Tuesday 14 July 2015

मुंगी -एक अद्भुत, विलक्षण विश्व आणि सामूहिक बुध्दीमत्ता ( SWARM INTELIGENCE) - 2

जीवसृष्टीतील अनेक लहान -मोठे जीव आपण आपल्या सभोवताली वावरताना पहातो. छोटे-मोठे किडे, मुंगी, डास, झुरळ, पाल हे तर आपल्या घरात जणू काही  "हे माझे घर " अशा थाटाने न बोलावता सुध्दा हक्काने येऊन आपल्यासोबतच राहतात. आपल्याला त्यांचे अस्तित्व अगदी नकोसे आणि त्रासदायक वाटते. त्यांना आपल्या घरातून बाहेर हाकलण्यासाठी आपण कीटकनाशके फवार, औषधी पावडरी वापर , प्रतिबंधक रेषा मार असे नाना उपायही अवलंबतो. परंतु त्यांना आपल्या घराबाहेर करणे किती कष्टाचे आणि अशक्यप्राय आहे याची जाणीव बहुधा आपल्या सर्वांनाच चांगल्याच माहितीतली आहेच. 

या जीवांपकी 'मुंगी' हा स्वत:मध्ये अफाट सामर्थ्य घेऊन जीवन जगणारा अतिसामान्य कीटक आहे असे आपल्याला प्रथमदर्शनी वाटू शकते. परंतु मुंगीचे अभ्यासक व संशोधक मात्र वेगळेच मत मांडतात. त्यांच्या मते मुंगी आणि तिचे संपूर्ण विश्व , तिचे सामाजिक जीवन , तिची जीवननिष्ठा आणि जगण्यातील शिस्त, जगण्याची कार्यप्रणाली, संरक्षणप्रणाली आणि युद्धनीती, सफाई पध्दती, अन्नशोधपद्धती, संदेशवहन, तिच्या वसाहती, बुरशीची शेती करण्याची त्यांची पारंपरिक पद्धती, मावापालन, किडय़ांचा सांभाळ करणारी गोशाळा, तेथील स्वच्छता, कामविभागणी असे सारेच थक्क करून सोडणारे विश्व आहे.

विल्सन आणि हॉलडॉब्लर ह्या दोन महान संशोधकांनी तर आपले अवघे जीवन मुंग्याचा अभ्यास करण्यात वेचले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या दोघांनी लिहीलेले " द ऍन्ट्स " हे पुस्तक ह्या त्यांच्या संशोधनाचा आढावा घेण्यास खूप मोलाचा हातभार लावते.

चला तर मग फेरफटका मारू या ह्या अद्भुत अशा मुंग्याच्या विश्वात -


मुंग्या ह्या माणसाप्रमाणेच इमारती म्हणजेच वास्तु बांधतात आणि त्याकरीता बांधकामाच्या विवीध रचनाही बनवितात. ह्याच मुंग्या पूल आणि बोगदेही बनवितात , एवढेच नव्हे तर महानगरेही वसवितात. आता आपल्याला वाटेल की मुंग्याची इमारत म्हणजे काय तर नुसता मातीचा ढिगारा (वारूळ) असणार , त्यात कसले आले कौशल्य? पण ह्याच वास्तुमध्ये संशोधकांना वातानुकूलीत व्यवस्था असलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या रचनाही आढळल्या आहेत, ज्या आपल्याला आश्चर्याने तोंडात बोट घालण्यास भाग पाडतात. 

माणूस समाजात जशी पूर्वापार कामाची विभागणी करणारी ब्राम्हण, क्षत्रिय, वाणी (वैश्य), शूद्र अशी चतुर्वर्ण व्यवस्था होती , तशाच प्रकारे मुंग्याच्या समाजातही कामाप्रमाणे वर्गवारी केली जाते.
वारूळाची सफाई करण्यासाठी सफाई कामगार मुंग्या असतात, तर वारूळाचे संरक्षण करण्यासाठी सैनिक मुंग्या असतात, आणि राणी मुंगी आणि तिच्या पिलांची देखभाल करणार्‍या परिचारीका (नर्स) मुंग्या असतात. आपण म्हणतो मानव हा शेतीप्रधान आहे, पण एवढुसा जीव वाटणार्‍या ह्या मुंग्या देखील शेती करतात, ज्यात त्या बुरशीच्या बागा बनवितात. ह्या बुरशीची आधुनिक प्रयोगशाळेत शेती करणे हे अजूनही शास्त्रज्ञांना एक आव्हान बनून राहिले आहे.



मुंग्यांच्या अभ्यासकांना संरक्षणक्षेत्रातील मुंग्याची कार्यक्षम पध्दती एवढी अद्भुत वाटली की पेंटॅगॉनसारखी अत्यंत विकसीत संरक्षण संस्था त्या कार्यप्रणालीचा अभ्यास करत आहे. मुंग्या आपल्या संरक्षणप्रणालीत गनिमी (छुपा) हल्ला करणे, शत्रूपक्षाला नमवून गुलाम बनविणे, सामर्थ्य व शक्तीचे प्रदर्शन करणे, रासायनिक शस्त्रास्त्रे वापरणे ह्यासारख्या प्रभावी आधुनिक पध्दतींचा अवलंब करतात. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आत्मसमर्पण करणार्‍या मानवीबॉम्ब प्रमाणेच मुंगीबॉम्बचीही योजना मुंग्याच्या कार्यप्रणालीत केलेली दिसते.
एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी प्रवास करताना वाटेत काही अडचण किंवा संकट आले आणि ते पार पडणे अशक्य वाटत असेल तरी ह्या मुंग्या जराही न डगमगता एकमेकांना पकडून आपल्या शरीराचे जिवंत पूल,शिडया व तराफा बनावितात एवढेच नव्हे तर उंचावरच्या ठिकाणी पोहचायला क्रेन सारख्या रचनांचाही वापर करतात.   
                   
संत तुकाराम महराज आपल्या एका अभंगातून आम्हाला मानवांना "एकमेकां सहाय्य करू , अवघे धरू सुपंथ" अशी अत्यंत मोलाची शिकवण देतात. परंतु बारकाईने पाहिल्यास जाणवते की बर्‍याच वेळा एका मानवाची प्रगती, विकास पाहून दुसरा माणूस तुलनेपोटी, मत्सरापोटी त्याचे पाय धरून पाडण्याचा वा त्याला मागे खेचण्याचाच जास्त प्रयत्न करतो. त्यामुळे मानव जरी अत्यंत बुध्दीमान प्राणी म्हनून गणला जात असला तरी तुकाराम महाराजांची शिकवण मात्र मानवाच्या अंगी बाणली जात नाही किंवा कळूनही तो ती समजावून घेऊ इच्छीत नसतो असे म्हणावे लागते. परंतु निरीक्षणांती असे आढळते की मुंगी आणि मुंगीचा समाज मात्र ही शिकवण अगदी मन:पूर्वक , निग्रहाने पाळतो आणि आपल्या प्रत्येक कृतीतून संपूर्ण जीवनातच यशस्वीरीत्या अंगीकारतो. नवल वाटले असेल ना? आपल्या तुलनेत अतीसामान्य दिसणारा हा नगण्य जीव कसा काय आचरणात आणतो ही संत महात्म्यांची शिकवण ? मला वाटते म्हणूनच की काय संत तुकाराम यांनी मुंगीप्रमाणे लहान, विनम्र व्हा असा संदेश समस्त मानवांना  'लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा' या अभंगातून दिलेला आहे;
 LEAF CUTTER ANT

अगदी कवी मनालाही ह्या मुंग्या भुरळ पाडताना दिसतात. मानवाचे जीवन किती सामान्य आहे हे जणू काही कवी बा. सी. मर्ढेकर सांगू इच्छितात असे दिसते, त्यांच्या एका कवितेत मर्ढेकर लिहीतात -  'मी एक मुंगी, हा एक मुंगी, तो एक मुंगी, तूं एक मुंगी, ही एक मुंगी, ती एक मुंगी'  मुंग्यांच्या काही माणसात आढळणार्‍या प्रवृत्ती दाखवताना ते म्हणतात या जीवनात 'कुणी डोंगळे काळे काळे, कुणी तांबडय़ा, भुरक्या मुंग्या; कुणी पंखांच्या पावसाळी वा, बेरड ग्रीष्मांतल्या लवंग्या!'.

एक महत्त्वाची किल्ली ह्या मुंग्याच्या कॉलनीची अस्ते ती म्हणजे येथे कोणीच प्रमुख नसतो. सैनिक मुंग्याना कोणी सैनिक अधिकारी मुंगी आज्ञा देत नाही वा ऑर्डरही सोडत नाही. कामगार मुंग्यांवर कोणी मॅनेजर अधिकार गाजवत नाही. राणी मुंगी अंडी घालण्या व्यतिरीक्त दुसरी कोणतीही भूमिका निभावत नाही. जवळपास अर्धा कोटी मुंग्याची वसाहत किंवा कॉलनी ही अत्यंत व्यवस्थितरित्या कोणत्याही व्यवस्थापनाशिवाय (मॅनेजमेंट्शिवाय) संपूर्णत: कार्य करते असे संशोधकांचे मत आहे, वास्तविक पहाता मुंग्याची कॉलनी ही मुंग्याच्या एकमेकांतील अगणित संवादांवर अवलंबून असते, ज्यातील प्रत्येक मुंगी ही ढोबळमानाने साधारण नियमाचे मात्र आवर्जून पालन करते. शास्त्रज्ञ ह्या कार्यप्रणालीला "स्वत:ची आयोजित प्रणाली " असे म्हणतात. 

मुंग्या ह्या एकमेकांना कसे सहाय्य करतात हे त्यांच्या कामवाटपाच्या उदाहरणावरून समजावून घेऊ या. डेबोराह गॉर्डन ह्या जीवशास्त्रज्ञाने ऍरिझोना (Arizona) वाळवंतातील लाल सुगीच्या मुंग्याचा अभ्यास केलाज्यात असे आढळले की एक मुंग्याची कॉलनी रोज सकाळी किती मुंग्या अन्नावर धाड घालायला/ अन्न शोधार्ध पाठवायच्या ह्याचे गणित मांडते, जे परिस्थितीनुसार बदलू शकते. ह्या धाड घालणार्‍या मुंग्याच्या हाती चवीष्ट रुचकर अन्न -पदार्थाचे घबाड लागले आहे का? तर तेव्हा ते अन्न गोळा करायला जास्त मुंग्या लागू शकतात. कालच्या रात्री वादळाच्या तडाख्याने घराचे /वारूळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे का? तर देखभाल करणार्‍या अधिक मुंग्याना दुरुस्तीचे काम करायला मागे घरात थांबवले जाते. एक मुंगी अक दिवस घरकाम करणारी असेल तर दुसर्‍या दिवशी कचरा जिल्हाधिकारी असेल. परंतु ही मुंग्याची कॉलनी कोणीही प्रमुख अधिकारी असल्याशिवाय अशा प्रकारचे समायोजन (adjustments) कशा करू शकते हा एक गूढ प्रश्नच आहे.                   

गॉर्डनने एक सिद्धांत मांडला आहे की मुंग्या ह्या स्पर्श आणि वासाच्या आधारे संवाद साधतात. घरात काम करणार्‍या मुंग्याचा वास हा घराबाहेर काम करणार्‍या मुंग्याच्या वासापेक्षा वेगळा असतो. त्यामुळे एक मुंगी जेव्हा दुसर्‍या मुंगीला तडाखा मारते तेव्हा ती तिच्या नांगीच्या मदतीने हे शोधून काढते की ही दुसरी मुंगी त्याच घराची आहे का आणि ती कोठे काम करत होती. प्रत्येक दिवशी अन्नाच्या शोधार्थ घराच्या बाहेर पडायच्या आधी ह्या धाड घालणार्‍या मुंग्या पॅट्रोलींगसाठी (patrollers) भल्या पहाटे गेलेल्या मुंग्याची परतण्याची वाट पहातात. जशा ह्या पॅट्रोलरस मुंग्या घरात प्रवेश करतात त्या त्यांच्या नांगीने ह्या अन्न शोधायला बाहेर जाणार्‍या मुंग्याना स्पर्श करून थोडक्यात माहिती देतात.  परंतु ह्या बाहेर जाणार्‍या मुंग्याना १० सेकंदाच्या आधी अजून बरेच संपर्क साधायचे असतात. 

ह्याचा थांगपत्ता शोधायला कोलॅरेडो युनिव्ह्रसिटीच्या गॉर्डन आणि तिच्या सहाध्यायी मायकेल ह्यांनी डेन्व्हर येथे जाऊन एका सकाळी ह्या पॅट्रोलींगसाठी बाहेर पडणार्‍या मुंगीला पकडले आणि अर्धा तास वाट पाहिल्यावर निरीक्षणाअंती त्यांना सुगावा लागला की बाहेर पडणार्‍या मुंग्याना एका सांकेतिक पध्द्तीने पॅट्रोलींगहून आलेल्या मुंग्या सांगतात की आता बाहेर पडणे सुरक्षित आहे की नाही किंवा आता बाहेर जोराचा वारा आहे , थोडा वेळ थांबा किंवा बाहेर भुकेलेली पाल वाट पहात बसली आहे , सावध व्हा. एकदा जर ह्या बाहेर गेलेल्या मुंग्या अन्न घेऊन परत माघारा येऊ लागल्या की बाकीच्या दुसर्‍या मुंग्या मदतीसाठी जातात. बाहेर गेलेली मुंगी अन्नाचे काही सामान मिळाल्याशिवाय परत येत नाही. कमी अन्न असेल तर मुंगीला परतायला वेळ लागतो, परंतु अन्नचा साठा मोठा असेल तर त्या मुंग्या अधिक वेगाने माघारी येतात. त्यामुळे आजचा दिवस चांगला की वाईट हे कोणी ठरवू शकत नाही.

"फॉर्चुन" नावाच्या मासिकात *३ नुकताच प्रसिध्द झालेला How swarming traffic lights could save drivers billions of dollars हा लेख सांगतो की Surtracचे सिग्नलस हे निसर्गातील मुंग्याचा स्मूह किंवा पक्ष्यांचा थवा ज्या एकत्रित्पणे येऊन काम करतात त्या पध्दतीवर आधारीत काम करतात. सामूहिक बुध्दीमत्तेचे हे कौशल्य आता स्वंयचलित ड्रोन विमानांचे शोध आणि बचाव कार्यासाठी वापर करताना समन्वय साधण्यासाठी करतात . ह्या सर्वातून करोडो रूपये वाचवता येऊ शकतात.       

अशा अद्भुत प्रकारे स्वार्म इंटीलिजन्स म्हणजेच सामूहीक बुध्दीमत्ता काम करते. सामान्य जीव सामान्य नियम पाळून, एकमेकांच्या सहाय्याने मदतीच्या आधारे किती अवाढव्य कामे पार पाडतात. एकही मुंगी कोणते मोठे चित्र पहात नाही की एक मुंगी दुसर्‍या मुंगीला काय करायचे हे सांगत नाही. पण ऑक्सफर्ड आणि प्रिन्सेटॉन युनिव्हर्सिटीचा आयेन कझिन हा जीवशास्त्रज्ञाने एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली आहे की कोणत्याही नेतृत्वाची गरज वा आवश्यकता भासत नाही. एक जटील स्वरूपाची ( गुंतागुंतीची वर्तणूक वा ) वागणूक  सामान्य संवादातून समन्वयित (coordinate) करता येऊ शकते.

मुंग्यांच्या अशा अद्भुत आणि आश्चर्यकारक विश्वाचा वेध आम्हा मानवांना मानवेतर जीवसृष्टीविषयी नवी जिज्ञासा निर्माण करणारा आणि जीवनाविषयी नवी अनुभूती देणारा आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही असे मला पामाणिकपणे वाटते. बहुधा माणूस दुसर्‍याला हिणविण्यासाठी, तुच्छ लेखण्यासाठी उपहासात्मक रित्या क्षुद्र म्हणून मुंगीची उपमा देताना दिसतो. परंतु मुंगीच्या विश्वाचा अभ्यास हा मुंगीविषयीच्या आपल्या आजवरच्या (गैर)समजांना पूर्णत: खोडून काढू शकतो असे दिसते. कमीत कमी हा चिकाटीचा , सातत्याचा गुणधर्म मानव नक्कीच अतिसामान्य वाटणार्‍या मुंगी ह्या जीवाकडून शिकू शकतो, नाही का बरे? 
       
संदर्भ :
१. मुंगी - एक अद्भुत विश्व : प्रदीपकुमार माने
२. http://ngm.nationalgeographic.com/2007/07/swarms/miller-text
3. http://fortune.com/2015/07/13/swarming-traffic-lights/

13 comments:

  1. अप्रतिम माहीतीपूर्ण लेख .

    ReplyDelete
  2. Informative article. Keep writing.

    ReplyDelete
    Replies
    1. Ambadnya Dr. Yogindrasinh Joshi for your valuable comment.

      Delete
  3. Ambadnya for the post. Very informative and knowledge sharing. Ambadnya efforts taken by you.
    Ambadnya for the references given at the last.

    ReplyDelete
  4. Mastach... Khup mahitipurn ani muddesute mandani..

    ReplyDelete
  5. Amazing sunder mahiti .apratim

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Reena Malusare for your comment.

      Delete
  6. एक लहान मुंगी इतके काही करू शकते हे खरच थक्क करून सोडणारे आहे.
    चिकाटी,सातत्य,सांघिक गुणधर्म इथे दिसून येतो.
    मुंग्यांचे विश्व एवढे अद्भुत आहे हे तुमच्या दोन्ही लेखांमधून समोर आले .
    ह्या मुंग्यांच्या आश्चर्यकारक विश्वाबद्दल अजून जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत.
    पुढच्या लेखाची प्रतीक्षा करतेय.

    ReplyDelete
    Replies
    1. सुप्रिया, खरोखरच आपण मानवांनी मुंग्याचे चिकाटी, सातत्य आणि सांघिक भावना हे गुणधर्म आचरणात आणल्यास खूपच हितावह ठरू शकेल असे माझेही मत आहे. अभिप्राय दिल्याबद्द्ल धन्यवाद.

      Delete
  7. अप्रतिम. हाच आपला पिपीलिका मार्ग. We all humans should learn and implement what ants are doing.
    Thx for valuable info.... waiting for next related article..
    हरी ॐ श्रीराम अम्बज्ञ

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog