Friday 1 January 2016

भगवंताची भाषा शिकून चला भगवंताशी नाते जोडू या ....

आज नवीन वर्षाला सुरुवात झाली. सर्वचजण एकमेकांना नव-वर्षाच्या शुभेच्छा देण्यात गुंग असतात. नवीन वर्ष म्हणजे नवीन आशेचा सूर्योदय ! नवीन ध्येयाचा, नवीन सुबत्तेचा , नवीन विचारांच्या धारेचा , नवीन सळसळत्या चैतन्याचा, नवीन जोशाचा ,नवीन ताकदीचा , नवीन सामर्थ्याचा , नवीन आविष्कारांचा , नवीन प्रार्थनांचा एक गुलदस्ताचा जणू ! ह्या शुभेच्छा , प्रार्थना आणि सदिच्छांतून अवघे प्रेमच अव्याहतपणे भरभरून वाहत असते. पण ह्या सर्वाचा मूळ स्त्रोत असणारा भगवंत , परमेश्वर ह्याची आम्हाला आठवण येते का ? आम्ही "त्या" अनंत करूणामयी परमेश्वराला, भगवंताला "त्या"नेच हे सारे आम्हाला दिले म्हणून कधीतरी कृतार्थ भावाने धन्यवाद देतो का? कधीतरी आभार मानतो का? तर कदाचित उत्तर देणे कठीण होऊन बसेल नाही? आम्हाला "त्या" भगवंताची स्मृती तरी असते का? हाच मुळात प्रश्न आहे, चला तर मग आज नवीन वर्षाच्या औचित्याने "त्या" भगवंताशी नाते जोडायला शिकू या ... 

आता कोणाशी नाते जोडायचे म्हणजे मला त्या व्यक्तीशी संवाद साधायला हवा आणि संवाद तर तेव्हाच साधता येतो जेव्हा मला त्या व्यक्तीला माहीत असलेल्या भाषेत बोलता येते किंवा मला ठाऊक असलेली भाषा त्या दुसर्‍या व्यक्तीला पण माहीत असते. आता येथे तर साक्षात भगवंताशीच मला नाते जोडायचे आहे म्हटल्यावर मला भगवंताची , परमात्म्याची भाषा येते का? हा प्रश्न उद्भवतो साहजिकच, नाही का बरे? 

आम्ही साईसच्चरितात वाचतो की कृष्णाचे वचन " संत माझ्या सचेतन मूर्ती ! " म्हणजेच संत ह्या परमात्म्याच्या, भगवंताच्या सचेतन मूर्ती आहेत. आणी "जे जे पिंडी ते ते ब्रम्हांडी " ह्या न्यायाने प्रत्येक मानव हा कितीही पापी असो की पुण्यवान असो, त्या परमात्म्याची अंशत: मूर्ती असतोच. आम्ही जर परमात्म्याचे अंश आहोत तर परमेश्वराने , त्या भगवंताने आमच्या पित्याने आम्हाला त्याची सगळी ताकद कमी-अधिक प्रमाणात दिलेली आहेच. म्हणजेच आम्हाला "त्या" परमात्म्याची, परमेश्वराची, त्या भगवंताची भाषा नक्कीच समजू शकते , जर आम्ही त्या दिशेने प्रयास केले तर !!! 

आम्हाला कधी प्रश्न पडला की परमेश्वराला कुठली भाषा कळते. तो एकच राम वा तो एकच कृष्ण वा तो एकच साई , मग त्याला आम्ही मराठीतून आळवतो, गुजराती मधून आळवतो, तमिळ , कन्नड , मल्याळी, बंगाली मधून आळवतो तरी सगळ्यांची भाषा "त्या"ला पोहचतेच ना, सारे काही "त्या" ला कळतेच ना ? कारण ती असते "प्रेमाची" भाषा ! 

रामाचे, कृष्णाचे, साईबाबांचे भक्त वेगवेगळ्या भाषा बोलणारे होते आणि आज ही आहेत, तरी सगळ्यांची भाषा "त्या" ला कळतेच. हे "त्या"चं वैशिष्टय आहे. ही "त्या"ची विशेषता आहे. पन मग आम्हाला "त्या"ची भाषा कळते का? परमात्म्याची, "त्या" प्रेमळाच्या प्रेमळ , दयानिधीची भाषा शिकणे हेच सगळ्यात विशेष आहे माणसासाठी असे मला वाटते.         

परमेश्वराने आम्हाला "त्या"ची भाषा दिलीय, वाणी (वाचा - बोलण्याची देणगी) दिलीय आणि त्या परमेश्वराची भाषा शिकायची सोयही करून ठेवलीय. पण आम्ही कधी तिचा वापर करतो का? 



येथे मला आठवली ती भगवंत श्रीकृष्णाने करंगळीवर गोवर्धन गिरीधारी पर्वत उचलला ती कथा ! मला वाटते ही कथा आम्हाला नीट समजून घ्यायला हवी. करंगळीवर गोवरधन पर्वत उचलला म्हणजे नक्की काय ? ही करंगळी भगवंताने प्रत्येक मानवाला दिलेली आहेच, तिचाच वापर "तो" करून दाखवतो -"गोवर्धनासारखा पर्वत मी उचलू शकतो, तुम्हा सगळ्यांना , माझ्या लेकरांना, भक्तांना आसरा देण्यासाठी, पण कधी तर तुमची काठ्या लावायची तयारी असेल तरच?

आपल्या हाताला पाच बोटे असतात. करंगळी सोडून प्रत्येक बोटाचा उपयोग आपण करत असतो, तर करंगळीचा काहीच उपयोग होत नाही. मात्र तीच करंगळी बांधून ठेवली तर मात्र तिचा उपयोग आमच्या ध्यानात येतो की करंगळीशिवाय आमची पक्कड घट्ट होत नाही. पण मला हे अनुभवावं लागतं. तसं मला माणूस म्हणून परमेश्वराने विशेषत्व दिलंय. , ते ह्या करंगळीसारख आहे. जणू काही श्रीकृष्ण सांगू इच्छितो की तुमच्या करंगळ्या तुम्ही लावू शकत नाही पण जाअर्थी मी तुम्हाला करंगळी दिली आहे ह्याचाच अर्थ मी तुम्हाला विशेषत्त्व दिले आहे.  
  
श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला म्हणजे "त्या"ने हे विशेषत्व वापरल आणि हे विशेषत्व त्याने गोपांना दिले. 
गोपांनी काठ्या लावल्या म्हनून परमेश्वराने त्यांना काही तरी दिले. गोपांनी काठ्या नंतर लावल्या , पण आधी कृष्णाने करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला होता हे आम्हाला विसरून चालणार नाही - श्रीकृष्णाने गोवर्धन उचलला  कारण -
१) त्यापूर्वीही गोप श्रीकृष्णाच्या सतत बरोबर होते.
२) ते कृष्णाच्या बरोबर खेळत होते, ते कृष्णाच्या बरोबर नाचत होते, बागडत होते.
३) महत्त्वाचे म्हणजे श्रीकृष्णाच्या प्रत्येक शब्दासाठी ते आपल्या जीवाचं रान करीत होते. ( आज्ञापालन )
४) स्वत:कडील असलेली भाजीभाकरी ते कृशःणासमोर धरीत होते, कृष्णा तू खा. पहिला घास तू खा, मग आम्ही खातो. 
५) कृष्ण कुठे जाईल तिकडे ते त्याच्या मागून जायला तयार होते.

यमुनेच्या डोहात कृष्णाने विषारी कालिया नाग असताना देखिल उडी मारल्याबरोबर सगळी मंडळी हैराण झाली, गावातील लोकांना बोलाविण्यासाठी मदतील त्यांच्या लाडक्या "कान्हाला" वाचविण्यासाठी, घाबरून जाऊन लपून बसले नाही स्वत:चा जीव वाचवायला, आणि त्या सर्वांच्या पलिकडे तो पेंद्या गेला होता - तो लंगडा, लुळा , आंधळा, काणा, चकणा जसा होता , तसा त्याने ही यमुनेच्या डोहात उडी मारली होती. पेंद्याने गोपांना शिकविले की परमेश्वराशी भाषा कोणती ? त्याच्याशी कसे वागायचे - स्वत:ला विसरून , देहभान हरपून , सर्वस्वाचा त्याग करून - फक्त "त्या"च्या साठी, फक्त "तो" मला हवा म्हणून, फक्त "तो" एकमेव माझा म्हणून !

परमेश्वराची ही प्रेमाची, आपलेपणाची, जिव्हाळ्याची भाषा आम्हाला शिकता आली की परमेश्वर , भगवंत काय बोलतोय हे आम्हाला शजतेने समजेल आणि मग जेथे साक्षात भगवंत माझा असेल तेथे उणीव ती कसली उरणार? जेथे सच्चिदानंदाची साठ तेथे दु:ख उरणार तरी कसे? 

परमेश्वर अवतार का घेतो? त्याचे साधे सोपे उत्तर म्हणजे त्याची निर्गुण निराकाराची भाषा आम्हा मानवांना त्याच्या लेकरांना समजत नाही, आम्हाला कळणारी प्रेमाची भाषा बोलण्यासाठी "तो" अवतार घेतो, जेणेकरून तो त्याची खरी भाषा आम्हा मानवांना शिकवू शकेल.

नजीकच्या काळातील तत्सम गोष्ट म्हणजे श्रीसाईसच्चरितातील पहिल्या अध्यायातील साईनाथांच्या गहू दळण्याच्या कथेची. साईबाबा दळण दळायला बसले आहेत हे कळताच गावातील लोक बाबा काय करत आहेत म्हणून गोळा होतात, पण त्यातील चार बायका पुढे सरसावून चक्क बाबांच्या हातातील जात्याचा खुंटा ओढून घेतात आणि साईबाबांच्यावर रचलेल्या भॊळ्याभाबया प्रेमळ शब्दांतील पदे म्हणा वा रचना गाऊन दळण दळू लागतात. साईनाथा रागावतात त्याकडे काणाडोळा करून ते पायलीभर दळण त्या पूर्ण करतातच. हेमाडपंत येथे सांगतात की प्रत्यक्षात आजूबाजूच्या गावांमध्ये महामारीची साथ आलेली असते आणि साईनाथांना मांडू दळण करून ते वस्त्रगाळ गव्हाचे पीठ शिरडी गावाच्या वेशीवर टाकायाचे असते. आता येथे त्या ४ स्त्रियांकडून तर भरडा दळण होते , त्यात त्या स्त्रिया नंतर पिठ स्वत:च्या घरी घेऊन चालल्या होत्या तरी देखिल साईंनी त्यांना त्यांची चूक सुधारायला लावून पीठ वेशीवर टाकवून घेतले आणि शिरडीला महामारीपासून वाचवलेच होते.  
येथे साईनाथांनी त्या ४ स्त्रियांना परमेश्वराची भाषा शिकायची कशी ते शिकविले होते. 

शिरडी गावातील त्या ४ स्त्रिया म्हणजे जणू काही माझ्या अंतर्मनातील ४ वृत्तीच होय - 
१) उत्कट प्रेम, भक्ती 
२) विश्वास 
३) सक्रीयता 
४) आज्ञापालन - निष्ठा 

साईबाबा गहू दळायला बसले हे कळल्यावर त्या स्त्रिया विचार करतात आम्ही असताना आमच्या बाबांना कष्ट का घ्यावे लागतात, आम्ही स्वत: बाबांच्या कामाला जमेल तसा अल्प का होईना हातभार लावू दाखवणारी - उत्कट प्रेम व भक्ती , आम्हाला भले बाबांसारखे काम जमणार नाही पण आमच्या बाबांचे नाव घेऊन केलेले काम चांगलेच होणार हा विश्वास , आमचे बाबा जे काही करतात ते प्रत्येक काम हे सत्य-प्रेम-आनंद ह्या त्रिसूत्रीलाच धरून असणार ज्याने माझे कल्याणच होणार हा विश्वास, बाबा गहूच का दळतात, कसे दळतात , पुडःए त्या गव्हाच्या पिठाचे काय़ करणार ह्या नसत्या गोष्टींची उठाठेव करण्यापेक्षा मला फक्त साईनाथांच्या कार्यात सहभागी व्हायचे ही सक्रीयता व बाबांनी स्रवच्या सर्व पिठ वेशीवर टाकाय़ला सांगितल्यावर त्यावर का करायचे, ह्याने काय होणार, सर्व कष्ट वाया जाणार असे कोणतेही तर्क-कुतर्क न करता, संशय न घेता फक्त बाबांचा शब्द पाळने जसाच्या तसा ही आज्ञापालन - निष्ठा !

श्रीकृष्णाने इंद्राची पूजा न करता गोवर्धन पर्वताची पूजा करायला सांगितल्यावर आणि त्याने स्वत: करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलताच, इंद्राच्या क्रोधाची जराही भीती न बाळागता, आपल्या काठ्या लावणारे गोप असो की सेतू बांधताना दगडांवर रामनाम लिहून समुद्रात फेकणारे भगवंत श्रीरामाचे वानरसैअनिक असो, सर्वच जण परमेश्वराच्या प्रेमाची भाषा बोलायला शिकले जणू ...
    
प्रत्यक्ष-मित्र ह्या बेबसाईटवर " श्रीसाईसच्चरित अध्याय १ (भाग ११) मन की चार साईनिष्ठ वृत्तियाँ  " ह्या भागात मनाच्या ह्या चार साईनिष्ठ वॄत्तींबाबत अधिक माहिती वाचायला मिळते  आणि भगवंताशी हे नाते कसे जोडायचे, "त्या"च्या प्रेमाची भाषा कशी शिकायची ह्याबाबत खूप चांगले विचार वाचनात आले. परमेश्वराशी नाते जोडायला , संवाद साधायाला खूप सोपे उपायच जणू येथे उलगडून हातात सोपवले आहे जणू ! ह्या प्रेमसागरात एक डुबकी मारून "हरिगुणसंकीर्तनाची" रसमाधुरी चाखायलाच हवी नाही का बरे? 

संदर्भ : 

5 comments:

  1. खुपच सुन्दर ।
    श्री राम अम्बज्ञ

    ReplyDelete
  2. Ambadnya post! Very aptly timed too when Bapu has given us what direction we have to take in 2016.

    The post connecting Krishna Katha and Sai Charita is quiet deep and thorough. After reading there is lot of मनन to be done on this.

    Good start to 2016 blogging. Wish you a very Ambadnya 2016. Keep posting!

    ReplyDelete
  3. ur article is
    Notes for panchasheel(sai
    satcharitra exam )
    +
    New year (different point of view)
    +
    Relationship between god n devotee
    Extra ordinary writing skills!!!
    eager to read more from you ...
    thanks for sharing such a beautiful post...

    ReplyDelete
  4. सुनिता करंडे, नमस्कार

    लेख खूप छान आहे, "त्या" भगवंताची स्मृती तरी असते का?..... हा एकदम मुलभूत प्रश्न प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा आहे. ज्या गोष्टी जन्माबरोबरच उपजत मिळाल्या आहेत त्याबद्दल आपण भगवंतासमोर कितीवेळा कृतज्ञता व्यक्त करतो?.....भगवंताला त्याची आवश्यकता नसली तरीही! ... वास्तविक स्वताच्या आईशी आणि भगवंताशी मनुष्याचे उपजतच नाते असते फक्त ते स्वीकारणे, ते फुलवणे आणि त्या नात्याला न्याय देणे हेच फक्त मनुष्य करू शकतो

    मनुष्याचा भाव हीच भगवंताची भाषा... शब्दामागचा भाव, कृतीमागील भाव किंवा केवळ डोळ्यातील भाव सुद्धा भगवंताला कळतो असे संतांनीच सांगितले आहे त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुठलेच औपचारिक सोपस्कार पाळण्याची मनुष्याला तशी गरजच नाही.
    प्रत्यक्ष-मित्र मधील श्रीसाईसच्चरित अध्याय १ (भाग ११) मध्ये सांगितल्या प्रमाणे आवश्यकता आहे ती फक्त त्या नात्यावर विश्वास असण्याची आणि भगवंताला शरण जाण्याची तरच मनातील फलाशेची महामारी जाऊन मनाला शांती तृप्ती आणि समाधान मिळेल.

    तुमच्या या लेखामुळे प्रत्यक्ष मधील लेख अधिक डोळसपणे वाचण्यास मदत मिळाली.

    राजीव कदम

    ReplyDelete
  5. सुनीताजी खुप छान लिहीलय परमेश्वराची भाषा म्हणजे फक्त प्रेम. निव्वळ प्रेम.

    परमेश्वर अवतार का घेतो? त्याचे साधे सोपे उत्तर म्हणजे त्याची निर्गुण निराकाराची भाषा आम्हा मानवांना त्याच्या लेकरांना समजत नाही, आम्हाला कळणारी प्रेमाची भाषा बोलण्यासाठी "तो" अवतार घेतो, जेणेकरून तो त्याची खरी भाषा आम्हा मानवांना शिकवू शकेल.
    खुप सुंदर लेख.



    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog