Sunday 8 November 2015

धनत्रयोदशी व धनलक्ष्मीपूजन ( श्रीयंत्र पूजन )

धनत्रयोदशी म्हणजे आश्विन कृष्ण त्रयोदशी -दिपावलीचा दुसरा दिवस ! 
चला तर पाहू या धनत्रयोदशीच्या दिवसाचे माझे सदगुरु श्री अनिरुध्द बापूंनी सांगितलेले महत्त्व (दैनिक प्रत्यक्षच्या अग्रलेखातून) 
धनत्रयोदशी म्हणजे धनाच्या सन्मानाचा व धनलक्ष्मीच्या आणि कुबेराच्या पूजनाचा दिवस ! वेगवेगळ्या प्रकारे त्या त्या प्रदेशांतील रीतिरिवाजांनुसार विवीध प्रकारे ही पूजा वा पूजन केले जात असले तरी सर्वत्र पूजन केले जाते ते धनाचेच !  
धनत्रयोदशीला धनलक्ष्मीपूजन केले जाते आणि लक्ष्मीपूजनाला ऐश्वर्यलक्ष्मीपूजन केले जाते. धनलक्ष्मी व ऐश्वर्यलक्ष्मी ही एकाच लक्ष्मीमातेची दोन वेगवेगळी नामे आहेत, वेगेवेगळी रुपे तर नाहीत आणि वेगवेगळी दैवते तर मुळीच नाही. (जसे पार्वती आणि उमा ही दोन नावे वेगळी असली तरी ती मुळात भगवान शिव-शंकराची पत्नी आहे आणि ती एकच आहे, अगदी तसेच) 



धनत्रयोदशीच्या दिवशी घराघरांतून धनाचे म्हणजे संपत्तीचे पूजन केले जाते. धन म्हणजे नाणी, नोटा, आणि सुवर्णादि अलंकार . तसेच ह्या धनाबरोबरच मुख्यत्वे दीपाचे पूजन केले जाते. 
पूजा करताना लक्ष्मीमातेला अशी प्रार्थना करायची असते की , " हे लक्ष्मीमाते ! तू दिलेल्या ह्या संपत्तीचा मान आम्ही राखू, त्या संपत्तीचा विनियोग (उपयोग) आम्ही तुला आवडणार्‍या कामांसाठी करू, ही संपत्ती अशीच वाढत राहू दे, पण तुझ्या दिव्य प्रकाशाच्या तेजाने संपन्न होऊनच अर्थात पवित्र मार्गाने. 

आता धनाबरोबर दीपाचे पूजन का करायचे? 
दीप हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, तर विझवून उपडा ठेवलेला दीप हे अलक्ष्मीचे म्हणजेच अशुभाचे प्रतीक आहे. 
धनाबरोबर दीपाचे पूजन करायचे असते ते लक्ष्मीमातेला प्रार्थना करण्यासाठी की हे लक्ष्मीमाते ! आमच्या घरात येणार्‍या संपत्तीला तुझे म्हणजेच पवित्र लक्ष्मीमातेचे कृपाछत्र असावे. परंतु हे लक्ष्मीमाते तुझ्यासारखीच सर्व प्रकारची भौतिक संपत्ती देऊ शकणार्‍या, पण तृप्ती, शांती आणि भक्ती हिरावून घेणार्‍या (आम्हाला भक्ती , शांती आणि तृप्ती पासून दूर नेणार्‍या) अलक्ष्मीची छाया (सावली) सुध्दा आमच्या घरावर पडू देऊ नकोस. 

धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करायची असते ती धनलक्ष्मीची म्हणजे मानवी मनाच्या सर्व केंद्रांना उर्जा पुरविणार्‍या मूळ शक्तिस्त्रोताची व म्हणूनच त्या दिवशी घरातील धनाचे पूजन केले जाते व त्या पूजनासाठी ऋषींनी काही परंपरा घालून दिल्या आहेत. 


एक म्हणजे कुठल्याही घरात धनत्रयोदशीचे पूजन करताना किंवा लक्ष्मीमातेच्या मंदिरात तिचे दर्शन घेताना , मनात फक्त गेल्या वर्षभरात जे काही पवित्र व शुभ घडले तेवढेच आठवायचे असते. 
व दुसरा नियम म्हणजे धनाला किंवा लक्ष्मीमातेच्या प्रतिकांना फक्त सुगंधित फुलेच अर्पण करावयाची असतात व पूजनानंतर एका फुलाचा सुगंध प्रत्येक भक्ताने घ्यायचा असतो व हाच धनलक्ष्मीचा प्रसाद मानला जातो. 
सुगंध म्हणजे सौख्य आणि सुगंधित पुष्प म्हणजे पावित्र्य ही गोष्ट भारतीय मनाला पुरेपूर माहीत असते.

धनत्रयोदशीच्या दिवशी पूजन करताना आम्ही काय करावयास पाहिजे ह्याचे आम्हाला ह्या ऋषी-परंपरेने उचित मार्गदर्शन करून ठेवलेले आहे. केवळ शुभ व पवित्र विचार हीच लक्ष्मीमातेस,
धनलक्ष्मीस आवडणारी खरी सुगंधित फुले आहेत व ही फुले जो भक्त कमीत कमी ह्या दिवशी तरी लक्ष्मीमातेस अर्पण करतो, त्यास ही पुढील वर्षभर धनलक्ष्मी संपदायुक्त करीत राहते. 
जी फुले आपण धनलक्ष्मीस वाहिली , त्यातीलच एका फुलाचा सुगंध हा धनलक्ष्मीचा प्रसाद असतो हा नियम आम्हाला सांगतो की वर्षभरसुध्दा तुम्हाला धनलक्ष्मीचा सुगंधित प्रसाद हवा असेल तर ह्या जगन्मातेच्या चरणांवर दुर्गंधित फुले वाहण्याचे पहिल्यांदा बंद करा कारण जी फुले तुम्ही तिच्या पायांवर अर्पण कराल , त्यातीलच काही फुले तुम्हाला जीवनात प्रसाद म्हणून स्विकारावीच लागतात. 

धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वात श्रेष्ठ पूजन हे "श्रीयंत्रा"चे असते.


श्रीयंत्र म्हणजे "श्री " चे यंत्र. "श्री " चे घर. श्री म्हणजे "श्रीविद्या" , ललिता, महात्रिपुरसुंदरी षोडशी विद्या , कमाला, कामेश्वरी माता ही सर्व श्रॆविद्येचीच नावे आहेत.      
त्यातही षोडश (१६ प्रकारच्या ) उपासनांनी व जपांनी सिध्द केलेल्या महाश्रीयंत्राचे दर्शन सर्वात श्रेष्ठ मानले जाते. हे महाश्रीयंत्र हे आकाराने तर खूप मोठे असतेच परंतु मुख्य म्हणजे ते वर सांगितलेल्या १६ मार्गांनी सिध्द केलेले असावे लागते आणि तेही सिध्दस्पर्शानेच !
समजा एखाद्या माणसाकडे श्रीयंत्र नसेल तरी दु:खी होण्याचे किंवा घाबरून जायचे मुळीच कारण नाही की आता माझ्याकडे स्वत:चे श्रीयंत्र नाही तर माझे कसे होणार ? 
स्वत:कडे स्वत:चे श्रीयंत्र जरी नसेल तरी सुध्दा अशा सिध्द महाश्रीयंत्राच्या दर्शनाने व त्याच्या साक्षीने केलेल्या श्रीयंत्राच्या पूजनाने (दुसर्‍या व्यक्तीने केलेल्या ) सुध्दा त्या माणसास (ज्याच्याकडे स्वत:चे श्रीयंत्र नाही त्यास) धनाच्या सुरक्षिततेबरोबरच म्हणजेच संपत्तीबरोबरच आवश्यक असणारे शांती, तृप्ती व भक्तीचे दान सहजपणे मिळते (प्राप्त होते ).

धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्र पूजन हे महत्त्वाचे का आहे ? त्या मागे एक कथा आहे - 
ह्या मन्वंतरातील पहिले श्रीयंत्रपूजन केले होते दुष्य़ंत-शकुंतला पुत्र भरत ह्याने. धत्रत्रयोदशीच्याच दिवशी शौनक ऋषींनी भरताकडून श्रीयंत्राचे आलेखन व पूजन करवून घेतले होते. 
श्रीदत्तात्रेयांच्या " त्रिपुरारहस्य " ह्या ग्रंथानुसार ’ श्री ’ देवीची अर्थात श्रीलक्ष्मीमातेची तपश्र्चर्या करून शौनक ऋषींनी सर्व श्रध्दावानांच्या कल्याणासाठी , साक्षात श्रीदत्तात्रेयांच्या आशीर्वादाने व मार्कंडेय आणि अत्रि ऋषींच्या मार्गदर्शनानुसार ह्या विश्वातील पहिले श्रीयंत्र प्रत्यक्षात आणले.
भरताच्या वंशात जोपर्य़ंत हे पूजन केले जात होते तोपर्यंत ऐहिक संपत्तीबरोबर्च शांती, तृप्ती व भक्ती अविरत नांदत होत्या. परंतु मत्सगंधेच्या मोहाने कामांध झालेला शंतनु राजा तिच्या नादात, धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्राचे पूजन करण्यास तर विसरलाच आणि दर्शन घेण्यासही विसरला आणि पुढे तर ही प्रथा खंडितच (बंदच) झाली. येथेच महाभारताच्या विषण्ण आणि सूडचक्राने भरलेल्या प्रवासास सुरुवात झाली. 

पुढे महाभारताच्या निर्णायक युध्दानंतर भगवान श्रीकृष्णांनी परत एकदा धनत्रयोदशीच्या दिवशी अर्जुनाकडून श्रीयंत्राच्या उपासनेची प्रथा सुरु केली आणि कलियुगातील येणार्‍या वर्षांसाठी श्रध्दावानांना एक मोठे दालन उघडे करून दिले.  
अशा रीतीने भारतवर्षात धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्राचे पूजन करण्याची पूर्वापार चालत असलेली प्रथा पुन्हा सुरु झाली जी आजतागायत जपली जात आहे.   

धनत्रयोदशीच्या दिवशी ह्या सिध्द महाश्रीयंत्राच्या दर्शनाने आणि त्याच्या साक्षीने केलेल्या पूजनामुले माणसाला मिळणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीदीपाचा प्रकाश म्हणजेच धोका होण्याआधीच त्या जगन्माऊली लक्ष्मीमातेकदून मिळणारी संभाव्य धोक्याची पूर्वसूचना!   
आपण सर्वच जण समजू शकतो की प्रत्येक माणसाच्या जीवनात  संकटाआधी हे घडू शकणारे धोके कळणे किती आवश्यक आहे. 
अगदी साधे व्यवहारातले उदाहरण घ्या की एखाद्या ठिकाणी पाण्यात आपण अचानक पडलो आणि नाका-तोंडात पाणी जाऊन जीव गुदमरू लागल्यावर धोक्याची जाणीव झाली तर उपयोग काय? कारण माणूस आपण बुडणार किंवा मरणार ह्या भीतीनेच एवढा गारठून गेला असतो, व त्यातही पोहता जर येत नसेल तर आणखीनच भीती वाढते आणि मग अशा वेळी तो असहाय्य जीव (माणूस) धडपणे सारी ताकद एकवटून जीव वाचविण्याचा साधा प्रयत्नही करू शकत नाही. म्हणूनच संकटाआधीच धोक्याची पूर्वसूचना मिळणे खूप आवश्यक असते. 
धनत्रयोदशीच्या दिवशी केलेल्या महाश्रीयंत्राच्या पूजनामुले, दर्शनामुळे किंवा तेही काही कारणांमुळे न जमल्यास त्या महाश्रीयंत्राच्या रचनेतून सिध्द केल्या गेलेल्या त्याच्याच छोट्या प्रतिमांचे (लहान श्रीयंत्राचे - जे श्रध्दावान भक्त आपल्या घरी पूजनासाठी ठेवतात ) कमीत कमी आपल्या घरात पूजन करणे सुध्दा माणसाच्या खूप फायद्याचे आहे. 
      
आपल्या संस्थेद्वारे धनत्रयोदशीच्या दिवशी षोडश (१६ प्रकारच्या ) उपासनांनी व जपांनी सिध्द केलेल्या महाश्रीयंत्राचे पूजन केले जाते व श्रध्दावान त्याच्या दर्शनाचा लाभ ही (विनामूल्य) घेऊ शकतात. तसेच स्वत:च्या घरील श्रीयंत्राची प्रतिमा आणून निर्धारीत पूजन मूल्य भरून स्वत: पूजनही करू शकतात.   

सदगुरु श्री अनिरुध्द बापूंनी त्यांच्या सर्व श्रध्दावान मित्रांना आवर्जून सांगितले आहे की -
माझ्या लाडक्या श्रध्दावान मित्रांनो ! धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची व दीपाची पूजा निश्चितच करा , पण ह्या दत्तात्रेयप्रणित श्रीयंत्रास मात्र कधीच विसरू नका.   



चला तर मग धनत्रयोदशीच्या पुण्यप्रद पावन दिवशी आपण सारे जण गुरुभक्ती वाढविणारे, आई आल्हादिनीची प्रेमकृपा वृद्धींगत करणारे, षोडश ऐश्वर्याचा मार्ग सुलभ करून देणारे आणि सदगुरु श्री अनिरुद्धांनी सिद्ध केलेल्या श्रीयंत्राचे दर्शन व पूजन (अर्चन) करून महात्रिपुरसुंदरी आई आल्हादिनीची कृपा प्राप्त करुन घेऊ या.   

हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ 

संदर्भ - 
१. सदगुरु श्री अनिरुध्दबापूंच्या दैनिक प्रत्यक्ष मधील धत्रत्रयोदशी आणि धनलक्ष्मी ह्या अग्रलेखांवर आधारित
२. http://aniruddhabapu-dhanlaxmipoojan.blogspot.in


3 comments:

  1. बहुत ही सुंदर संकलन किया है आपने
    और बहुत ही मार्गदर्शक भी है हम अम्बादन्य है

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog