Wednesday 8 April 2015

एक होता कार्व्हर - 2 - दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती !!!

येथवरचा  डॉक्टर कार्व्हर ह्यांचा खडतर प्रवास आपण पाहिला, आता पुढची जिज्ञासावर्धक कहाणी पुस्तकातून वाचल्यास वीणा गवाणकरांच्या अफाट अभ्यासालाही दाद मिळेल असे  मला  प्रामाणिकपणे वाटते. 

वीणाताईंचे काही बोल अगदी मनाला भिडतात -  

"प्रा. कार्व्हरांना स्थलकालाचं मुळी भानच उरलं नव्हतं. `सिंप्सन' वाल्यांनी भाकीत केल्याप्रमाणे ते चित्रकार वा संगीतकार झाले नव्हते. ते झाले होते एक `दक्षिणी शेतकरी' एका छोटया पण धडपडणाऱ्या शाळेचे शिक्षक, मुळ्यांचे डॉक्टर ! आणि रंगारीही ! ! हे त्यांचे अपयश म्हणायचं का ?
एका उजाड ओसाड माळाला त्यांनी नवजीवन दिलं होतं, फुलवलं होतं. खरोखरीच जणू कायापालट केला होता.
लोकांच्या डोळ्यावरच्या डॉलर्सच्या पटटया काढून त्यांना `बघायला' शिकवलं होतं. आणि ते लोकही आता डॉक्टर कार्व्हरप्रमाणे चिखलात,मुळ्यात, पाना-फुलात `देव' शोधायला शिकले होते. निसर्गाच्या रहस्यांचा मागोवा घेऊ लागले होते. उजाड,वैराण माळ दिसामासांनी फळत-फुलत होता. 
याला अपयश म्हणायचं का ?.... 

तरीही एवढे करूनही कार्व्हर ह्यांना  वाटत होतं, ही तर नुसती सुरूवात आहे. अजून खूप मजल मारायची आहे. 
किती हा विनम्र भाव ….
उत्तरेकडचा हा अबोल, विनम्र संशोधक किती कर्तृत्ववान आहे, हे इथवरचा प्रवास दर्शवितो. आजवर डॉ. कार्व्हरनी जे जे कार्य हाती घेतलं होतं, त्याला अपेक्षेहून कितीतरी अधिक पटीने यशाला घातलं होतं ह्याची पुरेपुर प्रचिती येते.

आपण वर्षानुवर्षे यशाच्या किती चुकीच्या मोजपट्या वापरतो नाही का? प्रवाहात तर सर्वच जण पोहतात, प्रवाहाच्या उलट दिशेने पोहायला मात्र खरे कसब आणि वाघाचे काळीज लागते म्हणतात ते उगीच नाही.

येथे आठवतात आपल्या पावन भारतभूमीतले " संत सावता माळी" ह्यांनी सुध्दा असाच निसर्गात , आपल्या शेतातच आपला देव पाहिला होता नाही बरे? " कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी " असे गात कधीही पंढरीची वारी ही न करणार्‍या, आणि विठ्ठलाच्या दर्शनालाही पंढरपूराला कधीच न जाणार्‍या ह्याच सावतामाळ्याच्या घरी , दारी आणि शेतात "तो" पळपुट्या विठ्ठल पाटील दडून बसला होताच ना कारण सावता माळींनी त्याला आपल्या हृदयरुपी शेतात मेख मारून अढ्ळ केले होते.


आता वळू या डॉक्टर जॉर्ज कार्व्हर यांच्या महान कार्याकडे टस्कगीच्या शाळेत आल्यानंतर बर्‍याच मोठ्या कालावधीनंतर १८९९ साली फिरत्या कृषीविद्यालयाने जन्म घेतला आणि टस्कगीची शाळा खुद्द  शेतकर्‍यांच्या अंगणात जाउन पोहचली . त्याला कारणीभूत ठरला कार्व्हर ह्यांचा दौरा, ज्यात त्यांनी मानसूकीचा नंगा नाच घालणारी `खरी दक्षिण अमेरिका' पाहिली. तिथले आपले दलित निग्रो बांधव, त्यांचं दारिद्रय. त्यांचं अज्ञान, त्यांची होत असलेली उपेक्षा आणि आबाळ- सारं काही उघडया डोळ्यांनी पाहिलं. त्या काळी तेव्हाही दक्षिणेत गुलामगिरीची कीड समाजाला पोखरतच होतॆ.  निग्रोला मानव म्हणून बहुधा गणलेच जात नव्हते. मुक्ततेनंतरही निग्रोंच्या सामाजिक सुधारणेत म्हणावा तसा काहीही फरक पडला नव्हता. अजूनही त्याला सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहनात, एवढेच काय, सार्वजनिक बागेतही प्रवेशाला मनाईच होती. रस्त्यावरून जाणाऱ्या गोऱ्याला ओलांडणे किंवा आडवे जाणे हा चक्क निग्रोचा समजला जाई व त्याला चाबकाची शिक्षा मिळत होती. गोऱ्यासाठी त्याला रस्ता सोडून बाजूला व्हावं लागत होतं. स्वतःच्या हिंमतीवर शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या निग्रोचा होणारा अपमान ही तर कोणाच्याच खिजगणतीत  ना येणारी अशी रोजचीच गोष्ट होती. कोणी अस्मिता दाखवू धजले की पाठीवर आसूड बसलाच. अजूनही निग्रोला `श्रीयुत' किंवा `श्रीमती' आपल्या नावामागे लावता येत नव्हते. लावल्यास शिक्षा ठरलेली. चामडी लोळेपर्यंत चाबकाचे फटके. पुन्हा न्याय मागायची सोय नाही. वाचताना सुध्दा अंगावर सर्रकन काटा येतो नाही  का  ? मग जेथे ते निग्रो प्रत्यक्ष हलाखीचे  जीवन वा नरकवास भोगत होते त्यांची काय कथा आणि व्यथा वर्णावी?

भारतात सुध्दा दलित बांधवांनी स्पृश्य-अस्पृश्य भेदभावा पोटी असेच हलाखीचे दिवस कंठले होते. संत चोखोबा महार जातीत जन्मले म्हणून त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता , आपल्या देवालाही ते डोळा भरून पाहू शकत नव्हते , त्याचेच विदारक चित्रण त्यांच्या अभंगात आढळते -- 

अबीर गुलाल उधळीत रंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ।

उंबरठ्याशी कैसे शिवू  ? आम्ही जातीहीन  । पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग । । 


दक्षिण अमेरीकेत तेव्हा बहुजन समाज हा शेतकरीच होता जे बहुधा मोडकळीला आलेल्या लाकडी खोपटांत राहत होते.  त्या लाकडी खोपटात  माणसं तरी कशी राहत तर १२ ते १५ निग्रो लोक - सारे लहान मोठे एकत्र राहात. एकत्रच खात आणि तेही हातावरतीच घेऊन. ना भांडी-कुंडी , ना सामान. एकत्रच झोपायचे. गादी-बिछाना वगेरे भानगड नाहीच. खिडक्या,तावदाने,पडदे यांची माहितीच नव्हती त्यांना बिलकुल. संडास हा प्रकारच माहीत नसावा बहुधा. खायला पदार्थ लांबवरच्या बाजांरातून विकत आणलेले आणि तेही ठारविक. मांस,पीठ आणि काकवी. दारात काही पिकवून खाता येतं. कोंबडया,बदकं डुकरं, एखादं दुभतं जनावर आपली अन्न-पाण्याची , पोटाची गरज भागवू शकतं याची कल्पना नव्हती. त्या निग्रो शेतकी समाजाला चौरस आहार आणि जीवनसत्त्वांच्या अभावामुळे `पेलाग्रा', `स्कर्व्ही' अशा रोगांनी पछाडलेलं होत जणू .पिण्याचं पाणी कोसा-दोन कोसांवरून आणलेलं, त्यामुळे पाणी पिण्यात काटकसर इतर वापर तर फार दूर राहिले. अर्थात कुपोषणाने शरीरावर भयंकर परिणाम होणार नाही तरच नवल ...
                                                 
दौऱ्यावरून आल्यानंतर कार्व्हर ह्यांचं मन एका वेगळ्याच दिशेने विचार करू लागलं. `समाज प्रबोधना' चा एक आगळा, अभूतपर्व कोपरा त्यांना साद घालू लागला. `या आपल्या बांधवांना जागृत करायला हवं ती माझी नैतिक जबाबदारी आहे'. त्यांना हे कळून चुकले होते की, जोपर्यंत दक्षिणेचा शेतकरी समृद्धीच्या पातळीवर पोहोचत नाही, तोपर्यंत दक्षिणेच्या संस्कृतीला भवितव्य नाही. शेतकऱ्यांचं समृद्ध जीवन राष्ट्रविकास घडवत असतं. म्हणून शेतकऱ्यांचा सर्वागीण विकास झाला पाहिजे. सर्वसामान्य शेतकऱ्याने आत्मविकसनाचा प्रयत्न केला तर, प्रत्येकाने `सुधारणा' आत्मसात केल्या तर, त्यांना स्वतःची अशी `संस्कृती' निर्माण करता येईल. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, समाजाच्या तळागाळाच्या या घटकाच्या गरजा ओळखून आपल्या संशोधनाला प्रा. कार्व्हरनी एक विशिष्ट दिशा दिली. आपल्या कार्याचा वेग वाढता ठेवला. हेच सिंहावलोकन अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते !! 
ज्याची प्रत्येक मानवाला नितांत आवश्यकता असते पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी , नाही का बरे ?

"साधी राहणी आणि उच्च विचारसरणी " ह्या कार्व्हरांच्या वागण्याने दक्षिणेच्या शेतकऱ्याला ते आता आपले वाटू लागले होते. सारा शेतकरी-वर्ग त्यांचा चाहता बनला. एवढया मोठया प्राध्यापकाचे,कृषितज्ज्ञाचे बोलणे, वागणे किती साधे नि सहज असते याचेच साऱ्यांना अप्रूप वाटे.

वीणा गवाणकर लिहीतात -

प्रा.कार्व्हरांच्या भगीरथ प्रयत्नाने दक्षिणी शेतकऱ्याच्या अंगणात गंगा अवतरली. ज्ञानाची गंगा, समृद्धीची गंगा.त्यांच्या या दौऱ्याने अमेरिकेच्या दक्षिण प्रदेशाचा संपूर्ण कायापालट झाला ! त्याचे जीवनमान उंचावले. प्रा. कार्व्हर यांच्या `फिरत्या कृषिविद्यालयाने' दक्षिणेच्या जीवनात अभूतपूर्व क्रांती केली. दक्षिणेची कलणारी मान आता अभिमानाने, दिमाखाने उंचावली होती. 

कार्व्हर ह्यांचा प्रवास वाचताना आपसूक आठवते ती आपली भारत भूमीच... येथे आठवले ते आपले "जय जवान जय किसान" चा नारा देऊन भारतात सशस्त्र हरितक्रांती आणणारे - लाल बहादूर शास्त्री आणि दक्षिण आफ्रिकेचा आणि भारताचा दौरा करून स्वत:मध्ये आणि देशातही आमूलाग्र बदल घडवलेले महात्मा गांधी!!

अशा ह्या पुरुषोत्तम कार्व्हर ह्यांची स्तुती करताना डॉ. वॉशिंग्टन हे कधीच थकत नसत , आपल्या ठिकठिकाणच्या व्याख्यानातून आपल्या या निःस्वार्थी, निगर्वी सहकाऱ्याच्या गौरवपूर्ण उल्लेख करीत असत - " या देशाने जन्माला घातलेल्या काही पुरूषोत्तमांपेकी श्री. कार्व्हर हे एक आहेत. आम्हाला आणखी असे अर्धा डझन कार्व्हर लाभले, तर...!'

फिरत्या कृषि-विद्यालयाची' सुरूवात करून `समाज प्रबोधना' चा नवा पायंडा पाडण्यात आपण यशस्वी झालो, याबदद्ल प्रा. कार्व्हरना नेहमी कृतार्थ वाटे. परमेश्वराविषयीची हीच कृतार्थता माणसाला  अजून  उत्तुंग कार्य करण्यास पाठबळ पुरविते असे मला वाटते .
`माझ्या आयुष्यातील महत्वाची कामगिरी' असा ते आपल्या फिरत्या शाळेचा उल्लेख करीत. त्यांच्या हरितक्रांतीने दक्षिणेकडच्या दरिद्री शेतकऱ्यांचे जीवन उजळून निघाले; त्यांच्या आयुष्याला नवा अर्थ लाभला.

वीणा गवाणकर म्हणतात - कार्व्हर यांनी काळाच्या उदरात खोलवर मशागत कली होती. उत्तम बी पेरलं होतं. त्याच्यावाढीची निगा राखली होती. आता आत्यांतिक निकडीच्या वेळी त्यांच्या कार्याचं भरघोस फळ मिळत होतं. -किती यथार्थता आहे हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवते.

प्रत्येक माणसाला त्याच्या वैयक्तिक जीवनातील कठीण प्रसंगाना तोंड देताना वा तो वावरत असलेल्या समाजातील , नगरातील, देशातील बिकट समस्यांना सामोरे जाताना जो संघर्ष करावा लागतो , जी लढाई करावी लागते ती त्याची स्वत:ची लढाई असते असे म्हटले तर चुकीचे ठरत नाही , पण त्याच बरोबरीने त्याने भगवंतावर , परमेश्वरावरही नितांत विश्वास ठेवला, श्रध्दा बाळगली तर त्याला "तो" परमेश्वर कधीच फार काळ लाचार वा लज्जास्पद अवस्थेत ठेवत नाही.

"उध्दरेत् आत्मना आत्मानम् " ह्या गीतेच्या वचनाचा बहुधा तोच अर्थ भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाकडून अपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी अर्जुनाला युध्द न करता पळून जाण्यापासून रोखले आणि रणांगणावर गीता शिकवली. श्रीकृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले , परंतु स्वत: मात्र हातात शस्त्र धरले नाही , उलट "ना धरी करी शस्त्र मी, सांगेन युक्तीच्या गोष्टी चार" अशी तटस्थ भूमिका, म्हणूनच स्विकारली असे वाटते.

डॉक्टर कार्व्हर ह्यांनी आयुष्यात सदैव अत्यंत प्रतिकूल परिस्थीतींशी लढा दिला, तो त्यांच्या परमेश्वरावरील प्रगाढ विश्वासापोटीच आणि तेही कोठेही स्वत:कडे त्याचे श्रेय न घेता ह्याचे मार्मिक उदाहरण म्हणजे-

त्यांच्या द्रष्टेपणाचं,कार्यरत वृत्तीचं कौतुक करणारा, त्यांच्या लोकोत्तर समाजसेवेचं गुणगान करणारा जेव्हा त्यांचे आभार मानू लागे
तेव्हा ते विनयानं म्हणत -  "माझी नाहीतर आणखी कोणाची नियुक्ती या कामी करून देवानं आपलं काम करवून घेतलं असतंच. त्यानं माझी निवड केली यात माझी प्रशंसा करण्याजोगं काय आहे !"


किती हा निगर्वीपणा आणि तटस्थ वृत्ती - जे काही मी करतो ,ते "तो " देवच करवून घेतो खरे तर, मला फक्त नेमले आहे "त्या" ने , बस्स !!! एवढी शरणागती , फक्त परमेश्वराच्या ठायी अनन्य शारण्य असल्याशिवाय मुळीच नसानसांत , रक्ताच्या प्रत्येक थेंबात भिनूच शकत नाही.
परमेश्वर अशा पुरुषार्थी मानवाच्या गळ्यात यशाची माळ नाही का बांधणार ? नक्कीच बांधेल - अगदी १०८ % निर्विवाद सत्य !

समाजसेवेचे असिधाराव्रत डॉक्टर जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर ह्यांनी आयुष्यभर सतत, सदैव  स्वत:च्या ऊराशी बाळगले आणि आचरणातही  बाणले होते , अगदी पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाच्या बिकट परिस्थितीतही कसे ते आता आपण पाहू या पुढील भागात-  त्यांच्या  जीवनातील प्रवासाचा पुढचा टप्पा न्याहाळताना -

-  क्रमश:


No comments:

Post a Comment

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog