Sunday 3 January 2016

क्रांतिसूर्य जोतिबांची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले !!!!



एक मेणबत्ती हजारो मेणबत्त्या प्रज्वलित करू शकते आणि तरी तिला तिचे स्वत:चे आयुष्य कधीच उणे भासत नाही " 
महात्मा गौतम बुध्द ह्यांचे हे उद्गार वाचताना डोळ्यासमोर साकारते ती क्रांतिसूर्य जोतिबांची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ! 

जोतिबा फुले हे आधुनिक भारताचा शिक्षणाचा पाया रचणारे क्रांतिसूर्य तर त्यांच्या कार्यात खांद्याला खांदा लावून निरंतर सावली बनून ५० वर्षांहून अधिक काळ त्यांना अविरत साथ देणारी सहचारिणी , कार्यकर्ती अशा सर्व भूमिका समर्थपणे पेलणारी सावित्रीबाई फुले म्हणजे क्रांतिज्योतीच होय !



स्त्री शिक्षण औषधालाही नसलेल्या, स्पृश्य- अस्पृश्य अशा किळसवाण्या जातीयवादाच्या जोखडाने भरडलेल्या, अज्ञानाने रंजल्या-गांजलेल्या पीडित समाजाच्या काळात सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी जानेवारी ३, इ.स. १८३१ रोजी लक्ष्मीबाई व खंडोजी नेवसे पाटील ह्या दांपत्याच्या पोटी झाला. लहानपणी सावित्रीबाई एक इंग्रजी पुस्तक कुतूहलाने चाळत असताना पाहून, आपली मुलगी शिकायचा प्रयत्न करत आहे हे पाहून त्यांच्या वडिलांचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी ते पुस्तक सावित्रीबाईंच्या हातातून हिसकावून खिडकीबाहेर फेकून दिले आणि त्यांना दरडावले देखिल की भविष्यात त्यांनी शिकायचा विचार केला आणि प्रयत्न जरी केला तर ते त्यांना महागात पडेल. ह्या वरून त्या काळच्या समाजातील स्त्रियांच्या केविलवाणी परिस्थितीचे विदारक चित्र डोळ्यांपुढे तरळून जाते आणि नकळत नयनांत पाणी दाटते. पण परिस्थितीला शरण जातील तर त्या सावित्रीबाई कसल्या? त्यांनी वडिलांच्या नकळत ते पुस्तक परत आणून घरात लपवून तर ठेवलेच पण निश्चयही केला एक न एक दिवस ते पुस्तक मी जरूर वाचीनच ! 

सावित्रीबाईंजवळ विलक्षण चिकाटी होती, परिस्थितीवर मात करण्याचे शौर्य, असामान्य धडाडी होती, पण ह्या गुणांना पैलू पाडून मूळच्या हिर्‍याचे तेज झळावणारा तसाच जवाहिर हवा होता. भगवंताने तसेच झुकते माप देऊन आपल्या ह्या वीरांगनेच्या कर्तृत्वाला झळाळी देण्याचा जणू मनसुबा रचला होता आणि १८४० साली वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह झाला, तेरा वर्षांच्या ज्योतिबांशी ! आणि वयाच्या दहाव्या वर्षी सावित्रीबाईंनी आपल्या पतीच्या ज्योतिबांच्या मदतीने शिक्षणाचा श्रीगणेशा केला, अक्षरओळख करून त्या साक्षर झाल्या. ज्योतिरावांच्या मनातील स्त्रियांच्या शिक्षणाच्या विचारांना पालवी फुटली आणि सावित्रीबाईंना त्याला खतपाणी घालून आपल्या अथक , महान कार्याने ह्या महान दांपत्याने भारतात स्त्री शिक्षणाची साक्षात गंगोत्री अवतरविली. अर्थातच सावित्रीबाईंचा त्यात सिंहाचा वाटा होताच. 

एकोणविसाव्या शतकाच्या मध्यात ज्या वेळी भारतासारख्या रूढीवादी परंपरा असणा-या देशात स्त्रीला समाजात 'चूल आणि मूल ' एवढेच स्थान होते, समाजात स्त्रीला कोणताही दर्जा नव्हता अशा वेळी तिला शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले.  पुण्यात शिक्षणाची सोय नव्हती म्हणून जोतिबांनी १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या शाळेत काम करण्यासाठी सावित्रीबाईंची शिक्षिका म्हणून नेमणूक केली. तीन जुलै १८५१ रोजी पुण्याच्या भिडे वाडय़ात जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सावित्रीबाईंच्या सहकार्याने ज्योतिबांची स्वप्ने बहरत होती आणि मग स्त्री शिक्षणाचा वारू चौखुर उधळावा ह्या ध्येयाने प्रेरीत होऊन त्यांनी आपली स्त्री शिक्षणाची चळवळ अधिक गतिमान करण्याचे ठरवल्यानंतर देखिल त्यांना सावित्रीबाईंनी हिरीरीने अखंड साथ दिली.

स्कॉटिश ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी चालवलेली मुलींची एक शाळा पुण्यात अहमदनगर येथे होती, ज्यात जवळपास दहा मुली शिकत होत्या. पण, ती ख्रिश्चनांची असल्याने चालू शकली नाही, असे जोतीरावांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी नमूद केले आहे. ज्योतीरावांनी अहमदनगर येथील या शाळेला भेट दिली. त्या शाळेतील शिक्षणपद्धती पाहून ते खूश झाले. पण याच शाळेतील मिस फॅशर बाईंनी भारतातील स्त्रीशिक्षणाच्या अनास्थेबद्दल काढलेले उद्गार ऐकून ते व्यथित झाले होते. आपल्या पतीला प्रेरीत करण्याच्या उद्देशाने सावित्रीबाईंनी कंबरच कसली होती जणू काही! तेव्हा स्त्रियांनी कसे शिकावे ह्याचा वस्तुपाठ घेण्यासाठी त्या काही काळ अहमदनगरला जाऊन देखिल राहिल्या होत्या.

विद्या हे धन आहे रे। श्रेष्ठ सा-या धनाहून
तिचा साठा जयापाशी। ज्ञानी तो मानती जन॥ 
ह्या मताच्या सावित्रीबाईंनी पुढे स्त्रीशिक्षणाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. घरच्या-दारच्या विरोधाला न जुमानता पतीसमवेत त्यांनी स्त्रीशिक्षणाचा ‘जागर’ सुरू केला. शिक्षणाच्या निमित्ताने समाजाच्या अगदी जवळ गेलेल्या सावित्रीबाईंना त्यांच्या व्यथा-वेदनांची उत्तम जाण होती. जोतिराव व सावित्रीबाईंना स्वत:चे अपत्य नव्हते पण दीनदुबळ्यांना, अनाथांना व विशेषत: दलित समाजाला जवळ करून सावित्रीबाईंनी पोटाच्या मुलांप्रमाणे प्रेम केले. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या कार्यात उत्तम साथ दिली.  सर्व टीका,छळ सहन करून समाज सुधारण्याचे काम करताना पदोपदी अग्नीपरीक्षाच जणू द्याव्या लागत. जोतीबा फुले आणि सावित्रीबाईंचे शिक्षणाचे पवित्र कार्य चालू असतांना, त्यांच्या ह्या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न तथाकथित समाजातील धर्ममार्तंडानी तर केलाच होता, पण घरातूनही प्रखर विरोध केला तो जोतीरावांच्या वडिलांनी ! त्यांच्या समाज सुधारण्याच्या कार्यामुळे धर्माला काळिमा लागेल, बेचाळीस पिढया  नरकात जातील असे त्यांचे समज होते. ह्याचा उद्रेक म्हणजे तर शेवटी जोतिराव व सावित्रीबाईंना नेसत्य वस्त्रानिशी घर सोडावे लागले होते. पण सावित्रीबाई आपल्या कार्यापासून तसूभरही ढळल्या नाहीत की जोतिरावांना साथ द्यायला डगमगल्या नाहीत.

संत चोखामेळा मंदिरात त्या उभयतांनी आपल्या दीन-दलित बांधवांसाठी शाळा काढली. सावित्रीबाईंच्या या कार्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांचा गौरव केला होता. असा मान त्याकाळी कोणालाही मिळाला नव्हता , ह्यावरून सावित्रीबाईंच्या अफाट सामर्थ्याची झलक पहावयास मिळते.

सावित्रीबाईंनी जे विचार मांडले ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले. अध्यापनाचे काम करत असतांना त्यांचा नातेवाईकांनी, समाजाने, सनातन्यांनी अतोनात मानसिक आणि काही प्रमाणात शारीरिक छळ सुध्दा केला. रस्त्यातून जात असतांना त्यांना लोकांकडून शिवीगाळ तर होतच असे पण त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे भिरकावण्यात येत, घरातील कचरा त्यांच्या अंगावर टाकण्यात येई. पण सावित्रीबाईंना मात्र कशाचीच तमा नव्हती, उलटपक्षी त्या लोकांनी सत्काराची फुले उधळल्यासारखीच त्या गोष्टी मानाच्या समजून घेत असत. हे सर्व ओंगळवाणे प्रकार घडूनही त्यांचे मनोधैर्य जराही ढळले नाही तर उलट त्यातूनच त्यांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी जबरदस्त प्रोत्साहन मिळत असे.एकदा शाळेत जात असतांना चौकातील गुंडांनी सावित्रीबाईंचा रस्ता अडवून ,"मुलींना आणि महार-मांगाना शिकवणे तू बंद कर नाहीतर तुझी अब्रू शाबूत  राहणार नाही" अशी धमकी दिली. हे ऐकताच सावित्रीबाईंनी त्याला चपराक लगावली होती असे वाचनात आले. ह्यावरून सावित्रीबाई अशा संकटांना तोंड देण्यास कशा सरसावल्या होत्या आणि किती खंबीर होत्या हे सिध्द होते.

अर्थातच परिणामस्वरूप त्यांच्या मुलींच्या शाळेत मुलींची संख्या हळूहळू वाढू लागली. पुण्यात त्या काळात हा चर्चेचा विषय झाला होता. या कार्यामुळे समाजात सावित्रीबाईंचा दरारा निर्माण झाला होता. सावित्रीबाई म्हणजे असामान्य साहस, विलक्षण चिकाटी व करारीपणा, संयमाची धीरोदात्त मूर्तीच जणू !


त्याकाळी दादासाहेब पांडुरंग तर्खडकर हे सरकारी-देशी शाळांचे पर्यवेक्षक असतांना, त्यांनी सावित्रीबाईंमुळे फार थोड्या वेळात शाळेने चांगली प्रगती केली हे भूषावह आहे असा शेरा दिला होता , जो सावित्रीबाईंच्या कार्याची जाणीव करून देण्यास पुरेसा आहे.एवढेच नव्हे तर पुढे १८५२ साली सावित्रीबाईंचा एक प्रगल्भ शिक्षिका म्हणून सरकार दरबारी सन्मान सुध्दा झाला होता. 

त्या काळात स्त्रियांना भीषण रूढी , प्रथांनाही तोंड द्यावे लागत असे. विधवा महिलांचे केशवपन होत असे कारण विधवा स्त्रीने संन्यासिनीसारखे जीवन जगावे अशी रूढी होती. विधवा स्त्रीला अपशकुनी समजले जात असे. तिला पांढरे वस्त्र परिधान करावे लागत असे. त्यांना घरात कोंडून ठेवले जात असे हे स्त्रियांचे दुख सावित्रीबाईंनीनी जवळून पहिले होते. केशवपनाची दृष्टप्रथा नष्ट झाली पाहिजे असे त्यांना वाटे, पण लोक ऐकत नव्हते म्हणून जोतीबा आणि सावित्रीबाईंनी सर्व न्हाव्यांची सभा बोलावली.  आपण आपल्या भगिनींवर वस्तरा चालवितो हे मोठे पाप आहे याची जाणीव करून दिली. न्हाव्यांना त्याची जाणिव झाली आणि त्यांनी पाठिंबा दिला. त्याचबरोबरीने सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधकगृह सुरु केले. बाल-विधवांचे दुखः त्यांनी जाणले होते, स्त्रीभ्रूण हत्याही सर्रास घडत असे म्हणून बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले.


ज्या काळात अस्पृश्यांची सावली पडल्यानेही आम्ही अशुध्द होतो असा खोटा दंभ मिरवणारी कर्मठ, दांभिक समाजात वावरत होते, तहानेने व्याकुळ जीवाला केवळ तो अस्पृश्य म्हणून पाणी नाकारले जायचे अशा समाजात अस्पृश्यांसाठी जोतिबा-सावित्रीबाईंनी आपल्या घरातील पाण्याची विहीर पहिल्यांदा खुली केली आणि त्यानंतर सार्वजनिक पाण्याचे हौद खुले केले. किती प्रखर जनक्षोभ उफाळला होता ? पण करारी बाण्याचे हे दांपत्य अडिग राहिले. पुढे इ. स. १८९३ साली सत्यशोधक  समाजाचे मोठे अधिवेशन सासवडला भरले होते त्याच्या अध्यक्षा सावित्रीबाई होत्या. त्यात त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले. 

आपल्या कार्याची यशस्वी घोडदौड करताना आपल्यातील कवयित्री मनालाही सावित्रीबाईंनी तेवढ्याच सुजाणपणाने जपले होते. वयाच्या अवघ्या तेवीस-चोवीसाव्या वर्षीच, १८५४ साली प्रकाशित झालेल्या व दलित साहित्याला वाहिलेल्या "काव्यफुले" ह्या पहिला काव्यसंगहातून,  शूद्र व अतिशूद्रांना हीन दर्जाची वागणूक देणा-या कर्मठांच्या विरोधात उभे ठाकलेल्या सावित्रीबाईंचे क्रांतिकारी विचार भेटीस येतात. या कविता संग्रहाच्या मुखपृष्ठावर ‘रचयित्री सावित्री जोतीबा’ असा उल्लेख असून खालच्या एका कोप-यात ‘मि. छा.’ अशी अद्याक्षरे आहेत. ती प्रकाशक राजश्री जोतीबा आणि ‘मिशनरी छापखाना’ यांची निदर्शक असावीत असे वाटते. 
निसर्गाच्या सान्निध्यात रमणार्‍या ह्या कवयित्रीच्या भावतरल मनाचे चित्रण म्हणजे एका रंगीबेरंगी फुलपाखरावर जीव ओतणा-या मुग्धकलिकेचे भाव टिपताना सावित्रीबाई लिहीतात - 
आपुलकीने खुणवी त्याला
मार्गप्रतीक्षा करते त्याची
ये तू धावत फुलपाखरा
मनात चिंती कळी फुलांची॥
झेप घेऊनी फुलपांखरू
तिच्या जवळी बसे मजेने
भारावलेली मधुकलिका
ओढून घेई उत्कटतेने ...
सावित्रीबाईंची दुसरी काव्यसंपदा ‘बावनकशी सुबोध रत्नाकार’ १८९२ साली प्रकाशित झाली. त्यात त्यांनी केवळ जोतीरावांचे चरित्र ग्रंथित केले नसून आर्याच्या आगमनापासून थेट पेशवाईपर्यंतच्या स्थित्यंतराचा इतिहास सुध्दा शब्दबद्ध केला आहे ह्याचे प्रत्यंतर येते. आपल्या कवितेच्या माध्यमातून अनिष्ठ रूढी-परंपरांना डागण्या देणारी सावित्रीबाईंची मनोवृत्ती खूपच मनाला भावते -
ऐसी संधी आली नव्हती हजार वर्षे रे
मुलाबाळांना आपण शिकवू आपणसुद्धा शिकू
विद्या घेऊनी ज्ञान वाढवून नीतीधर्म शिकू
नसानसातून इर्षा खेळवू विद्या मी घेईन
कणाकणातून ज्ञान वेचायला शिकवणा-या आपल्या पती जोतिबांचा सावित्रीबाईंच्या जीवनपद्धतीवर खूप मोठा प्रभाव होता. त्या आपल्या पतीबद्दलची निष्ठा, प्रेम व्यक्त करताना काव्यसुमनातून लिहीतात, ज्यात सदैव समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र जागृत राहून आपला देह अखंड झिजवणार्‍या आपल्या  पती जोतीबांच्यावरील अपार श्रद्धाही दिसते ....
काळरात्र गेली । अज्ञान पळाले॥
सर्वा जागे केले। सूर्याने या॥
शूद्र या क्षितिजी। जोतीबा हा सूर्य॥
तेजस्वी अपूर्व। उगवला॥



१८५४ सालीच अस्पृश्यांचा उध्दार करणार्‍या , त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी अविरत राबणार्‍या आपल्या पती जोतीरावांना ‘ज्ञानसूर्या’ची उपमा देऊन सावित्रीबाईंनी त्यांच्या महानतेची प्रचिती केवळ भारतालाच नव्हे तर सर्व जगाला करून दिली.
स्वामी जोतीबांच्या। लागे मी चरणी
त्यांची गोड वाणी। मनी घुमे
महार मांगाची। करते मी सेवा
आवडीच्या देवा। स्मरूनिया
एका समाजक्रांतिकारकाच्या सहवासात काढलेली अखंड ५० वर्षे ही त्याचीच फलश्रृती असावी , नाही का?
सावित्रीबाईंच्या "कर्ज" नावाच्या निबंधातील विचार आजही आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहेत असे मला वाटते -
सण साजरे करण्याकरिता आणि कर्मकांड पार पाडण्याकरिता कर्ज घेणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे कारण त्याने तथाकथित परलोक सुधारणार तर नाहीच उलट कर्जात बुडाल्यामुळे हा जन्म , हे जीवन पण वायाच जाईल. त्यापेक्षा तुम्ही भरपूर मेहनत करा, चांगले शिक्षण घ्या आणि चांगले काम करा. 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले ह्यांच्या महान कर्तृत्वाबद्दल उद्गार काढतात की मला नेहमीच आश्र्चर्य वाटते की भारतात सावित्रीबाई फुले ह्यांचा जन्मदिवस "शिक्षक दिन" म्हणून का साजरा होत नाही ? , जिने तळागाळातील दीन-दुबळ्यांसाठी पहिली शाळा काढली आणि जी स्वत: पहिली स्त्री शिक्षिका होती. 
ब्रिटीश साम्राज्याला दखल घेण्यास भाग पाडणारी असामान्य अशी ही पहिली भारतीय स्त्री -सावित्रीबाई फुले- जिच्यावर ब्रज रंजन मणि आणि पामेला सरदार ह्यांनी "A Forgotten Liberator : The Life and Struggle of Savitribai Phule” हे पुस्तक आणि "क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले "हे एम. जी. माली ह्यांनी पुस्तक लिहीले आहे.

इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीर विक्रय करणार्‍या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगाच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी स्वत:च्या जीवाची तमा न बाळगता प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊ लागल्या. प्लेगाच्या रोग्यांची सेवा करताना दुर्दैवाने सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातच १० मार्च १८९७ रोजी या क्रांतिज्योतीने अखेरचा श्वास घेतला.

भारत सरकारने सावित्रीबाई फुले ह्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ १० मार्च १९९८ रोजी पोस्टाचा स्टॅम्प प्रसिध्द केला होता.



दिव्यत्व , क्रातीज्योत ही कधीच मालवत नाही , मालवू शकतच नाही 
दिव्यत्त्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती ....
सावित्रीबाईंचा हा स्त्री -शिक्षणाचा वसा आज आम्हा भारतीय स्त्रियांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवून देता झाला आणि समाजात मानाचे स्थान देता झाला आहे , अशा ह्या क्रांतिज्योतिला मन:पूर्वक मानाचा सलाम !
अखिल भारतीय स्त्री ही सदैव तुझी ऋणी राहील  ह्या तुझ्या आभाळामायेस्तव तुझ्या चरणी … 

संदर्भ:
१. काव्यफुले - सावित्रीबाई फुले
२. बावनकशी सुबोध रत्नाकार - सावित्रीबाई फुले
३. "A Forgotten Liberator : The Life and Struggle of Savitribai Phule” - By Braj Ranjan Mani & Pamela Sardar
४. क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले - एम. जी. माली
५. ‘First Lady’ Teacher of India: Savitribai Phule - By Dr. B. R. Ambedkar


  

4 comments:

  1. Suneetaji tumche lekh khup abhyaspurn asatat. Mahiti dhabdhabyasarkhi osandun vahat aste. Savitribaina tumhi dolyasamor aanun ubhe kelat. Ek sundar lekh.

    ReplyDelete
  2. खरोखरीच सावित्री बाई फुले ह्या प्रत्येक काळातील समस्त स्त्री वर्गासाठी आदर्श आहेत आणि संपूर्ण स्त्री वर्ग नेहमीच त्यांचा ऋणी राहिलं .
    तुमचे खूप आभार एवढी महत्तवपूर्ण आणि वाचनात कमी येणारी माहिती आमच्यापर्यंत पोहचवलीत

    ReplyDelete
  3. Ambadnya Sunitaveera..Sanjaysinh very true..Savitribai samor ubhya rahilya..Savitribaini Stree jivanache kharya arthane sankraman kele....vishay khupach abhyaspurn tasech unique ahe..amha sarv streeysnchya jivanat savitri bai zopalelya hotya.....pan tumchya lekhane te punrujjiwit kele....Ambadnya a lot.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog