Wednesday 15 July 2015

१५ जुलै - श्रीसाईसच्चरितकार हेमाडपंताचे पुण्यस्मरण !!!


आज १५ जुलै ! ८६ वर्षांपूर्वी १५ जुलै १९२९ साली हेमाडपंतांनी श्रीसाईबाबांच्या  चरणी  आपला देह समर्पित केला . आज ज्यांच्यामुळे परमार्थाची वाट गवसली, माझ्या जीवनाला सदगुरुंचा परीस स्पर्श लाधला त्या माझ्या अत्यंत लाडक्या हेमाडपंताची म्हणजेच श्रीसाईसच्चरितकार श्री.गोविंद रघुनाथ दाभोलकर उर्फ अण्णासाहेब ह्यांची पुण्यतिथी. त्यानिमित हेमाडपंताचे  पुण्यस्मरण करू या, 
हेमाडपंताच्याच शब्दांत मांडायचे तर - 
ज्यांचेनि पावलों परमार्थातें । तेचि कीं खरे आप्त भ्राते । सोयरे नाहींत तयांपरतें । ऐसें निजचित्तें मानीं मी ।।
हेमाडपंतानी "श्रीसाईसच्चरित" हा एक अत्यंत महान , प्रासादिक अपौरूषेय ग्रंथ लिहून केवळ साईभक्तांवरच नव्हे तर समस्त मानवजातीवर अनंत उपकार केले आहेत. 
होऊनियां प्रत्यक्ष दर्शन । निवाले नाहींत ज्यांचे नयन । तयांसी बाबांचे माहात्म्यश्रवण । पुण्यपावन घडावें ।।

साईबाबा शिरडीचे हे जनमानसांतील अत्यंत प्रिय , लाडके असे दैवत. नवल वाटले असेल ना? हे असे उलटे का लिहीले साईबाबा शिरडीचे , होय माझ्या हेमाडपंतानीच मला , आम्हांला हा दृष्टीकोन दिला. सदगुरु हा स्थानामुळे ओळखला जातो हे चूक कारण त्या स्थानाला माहात्म्य प्राप्त होते ते फक्त आणि फक्त सदगुरूंच्या चरणधूळीमुळेच. म्हणून शिरडीचे साईबाबा नाही तर साईबाबाची शिरडी म्हणायला हवे.
शिरडी जाहलें पुण्यक्षेत्र । बाबांचेनि ते अति पवित्र ।  यात्रा वाहे अहोरात्र ।  येती सत्पात्र पुण्यार्थी ।।

"श्रीसाईसच्चरित" ह्या ग्रंथात साईबाबांच्या जीवनकालात त्यांनी आपल्या भक्तांना संसारात राहून परमार्थ कसा साधायचा ह्याची अत्यंत लाखमोलाची शिकवण कशी दिली होती, त्यांच्या भक्तांनी आपल्या ह्या लाडक्या सद्गुरुंचे प्रत्येक बोल कसे जीवापाड जपले आणि त्यांचा शब्द ही आज्ञा म्हणून कशी शिरोधार्य मानली आणि मग प्राणांची पर्वा न करता साईंचा शब्द पाळणार्‍या भक्ताचे साईबाबा कसे कोटकल्याण करत ह्यांच्या खूप सुंदर कथा येथे वाचायला मिळतात. त्यामुळॆ "श्रीसाईसच्चरित" हे केवळ साईनाथांचे चरित्र नसून त्यांच्या भक्तांचे आचरीत आहे हे हेमाडपंत आपल्याला पटवितात 

हेमाडपंत आपल्या ओघवत्या आणि रसाळ भाषाशैलीतून भक्तांनी आपल्या सदगुरुशी आपले नाते कसे दृढ करायचे , आपली नाळ कशी अखंड साधायची ह्याचे अत्यंत हृदयंगम चित्र आपल्या डोळयांसमोर एवढे जिवंतपणे रेखाटतात की प्रत्येक कथा ही केवळ कथा राहत नाही, तर साक्षात आपल्या जीवनात आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष घडते ह्याची खरोखरीची प्रचिती आपण वाचताना घेतो. जणू काही त्या कथेतील आपणही एक भाग बनून जातो आणि सहजच बाबांच्या सवे बाबांच्या शिरडीत जाऊन पोहचतो. 
साई संकल्प विद्योती । उजळली हि चारित्र्य ज्योती । मार्गदर्शक होवो तद्दीप्ती । मार्ग भावार्थी उमगोत ।।
                   
श्रीसाईसचरित हा अपौरूषेय ग्रंथ म्हणून गणला जातो? 
अपौरूषेय ग्रंथ म्हणजे परमेश्वरी आविष्कारामुळे जे ज्ञान आपोआपच प्राप्त होते , ते अपौरूषेय ज्ञान व त्यातून निर्माण झालेले ग्रंथ होय. 
साईसच्चरित्र ग्रंथ लिहीताना हेमाडपंताचे मन त्यांचे राहिलेच नव्हते, तर साईनाथांच्या प्रेरणेने हेमाडपंताच्या मनाचा ताबा घेतला होता, जशी सूर्याच्या किरणांनी रात्रीचा एका क्षणात दिवस होतो, अगदी त्याचप्रमाणे साईप्रेरणेने पूर्णपणे हेमाडपंतात संचार करून हे ग्रंथलिखाण झाले आहे असे पदोपदी जाणवते. 

ग्रंथात अगदी सुरुवातीच्या अध्यायातच हेमाडपंत आपली स्वतःचीच कथा अत्यंत प्रांजळपणे मांडत आहेत .ते जरी स्वतःला नाठाळ, टवाळ अशी दूषणे देत असले तरी हा त्यांचा सद्गुरू साईनाथांच्या पायांशी असलेला अनन्यशारण्यभाव आहे. हेमाडपंत रोजची स्नान-संध्या आटपल्यावर श्रीगुरुचरित्र वाचत, श्रीविष्णुसहस्त्रनामाचे पठण करीत, एकनाथी भागवत व रामाय़ण वाचीत, उपनिषदे व श्रीमदभगवद्गीता आदी ग्रंथाचा अभ्यास करीत हा त्यांचा रोजचा परिपाठ होता. तसेच ज्ञानेश्वरी ,पुराणे आदि अध्यात्मिक ग्रंथांचा त्यंचा गाढ अभ्यास होता भागवत तर मुखोद्गत होते . तरी देखील साईंच्या चरणी ते नतमस्तक होत वारंवार ! म्हनूनच ते  लिहितात “तैसेच आम्ही दिसाया थोर । परी त्या सिद्ध साई समोर । खरेच आम्ही पोरांहूनी पोर ।   
अगदी माणसाला भक्तीच्या प्रथम पायरीवर जाऊन अलगद त्याच्या  हाताला धरून अत्यंत प्रेमाने हा सद्गुरू आपला भक्तीमार्गातील प्रवास कसा करून घेतो व आपले जीवन हाच एक अत्यंत सुंदर असा प्रेममयी प्रवास कसा करवून देतो याचे मार्गदर्शन हेमाडपंत करतात स्वानुभवातून. 

हेमाडपंत सुरुवातीला "उध्दरेत आत्मना आत्मा" ह्या वचनाच्या आधारे माणसाने स्वत:च स्वत:चा उध्दार करावा व सदगुरुची काय आवश्यकता ह्या मताचे होते. त्यांचे जीवलग मित्र नानासाहेब चांदोरकर आणि काकासाहेब दीक्षित ह्यांनी त्यांना साईनाथांच्या भेटीला , दर्शनाला शिरडीला जाण्याचे सांगूनही प्रथम ते काही कारणास्तव जात नाही, पण ही आपली चूक ही ते मोठ्या उघडपणे आपल्या मित्राकडे कबूल करतात, पण जेव्हा ते शिरडीला जाऊन अगदी पहिली धूळभेट घेतात , तेव्हा जे साईंचे होऊन जातात त्यानंतर मात्र ते माघारी वळत नाही. साईदर्शनाने मी कसा पालटलो सबाह्याभ्यंतर हे सांगताना ते म्हणतात -
साई दर्शन लाभ घडला । माझिया मनीचा विकल्प झडला । वरी साई समागम घडला । परम प्रगटला आनंद ।।
साई दर्शनाची हीच नवाई । वृत्तीसी पालट होई । पूर्व कर्माची मावळे सई । वीट विषयी हळूहळू ।। 
माझ्या साईनाथांनी, माझ्या साईबाबांनी माझ्यावर अनुग्रह केला आणि मला आपल्या पदरी घेतले तेव्हापासून "मी त्यांचाच झालो आणि ते माझीच झाले" ह्याचे खूप हृदयस्पर्शी वर्णन हेमाडपंत अगदी बाबांच्या प्रेमाने ओथंबून जाऊन करतात -
साईंनी मज कृपा करून ।  अनुग्रहिंले जैंपासून ।  तयांचेचि मज अहर्निश चिंतन ।  भवभयंकृतन तेणेनि ।।  
नाहीं मज दुसरा जप ।  नाहीं मज दुसरें तप ।  अवलोकीं एक सगुणरूप ।  शुध्दस्वरूप साईंचें ।।  
पाहतां श्रीसाईंचे मुख ।  हरून जातसे तहानभूक ।  काय तयापुढें इअतर सुख ।  पडे भवदु:खविस्मृती ।। 
पाहतां बाबांचें नयनांकडें ।  आपआपणां विसर पडें ।  आंतूनि येतीं जैं प्रेमाचे उभडें ।  वृत्ती बुडे रसरंगी ।।
कर्मधर्म शास्त्रपुराण ।  योगयाग अनुष्ठान ।  तीर्थयात्रा तपाचरण ।  मज एक चरण साईंचे ।।  
काय जबरदस्त , अफाट प्रेम आहे ना , आणि असा भक्तच छातीठोकपणे सदगुरु हाच परमात्मा आहे ,माझा भगवंत आहे ह्याची ग्वाही निर्भयपणे देऊ शकतो आणि तो देतोच -
कोणी म्हणोत भगवद्भक्त ।  कोणी म्हणोत महाभागवत ।  परी आम्हांसी ते साक्षात भगवंत ।  मूर्तीमंत वाटले ।। 
आणि असा सदगुरुंच्या प्रेमाने भारावलेला भक्तच सांगू शकतो - रामकृष्णसाई तिघांमाजी अंतर नाही ।  

सद्गुरुंना आपण भेटायला जात नाही तर त्यांच्याच अकारण कारूण्याने ते स्वत:च आपल्याला चिडीच्या पायाला दोर लावून खेचावे त्याप्रमाणे आपल्याकडे खेचतात. हेच सत्य हेमाडपंताना जाणवते आणि ते आपल्या समोर मांडतातही तेवढ्याच निर्भीडपणे -
न जाणू कवण्या जन्मांतरी । कवण्या प्रसंगी कवण्या अवसरी । केले म्यां तप कैशियापरी । घेतले पदरी साईने । 
हे काय म्हणावे तपाचे फळ । तरी मी तो जन्माचा खळ । साईच स्वये दीनवत्सल । कृपा ही निश्चल तयाची ।। 
पुढे साईंच्या कृपाशिर्वादाने त्यांना साईनाथांचे चरित्र लिहीण्याची परवानगी मिळते आणि त्याबद्दलची आपली कृतज्ञता ते सातत्याने व्यक्त करतात. हेमाडपंत अगदी प्रत्येक क्षणाला आपल्याला ह्याची सतत जाणीव करून देतात त्यांच्या ओव्यांमधून -
माझी करोनियां लेखणी । बाबाचि गिरवतील माझा पाणी । मी तों केवल निमीत्ताला धणी । अक्षरें वळणी वळवितो ।।
उचलली जेव्हां हाती लेखण ।  बाबांनी हरिले माझें मीपण ।  लिहिती आपुली कथा आपण ।  ज्याचें भूषण त्याजला ।। 
कैसा वाजेल पावा कीं पेटी । चिंता नाहीं उभयां पोटीं ।  ही तों वाजवित्या आटाटी ।  आपण कष्टीं कां व्हावें ।।  
साई संकल्प विद्योती । उजळली हि चारित्र्य ज्योती । मार्गदर्शक होवो तद्दीप्ती । मार्ग भावार्थी उमगोत ।।

श्रीसाईसच्चरितातील प्रत्येक शब्द, प्रत्येक ओवी आणि प्रत्येक पान , प्रत्येक अध्याय हा असाच सदगुरुंच्या प्रेमाने दुथडी भरभरून वाहतो आणि मग आपणही नकळत "काय गोड गुरुची शाळा । तुटला जनक-जननींच लळा । " ह्याचा अनुभव घेण्या आसुसतो आणि मग "तो" साईनाथ आपल्याला "त्या"च्या शाळेत प्रवेश देतोच देतो आणि मग आपणही गाऊ लागतो 
लागता ह्या शाळेस पाय । कोण हतभागी माघारा जाय । माझें घरदार बाप-माय । सर्वचि गुरुराय जाहले ।।
हेमाडपंताच्या स्वप्नात बाबांनी त्यांना १९१७ साली सांगितले - " आज होळी पौर्णिमेला मी तुझ्या घरी दुपारी १२ वाजता भोजनाला येतो" आणि साईनाथ देहधारी असतानाच एकमेवाद्वितीय अशी साईंची मूर्ती हेमाडपंताच्या घरी साईनाथांच्या अद्भुत लीलेने प्रकटली, 

ज्याची साक्ष हेमाडपंताचे "साई-निवास" ही साईस्पर्शाने पावन, पुनीत झालेली वास्तु म्हणजेच त्यांचे राहते घर आजही देत आहे. मुंबईमधील बांद्रा येथे सेंट मार्टिन रोड वरील "साईनिवास" आजही आपल्याला ह्या घटनेची साक्ष देते. 


हेमाडपंताच्या सदगुरु साईनाथांवरील प्रेमाला आणि "त्यांच्या साईंच्या" त्यांच्यावरील अमाप प्रेमाला म्या पामर शब्दाने काय मापणार? 
ह्या प्रेमपान्ह्याचे आकंठ रसपान करीत सदगुरुंच्या चरणी आपणही "अवघे त्याचे " होऊन सदैव राहायचे, त्याच्याच चरणधूळीत लोळण्याचे अहोभाग्य पदरी बांधायचे . कमीत कमी "श्रीसाईसच्चरित " सातत्याने वाचत राहायचे , एवढे तर आपण नक्कीच करू शकतो. 

अशा ह्या हेमाडपंतानी स्वत:चे अवघे आयुष्य़ साईंच्या चरणीं समर्पित केले होते , ते काया-वाचा-मनाने फक्त आणि फक्त त्यांच्या सदगुरु साईनाथांचेच झाले होते आणि म्हणूनच त्यांनी मागणेही फक्त हेच मागितले - 
मी तों केवळ पायांचा दास । नका करूं मजला उदास । जोंवरी या देही श्वास । निजकार्यासी साधूनि घ्या ।।
आणि आपल्या लाडक्या लेकराची एकमेव इच्छा "तो" कृपासिंधु साई- साक्षात ईश्वर पुरविणार नाही का? होय साईनाथांनी हेमाडपंताची ही इच्छा पुरविली आणि म्हणूनच "श्रीसाईसच्चरित " ह्या ग्रंथाची समाप्तीदर्शक ओवीही हेमाडपंतांनी ना लिहीली , ना अवतरणिका लिहीली- आपली लेखणी म्हणजे आपले कर्मस्वातंत्र्य आणि आपले मस्तक म्हणजे आपले बुध्दीस्वातंत्र्य दोन्ही साईंच्या चरणी अर्पून हा साईंचा लाडका साईंच्याच चरणी विलीन झाला -
शेवटीं जो जगच्चालक । सदगुरु प्रबुध्दिप्रेरक । तयाच्या चरणीं अमितपूर्वक । लेखणी मस्तक अर्पितो ।। 
हे माझ्या साईनाथा, सदगुरुराया हेमाडपंताची अंशत: भक्ती, सदगुरुंच्या चरणींचा अनन्य शरणागत भाव मलाही अंगी बाणवता येऊ दे रे ..हीच माझ्या जीवनयज्ञाची इतिकर्तव्यता व्हावी ...

सदगुरुभक्तीची आस आणि ज्योत प्रत्येक मानवाच्या अंतरंगी जागवणार्‍या आणि ती आर्तता , ती पिपासा सातत्याने जागृत ठेवणार्‍या हेमाडपंतांना भावसुमनांजली ....

3 comments:

  1. हरी ओम !

    लेख खूपच छान आहे. चांगल्या पद्धतीने विचार मांडले आहेत. लेख आणि 'साई निवास' चा फोटो पाहून मन आपोआप त्या दिवसांकडे वळले, जेंव्हा मला बरीच वर्षे, दररोज ' साई निवास ' ला जाऊन बाबांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. पुन्हां एकदा आपल्या लेखा बद्दल अभिनंदन !

    ReplyDelete
    Replies
    1. दररोज ' साई निवास ' ला जाऊन बाबांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले - खरेच साईनाथांची असीम कृपा असल्याशिवाय असे भाग्य मिळणे केवळ अशक्य ! सुभाष चित्रे आपण खूप भाग्यवान आहात. आभारी आहे आपण आपले मत व्यक्त केल्याबद्दल...

      Delete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog