Friday 17 July 2015

हेल्मेट / कार सीट बेल्ट - सुरक्षेची हमी !!!

नुकतीच १५ जुलै २०१५ ला ठाणे - पोलिसांनी देशाचे भवितव्य असलेल्या युवा वर्गाला आपलेसे करण्याची नवी मोहीम आखली आहे अशी एक अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमाची माहिती http://marathi.eenaduindia.com/State/Thane/2015/07/15023056/youth-protection-campaign.vpf  ह्या स्थळावर वाचनात आली. ह्या बातमीत युवा सुरक्षा अभियानांतर्गत मराठी कलाकारांच्या उपस्थितीत पोलिसांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २०० हेल्मेटची वाटप केली. यावेळी पोलीस सहआयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, वाहतूक उपायुक्त रश्मी करंदीकर उपस्थित होते.

ठाणे शहर वाहतूक विभाग यांच्यामार्फत मंगळवारी ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयात युवा सुरक्षा अभियान राबविण्यात आले. यासाठी बायोस्केप या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव, कलाकार स्पृहा जोशी, विजू माने आणि मंगेश देसाई आदींनी रस्त्यांवर नियम पाळणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. तर सहआयुक्त लक्ष्मीनारायण यांनी तरुणाईला शिस्त लावण्याची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असून अन्य महाविद्यालयातही असे कार्यक्रम राबवणार असल्याचे स्पष्ट केले.

ह्यात पोलिस सहाआयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनाराय़ण ह्यांनी तरूणाईने हेल्मेट वापरून सुरक्षा नियम आपल्या अंगी बाणवणे किती जरूरीचे आहे ह्याबाबत माहिती दिली. कलाकार स्पृहा जोशींनी ह्या पोलिसांनी सुरु केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आणि त्यामुळे पोलिस आणि जनता ह्यांमध्ये जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते स्थापन होण्यास हातभार लागेल असा आशावाद व्यक्त केला. रवी जाधव ह्यांनी आपला हेल्मेट असल्यामुळे जीवघेण्या अपघातातून कसा जीव वाचला आणि जरी दुसर्‍या चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला असला तरी हेल्मेट घातले नसते तर त्यांच्या स्वत:च्या जीवाला किती मोठा धोका उद्भवला असता हे स्वानुभवाचे बोल सांगून तरूणाईशी संपर्क साधला. 

खरेतर ही बातमी खरोखरीच एक स्तुत्य उपक्रम आहे ह्यात शंकाच नाही. परंतु त्याच वेळी आपल्या स्वत:च्या सुरक्षेसाठी आपण किती बेपर्वाईने वागतो, किती बेजबाबदारीचे वर्तन करतो, अपघातात आपणच आपल्य़ा चुकांमुळे किती मोठे संकट ओढावून घेऊ शकतो आणि ह्या प्रकारच्या दिसाय़ला लहानशा वाटणार्‍या एका चुकीने वेळप्रसंगी आपण आपला लाखमोलाचा जीव कसा गमावूही शकतो ह्या सर्वाची जाणीव होऊन मन अगदी बेचैन झाले. 


खरेच आपण स्वत:ला सुजाण , सुशिक्षीत म्हणवतो खरे , पण आपल्या स्वत:च्याच जीवावर उदार होऊन असे बेजबाबदारीचे आयुष्य जगण्यात काय मोठेपणा मानतो, कसली धन्यता मानतो ह्याची मनाला बोचक जाणीव "आता तरी " आपल्याला झाली पाहिजे ना? 




खरेतर हेल्मेट घालणे ही आपली स्वत:ची काळजी आणि सुरक्षा वाहन चालकाने स्वत:च घ्यायला हवी , पण कधी आळसापोटी, तर कधी हिरोगिरी करून दाखवण्याच्या खोट्या भ्रामक कल्पनेपोटी हेल्मेट घालणे टाळले जाते. 

अग , काय आई कटकट करतेस , इथे नाक्यावर तर जाऊन यायचे आहे, हे बघ आता गेलो आणि आता आलो, एवढ्यासाठी काय ते हेल्मेट्चे ओझे घेऊन जायचे बरोबर? 
ए मम्मी , किती ग त्रास देतेस , एरव्ही मी नेहमी घालते ना हेल्मेट कॉलेजला जाताना, किती ५ मिनीटाचा रस्ता आहे, आता जाऊ बघ, त्या सिग्नला पोलिस पण नसतो ह्या वेळेला, तुझेच आपले काहीतरी... 
असे संवाद पालक णि पाल्यांचे खूपदा आपल्य़ा कानी पडतात. पालकांची आपल्या मुला-मुलीच्या सुरक्षेविषयीची काळजी म्हणा, चिंता म्हणा अनाठायी मुळीच नसते. शेवटी अनुभवाचे , प्रेमाचे, मायेचे , आपुलकीचे आणि आपल्या लेकराच्या कळवळ्यापोटीचे हे बोल असतात की बाबा रे किंवा बाई ग गाडी घेऊन जातोस/जातेस तर गाडी हळू चालव, हेल्मेट घालून जा. 

असे कितीतरी अपघात आपण पाहतो की जे कधी वाहन चालकाच्या चुकीने होतात , किंवा वाहन चालकाच्या अनवधानाने होतात असे मुळीच नसते. कधी कधी तर समोरून येणारे वाहन जरासा वेग चुकल्याने धडक देते वा जराशी दिशा चुकल्याने आपल्या गाडीवर येऊन आदळते. कधी विरूध्द दिशेच्या वाहन चालकाने घाईने वाहन चुकीच्या वळणावर सिग्नल न देता वळवले असू शकते , कधी आपलाच तोल जातो, कधी गाडीचे ब्रेकच लागत नाही, कधी गाडीवर नियंत्रणच मिळवता येत नाही, कधी रस्त्यात सांडलेले तेल, पेट्रोल, पाणी न दिसल्याने गाडी घसरते अशी एक ना अनेक कारणे अचानक उद्भवू शकतात आणि कधी आपल्या तर कधी दुसर्‍याच्या गाडीला आक्स्मिक अपघाताला सामोरे जावे लागू शकते. 

आपण मराठीत एक म्हण वापरतो की "काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, म्हणून जीव वाचला" पण ही वेळ ओढावण्यासाठी आपण हेल्मेट न घालून किंवा कार मध्ये सीट बेल्ट न लावून अधिकच आमंत्रण देतो असे नाही का वाटत? 

काल-परवाची गोष्ट आहे , ऑफीसच्या रस्त्यावर एक १५-१६ वर्षाचा मुलगा अपघातात जबरद्स्त जखमी झाला होता, हेल्मेट घातलेच नव्हते आणि त्यामुळे गाडीवरून जोरात फेकला जाऊन डोक्यावर एवढा भयंकर आपटून रक्तस्त्राव झला होता, रक्ताच्या चिंळकांड्या उडत होत्या, रस्ता रक्ताने माखला होता. त्या मुलाला हॉस्पिटल्मध्ये नेऊन उपचार करण्याआधीच त्याचे प्राण गेले होते. 
ह्यावरून दोन CRPF च्या जवानांमध्ये चाललेले बोलणे ऐकून मी हतबध्द झाले होते. 
एकाचे म्हणणे होते की हेल्मेट घातलेले असते तर एवढा मोठा गंभीर अपघात कदाचित टळू शकला असता आणि त्या मुलाचे प्राण वाचले असते. दुसरा मात्र त्याला अगदी ठणकावून सांगत होता की अरे असे काही नसते. एकदा मृत्यु आला की त्याला कोणी थांबवू शकत नाही, देवाने जर मरण लिहीले असेल तर त्याला कोणी टाळू शकत नाही, हेल्मेट घाल नाहीतर बुलेट-प्रुफ जॅकेट घाल, ही सगळी सुरक्षा काही कामाची नसते. 

माणूस म्हटला की मृत्यु हा अटळ आहे हे विधान एका अर्थाने जरी काही अंशाने सत्य असले तरी ह्याचा असा चुकीचा विपर्यास करने हे ही तितकेच चुकीचे आहे. मरण टाळता येत नाही म्हणून मी माझी स्वत:ची काहीच सुरक्षा करणार नाही, मी काही जबाबदारीने वागणार नाही , मी काळजीपूर्वक वाहतुकीचे , सुरक्षेचे नियम पाळणार नाही आणि वर त्या देवालाच दोषी ठरवणार , जणू काही "तो देव" मरण घेऊन फिरतच असतो असे त्यालाच जबाबदार धरणार. 
माणसाची हीच देवाला आपल्याच चुकांपोटी वेठीला धरण्याची, दोष देण्याची वृत्ती जाणून संत एकनाथ जाणीव करून देतात - एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा परी हरी कृपे नाश तयाचा !
आपले भोग, प्रारब्ध कितीही खडतर असले तरी "त्याच" हरीच्या कृपेने आपण त्या प्रारब्धाचा नाश करू शकतो, गरज असते त्या देवाला दोष न देता , आपण सभान बनून, जाणीवपूर्वक , काळजीने वागण्याची, आपले आचरण सुधारण्याची. 

देवाने माणसाला साखर खायला ऊस दिला , पण माणसाने त्या ऊसातून गोडवा, मधुरता देणारी साखर किंवा गूळ न बनविता त्यापासून दारू गाळली , आणि ती विषारी दारू पिऊन जर माणूस आपल्या प्राणाला मुकला, तर ह्यात देवाला कसा बोल लावणार? माणसाने आपले कर्मस्वातंत्र्य चुकीच्या पध्द्तीने वापरले आणि म्हणून देवाने दिलेला अमोल असा मानवी देह, नरजन्म वाया दवडला असेच म्हणावे लागेल, नाही का बरे? कारण आपण जाणतो की चौर्‍या ऐंशी लक्ष योनी फिरल्यानंतर हा दुर्मिळ मानव जन्म प्राप्त होतो. मग असा मौल्यवान नरजन्माची जपणूक मला करायला शिकलेच पाहिजे, काय पटतय ना तुम्हाला ?   



म्हणूनच लोक म्हणतात की हेल्मेट घालणे हे दुचाकी वाहनांसाठी बंधन आहे/ कार मध्ये कार सीट बेल्ट लावणे बंधनकारक आहे म्हणून आम्ही हेल्मेट घालतो/ कार सीट बेल्ट लावतो तेव्हा हे विधानच किती हास्यास्पद आहे असे वाटते. हेल्मेट हे बंधन म्हणून नाही, तर माझी स्वत:ची वैयक्तिक सुरक्षा, माझी स्वत:ची जबाबदारी , माझा जीव वाचविण्याची सोय , माझे सुरक्षा-कवच म्हणूनच त्याचा वापर हा व्ह्यायलाच पाहिजे असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते. हेल्मेट घातले नाही वा कार मध्ये सीट बेल्ट लावला नाही तर वाह्तूक -पोलिस अधिकारी पकडतो आणि मला दंड भरपाई करावी लागते म्हणून भीतीपोटी किंवा जबरदस्ती म्हणून , नाइलाजाने मी हेल्मेट घालत असेल/ सीट बेल्ट वापरत असेल तर ते अनुचित आहे. 

उलट पक्षी दुचाकी वाहन चालकाने आणि त्याच्या मागील सीटवर बस्णार्‍या अशा दोन्ही लोकांनी हेल्मेट घातली तर ती अधिक उत्तम सुरक्षा ठरेल, नाही का बरे?  


एका पाहणीद्वारे निरीक्षणांती असे आढळले आहे की भारतात प्रतिवर्षी रस्त्यावर होणारे अपघातात ३ टक्यानी वाढ होत आहे. ह्यात अपघातग्रस्त होणार्‍या लोकांमध्ये ७८ % लोक हे साधारणपणे २०-४४ वर्ष ह्या वयोगटातील असतात. दुचाकी वाहन चालवताना अपघाताची झळ लागून दर वर्षी  शेकडो तरूण मुले गंभीर स्वरूपाच्या डोक्यावरील जखमांमुळे आपल्या प्राणाला मुकली आहेत. ह्यांना फक्त हेल्मेटच डोक्यावरील गंभीर स्वरूपाच्या जखमांपासून वाचवू शकते. 

दर वर्षी १ लाख १० हजार लोक रस्त्यावर होणार्‍या अपघातांचे शिकारी बनून काळाच्या अधीन होतात , जेव्हा ह्याच्या ६ पट अधिक म्हणजे सुमारे ६ लाख लोक गंभीर  रूपाने घायाळ होतात. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्यातील ७० % लोक हे हेल्मेट न घातल्याने आणि कारचा सीट बेल्ट न लावल्याने दुर्घटनेत बळी पडले आहेत. ९० % लोकांच्या दोक्यावरील गंभीर जखमा ह्या हेल्मेट घालून थांबवता येऊ शकतात.  
  
जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) ची आकडेवारी असे दर्शविते की भारतात २०२० पर्यंत रस्ते अपघातात होणार्‍या मृत्युचे प्रमान हे खूपच भयावह आहे. असे अनुमान केले जाते की प्रतिवर्ष ५ लाख ४६ हजार लोक रस्ते अपघातात आपले प्राण दगावतील. एवढेच नव्हे तर प्रतिवर्ष १ कोटी ५३ लाख १४ हजार लोक  ह्या अपघातात अपंग-अधु होतील. त्यांच्या मते रस्त्यावरील दुर्घटनांमध्ये पायी चालणारे पदचारी, मोटार सायकलवर असणारे चालक, आणि सायकल स्वार ह्यांचे मृत्युचे प्रमाण सर्वात अधिक असेल. वास्तव तर असे आहे की सर्व जगाच्या फक्त १ % वाहने भारतात आहेत आणि तरी देखिल जगभरात रस्त्यावर होणा‍र्‍या अपघातांपैकी ६ % अपघात येथे भारतात होतात. ह्या देशात वर्तमान काळात दरवर्षी ५ लाख लोक रस्त्यावरील अपघाताचा फटका सोसतात, ज्यात १ लाख १० हजार मृत्युमुखी पडतात आणि १८ लाख लोक गंभीर रूपाने घायाळ होतात.     

भारतात रस्त्यावर अंदाजे दर २ मिनीटाला एक अपघात/दुर्घटना होते आणि प्रत्येक ८ मिनीटाला एका व्यक्तीचा मृत्यु होतो. ह्या रोड अपघातात हेल्मेट न घातलेल्या आणि कार चालवताना कारचा पट्टा ( car seat belt) न लावणार्‍या तरूणांचे प्रमाणच जास्त आहे.  

चला तर हेल्मेट घालण्याचा वा कार मध्ये बसताना सीट-बेल्ट लावण्याचा संकल्प करून आपल्या प्राणांची आपणच सुरक्षा करायला शिकू या आणि सुरक्षित जीवनासाठी मानव-निर्मीत आपत्तींना टाळण्याकरिता व्यवस्थापनाच्या वाटेवर पहिले पाऊल टाकू या....
                                              
संदर्भ : 
http://marathi.eenaduindia.com/State/Thane/2015/07/15023056/youth-protection-campaign.vpf
http://hindi.webdunia.com


No comments:

Post a Comment

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog