Monday 26 February 2018

वीरांगना मेजर कुमुद डोग्राला सलाम ...... दिव्यत्त्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती !!!

दैनिक प्रत्यक्षच्या १६ फेब्रुवारीच्या अंकात एक बातमी वाचताना काळजात कालवाकालव झाली होती की आसाममध्ये ब्रम्हपुत्रा नदीत असलेल्या माजुली बेटावर भारतीय वायूदलाचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत  जोरहाट येथील १० विंग एअर फोर्सचे विंग् कमांडर जय पॉल जेम्स आणि विंग कमांडर डी वॅट्स ह्या दोन वैमानिकांचा मृत्यु ओढावला. आसाम मध्ये ह्याच माजुली बेटावर लोक मनोरंजनासाठी , पर्यटनासाठी जातात आणि अशाच जागी ह्या दोन्ही वैमानिकांचा मृत्यु ओढावावा ही किती दु:खद घटना आहे. त्या घटनेचे मनातून विचार सरत नाही तोवर ट्विटर ह्या सोशल मिडीयावर जे चित्र दिसले ते पाहून तर काळजाचे पाणी पाणी झाले. 
                                                                      

विंग कमांडर दुष्यंत वॅट्स ह्यांच्या वीरपत्नी मेजर कुमुद डोग्रा ह्या आपल्या शहीद पतीच्या अंतिम संस्कारासाठी ५ दिवसाच्या तान्ह्या मुलीला घेऊन भारतीय सैनिकी गणवेशात हजर झाल्या , तेव्हा प्रत्येकाचे हात ह्या वीरांगनेला सलामी देण्यासाठी उंचावले गेले. पित्याच्या मृत्युची बातमी आली तेव्हा विंग कमांडर डी वॅट्स ह्यांची नवजात कन्या अवघी चार दिवसांची होती. एरव्ही बाळ झाले म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या त्या बाळाची व बाळंतिणीची  म्हणजेच त्या तान्ह्या बाळाच्या आईची किती किती काळजी  घेतली जाते , किती कौतुक केले जाते. बाळाच्या आईला आरामाची गरज असते. पण येथे नियतीने क्रूर डाव खेळला होता परंतु ह्या भारतमातेच्या शूर वीरांगनेने ना नियतीपुढे हात टेकले ना काळापुढे मान झुकविली. आपल्या लहानग्या मुलाला पाठीशी बांधून इंग्रजाच्या सैन्याला आपल्या तलवारीने पाणी पाजून,नामोहरम करणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई शिंदे ह्यांचाच जणू पाऊलावर पाऊल ठेवले होते मेजतर कुमुद डोग्रांनी ! अशा वीरांगनेला प्रसवून भारतमातेची कूस आज नक्की धन्यता मानीत असेल नाही?  

कोणत्याही पत्नीला आप ल्या पतीच्या निधनाची बातमी कळल्यावर आभाळच फाटते जणू, किती मोठा आघात असतो हा, किती मोठा दु:खाचा डोंगरच कोसळला असतो ...पण अशाही प्रसंगी जेव्हा एखादी वीरांगना आपल्या पतीला मानवंदना देण्यासाठी असे असामान्य धैर्य एकवटते आणि गाठते तेव्हा अर्थातच धैर्याची परिसीमाच ओलांडली असते तिने... अशा प्रसंगाला शब्दांत काय वर्णन तरी करणार ?

कवी बा,भ, बोरकर ह्यांच्या कवितेच्या ओळी स्मरतात आणि मानवंदनेसाठी हात नकळतच जोडले जातात हेच तर खरे दिव्यत्व !

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येऊनिया जाती
जग ज्यांची न करी गणती ॥१॥

यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाहि पणती ॥२॥

जिथे विपत्ती जाळी उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती ॥३॥

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवर्‍या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांगी डोळे भरती ॥४॥


आदिमाता महिषासुरमर्दिनी आपल्या दुर्गा स्वरूपाने ह्या वीरांगनेला जणू जीवनाची लढाई खेळण्याची असीम प्रेरणा, शौर्याची देणगी १८ हातांनी बहाल करती झाली आहे जणू !

तिच्या मनोधैर्याला खरोखर मन:पूर्वक अनंतवार मानाची सलामी !!!
अशा वीरांगना जिच्या उदरी जन्म घेतात त्या भारतभूमीचा जयजयकार आसमंतात दुमदुमणारच हे निर्विवाद सत्य!
जय हिंद ! जय भारत !

1 comment:

  1. Definitely .I totally agree with the opinion of blog writer that India s name n fame will remain forever in the universe bcoz such courageous ladies are daughters of bharatmata.
    A tight salute to her valour n courage.

    Trivikram takes incarnation in kaliyug n takes India to that level we could not hv ever imagined in our life.
    We are fortunate indeed lord aniruddha trivikram

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog