Saturday 14 November 2015

मधुमेह- गोड विषाच्या आपत्तीचे व्यवस्थापन

१४ नोव्हेंबर म्हटले की आम्हा भारतीयांना बाल दिन आणि चाचा नेहरू आठवतात , पण जगात १४ नोव्हेंबर हा दिवस एका विशीष्ट कारणासाठी साजरा केला जातो. काय आहे बरे वेगळे कारण ? चला तर जाणून घेऊ या -

आज शनिवारी ऑफीसला सुट्टी असली तरी १४ नोव्हेंबर निमीत्त " Walkethon" आणि मधुमेह अर्थात डायबेटीस संबंधी जनजागरूकता वाढविण्याच्या हेतूने ऑफीसने सर्व कर्माचार्‍यांसाठी "मधुमेह - जागरूकता" परिसंवाद आणि शिबीराचे आयोजन केले होते. एक तर सुट्टीच्या दिवशी मस्तपैकी झोप काढण्याच्या मनसुब्यावर पाणी पडले होते आणि त्यातून कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबादारी असलेल्या विभागाच्या कर्मचारी वर्गाला नियोजित वेळेच्याही २ तास आधीच पोहचायचे होते, त्यामुळे त्या विभागाचे कर्मचारी तणतणतच कार्यक्रमाच्या नियोजित स्थळी पोहचले होते.  

परंतु मधुमेहाबाबत झालेल्या परिसंवादानें तर प्रत्येकाचे डोळे खाडकन उघडले होते आणि आपल्या आळसापोटी नियमित व्यायाम न करून, खाण्याच्या गोष्टींचा मोह न टाळता आल्याने अनावश्यक चरबट गोष्टी खाऊन, जंक फूडच्या वेडापायी चुकीचे खाणे खाऊन आपणच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून स्वत:च्या हातांनीच स्वत:च्या पायावर कसा धोंडा मारून घेतलाय ह्याबाबत खडसून कान उघाडणी झाली आणि आपल्या चुकांची किती मोठी भरपाई  आपल्याला स्वत:ला आणि आपल्या कुटूंबीयांना, आप्त-स्वकीयांना करावी लागेल ह्या भीषण वास्तवाशी चांगलाच परिचयही झाला. सकाळचा राग कुठेच पळाला होता आणि ऑफीसच्या कार्यक्रम नियोजनाचे महत्त्व मनापासून पटले होते. मनातल्या मनात प्रत्येक जणच परमेश्वराकडे आभार व्यक्त करीत होता.   
       
जागतिक मधुमेह दिवस - दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरूवात जागतिक मधुमेह फेडरेशन (World Diabetes Foundation )  आणि  जागतिक आरोग्य संघटनेने ( World Health Organization )  संयुक्तपणे केली. मधुमेहामुळे होणार्‍या रोगाच्या तक्रारीविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने या दिवसाची सुरूवात करण्यात आली. फ्रेड्रिक बॅटिंग व चार्ल्स बेस्ट यांनी सर्वप्रथम इन्शुलिन तयार करण्याची कल्पना जगासमोर मांडली. फ्रेड्रिक बॅटिंग ह्याचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस असल्यामुळे पुढे १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा करण्याचा पायंडा पडला.




Healthy Living and Diabetes –२०१४-२०१६- अशी या जागतिक मधुमेह दिवसाची सध्याची संकल्पना आहे. मधुमेह फेडरेशनचे २०० सदस्य देश, यूएनचे १६० देश व इतर सहयोगी संस्था हा दिवस साजरा करतात अशी माहिती परिसंवादाच्या संचालकांनी दिली होती. ते गंमतीने  म्हणाले मधुमेह हा जणू काही गोड विषच आहे ! मराठीत म्हण आहे गोड बोलून केसाने गळा कापला तर येथे दुसरे कुणी नाही तर आपण स्वत:च गोड खाऊन आपला स्वत:चा गळाच एक प्रकारे कापत असतो. 

सध्या जगात मधुमेह हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. २००० मध्ये आपल्या भारत देशात ३.१ कोटी लोक मधुमेहग्रस्त होते. जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत ही संख्या ८ कोटीपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला असला तरी प्रत्यक्षात २०१३ मध्ये ६ कोटींचा आकडा पार केला आहे अशी धोक्याची सूचना मधुमेह तज्ञांनी दिली होती.

मधुमेह होतो म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे तर माणसाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण ठराविक मर्यादेपेक्षा वाढते. वारंवार खूप भूक व तहान लागणे, खूप वेळा लघ्वीला जावे लागणे, सुस्ती/आळ्शीपणा वाढणे, अचानक वजन कमी होणे, एखादी जखम / घाव लवकर न भरणे , खूप वेळा एलर्जीचा  त्रास होणे ही साधारण लक्षणे असल्याचे तज्ञांनी निर्देशास आणले. 

पुढे माहिती देताना ते म्हणाले होते की मधुमेहाची प्राथमिक लक्षणे सर्वांमध्ये दिसत नाहीत त्यामुळे शरीरात आजार असूनही आपण रुग्ण नाही असेच माणसाला वाटत राहते.अशा प्रकारास Insulin-dependent मधुमेह म्हणतात. अशा प्रकारचा मधुमेह वयाच्या ४० वर्षांआधी सुद्धा होऊ शकतो म्हणून यास ‘अल्पवयीन मधुमेह’ सुद्धा म्हटले जाते. मधुमेह तज्ञांनी स्पष्ट केले होते की अंदाजे मधुमेहपीडित लोकांमधील १०% लोकांना या प्रकारचा मधुमेह असतो. 

ढोबळमानाने मधुमेहाचे २ प्रकार असतात. 
१) प्रकार १ मधुमेह –  मधुमेहपीडित लोकांना नियमितपणे इन्शुलिनची मात्रा घेणे आवश्यक असते.

२) प्रकार २ मधुमेह  –  या प्रकारात शरीरात इन्शुलिन तयार होते पण त्याचे प्रमाण कमी असते किंवा शरीर या इन्शुलिनला प्रतिक्रिया देत नाही.

जास्त वजन असलेल्या विशेषत: पोटाचा घेर जास्त असलेल्या लोकांना प्रकार-२ मधुमेह होण्याची जास्त शक्यता आहे. त्याचप्रमाणे वयानुसार या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता वाढते.

नंतर त्यांनी महिलांना होऊ शकणार्‍या मधुमेहाची कल्पना दिली . ते म्हणाले की गर्भावस्थेतील मधुमेह (गॅस्टेशनल डायबिटीस ) – हा मधुमेह गर्भावस्थेत महिलांना होऊ शकतो. गर्भावस्थेत महिलांच्या रक्तामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, पण त्याप्रमाणात शरीरात इन्शुलिन तयार होऊ शकत नसल्याने हा मधुमेह होतो. तसेच त्यांनी हे ही नमूद केले की या मधुमेहाचे वेळेत निदान न झाल्यास बाळंतपणाच्या वेळी गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

त्या शिवाय अजूनही काही महत्त्वाची माहिती मिळाली होती. तज्ञांनी सांगितले की इंग्रजी भाषेतील An Apple a day keeps doctor away ही म्हण आपल्या सर्वांना चांगलीच परिचयाची आहे. तसेच रोजचे एक तास चालणे हे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही . पण आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस रोज चालणे, व्यायाम करणे ह्या साध्या सोप्या बिनखर्चाच्या सवयींकडे कानाडोळा करतो. परंतु नियमित जीवनशैली, संतुलित आहार आणि दररोज किमान अर्धा तास व्यायाम या त्रिसूत्रीच्या आधारे मधुमेहाला दूर ठेवता येऊ शकते, असे देशविदेशांत झालेल्या विविध संशोधनांमुळे सिध्द झाले आहे हे ध्यानात ठेवायला विसरू नका. 


मधुमेह तज्ञांनी पुढे स्पष्ट केले की टाइप-१ चे प्रमाण हे साधारण ५ ते ७ टक्क्यांच्या आसपास असते, मात्र टाइप-२ या मधुमेहाचे प्रमाण मात्र जागतिक स्तरावर मोठे म्हणजे साधारण ९० ते ९५ टक्क्यांच्या घरात आढळते. 

मधुमेह होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये अनियमित जीवनशैली, असंतुलित आहार किंवा जंक फूड खाणे, तणाव अथवा चिंता तसेच या सर्व कारणांनी वाढणारे वजन यांचा समावेश आहे. त्यामुळे  मधुमेहाचे आपल्या आयुष्यातील संकट रोखावयाचे असेल तर त्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे किंवा वाढलेले वजन किमान ५ ते ७ टक्क्यांनी घटविणे हा एक प्रमुख उपाय सांगितला जातो. यासाठी आठवड्यातून किमान पाच दिवस ३० मिनिटांचा व्यायाम किंवा चालणे हे अत्यावश्यकच असल्याचे तज्ज्ञ मत व्यक्त करत होते. ते पुढे म्हणाले की ह्या सर्वां शिवाय माणसाने रीज आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत शक्य तितका नियमितपणा सांभाळण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे जसे जेवणाच्या वेळा सांभाळणे, अवेळी खाणे किंवा फास्टफूड खाणे टाळावे. संतुलित आहार आणि व्यायामात सातत्य ठेवून वजनावर नियंत्रण ठेवले की मधुमेहाला दूर ठेवणे अशक्य नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ग्रामीण भागात घरगुती अन्नाला प्राधान्य असते आणि जोडीला कष्टकरी जीवनशैली असते ज्यामुळे मधुमेहाचे प्रमाण मोजकेच असते, तर आरामदायी जीवनशैली आणि जंक फूड/ फास्ट फूडचा वापर ह्या गोष्टी मधुमेहाला आमंत्रण देतात.

मुंबई, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, थिरुवनंतपूरम, लखनौ, दिल्ली आणि कोलकाता अशा आठ शहरांमधील ४१०० मधुमेही रुग्णांचा आहार, सवयी, रक्तातील साखरेचे प्रमाण तसेच मधुमेह व्यवस्थापनाविषयी माहिती घेण्यात आली. या पाहणीत ६२ टक्के जण स्थूल आढळले. त्यातही स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक स्थूल आढळल्या. यातील ५५ टक्के व्यक्तींना वयाच्या ४५ व्या वर्षांपूर्वी तर १७ टक्के व्यक्तींना वयाच्या ३५व्या वर्षांपूर्वी मधुमेहाचे निदान झाले होते. मुख्य म्हणजे ६५ टक्के जणांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित आहे. मुंबईत हे प्रमाण ५६ टक्के, तर चेन्नईत सर्वाधिक ८७ टक्के होते. शहरातील सर्वात कमी प्रमाण दिल्लीत (४७ टक्के) असले तरी तेदेखील खूप जास्त असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मधुमेहासाठी व्यक्तींचा आहार मुख्यत्वे कारणीभूत असल्याचे दिसून आले. भात आणि पोळी यांचे प्रमाण जास्त असल्याने सर्व सहभागी मधुमेहींच्या जेवणामध्ये सरासरी ६८ टक्के कबरेदके होती. त्यातही दक्षिणेकडील शहरांमध्ये भाताचे प्रमाण जास्त असल्याने तेथील परिस्थिती गंभीर आहे. भातासारख्या पटकन पचणाऱ्या कबरेदकांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने कमी-जास्त होते. पाहणीत सहभागी झालेल्यांपकी ८० टक्के लोक रोज तीन ते चार वेळा जेवतात व त्यात साडेचार ते सात तासांचा कालावधी असतो. सकाळची न्याहरीही उठल्यावर तब्बल साडेतीन तासांनी घेतली जाते. त्यातही भारतीयांमध्ये उपवास आणि मेजवानी यांचे प्रमाण आढळत असल्याने यामुळे ग्लुकोजच्या पातळीत चढ-उतार व बदल होतात, असे मुंबईच्या प्रसिध्द लीलावती रुग्णालयातील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी नमूद केले असे वाचनात आले. 

माणसाच्या आहारात मुख्यत्वे साखरेचे दोन प्रकार असतात ग्लुकोज व फ्रक्टोज. ह्यातील कोणती साखर आपल्या शरीराला आवश्यक आहे व ती कोणत्या पदार्थांमधून आपण मिळवू शकतो  व कोणती साखर घातक आहे आणि ती कशी टाळू शकतो ह्याबाबत माझे सदगुरु डॉकटर अनिरुध्द जोशी ह्यांनी त्यांच्या आरोग्यावरील व्याख्यानात मार्गदर्शन केले होते. त्याची सविस्तर माहिती आपण ह्या संकेतस्थळी वाचू शकता. http://www.aarogyamsukhsampada.com/sugar/

चला तर आपल्या जीवनशैलीत सुयोग्य बदल घडवून मधुमेह ह्या गोड  विषाच्या आपत्तीचे व्यवस्थापन करू या आजच !!!

No comments:

Post a Comment

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog