Tuesday 12 January 2016

आण्विक युध्द- अणुबॉम्बचे पुढचे पाऊल हायड्रोजन बॉम्ब!!!

७ जानेवारी २०१६च्या दैनिक प्रत्यक्षमधील एका बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले - उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी ! आणि जगात खळबळ उडविणार्‍या ह्या बातमीने हायड्रोजन बॉम्ब हा एवढा संहारक, अणु बॉम्बपेक्षा महाविनाशकारी का बरे मानला जात असावा ह्याची मनात अपार उत्सुकता दाटली.
  

उत्तर कोरियाने बुधवारी ६ जानेवारी २०१६ रोजी तेथील स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता अणुचाचणी केंद्रानजीक अणुबॉम्बपेक्षाही अधिक संहारक असलेल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याने, आंतरराष्ट्रीय सर्वच स्तरांवर प्रचंड खळबळ माजली आहे. ह्या चाचणीने उत्तर कोरियातील भूकंप केंद्राने ५.१ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद केली आहे. 

जागतिक शांतता धोक्यात आणल्यावरून उत्तर कोरिया हा फक्त जागतिक टीकेचा विषय बनला नसून त्याला आणखी कडक निर्बंधाना सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याआधी उत्तर कोरियाने २००६ , २००९ आणि २०१३ मध्ये अणु चाचणी घेतली होती. 

हायड्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा अधिक प्रमाणात संहार करण्याची क्षमता असलेला मानला जातो. उत्तर कोरियाने आपले आण्विक सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीने उचलेले हे पाऊल सर्व जगाला चिंता व्यक्त करण्यास का भाग पाडत आहे ? ह्या मागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करताना काही माहिती मिळाली ती देण्याचा हा प्रपंच !!

आता आपल्याला साहजिकच असे वाटू शकते की आपल्या सारख्या सामान्य माणसाला काय करायचे हे हायड्रोजन बॉम्ब किंवा अणु बॉम्ब असे  सगळे समजून घेऊन ? आणि दुसरे म्हणजे उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली आहे मग आम्हाला कशाला चिंता ?  

"तिसरे महायुध्द" हे डॉक्टर अनिरुध्द जोशी ह्यांचे पुस्तक वाचनात आले आणि लक्षात आले की आपला हा विचार किती चुकीचा असू शकतो. ह्या पुस्तकात आधुनिक शस्त्रास्त्रांची माहिती करून देताना डॉक्टर जोशी म्हणतात माहिती करून घेणे ह्याचा उपयोग नक्कीच आहे कारण अज्ञान हेच अनेक दुष्परिणाम घडू देते तर विज्ञान व माहिती अनेक दुष्परिणाम टाळू शकते.

आण्विक युध्द म्हणजे काय ?
जे युध्द आण्विक शस्त्रास्त्रांच्या सहाय्याने लढले जाते त्याला आण्विक युध्द म्हणतात. ह्या आण्विक युध्दामध्ये एक शस्त्र म्हणून अणुतंत्रज्ञान वापरले जाऊन अतिशय मोठ्या प्रमाणावर मानवी संहार केला जातो. आण्विक शस्त्र हे स्फोटक उपकरण आहे, ज्याचा वापर केल्याने अतिशय मोठ्य प्रमाणात अणुउर्जा निर्माण होते. दुसर्‍या महायुध्दाच्या काळात अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब "लिटील बॉय " याचा वापर जपानच्या हिरोशिमा शहरावर १९४५ साली केला , ज्यामध्ये १२.५ ते १५ टीएनटी एवढी उर्जा निर्माण झाली आणि ३ दिवसानंतर अमेरिकेने दुसरा अणुबॉम्ब " फॅट मॅन" जपानच्या नागासाकी शहरावर टाकला , ज्यामधून २० किलो टीएनटी एवढी प्रचंड उर्जा निर्माण झाली.

हिरोशिमा आणि नागासाकी मधील अपरिमित मानवी संहार व आर्थिक हानी आपणा सर्वांना चांगलीच माहित आहे. तपमानात वाढ आणि स्फोट ह्या इतर बॉम्बच्या परिणांमाशिवाय अणुबॉम्बचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वात भयंकर असा किरणोत्सर्गाचा परिणाम, जो स्फोटाच्या जागीच नव्हे तर स्फोटाच्या जागेपासून दूर असणार्‍यांनाही इजा पोहचवू शकतो. म्हणूनच अणुबॉम्ब , हायड्रोजन बॉम्ब ह्या सारख्या आण्विक अस्त्रांच्या युध्दामध्ये होणार्‍या वापराने संपूर्ण जग एका प्रकारच्या महासंकटाच्या छायेतच वावरत आहे.


अणु बॉम्ब , हायड्रोजन बॉम्ब , न्युट्रॉन बॉम्ब ही आण्विक बॉम्बची प्रगत स्वरूपे आहेत.  बॉम्ब हा परंपरागत प्रकारे रासायनिक प्रक्रियेवर आधारीत असायचा. पण सध्या वापरल्या जाणार्‍या स्मार्ट बॉम्ब पैकी आण्विक बॉम्ब हे अणुबॉम्ब किंवा हायड्रोजन बॉम्ब ह्या प्रकारचे असतात.      
  
ह्या अण्वस्त्रांची थोडक्यात माहिती करून घेऊ या -

अण्वस्त्रांचे प्रामुख्याने तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते. 
१.अणुबॉम्ब- यात युरेनियम-२३५ किंवा प्लुटोनियम-२३९ किंवा युरेनियम किंवा प्लुटोनियमच्या एखाद्या योग्य समस्थानिकाच्या अणुकेंद्रावर न्यूट्रॉन्सचा मारा केला जातो आणि अणूंचे विभाजन (Nuclear Fission ) केले जाते. त्यातून मोठय़ा प्रमाणात बाहेर पडणाऱ्या ऊर्जेने प्रचंड विध्वंस घडवून आणता येतो. 
अणुच्या एका विभाजनातून बाहेर पडणारी उर्जा ही जवळजवळ २०० लक्ष इलेक्ट्रॉन व्होल्टस एवढी प्रचंड असते. म्हणजेच १किलोग्रॅम युरेनियमच्या विभाजनातून बाहेर पडणारी उर्जा ही उच्च प्रतीचा ३५०० टन कोळसा जाळल्यावर निर्माण होणार्‍या उर्जे एवढी प्रचंड असते. 
२.हायड्रोजन बॉम्ब- यामध्ये अणुविभाजनाऐवजी अणुएकत्रीकरणाची प्रक्रिया केली जाते. 
हायड्रोजन बॉम्ब म्हणजे अणुंच्या एकत्रीकरणाने निर्माण झालेले शस्त्र - फ्युजन वेपन ( Fusion Weapon ) आहे. 
अणुउर्जानिर्मितीसाठी अणुविभाजनाच्याव्यतिरिक्त दुसरी प्रक्रिया वापरता येऊ शकते. अस्थिर अणुंच्या विभाजनाने उत्पन्न झालेली उर्जा वापरण्याऐवजी हलक्या मूलद्रव्यांचे एकत्रीकरण करताना बाहेर फेकलेली उर्जा वापरून अण्वस्त्रांची निर्मिती करता येऊ शकते हे शास्त्रज्ञांना लक्षात आले. अणुविभाजनाच्या उलट प्रक्रियेने म्हणजे हायड्रोजनसारख्या एकापेक्षा जास्त हलक्या अणूंच्या समस्थानिकांच्या (आयसोटोप्स ) अणुकेंद्राचे एकत्रीकरण करून तयार केलेल्या बॉम्बला हायड्रोजन बॉम्ब असे म्हणतात. 
या प्रक्रियेत विभाजनापेक्षा खूप अधिक ऊर्जा बाहेर पडते. त्यामुळे हायड्रोजन बॉम्ब वजनाच्या अणु बॉम्बपेक्षा १० हजार पट विनाशकारी असतो. 
३.न्यूट्रॉन बॉम्ब- हा सुधारित फ्युजन बॉम्ब , जे युध्दाच्या नवीन डावपेंचावर आधारित शस्त्र आहे, जे युध्द्भूमीचे प्रचंड नुकसान करू शकते, रणगाड्यांना छेदू शकते , संसर्गात येणार्‍या माणसांना व प्राण्यांना मारते, पण यातून दुय्यम किरणोत्सर्ग निर्माण होत नाही , त्यामुळे दूर अंतरावर असणारी माणसे व इमारती ह्यांना धोका पोहचत नाही. त्यामुळे वित्तहानी कमी होऊन प्राणहानी जास्त होते. 

आण्विक स्फोटाचे विध्वंसक परिणाम : 
आण्विक उष्णता ही सूर्याच्या पृष्ठ्भागावर असलेल्या उष्णतेच्या ५० पट अधिक असल्यामुळे त्याच्या कडे पाहिल्यास (मेगाटन क्षमतेचा स्फोट असेल तर शेकडो मैलांवरून सुध्दा ) डोळ्यांचा पडदा (रेटिना) जळून अंधत्व येऊ शकते. ही इजा बर्‍याच कारणांवर अवलंबून असते उदाहरणार्थ बॉम्बचा आकार, स्फोटाची उंची, वेळ, वातावरण इत्यादी.


हवेतील किंवा जमिनीवरील स्फोटातून उत्पन्न झालेल्या अग्नीगोलामुळे ( Fire ball ) मानवी त्वचेला जळण्याच्या गंभीर जखमा होऊ शकतात, ज्या स्फोटापासूनचे अंतर व बॉम्बची क्षमता ह्यावर अवलंबून असते. हिरोशिमा व नागासाकीमध्ये ८५ % जखमी लोक गंभीर दुखापत व जळलेल्या जखमांचे बळी पडलेले होते. 
आण्विक स्फोटानंतर अदृश्य स्वरूपातील किरणोत्सर्ग हा सर्व प्राण्यांसहीत मानवाला भयंकर धोकादायक आहे. त्यामुळे शारीरिक, मानसिक , एवढेच नव्हे तर आनुवंशिक परिणामसुध्दा होतात, जे अनेक पिढ्यांनाही भोगावे लागतात. 

अण्वस्त्रांची क्षमता मोजण्याची पद्धत ’ अण्वस्त्रांची क्षमता किलोटन किंवा मेगॅटन या एककात मोजतात. या पद्धतीत अण्वस्त्राच्या स्फोटातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेची तुलना ट्रायनायट्रोटोल्यून (टीएनटी) या पारंपरिक स्फोटकाच्या स्फोटातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेशी केली जाते. ’ एक किलोटन क्षमतेच्या अण्वस्त्राच्या स्फोटातून १००० टन टीएनटीच्या स्फोटाइतकी ऊर्जा बाहेर पडते. ’ एक मेगॅटन क्षमतेच्या अण्वस्त्रातून एक दशलक्ष टन टीएनटीच्या स्फोटाइतकी ऊर्जा बाहेर पडते. ’ 

आजच्या बॉम्बची क्षमता शेकडो मेगॅटनपर्यंत वाढली आहे. त्यांच्या वापरातून पृथ्वीचा कित्येक वेळा विध्वंस होऊ शकतो. 

अण्वस्त्रांचा इतिहास आणि प्रसार -
जगातील पहिल्या अणुबॉम्बची चाचणी अमेरिकेने न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात १६ जुलै १९४५ रोजी घेतली. या मोहिमेचे नाव ट्रिनिटी असे होते. त्याच्यासोबत बनवलेले आणखी दोन बॉम्ब ‘लिटल बॉय’ आणि ‘फॅट मॅन’ म्हणून ओळखले जातात आणि ते ६ ऑगस्ट १९४५ व ९ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकण्यात आले. 
सोव्हिएत युनियनने २९ ऑगस्ट १९४९ रोजी त्यांच्या पहिल्या अणुबॉम्बचा स्फोट घडवला. 
अमेरिकेने १ नोव्हेंबर १९५२ रोजी पहिला हायड्रोजन बॉम्बस्फोट घडवला. तर सोव्हिएत युनियनने १२ ऑगस्ट १९५३ रोजी पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली. त्यानंतर अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन हे देश प्रमुख अण्वस्त्रधारी देश म्हणून उदयास आले आणि त्यांच्याकडील अण्वस्त्र भांडारात हजारो बॉम्ब आहेत. त्यानंतर भारत, पाकिस्तान आणि इस्रायल यांनीही ही क्षमता मिळवली. नुकत्याच यशस्वीरीत्या केलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीनंतर आता उत्तर कोरिया हा देश ह्यात सहभागी झाला आहे. 

१९८० च्या दशकात अनेक अण्वस्त्रांची निर्मीती करण्यात आली. पण नंतरच्या काळात एन.पी.टी. करार ( Non -Proliferation Treety ) अण्वस्त्रबंदी करार केला गेल्याने त्यांना नष्ट करण्यात आले असे सांगितले जात असले तरी पण सर्वच देश त्याला बांधील नाहीत. 

संदर्भ : १. तिसरे महायुध्द - डॉक्टर अनिरुध्द धैर्यधर जोशी 
           २. आपत्कालीन व्यवस्थापन - लोटस पब्लिकेशन प्रायव्हेट लिमीटेड व अनिरुध्दाज ऍकॅडमी ऑफ                                डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 
           ३. दैनिक प्रत्यक्ष - ७ जानेवारी २०१६
           ४. http://www.mirror.co.uk/news/world-news/north-korea-nuclear-test-what-7124919




4 comments:

  1. Ambadnya Suneetaveera. One more thing I would like to add here. Through Aniruddha's Academy of Disaster Management too have learnt about Nuclear Wars ( under Man Made disasters).
    Dr Aniruddha Joshi's Book on " Third World War too flashes on this Topic. We, common people never think of these things in detail. But now its high time each one needs to keep oneself updated.
    Ambadnya for your detailed information.

    ReplyDelete
  2. As said by bappa world will get polarize in 2016. i think it has been started with hydrogen bomb test. It will be biggest impact on international level.

    ReplyDelete
  3. the explanation about the different bombs is explained in easy terms. The bombs are amassed as a deterrent but in a highly charged polarized situation the line gets crossed over easily. Though N Korea has done the test now, the H Bomb is already there with couple of countries much before.



    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog