Sunday 5 March 2017

तव पदरीं असता ताता। आडमार्गीं पाऊल पडतां .....

तव पदरीं असता ताता। आडमार्गीं पाऊल पडतां।

सांभाळुनि मार्गावरता। आणिता न
दुसरा  त्राता।
 

"त्या " एकाच्याच पदरी असताना , "त्या" च्याच मार्गावर चालताना  चुकीने आडमार्गी पाऊल पडतां , आपण "त्या" ला दिलेल्या वेदनेच्या प्रखर जाणिवेतून उमटलेले  काही शब्द .....

अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थांचे भक्त गजर करण्यात तल्लीन झाले होते , त्यांच्या मुखीचा हा पवित्र , पावन करणारा गजर ऐकून आठवण झाली ती श्रीस्वामी समर्थांच्या दोन श्रेष्ठ भक्तांची - चोळाप्पा आणि बाळाप्पा !
चोळाप्पाचे प्रेम हवे मज बाळाप्पाची भक्ती हवी
विभक्तीचा अंश नको मज स्वामी तुमची कृपा हवी

चोळाप्पाचे श्रीस्वामींवर निरतिशय प्रेम होते तर बाळाप्पाची श्रीस्वामीं चरणीं नितांत भक्ती होती.

खरे तर परब्रम्ह स्वरूप सदगुरुंच्या लीलांचा ठाव कोणालाच लागत नाही , त्या अतर्क्य लीलांचे अवगाहन करणे व त्यांच्या अतुल्य प्रेमाचा आकंठ आस्वाद घेत त्या अमृततुल्य प्रेमात निरंतर डुंबत राहणे एवढेच भक्तांच्या हाती असते. तरीही अशा सद्गुरुंच्या गळ्यातील ताईत बनलेल्या कांही भक्तांचे आचरण पाहतां जाणवते की भक्तीचा "भ" किती सुंदर , फक्त आणि फक्त प्रेमाने ओथंबून ओसंडून वाहणारा असा प्रेमप्रवास आहे जो भरताने केला -
भरत - भक्तीत रममाण झालेला , भक्तीत स्वतः:ला विसरून रत झालेला "त्या "चरणांचा दास !
 . "तो" फक्त आणि  फक्त माझाच आणि मी फक्त आणि फक्त "त्या" एकाचाच, हा फक्त एकमेकाचे होऊन राहण्याचा प्रवास !

अशाच स्वामीभक्त्तीत आपले सर्वस्व झोकून देणार्‍या बाळाप्पांच्या भक्ती-प्रेमाच्या काही कथा स्मरू या आणि सदगुरुतत्त्वाच्या अतर्क्य लीलांचा रसास्वाद चाखू या....

श्री गोपाळबुवा केळकर ह्यांनी लिहिलेल्या श्रीस्वामी समर्थ आजोबांच्या बखरीत बाळाप्पाच्या स्वामींच्या चरणीं असलेल्या नितांत सुंदर भक्तीच्या कथा वाचताना डोळे पाणावतात. बखरीतील १३२ व्या कथेत बाळाप्पांच्या पूर्वेतिहासाबद्दल वाचनात येते की बाळाप्पा हे हवेरी गांवी राहात होते. एके दिवशी त्यांना पश्चात्ताप होऊन गुरु करावा म्हणून ते मुरगोड गांवी गेले. तेथील महान कीर्तीमान पुरूष म्हणून प्रसिध्दी पावलेल्या चिदंबर दीक्षित ह्यांचे स्थान पहावें म्हणून बाळाप्पा त्यांचे गांवीं गेले, तेथे ३ दिवस राहून पुढे ते गाणगापुरास गेले. गुरुदर्शन व्हावे म्हणून त्यांनी फार कडक सेवा चालविली असतां , ३ महिन्यांनंतर त्यांना अक्कलकोटास जा असा एके दिवशी दृष्टांत झाला . अक्कलकोटाची कीर्ति बाळाप्पांनी आधीच ऐकली होती आणि आता आज्ञा झाली म्हणून ते लगेच अक्कलकोटास आले. त्या दिवशी श्रीस्वामी समर्थ खासबागेंत होते. बाळाप्पांनी दर्शन घेऊन पैशाची खडीसाखर पुढे ठेविली . असो. श्रीस्वामींची मूर्ति पाहतांच स्वप्नांत ज्या संन्याशाने  दर्शन दिले , तीच मूर्ति असे पाहून बाळाप्पांस कोण आनंद झाला. मग तो मुरलीधराचें देवळांत राहून स्वामींची सेवा करू लागला.

बाळाप्पांस प्रथम सुंदराबाईने आश्रय दिल्यामुळे तो तिच्यामार्फत स्वामींची सेवा करू लागला. चोळाप्पास सुरुवातीला बाळाप्पाने श्रीस्वामीं जवळ राहू नये असे वाटे, त्यामुळे त्याने तसे स्वामींना सुचविले देखिल, पण श्रीस्वामी समर्थांनी बाळाप्पाला माघारी धाडण्यास नकार दिला. पुढे बाळाप्पाला घालविण्यासाठी श्रीपादभटाने युक्तीने चिठ्ठी काढली असतां ’जाऊं नको ’ अशीच आली व त्यावर त्या दोघांचा निरूपाय झाला .
बाळाप्पास कितीही श्रीस्वामींनी आपल्याला प्रसाद द्यावा असे मनांतून वाटले तरीही कधीही स्वामी समर्थ आजोबा त्यास प्रसाद देत नसत. एकदा  तर बाळाप्पाने स्वामींपुढे प्रसाद म्हणून ठेवलेल्या खारकांपैकी  १ खारीक आपणांस प्रसाद म्हणून मिळावी म्हणून स्वामींच्या चरणीं प्रार्थनाही केली, तरी देखिल स्वामींनी त्याला १ खारीक देखिल प्रसाद म्हणून दिली नाही. चोळाप्पानेत्या खारका उचलून त्यांतील २ खारका बाळाप्पाला दिल्या व आनंदाने बाळाप्पा माघारी परत जात असताना चक्क श्रीस्वामींनी चोळाप्पाला सांगून त्या २ खारका परत मागवून घेतल्या व स्पष्ट सांगितले देखिल ," अरे चोळ्या , त्याला कांही द्यावयाचे नाहीं ! जा, खारका परत घेऊन ये. अर्थात चोळाप्पाने धांवत जाऊन बाळाप्पापासून खारका मागवून आणल्या, ज्याने बाळाप्पास फार वाईट वाटले. परंतु दयाघन , करूणामूर्ती श्रीस्वामी समर्थांची त्या मागे अचिंत्यदानी लीला दडलेली होती.

चोळाप्पा, सुंदराबाई, श्रीपादभट हे सेवेकरी जरी बाळाप्पाला अक्कलकोट सोडून माघारा आपल्या गांवी जाण्यास नाना उपाय योजीत होते , तरी देखिल त्या कशाचीच पर्वा न बाळगतां, बाळाप्पाअत्यंत निष्ठेने, सबुरीने स्वामी चरणांची सेवा हेच आपले परम कर्तव्य मानून भक्ती करीत राहिले ह्या त्यांच्या वागण्यातून स्वामीं प्रतीची त्यांची प्रेमळ, निष्काम भक्तीच दिसून येते.
बखरकार केळकर बुवा म्हणतात ज्याला स्वामी आजोबा प्रसाद देत , त्याला जाण्याची आज्ञा असे व ज्याला प्रसाद मिळत नसे त्याला आज्ञा नसे. म्हणजेच बाळाप्पाने आपल्या चरणीं सेवेसाठी राहावे असाच श्रीस्वामींचा मनोदय होता असे जाणवते. अर्थातच भक्ती हाच ज्याचा काम आहे त्या भक्ताचा स्वामी तरी कसा अव्हेर करणार ? परंतु स्वामी मनीचे शब्द जाणणार तरी कसे ?

अक्कलकोट येथे श्रीस्वामी समर्थांच्या चरणीं सेवेत रूजू होण्याआधी बाळाप्पाला  ३ वर्षांच्या आधी व्यापाराच्या भरभराटीच्या एका द्वेष्ट्याने कानवल्यांतून विष खाऊ घातले होते. त्यामुळे बाळाप्पाच्या बेंबीतून रक्तस्त्राव होत असे. ह्यामुळे बाळाप्पा फार आजारी झाला होता व त्याला जागेवरून उठवेना. तेव्हा शरणागत वत्सल गुरुमाऊलींच्या कृपेने बाळाप्पाच्या बेंबीतून फार रक्त वाहू लागले व एका पुडीतून कांही काळा पदार्थ बाहेर पडला व बाळाप्पास आराम जाहला. ह्यावरून स्वामींनी बाळाप्पाच्या जीवावरचे संकट निवारण करून त्याचे प्राण वाचविले होते.

सुरुवातीला हे जरी अगम्य कोडे असले तरी कालांतराने भक्ताला आपल्या सदगुरु माऊलीच्या मनांतले  न सांगता ही कसे आपसूक "त्या" च्याच लीलेने कळू लागते हे पाहू या आता.

असेच आणखी दोन-चार श्री स्वामींच्या अतर्क्य लीला , चमत्कार अनुभवास आल्यावर तर बाळाप्पाची भक्ती दिवसेंदिवस स्वामीं चरणीं अधिकच घट्ट होऊ लागली. सुंदराबाई , चोळाप्पा ह्यांच्या नंतर जेव्हा बाळाप्पाचा अंमल सुरु झाला तेव्हा स्वामींची सर्व तयारी तो अत्यंत चोख पणे ठेवीत असे. बाळाप्पास सुरुवातीस पाणी आणण्याची लांज वाटत असे , पण एके दिवशी श्रीस्वामी समर्थ म्हणाले ," निर्लज्जो गुरुसन्निधौ" हे ऐकून बाळाप्पाने लाज सोडून दिली व तो एकनिष्ठेपणें सेवा करू लागला. सदगुरुंने सांगता क्षणी त्याची आज्ञा स्विकारणे आणि कोणतीही चाल ढकल न करता, दुर्लक्ष न करतां ,  तंतोतंत पाळणे हे उत्तम भक्ताचे लक्ष्ण बाळाप्पाच्या अंगी बाणलेले ध्यानांत येते.

सुंदराबाईच्या पुढे कोणाचेही कांही चालत नसे. एकदा दत्तजयंतीचा दिवस असतांना यात्रेची गर्दी फार असल्या कारणाने श्रीस्वामी समर्थ आजोबांना पहाटे चार वाजता स्नान घालून भोजन घातले होते. तितक्या पहाटेंस दर्शनास आलेल्या एका गृहस्थाने "श्रींनी आपला नैवेद्य खावा" ह्या इच्छेने पंचपक्क्वानांनी भरलेले ताट आणले होते. परंतु स्वामी आजोबांची आंचवण्याची व नैवेद्य येण्याची एकच गांठ पडल्याने त्याचा नैवेद्य तसाच राहिल्याने तो गृहस्थ फारच हिरमुसला होता. सुंदराबाईपुढे हात जोडून त्याने कसें ही करून  स्वामींच्या मुखांत एक घांस तरीं पडावा व त्याबद्दल बाईंस दोन रूपये देण्याचे कबूल केले होते. पैशाच्या लोभी सुंदराबाईने तसे मान्य करून आतां जेवण झाले, दुपारी घालूं अशी हमी दिली होती. परंतु रात्री १० वाजेपर्यंत दर्शनास आलेल्यांची दाटी असल्याने स्वामींनी कांहीच खाल्ल्ले नाही. रात्री सर्व सारवासारव झाल्यावर सुंदराबाईने पैशाच्या लोभानें बाळाप्पाला दटावणी करून नवीन स्वंयपाक न करू देतां , तसेच त्या गृहस्थाचे आणलेले , शिळे झालेले अन्न भरविले. श्रींनी जरी अन्न मुकाट्यानें खाल्ले, मात्र त्रिवार म्हणाले, " आतां काय नबाब झाले! "

स्वामींच्या एवढ्या शब्दानें बाळाप्पास मरणप्राय दु:ख झाले व अंत:करण सद् गदित  होऊन  श्रींचे दोन्ही पाय पोटाशी घट्ट धरून तो रडूं लागला. झाल्या चुकीबद्दल माफी मागितली व बाईचे बोलण्यावरून श्रींस शिळे खाण्याचा प्रसंग त्यानें कधींही येऊ दिला नाहीं !
ह्यावरून बाळाप्पाची समर्थांच्या चरणीं असलेली प्रेमळ , निग्रही भक्ती दिसते. स्वामी तुमच्यासाठी काहींही करायची तयारी असल्याची त्याची कृती स्वामीं ठायीचा त्याचा अननय भाव दाखवितो.

"श्रीसाईसच्चरित" ह्या महान अपौरूषेय ग्रंथात हेमाडपंत अध्याय २३ व्या मध्ये उत्तम भक्ताची लक्षणें  वर्णितांत -
न सांगतां अभीष्ट जाणणें   जाणतांच सेवा करूं लागणें  
प्रत्यक्ष आज्ञेलागीं न खोळंबणें जाणें ’उत्तमशिष्य ’ तो

वरील प्रसंगी आपण पाहिले की श्रीस्वामी समर्थांनी फक्त कांही मुखातून उद्गार काढले होते आणी बाळाप्पाला कांही स्पष्ट आज्ञा दिली नव्हती किंवा सुंदराबाईच्या अक्षम्य कृत्याबद्दलही कांहीं अवाक्षरही काढले नव्हते, तरी देखिल बाळाप्पाने स्वामींचे अभीष्ट (मनांतील) जाणले व जाणतांच तशी सेवा करू लागला तो, पुढे कोणाचीही तमा न बाळगता.

असेच  एकदां बाळाप्पा प्रात:काळी (पहाटे ) चार वाजतां माळ घेऊन गणपतीचा जप करीत बसला होता. श्रीस्वामी समर्थ तेव्हा पलंगावर बसले होते आणि शिवुबाई सेवेकरीण खालीं बसली होती. गोष्टी चालल्या असतां शिवुबाईने स्वामींस विचारले कीं ," हल्ली बाळाप्पा काय करीत आहे? तेव्हा श्री समर्थ म्हणाले ," तो तरट विणत आहे." शिवुबाई गप्पच राहिली. बाळाप्पाने समर्थांचे उत्तर ऐकून मनांत विचार केला , तरटाचा उपयोग विशेष होत नाहीं. त्या अर्थी गणपतीच्या जपापेक्षा श्रीस्वामी समर्थांचा जप करावा. दुसरे दिवशी पुन्हां श्रीस्वामी समर्थ आजोबा पलंगावर बसलें असतां शिवुबाई जवळ होतीच , आणि बाळाप्पा माळ घेऊन जप करू लागला होता. कांही वेळाने शिवुबाईनें श्रींस प्रश्न केला कीं ,"आज बाळाप्पा काय करीत आहे? " समर्थांनी उत्तर दिलें की ," अगं तो कांबळी विणीत आहे." बाळाप्पाने विचार केला , तरटांपेक्षा कांबळींचा उपयोग जास्त आहे तर सर्वकाळ समर्थांचे नांवाचाच जप करावा.

ह्या कथेंतून दिसतें की बाळाप्पाने श्रींच्या मनांतील अभीष्ट जाणून स्वामी समर्थ नावाचा जप करण्यास सुरुवात केली , येथेही श्रींनी कोणतीच प्रत्यक्ष आज्ञा केली नव्हती. म्हणून बाळाप्पा स्वामीमुखीच्या प्रत्यक्ष आज्ञेलागीं खोळंबला नाहीं की कधी मला स्वामी समर्थ स्वमुखाने आज्ञा देतील की तू माझ्या नावाचा जप कर व मगच मी तो जप करेन. हे श्रेष्ठ , उत्तम भक्ताचे लक्षण आहे असे वाटते.

पण कधी कधी भक्ताला आपले हित -अहित कळत नसते , उचित अनुचित कळत नसते , तेव्हा मात्र सदगुरु भक्ताच्या कनवाळ्या पोटीं स्पष्ट शब्दांत तशी आज्ञा देताना दिसतात,

श्रीस्वामी समर्थ आपल्या भक्तांस इतर तीर्थांस कधी जाऊ देत नसत.
एकदां मुंगी-पैठणची विठाबाई नावाची स्त्री अक्कलकोटास श्रींच्या दर्शनास आली होती. आषाढ महिना आला असून एकादशी (आषाढी एकादशी ) नजीकच आली होती. बाईंच्या मनांत पंढरपुरास जावयाचे होते व तिने आपला उद्देश गणपतराव व बाळाप्पा ह्यांना कळविला होता. श्री समर्थांची स्वारी त्या वेळीस राजवाड्यात मुक्कामाला होती व तेथे फक्त बायकांना दर्शनास जावयाला परवानगी होती, म्हणजेच पुरुषांना मनाई होती. श्रींचे राजवाडयांत राहणे किती काळासाठी हे माहीत नसल्याने बाहेर राहून कंटाळवाणे दिवस काढण्यापेक्षा हे दोघे विठाबाई बरोबर पंढरपुरांस जायचे ठरवितात. परंतु विठाबाई श्रींच्या दर्शनास राजवाड्यांत गेली असतां श्रींच्या मर्मभेदी सूचक बोलाने विठाबाईस उपरती होते कि श्रीस्वामी समर्थ हे प्रत्यक्ष चालते- बोलते देव असून आपण
विठोबाचे दर्शन करण्यास जाणार व त्यातून श्रींचे सेवेकरी बरूबर नेणार हे चुकीचे आहे. विठाबाई तशी कबूली श्रीस्वामींस देऊन आपला पंढरपुरास जाण्याचा बेत रहीत करते. अर्थात्च श्रींनी लवकरच वांद्यातून बाहेर येऊन सर्व भक्तवृंदास दर्शन दिले , ज्यामुळे बाळाप्पा व गणपतरावांनाही आपली चूक उमगली.

असेच उदाहरण वामनबुवा बडोदकरांच्या बाबतीत घडलेले आढळतें शके १७९४ सालीं सिंहस्थात वामनबुवा बडोदेकर हे स्वामीभक्त नाशिकांस जाऊन नाशिक, त्र्यंबक अशा यात्रा करून श्रीसप्तशृंगीदेवीचे दर्शनास गेले होते. तेथील पुजार्‍यांनी वामनबुवांची ते स्वामी भक्ती करीत असल्याने खिल्ली उडविली परंतु वामनबुवा व ब्रम्हचारीबुवा ह्यांच्या मनीची श्रीसप्तशृंगीदेवीच्या मुखातील तांबुल प्रसाद म्हणून खाण्याची इच्छा शेवटी स्वामींच्या कृपेनेच पूर्ण होऊ शकली.
पुढे तर श्री क्षेत्र पंढ्रपूर येथे जाऊन श्रीपांडुरंगावर गंगा घालण्याची मनिषा पुरविताना आपण स्वत:च "तो" पांडुरंग असल्याचे श्रींना प्रत्यक्ष तेथे मूर्ती रूपाने दर्शन देऊन दाखवावे लागले होते. नंतर वामनबुवांना तशी स्पष्ट प्रचिती श्रीस्वामींनी प्रत्यक्ष बोलून दाविली होती.

कधी कधी वाटते कि युगानुयुगे हा सदगुरुराया माझ्यासाठी सतत चालतोय , नाही नाही धावतोय आणि माझ्या चुकीच्या वागण्याने माझ्यामागे धावून धावून "त्या"चे पाय सुजले आहेत, खूप खूप दुखत आहेत आणि आता "त्या" ला सहज चालणे पण मी अशक्य केले आहे , किती विचीत्र कर्मगती ना ?   

एकीकडे भक्ती करताना आपण सदगुरुलाच ब्रम्हा, विष्णु, महेश म्हणून "त्या"चा गोडवा गातो आणि तरीही "त्या"च्या चरणी अनन्य शरणागती स्विकारण्याचे सोडून आपण तीर्थक्षेत्रांमध्ये देवाला शोधायला धाव घेतो. तेव्हा आपण "त्या"च्या अंत:करणाला किती वेदना देत असू नाही का? अरे माझ्या लेकरांसाठी मी अथक परिश्रम करून, घोरातिघोर तपर्श्च्र्या करून  जगातील सर्वात पावन पवित्र तीर्थक्षेत्र निर्माण केले आणि तरीही माझी लेकरे मला न मानता, माझ्या शब्दांची किंमत न करता हजारो कोस दूरवर तंगडतोड करीत राने वने तुडवित , डोंगर दर्‍या पालथी घालत फिरतात अन वरती शिखर सर करण्यासाठी मलाच साद घालून मला थकवितात. कुणी प्रयागाला संगमावर जातो तर कुणी जेजुरीच्या गडावर तर कुणी १०००० पायर्‍यांचा गिरनार सर करायला ! माझ्या लेकरांना कधी कळणार बरे माझी अटाटी, माझी कळकळ ? कधी तुटून पडणार ह्या तेल्याच्या भिंती !

श्रीसाईसच्चरितात साईनाथ स्वमुखे सांगतो ना दासगणूंना प्रयाग तीर्थी पर्व विशेषी जाण्याची अनुमती मागायला साईनाथांकडेच ते गेले असतां , काय वाटले असेल माझ्या साईबाबांना ? साईबाबा वदलेच ना शेवटी
नलगे तदर्थ जाणें दूर । हेंचि आपुलें प्रयागतीर। विश्वास धर दृढ मनीं ।।
आणि आपण पहातो पुढे दासगणुंनी बाबांच्या चरणी मस्तक ठेवितां उभय अंगुष्ठांमधून उदक निथळले होते , ते होते अखंड , सदैव प्रवाहीत असणारे गंगायमुनोदक ! पण मला ते दिसत नाही ? कारण माझा तसा "त्या" च्या चरणी अनन्य भाव, शरणागतीचा भाव नसतो. मला माझ्या भक्तीचे देव्हारे माजवायलाच आवडतात का ? थांबव रे देवा , हे सदगुरुराया मी वर्षभर "एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा " असा जयघोष बेंबीच्या देठापासून ओरडून केला होतो तो व्यर्थच होता का रे ?
नको मला अशी दांभिक भक्ती , आज कळते ती श्रेष्ठ महान साईभक्ताची , आद्य पिप्पलिका पांथस्थ असणार्‍या पिपाची पिपासा , आर्तता - कधी उतरणार माझ्याही मनी ?
पूजा भस्म माळा अंतरंगी काम चाळा  
ऐसा मिळेना सावळा फुका कष्टवितां गळां
 
आज खर्‍या अर्थाने तुझ्याच कृपेने कळले "कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयांत उपाशी " रूद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा --- मी पण असाच बाह्य साधनांत भुललो, बाह्य स्थानां मध्ये "तुला " शोधीत फिरलो अन "तु" मात्र माझ्याच दारी , माझ्याच आनंदघरात , माझ्याच मन मंदिरात अखंड निवास करून वसला आहेस , हेच मी सोईस्कर रीत्या विसरून गेलो होतो. विश्वावरचे तुझे पाऊल तर सतत चालतच राहते माझ्यासाठी , माझ्या सुखासाठी अविरत चालत राहते, धावत राहते कशाची तमा न करीता अनिरूध्द गतीने , अष्टौप्रहर जागेच राहते , आम्ही जरी वासनेच्या कुशी घोरत पडलो तरी , आम्हाला जागे करण्यासाठी अविरत चालतच राहते... किती थकला असशील ना हे माझ्या लाडक्या साईनाथा, हे माझ्या स्वामी समर्थ आजोबा ! आता तरी माझे डोळे खर्‍या अर्थाने उघडू दे , तुझे पाय किती सुजले असतील , तुझे पाय किती दुखत असतील ह्याची कळ माझ्या मनी लागू दे अन आता तरी माझी बुध्दी जागी होऊ दे ,ज्या दिव्य चरणांचे सेवन करायचे , ज्यांचे  तीर्थ प्राशन करायचे त्या तुझ्या दिव्य चरणांना आमच्या अपराधांमुळे, आमच्या चुकांसाठी अशी सूज नको ना रे चढून देऊ.

भले तुझ्या शब्दांचे अर्थ जाणण्या आम्ही अज्ञानी असू , अगतिक असू पण आज तू दाविलेस , स्पष्ट म्हणा अस्पष्ट म्हणा सांगितलेस आता तरी आम्ही तुला सोडून अन्यत्र धाव नाही घेणार हे स्वत:लाच बजावू. 
श्रीवासुदेवानंदस्वामी विरचित करूणात्रिपदीतील बोलांनी  ( श्रीवासुदेवानंद सरस्वतींना आपल्या चुकीच्या वागण्यामुळे श्रीदत्तगुरुंना आपण दु:खी केले ह्याची जाणीव होऊन जे क्षमा प्रार्थिण्या अंतरीचे सूर उमटले होते )

 शांत हो श्रीगुरुदत्ता। मम चित्ता शमवी आता।।ध्रु।।

तू केवळ माता जनिता। सर्वथा तू हितकर्ता।।

 तू आप्तस्वजन भ्राता। सर्वथा तूचि त्राता।।

भयकर्ता तू भयहर्ता। दंडधर्ता तू परिपाता।
तुजवाचुनि न दुजी वार्ता। तू आर्ता आश्रयदाता ।।
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता...... ।।१।।

अपराधास्तव गुरुनाथा। जरि दंडा धरिसी यथार्था।।

 तरि आम्ही गाउनि गाथा। तव चरणीं नमवू माथा।।

तू तथापि दंडिसी देवा। कोणाचा मग करूं धावा?
 सोडविता दुसरा तेव्हां। कोण दत्ता आम्हां त्राता?
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता...... ।।२।।

तू नटसा होउनि कोपी। दंडिताहि आम्ही पापी।

पुनरपिही चुकत तथापि। आम्हांवरी न च संतापी।।

गच्छतः स्खलनं क्वापि। असें मानुनि नच होऊ कोपी।
निजकृपा लेशा ओपी। आम्हांवरि तू भगवंता।।
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता...... ।।३।।

तव पदरीं असता ताता। आडमार्गीं पाऊल पडतां।

सांभाळुनि मार्गावरता। आणिता न दुसरा त्राता।

निजबिरुदा आणुनि चित्ता। तू पतितपावन दत्ता।
वळे आतां आम्हांवरता। करुणाघन तू गुरुनाथा।।
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता...... ।।४।।

सहकुटुंब सहपरिवार। दास आम्ही हें घरदार।

तव पदी अर्पू असार। संसाराहित हा भार।

परिहरिसी करुणासिंधो। तू दीनानाथ सुबन्‍धो।
आम्हां अघ लेश न बाधो। वासुदे-प्रार्थित दत्ता।।
शांत हो ।
शांत हो श्रीगुरुदत्ता। मम चित्ता शमवी आता।।५।। 

2 comments:


  1. स्वामी आजोबांच्या विविध लीला आणि भक्ताने कसे वागावे हे बाळाप्पाच्या कथांमधून छान सांगितले । अम्बज्ञ सुनीतावीरा ।keep writing .

    ReplyDelete
  2. HARI om khup sunder blog .beautiful naration of 2 ardent devotees of swami I.e. cholappa n balappa.
    Ambadnya sunitaveera

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog