Saturday 9 January 2016

अंतराळ युध्द - आधुनिक शस्त्रात्रे आणि प्रभाव !

नुकत्याच दैनिक प्रत्यक्ष मध्ये वाचनात आलेल्या एका बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले होते ती बातमी होती - चीनच्या राष्ट्राध्यक्षांकडून लष्कराला सज्जतेचे आदेश. काय विशेष असे होते या बातमीत? तर सैनिकांची संख्या कमी करण्याबरोबर पुढील पाच वर्षात चीनच्या लष्कराच्या अद्ययावतीकरणावर भर देण्यात येणार असून यामध्ये अंतराळ युध्दाची तयारी म्हणून ’स्पेस फोर्स’ तयार करण्यात येणार आहे. 



हे वाचल्यावर अंतराळ युध्द म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्याची मनात अपार जिज्ञासा दाटली. त्या वाचनातून हाती आलेली काही माहिती येथे देण्याचा प्रयत्न करीत आहे.
 
सर्वसामान्यपणे आपल्याला युध्द म्हटले की वाटते की जे देशाच्या सीमांवर खेळले जाते , ज्यात भूदल, नौदल आणि हवाई दलाचा समावेश असतो असे युध्द ! शक्यतो युध्दामध्ये एका देशाचे सैन्य हे दुसर्‍या देशाच्या वा शत्रू देशाच्या सैन्याशी रणागणांवर लढते अशी संकल्पना असते. त्यामुळे बहुतांशी सागरी युध्द, वाळवंटी युध्द आणि आधुनिक पध्द्तीची शस्त्रास्त्रे वापरून म्हणजे जैविक यु्ध्द, रासायनिक युध्द , आण्विक युध्द हे प्रकार ऐकीवात असतात. मग साहजिकच प्रश्न पडू शकतो की अंतराळ युध्द म्हणजे नक्की काय असू शकते?

आपण वसुंधरेवर म्हणजेच आपल्या पृथ्वीतलावर जन्म घेतलेले मानव प्राणी केवळ आपल्यापुरते, कुटुंबापुरते, देशापुरते व अखेरीस आपल्या राहत्या पृथ्वीपुरते विचार करत असतो किंवा बघत असतो. अर्थात याला काही अपवादही असतातच जसे संशोधक,शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ जे पृथ्वीच्या पलीकडील विश्वाच्या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असतात. एवढ्या मोठ्या विश्वात पृथ्वीवर आपण फक्त एकटेच मानव आहोत का? की आपल्यासारखे किंवा दुसर्‍या कोणत्याही इतर प्रकारची माणसे अजून कोणत्या इतर ग्रहांवर राहतात का?  याचा शोध घेतला जातो आणि त्यातूनच पृथ्वीसारखे वातावरण अन्यत्र कुठे दिसून येते का याचाही शोध घेतला जातो. जशी आपली सूर्यमाला आहे, आपली आकाशगंगा आहे  तशा इतरही काही त्या पलिकडे कोट्यावधी आकाशगंगा आहेत, सूर्यमाला आहेत, व अशा अनंत कोटी ब्रम्हांडानी हे अज्ञात अंतराळ पसरले आहे. अशा शोधांतून मानवाला अनंत कोटी ब्रम्हांड नायक हे परमेश्वराचे बिरूद म्हणा वा विशेषण किती सार्थ आहे ह्याचीच जणू काही प्रचिती मिळते आणि अशा अनंत अथांग अंतराळाचा वेध घेणे किती कठीण असेल असे सकृतदर्शनी वाटते खरे ! परंतु तरी देखिल ह्या अनंत अथांग अंतराळाच्या पसाऱ्यात आपण मानव एखाद्या मातीच्या कणा इतुकेसे लहान दिसत असलो तरी या अनंत अवकाशाचा वेध घेण्याची व ते जाणून घेण्याची कुवत पृथ्वीवरील मानवात "त्या"च परमेश्वराने दिली आहे हे ही तितकेच सत्य आहे हे विसरून चालत नाही आणि म्हणूनच चंद्र, मंगळ अशा विवीध उपग्रहांवर मानव अथक परिश्रमाने, संशोधनाद्वारे जाऊन पोहचला आहे हे सत्य नाकारून चालत नाही. आता कोणाला वाटेल की चंद्र, मंगळ हे आपल्या सूर्यमालेचे भाग आहेत. पण संशोधनांती असे आढळले आहे की  आपल्या सूर्यमालेच्या बाहेर अंतराळात उपग्रह सोडले जाऊ शकतात. 

अनेक दशकांपूर्वीपासूनच म्हणजे १९५७ साली अमेरिका व रशिया ह्यांनी अंतराळात आपले पहिले सॅटेलाईट लॉंच करून अंतराळाच्या शर्यतीचा जणू श्रीगणेशा केला होता त्यानंतर २४ एप्रिल १९७० रोजी डॉनफेंगहोंग-१ ह्या सॅटेलाईट्ला अवकाशात लॉंच करून चीनने अंतराळ क्षेत्रातील आपले पदार्पण केले होते.  

भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक आणि शिल्पकार असलेल्या डॉक्टर विक्रम साराभाई ह्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आपल्या भारताने १९७५ मध्ये आर्यभट्ट हा पहिला अंतरिक्ष उपग्रह अवकाशात सोडला होता ज्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली गेली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले आहेत ज्यामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.

आता आपण बघू या की अंतराळ युध्द म्हणजे काय? 

डॉक्टर अनिरुध्द जोशी ह्यांच्या "तिसरे महायुध्द" ह्या पुस्तकात वाचनात आले होते की जेव्हा युध्दातील हल्ल्याचे लक्ष्यस्थान हे अंतराळात असते तेव्हाच त्याला ’अंतराळ युध्द’ असे म्हणतात. परंतु उपग्रहांद्वारे शत्रूच्या जमिनीवर हल्ला करण्याच्या पध्द्तीस मात्र अंतराळ युध्द म्हणून गणले जात नाही. 
अंतराळ युध्दाचे प्रामुख्याने दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते -
१. शत्रू देशाच्या उपग्रहावर जमिनीवरून हल्ला करणे.
२. शत्रूराष्ट्राच्या उपग्रहांवर आपल्या स्वत:च्या उपग्रहांद्वारे हल्ला करणे.
शीतयुध्दाच्या काळात अमेरिका व रशिया ह्या दोन देशांनी उपग्रहांच्या क्षेत्रात लक्षवेधी प्रगती करून प्रचंड कार्यक्षमतेचे व खूप मोठ्या प्रभाव क्षेत्रांचे उपग्रह अवकाशात सोडले एवढेच नव्हे तर अवकाशजहाज, अवकाशप्रयोगशाळा स्थापन केल्या होत्या. ह्या उपग्रहांच्या सहाय्याने पृथ्वीच्या कुठल्याही प्रदेशातील एक लहानशी झोपडीसुध्दा शोधून काढली जाऊ शकते व मग रडार यंत्रणेच्या सहाय्याने त्या स्थानाचा क्षेपणास्त्राद्वारे वेधही घेता येऊ शकतो.  
ह्याचे उदाहरण म्हणजे इराकमधील अल-झरकावी व त्याच्या गटावर केला गेलेला हल्ला. ह्यात नेमकी ही मंडळी बसलेली बिल्डींग उडविता आली होती त्या ह्याच तंत्रा द्वारे ! 

अंतराळ युध्दासंबंधी अजून उद्बोधक माहिती आपण "तिसरे महायुध्द " ह्या पुस्तकातून वाचू शकता.  
  
सध्या अंतराळात अमेरिका , रशिया ,चीन अशा विवीध देशांचे हजारो कम्युनिकेशन उपग्रह फिरत आहेत. या उपग्रहांची मुदत संपल्यानंतर ते अंतराळात भरकटतात. त्यांचा मोठा फटका विद्यमान उपग्रहांना बसू शकतो. इ.स १९६३ मध्ये अमेरिकेने अवकाशामध्ये स्वत:च्याच एका अकार्यक्षम उपग्रहाला आण्विक क्षेपणास्त्राद्वारे उडविले व त्याचा अवकाशातील विद्युतचुंबकीय क्षेत्रावर होणारा परिणाम अभ्यासला होता. त्यवेळेस अवघ्या अडीच मिनीटांत अमेरिकेचे ३० व रशियाचे २६ कार्यक्षम उपग्रह निकामी झाले होते. 

त्यानंतर जानेवारी २००७ मध्ये चीनने पृथ्वीपासून साडे आठशे किलोमीटर अंतरावर असणार्‍या आपल्या अका जुन्या व अकार्यक्षम उपग्रहाला मिसाईल वापरून नष्ट केले होते आणि जगाला फार मोठा धक्का देऊन हादरविले होते. ह्यातून पृथ्वीवरचे युध्द आकाशापर्यंत पोहचविण्याची स्वत:च्या अवाढव्य क्षमतेचेच जणू काही चीनने जगाला प्रदर्शन करून दाखविले होते. चीन स्वत:ला महाशक्ती म्हणून सिध्द करण्याच्या इर्शेने पेटून उठला होता. काळाची चक्रे मात्र वेगळाच संकेत देत होती. आंतर महाद्विपीय अग्नी ५ ह्या क्षेपणास्त्राच्या यशस्वीतेने भारतासाठी अंतराळ युध्दातील नवीन सामर्थ्यवान शक्ती बनण्याचे दारे उघडली होती. पृथ्वीच्या वातावरणाच्या सुमारे ६०० किलोमीटर उंचीपर्यंत जाणार्‍या अग्नीच्या उड्डाणाने ८०० किलोमीटर च्या त्या लक्ष्याला आपल्या आवाक्यात आणले , जे आपल्या उपग्रहांच्या सुरक्षिततेच्या व दुसर्‍या उपग्रहांना निशाणा बनविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जाते. ह्याचे प्रत्यंतर नजीकच्या काही घटनांवरून लक्षात येऊ शकते असे वाटते. रशियाने सिरीयावर केलेल्या हल्ल्यांमध्ये अंतराळ सामर्थ्याचा  (Space Power )वापर केला असा दावा काही विश्लेषक करत आहेत.

तसे पहाता आपला भारत हा अग्नी-५ च्या यशस्वी मोहिमेपूर्वी अंतराळ मोहिमांसाठी अमेरिका, रशिया, फ्रान्सवर अवलंबून होता. त्यामुळे भारताने या मोहिमांसाठी स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित करण्यास प्रारंभ केला. अग्नी-५ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर या संशोधनाला २०१४ मध्ये मोठे यश मिळाले. आंतरध्रुवीय मोहीम, क्रायोजनिक इंजिनची चाचणी, अवजड रॉकेटची चाचणी आदी तांत्रिक आघाड्यांवर इस्त्रोने कमाल केली. परंतु अंतराळातील प्रगतीमुळे भविष्यात ‘स्पेस वॉर’ होण्याची भीती निर्माण झाली असून तसे युद्ध होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याची गरज खुद्द माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी व्यक्त केली आहे ह्यावरून अंतराळ युध्दाचे गंभीर भयावह परिणाम असू शकतात ह्याची शक्यता नाकारता येत नाही. 

गेल्या दोन दशकांपासून संरक्षण क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक करीत चीनने अवाढव्य लष्करी साम्राज्य उभारले आहे. परिणामी, भविष्यात ज्या राष्ट्राशी त्याचे युद्ध होईल, ते केवळ एका विशिष्ट प्रदेशापुरते अथवा पारंपरिक शस्त्रास्त्रांपुरते मर्यादित राहणार नाही. आधुनिक युद्धतंत्राचा प्रभावीपणे अविष्कार दाखविण्याची संधी चीन साधून घेईल. कोणत्याही युद्धात यशस्वी होण्यासाठी सैन्यशक्ती, लष्करी सामग्री, योग्य रणभूमी, युद्ध डावपेच, घेराव पद्धती, पुरवठा व्यवस्था हे घटक महत्त्वाचे ठरतात. त्याकरिता आधुनिक प्रणालींची सांगड घालून चीनने खास व्यवस्था केली आहे. ह्या गोष्टींचा सारासार विचार करता पारंपरिक युद्धाबरोबर अंतराळ युध्दासारखी आधुनिक शस्त्रास्त्रे वापरून युद्धाची भक्कम तयारी करण्यामागचा मुख्य रोख हा शत्रूला लढाईपूर्वीच निष्प्रभ करण्यावर आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्धतंत्रात शत्रूची संपर्क व्यवस्था बंद पाडण्याची क्षमता त्यापैकीच होय. संपर्क व्यवस्था बंद पडली तर आपोआप लष्कराच्या हालचालींवर मर्यादा येतील. या माध्यमातून शत्रूचे मनोधैर्य खच्ची करण्याचे नियोजन त्यात अंतर्भूत आहे. तसेच शत्रूराष्ट्राचे टेहळणी व माहिती दळणवळण व्यवस्थेचे उपग्रह चीन उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राद्वारे भेदू शकतो. युद्धकाळात उपग्रह नष्ट केला गेला तर त्याचे विपरित परिणाम केवळ लष्करी क्षेत्रालाच नव्हे, तर नागरी क्षेत्राला सहन करावे लागतील याचे भान ठेवणे अत्यंत निकडीचे आहे.  

ह्या पार्श्व भूमीवर अंतराळ युध्दाच्या तयारी हेतूपूवक स्पेस फोर्समध्ये चीनने समावेश केलेली आण्विक विस्फोटकांनी सुसज्ज केलेले दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे, इलेक्ट्रोनिक संघर्ष पथक ह्यांची गंभीर रीत्या दखल घेणे जरूरीचे वाटत आहे. त्यामुळेच चीनच्या राष्ट्राध्यक्ष जिनपिंग ह्यांनी "स्पेस फोर्स" शीघ्रतेने कार्यान्वित करण्याचे आदेश हे "तिसर्‍या महायुध्दाच्या" दिशेने घडत असणार्‍या वेगवान घडामोडींची जबरदस्त नांदी असावी असा कयास बांधला जात आहे.  
   
सध्याची "स्पेस-फोर्स"ची चीनची स्थापना ही अंतराळ युध्दाची जोरदार तयारी असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. चीनची अंतराळ युध्दाची तयारी ह्यावर चीन सरकारचे मुखपत्र असणार्‍या "ग्लोबल टाईम्स " वरील आणि चीनी दैनिक"झिनुआ" वरील माहिती "प्रत्यक्ष-मित्र" च्या चीन के राष्ट्राध्यक्ष द्वारा सेना को तैयार रहने के आदेश ह्या लेखातून वाचायला मिळाली आणि अंतराळ युध्दाचे महत्त्व किती व्यापक पातळीवर प्रभावशील असू शकेल ह्याची जाणीव झाली. 

संदर्भ: 

6 comments:

  1. प्रत्यक्ष मित्र आणि डॉ. अनिरुद्ध जोशींनी लिहीलेल्या "तिसरे महायुद्ध" ह्या दोन अथांग महासागराची सांगड अतिशय सहजतेने घालून, अंतराळ युद्धाविषयीची सखोल माहिती पुरविल्याबद्दल सुनिताजी तुमचे मनःपुर्वक आभार. अंतराळ युद्ध म्हणजे काय असते, हे तुमच्या लेखावरुन समजले.

    ReplyDelete
  2. It's a very informative book. One should have it and study it. Ww3 started already.

    ReplyDelete
  3. Ambadnya Suneetaveera for the informative updates. Dr Aniruddha Joshi's " Third World War" is indeed the best guide for one & all. He has very nicely penned down, the deep & vast history. Got to learn many new things from his "The Third World War".
    Hari Om

    ReplyDelete
  4. Third world war punha vachavese vatat ahe...baryach goshtinchi ukal tumchya lekhatun milat ahe.. ambadnya a lot.

    ReplyDelete
  5. "जेव्हा तीसरे महायुद्ध आणि आमचा काय सम्बन्ध ?"असा प्रश्न विचारताना काहिजन दिसतात तेव्हा सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी " नेहमी आपले डोके आपल्या खांद्यावर ठेवूनच विचार करावा " हे सांगितलेले बोल आठवतात .
    जार आपला देश सुरक्षित असेल तरच आपले कुटुंब सुरक्षित राहणार आणि आपले कुटुंब सुरक्षित असेल तेव्हाच आपण सुरक्षित राहू शकतो .

    आता "तिसरे महायुद्ध " हा आपणास सद्गुरु श्री अनिरुद्धान्नी म्हणजेच डॉ अनिरुद्ध जोशींनी दिलेला ग्रन्थ आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करणारा वाटाड्या ठरत आहे .
    म्हणून ज्यांनी कोणी हां ग्रन्थ वाचला नसेल त्यांनी जरुर वाचावा .
    परत परत वाचत राहने ही आजच्या कालाची गरज आहे .
    सुनीतावीरा यांनी ह्याबद्दल परत आठवून करुन दिल्याबद्दल अम्बज्ञ .

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog