमात पुढील वर्षाच्या म्हणजे २०१९ च्या पहिल्या ६ महिन्यांतच अंतराळक्षेत्रातील त्यांच्या मालकीच्या आघाडीच्या ’स्पेसेक्स ’ ह्या खाजगी कंपनीकडून ’इंटरप्लॅनेटरी ’ प्रकारातील अंतराळयाने तयार होतील व त्यामुळे दोन ग्रहांमधील प्रवासाचा अवधी खूपच कमी होईल अशी ग्वाही दिली. परंतु त्याच बरोबरीने मंगळावर जाणारे पहिले मानवी पथक मोठा धोका पत्करणारे असेल ह्या वास्तवाचे संकेतही द्यायला मस्क विसरले नाहीत. एलॉन मस्क ह्यांनी स्पष्ट शब्दांत तंबी देखिल दिली की मंगळावरील पहिले मिशन हा श्रीमंत लोकांसाठी सुटकेचा गु्प्तपणे रचलेला कट नाही ( the first missions to Mars will not be "an escape hatch for rich people" ). मंगळावर जाणारे लोक हे अगदी मूलभूत गोष्टीं पासून समाज निर्माण करतील आणि त्याकरिताच प्रचंड आर्थिक पाठबळाची गरज आहे.

’आर्टिफिशियल इंटेलिजन्स ’ अर्थात कृत्रिम बुध्दीमत्ता ह्याच्या धोक्यांबद्दल सातत्याने आवाज उठविणारा  ’ओपन ए आय’ हा उपक्रम जागतिक पातळीवर बहुतांश व्यासपीठावरून राबविणे ह्यातून एलॉन मस्क ह्यांची जगाला तिसर्‍या महायुध्दातील होऊ घातलेल्या भीषण नरसंहारापासून वाचविण्याची अटाटी दिसते.

’न्यूरालिंक ’ द्वारे मानवी मेंदूला संगणकाशी जोडून मेंदूशी निगडीत गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी उत्पादन येत्या ४ वर्षांत  विकसित करण्याची मस्क ह्यांची महत्त्वाकांक्षेला परमेश्वरी वरदहस्त व सहाय्य लाभो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना !

टीप - " एलॉन मस्क - द्रष्ट्या उद्योजकाची गगनभरारी !  " हा लेख दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक २१ मार्च २०१८ च्या अंकात "व्यासपीठ" ह्या सदरात पान क्रमांक ८ वर प्रथम छापून आला होता.  

2 comments:

  1. Mind blowing article Sunitaji...Your articles are full of knowledge gaining and study based. Reference of New year Issue and following articles on Third World war in Daily Newspaper Pratyaksh are the best to judge the significance of WW3 in present scenario.

    ReplyDelete
  2. Very nice article... especially those who hv no access to daily newspaper pratyaksha should n must follow this blog quite regularly to update themselves with all the latest news happening in n around the world...hats off to this stalwart industrialist....

    AI... artificial intelligence is a field taking its shape so fast so that we may assume future based in AI only.it has got is advantages n disadvantages...it depends on how we use it...whether we use it for wellbeing of mankind like ALON MASK or for destruction foreseen ahead by way of WW3.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog