Wednesday 27 January 2016

सत्यसंकल्प प्रभु - सुंदरकांड - अद्वितीय प्रेमप्रवास !

सुंदरकांड पठण करताना माझे मन नेहमी ’राम सत्यसंकल्पप्रभु सभा कालबस तोरी।’ ह्या ओवीभोवती घुटमळायचे. खरेच परमात्मा हा जेव्हा जेव्हा मानव रुपात ह्या वसुंधरेवर म्हणजेच आपल्या ह्या पृथ्वीतलावर अवतरतो तेव्हा किती अपार कष्ट सहन करतो आणि आम्हाला "त्या"च्या लेकरांना सत्य, प्रेम, आनंद ह्या त्रिसूत्रीला आचरून मर्यादा पुरुषार्थ कसा साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टीतून असो वा नातेसंबंध जपताना असो आचारणात आणावयाचा ह्याचे उत्तम उदाहरण देऊन वास्तववादी आदर्शच घालून देतो जणू ह्याची प्रकर्षाने जाणीव झाली.

                                                           

रावणाच्या भरदरबारात त्याचा सख्खा भाऊ बिभीषण हा त्याला श्रीराम प्रभुंच्या पत्नी सीतामाईंना आदरपूर्वक परत पाठविण्याचा व आपल्या राक्षस वंशाचा समूळ संहार होण्यापासून रोखण्याचा यथोचित सल्ला देतो. तेव्हा अंहकाराने उन्मत्त झालेला, रागाने बेभान झालेला रावण बिभीषणाला लाथेने धुडकावतो, तेव्हा श्रीरामांच्या स्वभाव वैशिष्ट्याचे, गुणसंकीर्तन करताना बिभीषण उद्गारतो की  हे रावणा, माझे प्रभु श्रीराम हे सत्यसंकल्प प्रभू आहेत आणि तुझी सभा ही काळाने ग्रासलेली आहे.

राम सत्यसंकल्प प्रभु आहे असे बिभीषण रावणाला सांगतो कारण राम हाच एकमेव सत्यसंकल्प आहे , अर्थात फक्त रामाचाच संकल्प सत्यात परिवर्तित होऊ शकतो. ह्या अखिल जगतात जेव्हा काहीच नव्हते , तेव्हा परमेश्वराने केवळ "त्या"च्या " एकोsस्मी बहुस्याम " ह्या संकल्पनेनुसार सर्व जग उत्पन्न केले, म्हणजेच ज्याने केवळ स्वत:च्या कल्पनेच्या सहाय्याने अवघे विश्व उत्पन्न केले, त्या परमात्म्याची कल्पनाशक्ती ही एक शक्ती आहे. त्यामुळे फक्त "त्या" एकाचाच संकल्प सत्यात उतरतोच उतरतो. आम्ही मानव आहोत , आम्हाला मानवांना हे जाणून घ्यावे लागते की कल्पनाशक्तीच्या सहाय्याने आम्हाला क्षणिक आनंद मिळू शकतो, परंतु आम्हाला खराखुरा नित्य आनंद, वास्तविक सुख, खरे वैभव, खरी ताकद, खरे बळ ह्या क्षणभंगुर कल्पनेतून नाही मिळू शकत. त्यासाठी परमात्म्याने आम्हाला निरीक्षण शक्ती दिली आहे  आणि तिच्या सहाय्याने आम्ही प्रयत्न करून , पुरुषार्थ करून आम्हाला हवे ते उचित प्रकाराने मिळवू शकतो. 

संत रामदास स्वामी सांगतात की " केल्याने होत आहे रे , आधी केलेचि पाहिजे " आणि " यत्न तो देव जाणावा , अंतरी धरिता बरे " 

माणसाचे मन हे संकल्प-विकल्पात्मक असते. माणसाच्या मनात जसे संकल्प येतात तसे विकल्प पण येतात. आपल्याला माहित असते की Action and reaction are equal but opposite.  म्हणजेच क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या नेहमी एक्मेकाच्या विरूध्द असतात आणि दोन्ही समान बलाच्या असतात. म्हणूनच जेव्हा आपल्या मनात आपण एखादा संकल्प करतो , तेव्हा त्याच्या विरूध्द दिशेला तेवढ्याच ताकदीचा विकल्प सुध्दा उभा राहतो आणि म्हणूनच आपला संकल्प कधी सत्यात उतरू शकत नाही. 

अगदी साधी साधी उदाहरणे बघायची झाली तर आपण नवीन वर्ष सुरु होताना प्रत्येकजण किती चांगले चांगले संकल्प करतो. कोणी म्हणते मी रोज सकाळी उठून १ तास चालायला जाईन ज्याने माझे आरोग्य सुधारेल. कोणी संकल्प करतो की मी रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करेल , सायकल चालवेन किंवा एखाद्या व्यायामशाळेत किंवा जिम मध्ये जाईल, कोणी ठरवते की मी पहाटे उठून अभ्यास करेन.

हे सर्व संकल्प चागल्याच हेतूने केले जातात खरे, पण पुढे आपल्याच आळसापोटी किंवा निष्काळजीपणाने काही दिवसातच आपले संकल्प बारगळतात एखाद्या फुग्यातून हवा निघून गेल्याप्रमाणे, आणि आपले पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी गत होते.

तेच आपण परमात्मा राम म्हणा किंवा कृष्ण किंवा साईनाथ ह्यांच्या जीवनात बघतो तेव्हा आढळते की त्यांनी केलेला कोणताच संकल्प कधीच अर्धवट राहत नाही, अपूर्ण राहत नाही, तो संकल्प नेहमीच पूर्ण होतोच होतो.

आता हेच बघा ना श्रीरामाच्या पित्याने राजा दशरथाने कैकयीला वचन दिले की मी तुझ्या पुत्राला भरताला राज्यगादीवर बसवेन आणि रामाला चौदा वर्षे वनवासासाठी पाठवेन. जरी हे वचन पिता दशरथाने दिले असले तरी पित्याचे वचन पाळण्याचा श्रीराम प्रभू संकल्प करतात आणि मग त्याच्या आड आलेली प्रत्येक गोष्ट ते ठाम निश्चयाने दूर करतात. स्वत:चा होणारा राज्याभिषेकाचा मोह त्यांना अडवू शकत नाही की स्वत:च्या माता कौत्सल्येचे अश्रू त्यांना आपल्या निश्चयापासून परावृत्त करीत नाही. अयोध्या सोडल्यानंतर श्रीरामांच्या विरहाने व्याकुळ होऊन राजा दशरथ आपले प्राण त्यागतो ,पण तरीही श्रीराम आपल्या पित्याच्या निधनाने सुध्दा आपल्या संकल्पापासून तसूभरही ढळत नाही. प्राणाहून प्रिय असलेल्या  पत्नी जानकीला वनवास भोगावा लागेल, किंवा अयोध्येला परत नेण्यासाठी हट्ट धरून आलेला भरत असो कोणतीच गोष्ट श्रीरामांना अडवू शकत नाही की रोखू शकत नाही. त्यानंतर राक्षस्राज रावण श्रीरामांच्या पत्नीचे सीतेचे अपहरण करतो, तरीही श्रीराम बंधू लक्ष्मणासह सीतेचा शोध घेतात आणि वानरराज सुग्रीवाला हाताशी धरून लंकेवर आक्रमण करतात. वाटेत अक्राळविक्राळ समुद्र पसरला असताना सुध्दा श्रीराम हताश होऊन माघारा फिरत नाही. युध्दात एकदा तर रावणाच्या बाणाने श्रीरामांचा प्राणाहूनही अधिक प्रिय असलेला बंधू लक्ष्मण हा मूर्च्छीत होऊन पडतो, संजीवनी बुटी मिळाल्याखेरीज लक्ष्मणाचे प्राण वाचणे केवळ अशक्य असते तरीही श्रीराम अविचल राहतात. सरतेशेवटी रावणाला युध्दात मारून , चौदा वर्षांचा वनवास संपवून मगच परत अयोध्येला माघारा येतात.
येथे जाणवते की एकाहून एक भयंकर संकटे श्रीरामांच्या जीवनात पण आली होतीच , तरी देखिल "त्यांचा" संकल्प हा सत्यात उतरलाच....कारण "तो" एकमेव परमात्माच सत्यसंकल्प प्रभू असतो.            
परमात्मा रामाच्या संकल्पाला विरोध करणारी किंवा करू शकणारी कोणतीच शक्ती अस्तित्वात नव्हती किंवा नाही असे जरी प्रथम दर्शनी  दिसले तरीही प्रत्यक्षात श्रीरामांनाही विरोधाला तोंड द्यावेच लागले होते. पण परमात्मा हाच सत्यसंकल्प आहे कारण  "त्या"च्या इतका समर्थ दुसरा कोणीच नाही. परमेश्वराशिवाय इतर दुसरा कोणी शक्तीशाली असूच शकत नाही आणि म्हणूनच "तो" अनिरूध्द -अनेन रूध्दती इति अनिरूध्द: - ज्याला कोणी रोखू शकत नाही, ज्याला कोणी अडवू शकत नाही असा एकमेवाद्वितीय तोच "तो" असतो. म्हणूनच परमेश्वराच्या शक्तीला आव्हान देणारा, विरोध करणारा कोणी असूच शकत नाही. म्हणूनच केवळ आणि केवळ , फक्त आणि फक्त "त्या" एकाचाच संकल्प सत्यात उतरू शकतो आणि अन्य कोणाचाही नाही. 

श्रीसाईसच्चरितात ग्रंथविरचिते हेमाडपंत हेच सत्य अगदी पहिल्या अध्यायापासून आम्हाला अतिशय सोप्या कथांमधून , अत्यंत सुंदर प्रकाराने समजावून सांगतात. पहिल्या अध्यायात साईनाथ गहू दळायला बसतात. साईनाथ म्हणजे साक्षात ईश्वर - प्रत्यक्ष परमात्मा - मानव रूपात अवतरलेला सगुण देहधारी सदगुरु ! खरेतर हा साईनाथ सहजसिध्द आहे, तरीही "तो" मानव रूपात अवतल्यामुळे मानवी देहाच्या सर्व मर्यादांचे पालन करतोच. साईबाबांना गव्हाचे पिठ पाहिजे , तर ते सामान्य माणसा सारखे गहू दळायला बसले आहेत. ते कुठेही जादूचे खेळ करून हवेतून हात फिरवून गव्हाचे पिठ काढत नाहीत, किंवा कोणत्याही इतर हातचलाखी , हातकौशल्याने आपोआप पिठ कढत नाहीत. मानवी मर्यादेचे संपूर्णत: पालन करून जसे सामान्य माणूस गहू दळून पिठ काढेल , अगदी तसेच साईनाथ स्वत" जात्यावर दळून गव्हाचे पिठ काढतात. 


माणूस एखादे कार्य करताना त्याच्या मनात त्या कामाची मला काय फळे मिळतील, माझा कसा काय फायदा होईल असे नाना प्रकारच्या कल्पना उठतात, ज्या फलाशा असतात. माझ्या कर्माचे मला काय़ फळ मिळेल ह्या भावनेत माणूस अडकून पडतो. पण जेव्हा काम करताना माणसाच्या मनात परमेश्वराचे नामस्मरण असेल तर ते फलाशेच्या मोहात फसत नाही. साईनाथ सदैव मुखाने त्यांच्या परमेश्वराचे "दत्तगुरुं"चे नाव घेत , कार्य करीत त्यामुळे त्यांचे प्रत्येक कार्य हे फलाशेविरहीत होते आणि ते "सहजसिध्दाची " सहज लीला बनून बाहेर पडते. 

साक्षात हनुमंत महाप्रभू त्यांच्या स्वत:च्या महान आचरणातून सुंदरकांडात हेच सप्रमाण दाखवतात की फक्त श्रीरामांचे , स्वगुरुंचे नाम घेत, नि:स्वार्थ वृत्तीने, निरपेक्ष प्रेमाने केलेली कृती हा जीवनाचा प्रेमप्रवास घडविण्याचा एकमेवाद्वितीय सोपा उपाय आहे.

"प्रत्यक्ष-मित्र" ह्या वेबसाईटवरील "श्रीसाईसच्चरित अध्याय १ (भाग १३) सत्यसंकल्प के स्वामी साईनाथजी" हा भाग वाचून परमेश्वराचे "सत्यसंकल्प " स्वरूप कसे कार्य करते ते अधिक चांगल्या प्रकारे उमगले. कोणत्याही फलाशेच्या मोह्जालात न फसता, निव्वळ नि:स्वार्थ, निरपेक्ष भावनेने परमेश्वराला स्मरून केलेले कोणतेही पवित्र कार्य हे सत्य संकल्पात सहज उतरू शकते आणि हे फक्त "त्या" सहजसिध्दालाच "त्या"च्या सहजलीलेद्वारे साध्य करता येते आणि म्हणून "तो" एकमेवच सत्यसंकल्प-प्रभू असतो , हे मनोमनी १०८ % पटले. म्हणून लक्षात आले की माझ्या जीवनातील संकटरूपी महामारीचा विनाश करायला आणि आपले संकल्प सत्यात उतरवायला ह्या "सत्यसंकल्प प्रभू " असणार्‍या श्रीरामाला म्हणा वा श्रीकृष्णाला वा स्वामी समर्थांना वा साईबाबांना मला प्रेमाचे , विश्वासाचे आमंत्रण देऊन बोलवायलाच पाहिजे की  हे माझ्या साईरामा, अनिरुध्द रामा तू माझ्या हृदयसिंहासनावर सत्वर (लवकर लगबगीने) येऊन बस आणि माझ्या जीवनाचा राजाधिराज बनून माझ्या जीवनात आमरण विराजमान हो.  
             
 संदर्भ: 
 १. श्रीसाईसच्चरित 
 २. सुंदरकांड - संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासविरचिते  
 ४. सदगुरु डॉक्टर अनिरुध्द जोशी ह्यांचे श्रीरामरक्षेवरील २९जून २००६ रोजीचे प्रवचन            
   

2 comments:

  1. खुप सुंदर विवेचन. अंबद्य

    ReplyDelete
  2. खूपच सूंदर मांडले आहे.. 'तो' एकच सत्यसंकल्प असतो.. ह्याचे खुप छान उदाहरणं तुम्ही सुंदरकांड व्दिअ श्री रामांच्या आचरणातून मांडले आहे..

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog