Tuesday 7 July 2015

बायोइंजिनिअरिंग- वाळा- खस गवताची लागवड - Landslideसाठी प्रतिबंध

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला , पूर येऊ लागले की त्याच्या सोबतीने भूस्सखलन होणे, दरडी कोसळणे , भूघसरण होणे म्हणजेच Landslide होणे ह्या प्रकारच्या आपत्तीही तोंड वर काढू लागतात.

नुकतीच वर्तमानपत्रात सोमवारपासून उत्तर बंगालमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री दार्जिलिंगमधील कलिम्पोंग आणि मिरिक येथे भूस्खलन झाले. दार्जिलिंग - सिक्कीमला देशाशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (एनएच) 55 वर देखील दरड कोसळली आणि वाहतूक कोंडी झाली आहे. संततधार पावसामुळे जमिनीची धूप होऊन दार्जिलिंग परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मंगळवारी रात्री १जुलै २०१५ ला सुमारे ३८ जणांचा बळी गेला आहे. दार्जिलिंगमध्ये २५ ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग १० व ५५वरील वाहतूक विस्कळ‌ित झाली. ही बातमी वाचली. आणि त्यानंतर NIDM ( National Institue of Disasater Management) मधील Geo Hazards भागाचे मुख्य आणि अध्यापक (Professor) असणार्‍या तञ व्यक्तीचे मत वाचण्यात आले ज्यात त्यांनी Landslide होण्यामागची कारणमिमांसा केली होती आणि Landslide थोपविण्यासाठी जमिनीची मशागत करून Vetiver grass ची लागवड केल्यास प्रतिबंध होऊ शकतो असे मत व्यक्त केले होते ज्यामुळे मनात जिज्ञासा दाटली की निसर्गाच्या प्रकोपाला एक साधेसुधे गवत कसा काय प्रतिकार करून थोपवू शकते. 

पण त्याआधी दरड कोसळणे किंवा Landslide होण्यामागची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊ या. साधारणपणे ढोबळमानाने डोंगर किंवा टेकडी ही त्रिकोंणी आकाराची असते. ह्यातील भूमध्य  स्थिती नीट असते तोवर घसरण होण्याची शक्यता नसते. पण जेव्हा कोणत्याही बाजूच्या पायाकडची जमीन किंवा माती ही पकड सैल झाल्याने घसरू लागते तसे भूमध्याची जागा बदलते आणि संपूर्ण वरचा भाग खाली कोसळू लागतो.

भूस्सखलन होणे म्हणजेच दरड कोसळणे किंवा भूघसरण होणे . धो धो पडणार्‍या पावसात साचलेले पाणी उताराच्या दिशेने वेगाने वाहते आणि पाण्याच्या जोराच्या वेगाने तेथील भुसभुशीत झालेली मातीही वाहू लागते. अशा वेळी मातीची पकड कमकुवत वा ढिली पडली की मोठा भूभाग घसरून पडण्याची शक्यता वाढते , ज्यामुळे मातीचे ढिगारे वा दरडी कोसळून पडण्याची भीती वाढते, ज्याच्या प्रचंड द्बावाखाली लोक चेंगरून मरू ही शकतात. त्यामुळे अशा दरडी कोसळण्याच्या संभाव्य शक्यता असलेल्या जागी जल-मृद्‌संधारणासाठी वनीकरण अत्यंत गरजेचे असते.

आपण सारे जाणतो की आपल्या परिसरातील जंगलाचे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत चालले आहे; तसेच झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणाचा परिणाम वनसंपदेवर होताना दिसतो. वनांच्या कमी झालेल्या क्षेत्रामुळे ऋतुमानात बदल होत आहेत. जंगलांच्या घटलेल्या प्रमाणामुळे मातीची धूप झाली आहे, जलस्रोतांवर परिणाम झालेला आहे; माती, पाणी इत्यादींवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.

एक सें.मी. मातीचा थर तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. खडकांची झीज होऊन विविध सूक्ष्मजीव, शेवाळ, नेचेवर्गीय, अपुष्प, पुष्पवर्गीय वनस्पतींच्या सहयोगाने माती तयार होते. जंगलाचे जमिनीवरील आवरण कमी झाल्याने पर्यावरणात असमतोल निर्माण झाला आहे. अन्नसाखळ्यांचे संतुलन बिघडले आहे. रस्ते दुतर्फा, नद्याकाठ, शेते इ. ठिकाणी जमिनीची धूप होण्याबाबत अत्यंत संवेदनानशील आहेत.

मातीच्या संवर्धनासाठी नैसर्गिक स्थिती आपण जर पाहिली तर पहिल्या पावसानंतर लगेचच गवत येते. या गवतामुळे हजारो टन मातीचे संवर्धन होते; परंतु बऱ्याचशा भूभागावर गवतही आढळत नाही, अशा परिस्थितीमध्ये मोठे नुकसान होते. अशा परिस्थीतीत Vetiver grass ची लागवड केल्यास landslide म्हणजेच दरडी कोसळणे ह्या नैसर्गिक आपत्तीला आळा घालता येऊ शकतो हे वाचून मोठे कुतुहल दाटले आणि Internet search केले असता चक्क आ वासण्याची परिस्थीती झाली.

Vetiver grass म्हणजे चक्क आपले वाळा किंवा खस म्हणून ओळखले जाणारे गवत बरे का !!!




महाराष्ट्रातील नागपूर , विदर्भ भागांमध्ये कडक उन्हाळ्यापासून संरक्षण म्हणून वाळ्याचे पडदे खिडक्या-दारांना लावतात. वाळ्याची जुडी माठातल्या पाण्यात ठेवल्यास थंड , मधुर सुवासाचे पाणी पिण्यास मिळते. उन्हाळ्यात वाळ्याचे सरबत ही मोठ्या प्रमाणात वापरले जाते अशी साधारण माहिती बहुतेकांना असते. 



Chrysopogon zizanioides हे शास्त्रीय नाव असलेले Vetiver grass म्हणजेच वाळा किंवा खस गवत, ज्याचा मूळ उगम आपल्या भारतातच आहे. Vetiver हा मूळ तमिळ शब्दापासून उत्पन्न झाला. विशेषत: पश्चिम आणि उत्तर भारतात "खस गवत" ह्या नावाने परिचीत असलेले हे गवत.
वाळा खस गवत - या बहुवर्षायू गवताची उगवण दाट होते. हे गवत मृद्‌संधारणासाठी अतिशय चांगले आहे. लागवड स्लिप्स’पासून केली जाते.
गवती बांध या तंत्रामध्ये समपातळीत उतारास आडवे मातीचे बांध टाकण्याऐवजी वनस्पतीची लागवड केली जाते व त्याचा बांधासारखा उपयोग करता येतो. याकरिता प्रामुख्याने मारवेल-८, मद्रास अंजन, खस गवत आणि सुबाभूळ अशा वनस्पतींची निवड करतात.


जैविक बांध- पावसाच्या वेगाला अटकाव करू शकणार्‍या वनस्पतीची समतल रेषेवर केलेली लागवड म्हणजे जैविक बांध होय. कमी उताराच्या जमिनीवर जैविक बांध घालणे पुरेसे ठरते. पण जास्त उताराच्या जमिनीवर मातीचा बांध घालून त्यावर वनस्पतीची लागवड केल्यास त्याला भक्कमपणा येतो. जैविक बांधासाठी खस, गिरीपुष्प, चराऊ गवत आदी वनस्पतीचा वापर केला जातो. या बांधामुळे जलसंधारणासोबतच इतरही उत्पादने मिळत असल्यामुळे फायदेशीर ठरतो.

खस गवताचे गुणधर्म असे की जमिनीवर उंच दाट गवत वाढते. बांधावर किंवा उतारावर (जमीन उतारावर) ह्याची लागवड करतात.
पावसाळ्यात पाणी साठले की ह्या खस गवतामुळे बांधातून फक्त पाणी वाहून जाते व मातीला अटकाव होतो. तसेच जमिनीखाली सुद्धा खसगवतांची मुळे खोलवर जाऊन व एकमेकांत गुंतून मुळाचा बांध तयार होतो. त्यामुळे जमीन खरडून जात नाही. उन्हाळ्यात नांगरणी, वखरणी, उताराला आडवी केल्यामुळे व काडी कचऱ्याने घळी बुजवल्याने सुरुवातीला जोरदार पाऊस आल्यास पावसाला ठिकठिकाणी अटकाव निर्माण होतो व पाणी जमिनीत मुरते. ठिकठिकाणी अटकाव केल्यामुळे वाहत्या पाण्याचा वेग कमी होतो व जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते व पाणी मुरते. उताराला आडवी पेरणी केल्यामुळे, पिकांमध्ये आंतरमशागतीने सरी व वरंबे तयार होतात. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा वेग कमी होऊन पाणी जमिनीत मुरते. जमिनीची झीज कमी होते. जमिनीचा उतार कमी होतो.

वाळा लागवड
:
वाळ्याचे अनेक औद्योगिक उपयोग आहेत, त्याचबरोबरीने या वनस्पतीमध्ये माती धरून ठेवण्याची असलेली क्षमता लक्षात घेता जल आणि मृद संधारणासाठी मोठ्या प्रमाणात लागवड केल्यास निश्‍चितच उपयुक्त ठरू शकते. भारतामध्ये उत्तर प्रदेशात जंगलांमधून व तमिळनाडू, केरळ इ. राज्यांत वाळा लागवड करून तेलनिर्मिती केली जाते. वाळा या सुंदर दिसणाऱ्या गवताची मुळे काहीशी कंदवर्गीय असतात, त्यांची वाढ माती, हवामान यांच्या अनुकूलतेप्रमाणे 10-35 सें.मी.पर्यंत होते. हे गवत दीड ते दोन मीटरपर्यंत वाढते. पाने अरुंद, चपटी, चकचकीत, तेलकट असतात. या बहुवर्षायू गवतास वाढीसाठी सूर्यप्रकाशाची आवश्‍यकता असते व उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. 1000 ते 2000 मि.मी. पाऊस आणि 21 ते 43 अंश से. तापमानाच्या ठिकाणी, हलक्‍या ते मध्यम जमिनीत हे गवत चांगले वाढते. त्याचप्रमाणे भारी जमिनीत, मोकळ्या पडलेल्या, खार, चढ - उताराच्या, नदीकाठच्या, पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीतही याची लागवड होऊ शकते.

वाळा - खस गवत हे बहुवर्षायू म्हणजेच चिरस्थायी स्वरूपाचे आहे म्हणजे प्रदीर्घ काळ टिकणारे, अत्यंत टिकाऊ व चिवट गवत आहे. वणवा, थंडी इ.साठी हे गवत कणखर मानले जाते. म्हणूनच या गवताची लागवड मृद, जल संधारणासाठी उत्कृष्ट समजली जाते. पडीक माळराने, नापिक जमिनी, जास्त धूप होणाऱ्या जमिनी इ. ठिकाणी लागवडीसाठी ही वनस्पती उपयुक्त आहे.
वास्तविक पहाता बायोइंजिनिअरिंग मध्ये ह्या vetiver grass चा उपयोग फिजी, इटली, हैती, जावा , साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज इत्यादी बरेच देश भू-संधारणासाठी मोठ्या प्रमाणावर करतात. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वात पहिली सुरुवात जागतिक बँकेने आपल्या भारतातच १९८० च्या सुमारास केली आणि त्यानंतर इतर सर्व देशांत त्याचा उपयोग सुरु झाला. 

दुर्दैवाने आपल्या भारतात खस गवत किंवा वाळा ह्याच्या बहुविध उपयोगाचे महत्त्व अजूनही जास्त परीचयाचे नाही असे काही संस्थाच्या निष्कर्षातून सामोरे आले आहे. 

आपल्या देशात २०१३ मध्ये कोईमतूर नेहरू आर्टस आणि सायन्स सेंटरने निलगिरी पर्वतांच्या भागातील जमीनीची धूप थांबविण्यासाठी ह्याचा वापर केला होता. तसेच ह्याच प्रोजेक्ट्चा भाग म्हणून उटी-कोटगिरी हायवे वरील कोडप्पामुड , उटी- मेट्टुपलायम नॅशनल हायवे येथील मरापालम आणि कलहट्टी येथे खस गवताची लागवड केली होती. *१

तसेच कोकण रेल्वे येथे सुध्दा दरडी कोसळून होणारे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी ह्याच vetiver grass चा उपयोग केला होता.

Dr. Paul Truong, Director, Vetiver Network International, Brisbane, Australia ह्यांनी Samford Valley, Brisbane, Australia येथील Landslide ही Vetiver Grass लावून कशी थांबविता येऊ शकते हे आपल्या Photo essayने सिध्द केले आहे.*२

VETIVER GRASS CULTIVATION ON SLOPE


खरे तर २०१० मध्ये आसाम सरकारने आसाम मधील ब्रम्हपुत्रा नदीचे भूस्सखलन थांबविण्यासाठी जर्मन Expert Team बोलाविली होती. *६
पण शेवटी एका भारतीयानेच ह्याचे उत्तर शोधले आणि तो भारतीय म्हणजे शंतनु भट्टाचार्य, आसाममध्ये PWD मध्ये काम करणारा..

 BRAHMPUTRA RIVER - SOIL EROSION 
ह्याच Shantanoo Bhattacharyya, Executive Engineer, PWD, Assam & Volunteer in Bioengineering ह्याने आसाम मधील ब्रम्हपुत्रा नदीचे भूस्सखलन कसे अफाट मेहनतीने थांबविले हे त्यांच्या Photo essayने सिध्द केले आहे.*३ 

खाली दिलेल्या संदर्भातील लिंकवर भेट देऊन जर हे आपण प्रत्यक्ष पाहिले तर साधे दिसणारे गवत काय प्रचंड करामत करू शकते ह्याची जिवंत प्रचिती तुम्हाला नक्कीच येइल.

निसर्गातील ही वनसंपत्तीच निसर्गाच्या प्रकोपापासून माणसाला वाचविण्यास मदतीचा मोठा हात देऊ शकते पण आपण जागृत व्हायला तर हवे नाहीतर आपली अवस्था "तुझे आहे तुजपाशी , परी जागा चुकलासी " अशी बिकट होते, आपल्याच अज्ञानाने...

मागच्याच वर्षी ५ जून २०१४ ला आसाम मधील गुवाहाटी येथे मोठी landslide झाली, त्यानंतर  Assam State Disaster Management Authority नी ३६६ landslide-prone sites मध्ये vetiver grass लावण्याचा Project हा शंतनु भट्टाचार्य ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केला आहे.*४

आपली भारतीय संस्कृती ही खूप महान आहे . ह्याच्याही खूप आधीच्या इतिहासात धौम्य ऋषींनी आरूणी नावाच्या त्यांच्या शिष्याला "केदारबंध" नावाची विद्या शिकवून ह्याच शास्त्रात प्रगत केले होते, ज्यात मातीचे बंधारे बांधून जमिनीची मशागत केली जात असे.

vetiver grass ही मुळात आपली भारताचीच जगाला देणगी आहे , चला तर आपण आपल्याच ह्या देण्याचा स्वत:च्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी वापर करायला शिकून landslide रूपी निसर्गाच्या प्रकोपाला यशस्वीपणे सामोरे जाऊ या...अगदी कमी खर्चात,निसर्गाच्याच सहाय्याने...

संदर्भ :
१. http://www.thehindu.com/sci-tech/energy-and-environment/role-of-vetiver-in-checking-landslides-in-nilgiris-stressed/article5159271.ece
२. http://www.vetiver.org/AUS_landslide%20Samford-o.pdf
३. http://www.vetiver.org/IND_riverbank%20erosion%20control%203.pdf
४. http://www.telegraphindia.com/1140606/jsp/northeast/story_18482095.jsp#.VZqyJ_mqqko
५. http://www.telegraphindia.com/1120626/jsp/northeast/story_15655181.jsp#.VZv8GPmqqko
६. http://archive.indianexpress.com/news/assam-ropes-in-german-experts-to-tame-brahmaputra/636286/

No comments:

Post a Comment

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog