Sunday 15 November 2015

सेतू

सेतू शब्द उच्चारताच डोळ्यापुढे पटकन चित्र उभे राहते ते रामायणातील साक्षात श्रीराम प्रभूंच्या आज्ञेने व प्रत्यक्ष श्रीहनुमंतानी पाषाणावर स्वत:च्या हाताने रामनाम लिहून वानरसैनिकांकडून लंकेला जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांधून घेतला होता त्या सेतूचे ! वानरसैनिकांनी प्रभु रामचंद्राची आज्ञा पाळली, हनुमंताच्या सांगण्यावरून पाषाण उचलण्याचा पुरुषार्थ केला आणि पहिले पाऊल उचलले होते. 


संत तुलसीदास "सुंदरकांड" मध्ये सांगतात की सीतामाईचा शोध घेण्यासाठी हनुमंताने एकट्याने आकाशातून उड्डाण केले होते आणि त्याला त्यावेळेस जाणवले होते की हा समुद्र पार करणे खूप कठीण आहे कारण त्या सागरात अनेक मगरी , अजस्त्र मोठाले जलचर प्राणी, भोवरे , खडक आहेत. तसेच त्या सागरात निशाचरी नावाची मायावी राक्षसी राहत होती जी हवेतून उडणार्‍याची सावली पकडून त्याला गिळते त्यामुळे ह्या समुद्रात उडी मारून पोहून जाणे , नौकेने प्रवास करणे किंवा आकाश मार्गे हवेतून उडत जाणे कठीणच नाही तर अशक्य आाहे. परंतु हनुमंताचा आपल्या प्रभु श्रीरामांवर अढळ विश्वासही होता की माझ्या भगवंताच्या, माझ्या प्रभुच्या , श्रीरामांच्या नावाने अशक्य ते शक्य सहज होऊ शकते. ह्याच हनुमंतातच्या एकमेव विश्वासापोटी आपण पाहतोच की पाषाण सुध्दा समुद्राच्या पाण्यावर न बुडता तरंगतात. 

सामान्यत: विज्ञानाचा नियम पाहू जाता एखादी जड गोष्ट पाण्यात टाकली तर ती बुडते आणि हलकी गोष्ट पाण्यावर तरंगते. आता पाषाण म्हणजे तर मोठाले दगड किंवा शिळाच ! पण ज्या वेळी हनुमंत त्याच्या लाडक्या भगवंत प्रभु श्रीरामाच्या चरणांवरील प्रेमाने, भक्तीने पाषाणावर "रामनाम " लिहीतो तेव्हा मात्र विज्ञानाच्या नियमाला डावलून ते सर्व पाषाण समुद्राच्या पाण्यावर तरंगतात, एवढेच नव्हे तर श्रीरामांची कित्येक कोटी वानरसेना त्या सेतूवरून समुद्र पार करून लंकेला पोहोचली देखिल. ही असते भक्तीची ताकद, भगवंताच्या चरणांवरील विश्वासाचे सामर्थ्य !      
    
आता सेतू म्हणजे साध्या सरळ शब्दांत मांडायचे झाले तर दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या गोष्टींना जोडणारा दुवा ! 


रोजच्या जीवनातले सोपे उदाहरण बघायचे झाले तर लग्न म्हणजे वधू-वरांचे मिलन ! परंतु येथे फक्त नवरा मुलगा आणि नवरी मुलगी एवढे दोघेच जण एकत्र येतात , जोडले जातात असे नाही , तर मुलाचे कुटूंब, नातेवाईक, आप्त -मित्र परिवार आणि मुलीचे कुटूंब, नातेवाईक, आप्त -मित्र परिवार हे सगळेच ह्या नात्याने जोडले जातात . म्हणजेच म्हटले तर लग्न म्हणा वा विवाह हा दोन वेगळ्या , वेगळ्या भिन्न परिवारांना जोडणारा एक सेतूच असतो, नाही का ?

ह्या सेतूवरून एक गोष्ट आठवली. "साईसच्चरित सेतु" हा लेख "प्रत्यक्ष-मित्र" ह्या संकेत-स्थळावर वाचनात आला होता. श्रीसाईसच्चरित हा तर माझ्या अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय ! त्यामुळे अर्थातच मनात कुतूहल दाटले.    

साहजिकच ना आपल्या आवडीच्या विषयाबद्दल एखादा नवीन पैलू आढळला की कधी एकदा जाणून घेतो असे होते. हेच बघा ना माझ्या मनात सहजच प्रश्न आला की साईसच्चरित हा सेतू आहे म्हणजे नक्की काय असावे बरे? येथे लेखकाने असे मांडले होते की साईसच्चरित लिहीणारे हेमाडपंत आपल्याला सोप्या भाषेत समजावून देतात की भक्तीची एकाहून एक सुंदर अशी अनेक विलक्षण लक्षणे आहेत. पण तेच पुढे म्हणतात की समजा त्यातले एकही लक्षण आम्हाला समजले नाही तरी काही हरकत नाही कारण केवळ सदगुरुंच्या कथांचे स्मरण केल्याने म्हणजेच सदगुरुंच्या गोष्टी वारंवार आठवत राहिल्याने सुध्दा माणूस अगदी पाय न भिजवताही ह्या भवसागरातून पार जाऊ शकतो.
ऐंशी भक्तीचीं अनेक लक्षणें । एकाहूनि एक विलक्षणें । 
आपण केवळ गुरुकथानुस्मरणें । कोरडया चरणें भव तरूं ।। १०२  ।।   
                                                                                     - ( अध्याय १ , श्री साईसच्चरित ) 
भवसागर म्हणजे मानवाचे जीवन ! आपण सारे अनुभवतो की आपले मानवी जीवन किती नानाविध संकटांनी, वेगवेगळ्या समस्यांनी , दु:खांनी  भरलेले असते. म्हणूनच त्याला भवसागर म्हणतात.   

संत तुकाराम आपल्या अभंगात भक्तीचे हेच वर्म सांगतात की - 
तुका म्हणे सोपी केली पायवाट उतरावया भवसागर रे । 
सारे संतच आपल्याला भक्ती मार्गाचे हे महत्त्व आपापल्या परीने समजावून सांगतात की कोणत्याही मार्गांमध्ये भगवंताची वा सदगुरुंची भक्ती हीच सोपी आहे.  

हेमाडपंत ठामपणे सांगतात की फक्त सदगुरुंच्या गोष्टी सतत ऐकत राहून , सदगुरुंचे गुण गात राहून माणूस मात्र हाच भवसागर आरामात पाय ही न भिजवता ओलांडून जाऊ शकतो, कारण त्यावेळी तुम्ही एकटे नसता तर सदैव तुमची साथ देणारा सदगुरु हा तुमचा हात धरून तुमची सोबत करत असतो. त्याच्या संगे , त्याचे गुण गाता गाता, आनंदाने, नाचत , गात , बागडत तुम्ही एका तीरावरून दुसर्‍या तीरावर सुखरूप पोहचतो. 

समुद्र , सागर म्हटला की पाणी आले आणि त्यावर बांधलेल्या सेतूवरून जाताना पाय तर भिजणारच असे आम्हाला वाटते. पण साईसच्चरिताचे लेखक हेमाडपंत त्यांच्या सदगुरुंचा साईनाथांचा अगाध महिमा गाताना प्रेमाने सदगदीत होऊन सांगतात की एकदा का तुमचे हृदय सदगुरुंच्या प्रेमात भिजून गेले, तुम्हाला त्यांच्या तुमच्यावरील अगणित प्रेमाची जाणीव झाली ना की तुम्ही त्यांच्या चरणी आपला सर्व भार वाहून आनंदाने त्यांच्या बरोबर " प्रेमप्रवास " करतात. अर्थात ज्याचे हृदय सदगुरूंच्या प्रेमात ओले चिंब झाले त्याचे पाय कोरडे राहतातच पण ज्याचे हॄदय कोरडे राहिली, ज्याला सदगुरुंचे प्रेम कळले नाही त्याचे पाय तर भिजणारच , पण तो कधी समुद्रात गंटागळ्या खाऊन बुडेल ह्याची पण अनामिक भीती असतेच. 

वानरसैनिकांनी प्रभु रामचंद्राची आज्ञा पाळली, हनुमंताच्या सांगण्यावरून पाषाण उचलण्याचा पुरुषार्थ केला आणि पहिले पाऊल उचलले होते. आजच्या "रेडिमेड "च्या जमान्यात आम्हाला सगळे काही कमीत कमी कष्ट करून हवे असते , म्हणून हे जाणणार्‍या साईरामाने स्वत:च सेतू बांधून पण दिला आहे त्याच्या आपल्यावरील अपार प्रेमापोटी , मग आम्हाला कमीत कमी पहिले पाऊल उचलून सेतूवर तर ठेवायलाच हवे ना ?   

आपण बघतो की रामायणातील रामसेतूमध्ये वानरसैनिकांनी रामाची आज्ञा पाळली व हनुमंताचीही, हनुमंताने पाषाण आणायला सांगितले तेव्हा वानरसैनिकांनी ते उचलून नेण्याचा पुरुषार्थ तर केलाच , आणि पुढे हनुमंताने त्या पाषानावर स्वत:च्या हाताने राम नाम लिहून ते पाषाण परत समुद्राच्या पाण्यात टाकायला सांगितल्यावर तसेच आचरण केले. येथे वानरसैनिकांनी रामाची व हनुमंताची आज्ञा पाळली म्हणजे त्यांनी सांगितलेले काम जसेच्या तसे केले , मनात कोणताही किंतु , परंतु न आणता तसेच पाषाणावर राम नाम लिहून काय होणार, पाषाण समुद्रात टाकून ते तरंगणार कसे, ते जड पाषाण तर पाण्यात बुडून जातील अशा प्रकारच्या कोणत्याही स्वत:च्या मनातील विचारांना थाराच दिला नाही. माझ्या प्रभु श्रीरामांची , माझ्या हनुमंताची आज्ञा मी जशीच्या तशीच पाळली पाहिजे हाच त्यांचा दृढ निर्धार होता. त्या वानरसैनिकांना हे पूर्णपणे माहित होते की "युध्दकर्ता श्रीराम: मम समर्थ: दत्तगुरु मूलाधार साचार वानरसैनिकोsहम् रावणवध: निश्र्चित: " म्हणजेच माझ्यासाठी माझा श्रीराम युध्द करणार आहे (मला युध्द स्वत:ला करावेच लागणार नाही, माझा श्रीराम माझे संरक्षण करणार्च आहे हा दृढ विश्वास आणि निर्धार ), माझ्या रामाच्यामागे आमचा सर्वांचा मूळ आधार दत्तगुरु आहेतच उभे , मी फक्त मला सांगितले तेवढाच आचरणात आणणार , रावणाचा वध (माझ्या रामाकडून) निश्र्चितपणे होणारच आहे. 

अगदी तसेच, त्या वानरसैनिकांप्रमाणेच साईबाबांच्या भक्तांनी साईबाबांचा प्रत्येक शब्द आज्ञा म्हणून कोणत्याही परिस्थीतीत, वेळप्रसंगी जीवाची पर्वा न करता, स्वत:चा विचार न करता पाळली आहे श्रीसाईसच्चरितात ! त्यामुळे साईबाबांचे चरित हे फक्त साईबाबांचे चरित्र न राहता , त्यांच्या वरील त्यांच्या भक्तांच्या प्रगाढ विश्वासाचे, आज्ञापालनाचे प्रत्यक्ष आचरित बनते व हाच तो सेतू असतो ज्यावरून सदगुरु त्याच्या भक्ताला भवसागरात न बुडू देता एवढेच नव्हे तर साधे पायही भिजू न देता कोरड्या चरणांनी तारून नेतो असे "साईसच्चरित सेतु" सांगतो असे मला वाटते.        

अर्थात सदगुरु साईनाथ आपल्या भक्तांना कर्मस्वातंत्र्य संपूर्णपणे देतोच की ह्या "साईसच्चरित सेतु" वरून हा दुस्तर भवसागर स्वत: साईबाबांच्या सवे नाचत , गात , आनंदाने प्रेमप्रवास करत कोरड्या चरणांनी तरून जायचा की आपला आपण एकट्याने बुडण्याची भीती बाळगून करायचा त्याचे... साईबाबांसवे त्यांच्या भक्तांचा प्रेमप्रवास ह्यावरून स्मरला ती साईबाबांची चावडीची मिरवणूक - आपला बाबा, आपला साईनाथ आपल्या सोबत आहे ह्या परमोच्च आनंदाच्या उत्कट भावनेने प्रत्येक भक्त किती आनंदाने , तृप्तीने न्हाऊन निघाला आहे . 


हा सदगुरुं साईबाबासंगेचा त्यांच्या भक्तांचा प्रेमप्रवास पाहून निदान मला तरी वाटते सदगुरु साईबाबांनाच साईराम मानून , त्यांच्यावर माझा भार सोपवून , फक्त त्यांची आज्ञा पाळून ह्या "साईसच्चरित सेतु" वरून प्रेमप्रवास करण्यातील मजा काही न्यारीच असेल, आणि ती चाखायला तर नक्की हवीच...    

संदर्भ: 
१. श्रीरामरसायन 
२. प्रत्यक्ष -मित्र संकेतस्थळ - http://www.pratyaksha-mitra.com/
   
  

No comments:

Post a Comment

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog