Sunday 26 July 2015

२६ जुलै- कारगील विजय दिन - शहीद हुतात्म्यांना व भारतीय सैन्याला मानवंदना !!!

आजपासून १६ वर्षांपूर्वी आपल्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांनी कारगिल युध्दात टायगर हिलवर आपल्या भारतमातेचा तिरंगा ध्वज फडकवून आपला यशाचा, विजयाचा गौरव साजरा केला होता. आपण त्या महान , थोर भारतमातेच्या सुपुत्रांना नतमस्तक होऊन त्रिवार प्रणाम करू या आणि भाव-सुमनांजली अर्पण करून आजच्या दिवशी त्यांची विजय गाथा स्मरू या. 


अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानवर विजय मिळवला. जोझीलापास पासून द्रास-कारगील, बटालीक सेक्टर, टायगर हिल व तोलोलिंग शिखर  -  सगळीकडे ऊंचावर शत्रू आणि पायथ्याला आपले सैनिक. शत्रू कुठे दडलाय, त्यांचे किती संख्याबळ आहे, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र कोणती आहेत आणि किती ताकदीची आहेत याचा काहीच थांगपत्ता नसताना लढून जिंकलेलं हे युद्ध म्हणूनच खूप खडतर होते. 


महामार्गाच्या लगतच्या चौक्यांवरील भारतीय आक्रमणांत टायगर हिल व तोलोलिंग शिखर या दोन चौकीवजा शिखरांवरील आक्रमणे खरोखरीच दाद देण्याजोगी आणि नोंद घेण्याजोगी होती. यानंतर बटालिक व तुर्तुक या सियाचीन लगतच्या भागाला लक्ष्य करण्यात आले. यातील काही जागा गमावणे पाकिस्तानी संरक्षणाच्या दृष्टीने परवडणारे नव्हते. पॉईंट ४५९० व पॉइंट ५३५३ या त्यापैकी काही अत्यंत महत्त्वाच्या जागा होत्या. या भागात शिखरांना नावे त्यांच्या उंचीप्रमाणे असतात हे बाब ध्यानात घ्यायला हवी तसे बघायला गेले तर ४५९० हा महामार्गाला सर्वात जवळचा पॉइंट होता तर ५३५३ हे युद्धातील सर्वात अधिक उंचीचे शिखर होते. पॉइंट ४५९० वर १४ जून १९९९ रोजी भारतीय सेनेने ताबा मिळवला व युद्धाचे पारडे हळूहळू भारताच्या बाजूने झुकू लागले.
  
या युद्धात भारतीय सैन्याने नवनवीन क्‍ऌप्त्यांचा वापर करून शत्रूच्या नाकात दम आणला आणि त्यांना सळो की पळो करून सोडले होते. काही लढायांमध्ये भारतीय सैनिकांनी रात्रीच्या अंधारात हजारो फूट सरळसोट कड्यांवर गिर्यारोहण करून शत्रूवर अनपेक्षित ठिकाणांवरुन हल्ले चढवले व चौक्या ताब्यात घेतल्या. शेवटी शिवाजी महाराजांच्या मुलुखातील हे सळसळते रक्त आपल्या लाडक्या शिवरायांचा प्रताप, त्यांचे गनिमी कावे, त्यांच्या "हर हर महादेव " च्या आसमंत  दुमदुमवून टाकणाऱ्या सिंह गर्जना थोडेच  विसरणार ? काही ठिकाणी भारतीय सैन्यातील काही तुकड्यांनी आक्रमण करताना अल्ला हू अकबर असा नारा देत हल्ला केला त्यामुळे शत्रूपक्ष आपलेच सैनिक आहेत या भ्रमात राहिले व चौक्या गमवाव्या लागल्या. तर काही वेळा शत्रूने अल्ला हू अकबर असा नारा देउन आपले Wireless कुचकामी केले होते आणि त्यामुळॆ खूपच कठिण समस्यांना सामोरे जावे लागले होते.  

बहुतांशी चौक्या या खूप उंचीवर होत्या व काश्मीरमधील हा भाग दगडी व रेताड आहे त्यामुळे हल्ला करताना लपायला फारशी जागा मिळत नव्हती. त्यासाठी भारतीय सैन्याने आपले सैनिक कमी मारले जावेत म्हणून बहुतेक हल्ले/आक्रमणे रात्रीच्या वेळेसच करण्याचे धोरण आखले होते. परंतु रात्रीच्या हालचाली ह्या वेळखाऊ होत्या. तसेच या उंचीवरील अतिशय कमी तापमान व जबरदस्त उतारावरील लढाया ह्या सर्वच गोष्टी भारताच्या विरोधात होत्या असे वाचनात आले. 

तब्बल २ महिन्यांच्या अथक प्रयासानंतर आणि खडतर परिश्रमानंतर, अत्यंत उंच , दुर्गम अशा टेकड्यांमधील पकिस्तानी आऊट्पोस्टचा भारतीय सैन्याने ताबा घेतल्यावर "ऑपरेशन विजय" यशस्वी झाले होते. हे जीवघेणे , विनाशकारी युध्द "कारगिल युध्द " म्हणून २६ जुलै १९९९ ला समाप्त झाले. ह्या युध्दात सुमारे ५२७ हून अधिक वीर योध्दे हौताम्य पावले आपल्या भारतमातेच्या संरक्षणासाठी हसत हसत आपले बलिदान देऊन शहीद झाले आणि १३०० हून अधिक सैनिक जबरदस्त घायाळ झाले होते असे सांगितले जाते. ह्या सैनिकांमधील अधिकांश सैनिकाने आपल्या जीवनाचे ३० पावसाळे पण पाहिले नव्हते. ह्या शहीद हुतात्म्यांनी भारतीय सैन्याची शौर्य व बलिदानाची परंपरा आमरण पाळली , ज्याची प्रतिज्ञा प्रत्येक सैनिक आपल्या लाडक्या तिरंग्याला स्मरून घेत असतो. 

हिमालयापेक्षाही अति- उत्तुंग असा त्यांचा अतुलनीय पराक्रम, साहस, दैदिप्यमान शौर्य आहे, जे शब्दांनी वर्णन करणे खरेच शक्य नाही. 
ह्या रणधुरंधर लढवय्यांनी आपल्या कुटूंबीयांना , स्वजनांना घरी परतण्याचे वचन तर दिले असेल पण त्यांनी आपले वचन खूपच अनोख्या अंदाजाने निभावले...ते आले घरी परत ...पण लाकडाच्या मोठ्या पेटार्‍यातून ,आपला देह तिरंग्यात लपेटून , ज्या तिरंग्याची सुरक्षा करण्याचे शपथ त्यांनी वाहिली होती, ती आपल्या स्वत:च्या रक्ताचा थेंब अन थेंब सांडून आणि शेवटचा श्वास असे तो वर... आजीवन निभावली आणि
म्हणूनच जो भारतीयांच्या अभिमानाचा तिरंगा ध्वज ज्याच्या पुढे कधी आदराने त्यांचे शिश नमले होते , तोच मातृभूमीचा तिरंगा आज आपल्याला त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची ,बलिदानाची गौरव गाथा सांगत त्यांना घेऊन परतला होता सन्मानाने!!!!

भारतीय सेनेच्या वेगवेगळ्या पदांवरच्या सुमारे ३०००० अधिकारी व सैनिकांचा ह्या ऑपरेशन विजयमध्ये सहभाग होता. कारगिल युद्ध हे फक्त सीमेपुरतेच लढले गेले नाही. भारतातील प्रत्येक शहर, गावाचे यामध्ये योगदान होते. 26 जुलै हा कारगिल विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो ते उगीच नाही. 

काही कारगिल युध्दाच्या Videoची लिंक देत आहे ते आपण youtube वर पाहू शकता-
१.  India Pakistan Kargil war 1999 - a very exclusive video - 

३.  Recall 'Operation Vijay' 26 July 1999 - https://www.youtube.com/watch?v=Nirnby2uN4s

कोणतेही युध्द हे फक्त हत्यारांनी लढले जात नाही तर ते युध्द लढताना हवे असते असीम साहस, जाज्वल्य देशप्रेम, कर्तव्यनिष्ठ भावना व आत्मसमर्पणाची , बलिदानाची प्रखर तळपती भावना ! आणि भारतमातेच्या सुपुत्रांना ह्याची उणीव कधीच भासत नाही. 

भारतभूमीच्या परंपरेने ज्यांना पूजले, ज्यांना वंदिले, ज्यांची गीते गायली  ते साक्षात प्रभू श्रीरामचंद्र सुध्दा हेच उद्गार काढून आपल्या मातृभूमीचा गौरव करतात -

जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी - माझी माता आणि मातृभूमी - जन्मभूमी ह्या स्वर्गापेक्षा सुध्दा अधिक मला प्राणप्रिय आहेत. 
आज हे भारतमातेचे सुपुत्र भले आज आपल्यात नसतील परंतु त्यांच्या स्मृती आपल्या हृदयात निरंतर तेवत राहतील आणि आपल्याला मातृप्रेमाची , मातृनिष्ठेची , देशभक्तीची शिकवण देतच राहतील....
जय़ भारतमाता ! वंदे मातरम् !


1 comment:

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog