Wednesday 8 March 2017

आई नमोऽ स्तुते , नमोऽ स्तुते , नमोऽ स्तुते ! जागतिक महिला दिनानिमीत्त जगदंबेला नमोऽ स्तुते !

जागतिक महिला दिनानिमीत्त आद्यस्त्री महन्मयी आदिमातेला ,  जगदंबेला नमोऽ स्तुते ! 


आई नमोऽ स्तुते , नमोऽ स्तुते , नमोऽ स्तुते
जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽ स्तुते ! 

आदिमाता महिषासुरमर्दिनीचा गजर जोरात रंगला होता आणी तिच्या सर्व लेकी आपल्या आईच्या , आद्य स्त्रीच्या, आद्यमातेच्या स्मरणात रंगून , बेभानपणे तिच्या नामघोषाच्या जल्लोषात तल्लीन झाल्या होत्या.

खरेच आज  ८ मार्च - जागतिक महिला दिवस !
ह्या दिवशी सर्वात पहिली आठवण येते ती आमच्या मोठ्ठ्या आईची !
असे गोंधळलात काय राव ? आमची मोठ्ठी आई म्हणजेच आपल्या सार्‍यांचीच पूज्यनीय, वंदनीय मूलभूत स्त्रोत असलेली आदिमाता महिषासुरमदिनी - कोणी तिला जगदंबा म्हणते, तर कोणी दुर्गा तर कोणी भवानी तर कोणी गायत्री तर कोणी अनसूया ! कोणत्याही नावांनी हाक मारा, साद घाला असते ती मूळ एकच ! आदिमाता - निरंतर प्रेमाचा पान्हा पाजणारी , अविरत प्रेमाचाच वर्षाव करणारी , लाभेवीण प्रेमाचा वात्सल्यतेचा पदर असणारी, अकारण कारूण्याने ओतप्रोत भरभरून वाहणारी , अचिंत्यदानी गुरुमाऊली, क्षमेचा चिरंतन घनु बरसवणारी ... कारण जी आपल्या बालकाच्या , एकमेवाद्वितीय पुत्राच्या जन्माच्या वेळेस उच्चारते ते आद्यवाक्यच , पहिले मातृवाक्यच किती नितांत प्रेम वर्षविते बघा -
माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते !
हेच असते"त्या"महन्मयी , मांगल्याचे  मांगल्या, पावित्र्याचे पावित्र्य असणार्‍या आदिमातेला आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी , मनाच्या गाभार्‍यात वसविण्यासाठी केलेले आमंत्रण ! हे वाक्यच दाविते किती , किती म्हणून प्रेम आहे तिचे आपल्या लेकरांवर!

संत तुलसीदास विरचिते सुंदरकांडात साक्षात हनुमंत सीतामाईला सांगतात "तुम ते प्रेमु रामु के दुना"
म्हणजे जो कोणी जीव त्याच्या परमेश्वरावर , आदिमातेच्या पुत्रावर , त्रिविक्रमावर एक पट जरी प्रेम करतो त्याच्यावर हा आदिमातेचा पुत्र परमात्मा तो जीव करत असलेल्या प्रेमाच्या दुप्पटीने प्रेम करतच असतो , कारण तो आदिमातेचा पुत्र आहे.
मग असा विचार माझ्या मनाशी सहज आला कि अशा ह्या सदगुरुची माता, किती बरे अजून कैक पटींनी प्रेम करणारी असेल म्हणजेच ही परमात्म्याची माता ,
आदिमाता तर आपल्या लेकरांवर अनंत पटींनी प्रेम करणारच ना !

येथेही सुंदरकांडच आपल्या मदतीला येते. जर हा परमात्मा, हा सदगुरु, हा आदिमातेचा पुत्र एवढे माणसावर प्रेम करतो दुप्पटीने , मग "त्या"च्या कडे हा गुण कोठून आला तर "त्या"च्या आदिमातेकडून - म्हणजेच ह्या आदिमातेकडे तर प्रेमाचा अफाट स्त्रोत नक्कीच असणार .

सुंदरकांडात साक्षात महाप्राण हनुमंत रावणाला परमात्म्याच्या नावाचा , त्याच्या प्रेमाचा महिमा वर्णन करून सांगतात -
राम बिमुख संपति प्रभुताई। जाइ रही पाई बिनु पाई॥
सजल मूल जिन्ह सरितन्ह नाहीं। बरषि गएँ पुनि तबहिं सुखाहीं ॥ 
                                                                       (सुंदरकांड - श्लोक १३४ ) 
   
श्रीरामांना (परमात्म्याला म्हणजेच आदिमातेच्या पुत्राला ) विमुख झाल्याने मानवाच्या जीवनातील संपत्ती व ऐश्वर्य निघून रहाते , ते मिळूनही न मिळाल्यासारखेच आहे. ज्या नद्यांचे पात्र पाण्याने भरलेले नसते म्हणाजे ज्या नद्यांचे पात्र स्तोत्ररहित असते, त्या पावसाळा संपल्यावर परत कोरड्या पडतात. याचाच अर्थ गंगेसारख्या बारमाही पाण्याच्या नद्या ह्या त्यांचे मूळ सजल असल्याने पावसाळा संपल्यावरही त्या सुकत नाहीत . पावसाळा हे मूळ जलाचे स्त्रोत संपल्यावरही त्या १२ महीने पाण्याने भरलेल्या असतात. अशा प्रकारे आदिमातेच्या पुत्राचे परमात्म्याचे  नाव हेच माणसाच्या जीवन नदीचे मूळ आहे, जो आदिमातेच्या पुत्राचे सदगुरुचे म्हणा वा परमात्म्याचे नाव घेत रहातो त्याचे जीवन कधीच सुकत नाही. ज्या नद्यांचे मूळ सजल नसते त्या पावसाळा संपल्यावर सुकून जातात, तसेच परमेश्वराच्या नामाचा प्रेम पुरवठा ज्या माणसाच्या आयुष्यात नाही त्या माणसाचे जीवन म्हणजे "असजल मूळ " नद्यांसारखी होते म्हणजेच त्या माणसाचे जीवन प्रेमहीन होते, त्यातील चैतन्य निघून जाते, रसरशीतपणा निघून जातो.
मग हा परमात्मा आदिमातेच्या पुत्राचे मूळ असलेली आदिमाता ही साक्षात प्रेम , प्रेम आणि बस्स प्रेमच असणार ना ? म्हणजेच ही परमात्म्याची माता ,आदिमाता तर आपल्या लेकरांवर अनंत पटींनी प्रेम करणारच ना ! मग अशा प्रेमळा आदिमातेवर आपण तिच्या लेकरांनी सुध्दा प्रेमच करायाला पाहिजे ना , आपल्याला जमेल , आपल्याला झेपेल तेवढे तरी . जसे बाळाचे त्याच्या आईवरती प्रेम असते तसेच .
आता आपण लहान मुलाच्या जीवनात त्याच्या आईचे असलेले अनन्य महत्त्व आणी तिचे प्रेम बघू या . 
आपण अगदी लहान असताना सतत आईच्या मागे मागे तिचा पदर धरून फिरत असतो ना , लहान बाळाला जशी त्याची आई दिसली नाही की जरा सुध्दा चैन पडत नाही , ते लगेच मोठ्याने भोकाड पसरते, सगळे घर डोक्यावर घेते , रडून रडून नुसता जीवाचा आकांत करते , पण आई दिसता क्षणी त्याचे हसू उमलते. त्याचे रडे आपोआप थांबते.
तसेच आपल्याला आपल्यावर स्वत:पेक्षाही अधिक प्रेम करणार्‍या आदिमातेवर असेच प्रेम करता आले पाहिजे, तिचा विरह आपल्याला जाणवायला पाहिजे आणि असह्यही व्हायला पाहिजे आणी मग विरह झाला की आपोआप आपण प्रेमाने तिला शोधणार, तिला हाक मारणार ? मग प्रश्न पडतो ह्या परांबेला, ह्या जगदंबेला साद तरी कशी घालायची तर अगदी सोपे आहे तिच्याच पुत्राने भगवान परशुरामाने आपल्याला उत्तर दिले आहे कि
जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या धकाधुकीच्या आयुष्यात , आपण दिवसभर कामात असताना, व्यवहारात असताना , आजूबाजूच्या इतर मानवांमध्ये असताना आपल्या ह्या लाडक्या आदिमातेची आठवण येते तेव्हा
ह्या जगज्जननीला साद घालून भेटायला बोलावणे सुध्दा किती सोप्पे ! आहे बघा - तिनेच तिच्याच कृपेने - दिलेले अचिंत्यदानी वरदानामुळे
आदिमाते तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ  आहे .  अशी तिला साद घालायची .
हे "त्या" आदिमातेचेच वचन आहे कि जो कोणी  प्रेमाने तिला असे आग्रहाने साद घालतो, प्रेमाने तिची आठवण करतो , तिला आपल्या जीवनात कळकळीने साद घालतो तेव्हा ती वत्सला आपल्या लेकरांच्या सादेला हाकून अनिरूध्द गतीने आपल्या जीवनात येतेच , येते , कारण हे "त्या " आदिमातेनेच सर्व श्रध्दावान जगताला दिलेले अभय वरदान आहे.  पण आपला विश्वासही असायला हवा तसा !
साक्षात भगवान परशुरामांनी मातृवात्सल्य  उपनिषद्  अर्थात् श्रीस्वस्तिक्षेमविद्या ह्या ग्रंथात आपल्याला तिच्या शब्दांची आणि वचनाची कथा सांगितली आहे आणि आदिमातेचे हे वचन आहे की - मी तुमच्यासाठीही अशीच धावत येईल ."
आपण पाहतो की मानवी माता जोवर आपल्या गर्भात बालकाला धारण करते ९ महीने , तोवरच्या गर्भधारणा काळात म्हणजे ९ महीने ते गर्भातील बालक ना स्वत: होऊन श्वास घेत , ना खात, ना पित ! ते बालक आपल्या मातेवर , आपल्या जन्मदात्रीवर संपूर्णत: अवलंबून असते. परंतु ९ महीन्यानंतर जेव्हा माता प्रसूतीनंतर अपत्याला जन्म देते त्या क्षणापासून त्या नवजात बालकाला आपला श्वास आपल्याला घ्यावा लागतोच ना !
माणसाने कितीही आपल्या अगदी लाडक्या लेकराचे दु:ख घ्यायचे ठरवले तरी तो कधीच घेऊ शकत नाही , किंवा अडीअडचणीला, संकटसमयी आपला श्वास द्यायचा म्हटला प्राण वाचवायला तर तो ही देऊ शकत नाही. एकतर कृत्रिम रीत्या ऑक्सीजन द्यावा लागतो , व्हेंटिलेटर मशिन लावावे लागते  पण ही आदिमाता किती वत्सला हृदया आहे बघा ! तिची लेकरे जेव्हा अगतिक होतात आजारांनी, जेव्हा शारिरीक किंवा मानसिक आजारांनी त्रस्त होतात , त्यांचे जीवन असह्य होते तेव्हा आदिमातेला प्रेमाने साद घालता आणि केवळ "श्रीश्वासम्" गुह्यसूक्तम् हा आपल्या पुत्राकरवी जगाच्या उध्दारासाठी सहज ,सुलभ असा मार्ग तिनेच हाती सोपावला. हे "श्रीश्वासम् " म्हणजे निरोगीकरणाची गुप्तकिल्लीच जणू काही !
अवधूत अंबे आंजनेया त्रिविक्रमा ला प्रेमाने आवर्जून आमंत्रण देऊन. त्यांची क्षमा प्रार्थून, त्यांची कृपा म्हणजेच आरोग्यदानाचा प्रसाद मागून आणि अरूला म्हणजेच आदिमातेची unmerited Grace , unmerited Love मागून , कृतज्ञ भाव व्यक्त करीत म्हणजेच अंबज्ञता दर्शवित केलेली प्रार्थना ! तदनंतर   
"आदिमाते तुझा श्वास माझ्या देही फिरतो आहे , मी तुजवरी प्रेम करीतो अन तूही मजवरती "  ही आर्ततेने केलेली आळवणी .
बस्स ! एवढेच फक्त कानाने ऐकायचे , सहज साधेपणाने , ना कुठलेही आसन घालायला नको ,ना कुठलाही मंत्र जप करायला नको , ना कुठलीही ध्यान-धारणा करायला !
असे वाटते म्हणावे - इतुके सोपे जीवन केले बसल्या जागी देव आले 
                              उठूनी बसण्या दमलो नाही हीच काय ती सेवा घडली
खरोखरीच एक आजीच एवढी आभाळमाया करू शकते ना कारण तिची नातवंडे असतात तिच्याकरिता  "दूधावरची साय" म्हणजेच तिच्या लेकापेक्षाही, लेकी पेक्षाही  अधिक प्रिय !   
ही आदिमाता एवढी कृपा बरसविते ना की पदोपदी प्रचिती येते "देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी रे"
मनुष्याच्या प्राणमय देहात सप्तचक्र असतात आणी दोन सुप्तचक्रे असतात . ह्या सप्तचक्रांचे संतुलन बिघडल्याने मानवाला नाना तर्‍हेच्या समस्या उद्भवतात, त्यामुळे हे सप्तचक्रांचे संतुलन अत्यंत आवश्यक असते मानवासाठी , त्यामुळे आपल्या सर्वात श्रेष्ठ "मानव" ह्या अपत्याच्या क्षेमकुशलासाठी ही सप्तचक्रनिवासिनी आदिमाताच कार्यरत होऊन सत्वरी धाव घेते व हाती सुपुर्द करते - श्रीशब्दध्यानयोग ! अत्यंत सोपा उपाय ! स्वस्तिवाक्य व प्रदक्षिणा मंत्र म्हणत केलेले अत्यंत सोप्पी योगाची पध्दत , इतक्या सहजतेने की  वाटावे अग  आदिमाते ! मी तर सतत चुका करून , वारंवार अपराध करून तुझ्यापासोन माझी नाळ तोडली होती, तुझ्याशी , माझ्या घराशी, माझ्या गावाशी, माझ्या शहराशी, माझ्या राज्याशी, माझ्या देशाशी असणारे नाते किती मोडकळीला आणले होते , परंतु हे आदिमाते तू किती सहजतेने तुझ्या ह्या श्रीशब्दध्यानयोगातून मला जोडून घेतले मला तुझ्या चरणांशी !
आदिमाते तू खूप खूप प्रेमळ आहे आणि माझ्या सदगुरुंच्या कृपेने मी तुझ्या चरणांशी अंबज्ञ आहे आणि सदैव , आजन्म अंबज्ञ राहो हीच तुझ्या चरणी प्रार्थना !
पुढे कोडे असते श्रध्दावानाला मी तरी तुझ्या कृपेने श्रध्दावान झालो , भक्तीच्या देवयान मार्गावर तू मला सदगुरुंच्या हाती सोपवून , त्रिविक्रमाच्या चरणी घालून , पण आदिमाते माझ्या वंशात माझी मुले , माझी अपत्ये , माझी नातवंडे माझी पुढची पिढी ह्याच भक्तीच्या वाटेवर चालेल का ? असे साहजिकच कोणालही वाटेलच ना? जशी आपण आपल्या वारसांसाठी वारसाहक्काने मालमत्ता देतो तशीच ही भक्तीची अत्युच्च देणगी !

आपण श्रीगुरुचरित्राच्या १४व्या अध्यायात वाचतो की सांयदेव श्रीगुरुदत्तात्रेयांना आळवतात की -
" माझे वंशपारंपरी । भक्ति द्यावी निर्धारी  । इह सौख्य पुत्रपौत्री । उपरी द्यावी सदगती ।।"
तेथे एकट्या सायंदेवाला श्रीगुरुंनी वरदान दिले , परंतु येथे त्या आदिमातेच्या कृपेने , तिच्या पुत्राच्या त्रिविक्रमाच्या कृपेने भक्तिचे अमाप वरदान समस्त मानवजातीलाच प्राप्त झाले ते शिवगंगागौरी मातेने तपश्चर्येचे फलस्वरूप दिलेल्या , "ब्रम्हास्त्रविद्या अंतर्भूत असलेल्या गदास्तोत्रातून !
असे हे कधीही न संपणारे आदिमातेचे अमूल्य , अतुलनीय भांडार !

श्रीसाईसच्चरितातील साईबाबांचे उद्गारच जणू ह्याची प्रचिती देतात -
कोणाचें देणें कोणास पुरतें ।  कितीही द्यावें सदा अपुरतें । 
माझें सरकार जैं देऊं सरतें । न सरतें तें कल्पातीं ।।
देणें एक माझ्या सरकारचें । तयासी तुळें काय तैं इतरांचें  । 

अर्यादास मर्यादेचें । भूषण कैंचे असावें ।।
माझें सरकार न्या न्या वदे । मजलाच जो तो म्हणे दे दे । 

कोणी न माझ्या बोलासी लक्ष दे ।  एकही सुधें ऐकेना ।।
उतून चालला आहे खजिना । एकही कोणी गाड्या आणीना । 

खणा म्हणतां कोणीही खणीना ।  प्रयत्न कोणा करवेना ।।
मी म्हणें तो पैका खणावा । गाड्यावारीं लुटून न्यावा । 

खरा माईचा पूत असावा । तेणेंच भरावा भांडार ।।
                                                                              - ( श्रीसाईसच्चचरित , अध्याय ३२ )
आदिमातेचा पुत्र त्रिविक्रम हा आपला सदगुरु रूपाने आपल्यात येतो वावरतो, आपल्याशी हसतो , बोलतो, चालतो , आपल्यातील एक बनून राहतो का कधी राम बनून येतो, कधी कृष्ण बनून , कधी साई बनून तर कधी योध्दा रूपाने परशुराम बनून ! "त्या"ची अनिरूध्द गती आम्हाला तारून नेते भवसागरातून अगदी कोरड्या चरणांनी असे संतमहंत उच्चरवाने गर्जून सांगतात , गरज असते आम्हाला "त्या " आदिमातेला शरण जाण्याची !  तिचे चरण पूजिण्याची आणि तिला तिच्या पुत्रासह आपल्या जीवनात आमंत्रित करायची , तिला आपल्या हृदयसिंहासनावर तिच्या पुत्रासह विराजमान व्हायला प्रार्थिण्याची !
हे आदिमाते , आम्ही तुझी लेकरे तुला अंत:करणापासून साद घालतो तू तुझ्या त्रिविक्रम , सदगुरु पुत्रासह ये, तुझ्या साईसह  (साक्षात ईश्वर ) आमच्या जीवनी ये आणि निवास कर !
ओ जय महाल्क्ष्मी माँ , वत्सल हृदया माँ , जातवेद संग ले आवो तुम अनपगामिनी  माँ
जातवेद हे आदिमातेच्या त्रिविक्रम पुत्राचेच एक नाव आहे -जातवेद म्हणजे सर्वसाक्षी - जो सर्व काही जाणतो , ज्याला काही माहीत नाही असे काही ज्या जगात नसतेच मुळी ! सर्वदर्शी, सर्वज्ञ !
म्हणूनच आपल्याला  ज्ञानोबामाऊलीसुध्दा हेच शिकवितात सदगुरुंना बसायला आसन कुठचे द्यायचे तर हृदयसिंहासन - (कारण ज्ञानियांचा राजा संत ज्ञानेश्वर हे जाणतात की सदगुरु आला की त्याच्यासह त्याची माता - आपली आदिमाता ही येणारच )
आता हृदय हेआपुले। चौफाळूनिया भले। वरी बैसवू पाऊले। श्रीगुरुंची।
चला तर आदिमातेला साद घालू या-


                                            "आदिमाते तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ  आहे . "
 
 आमंत्रण करू या , सर्वोच्च आमंत्रण करू या , तिच्याच सर्वोच्च मंत्राने -
" माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते. "
हाच मानवासाठी प्रारब्ध बदलण्याचा सर्वोच्च उपाय आहे !

संदर्भ -
१.  मातृवात्सल्य  उपनिषद्  अर्थात् श्रीस्वस्तिक्षेमविद्या 
२.  श्रीसाईसच्चचरित
३.  श्रीगुरुचरित्र
४.  सुंदरकांड
  
   

2 comments:

  1. जो आदिमातेच्या पुत्राचे सदगुरुचे म्हणा वा परमात्म्याचे नाव घेत रहातो त्याचे जीवन कधीच सुकत नाही. खरंच सदगुरु नामाविण नाही मार्ग दुजा ...
    आपण त्या मोठ्या आईच्या नाती आहोत ..
    म्हणूनंच निर्भय आणि सक्षम आहोत.
    उत्कृष्ट लेखन आणि परिपूर्ण असा लेख..
    सुरेख मांडणी ....

    ReplyDelete
  2. Very nice article . Ambadnya shriram. Adimata is adimata for us only of our sadguru n his unmediated grace.else it would have a different story altogether.Ambadnya sadguru shri aniruddha.we have no existence without you.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog