Friday 10 April 2015

एक होता कार्व्हर - 3 - दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती !!!

वीणा गवाणकर ह्या पुढे पुस्तकात अमेरीकेलाही  पहिल्या आणि  दुसर्‍या महायुध्दाचा सुध्दा  कसा  तडाखा बसलेला ह्याचे स्पष्ट चित्र नजरेपुढे साकार  करतात , त्यांच्या समर्थ लेखनशैलीतून !

पहिल्या महायुद्धात डॉ. कार्व्हरांच्या रताळ्यांनी लोकांची आणि सैनिकांची उपासमार टाळली. युद्धानंतर मोठया प्रमाणावर `निर्जलीकरण प्रकल्प' उभारला जाणार होता. तशी योजनाही आखली गेली होती-पण तीही योजना प्रत्यक्षात उतरायला दुसरं महायुध्द यावं लागलं.म्हणजे वीस वर्षाचा अवधी जावा लागला. आणि गंमत म्हणजे निर्जलीकरणाच्या योजनेचे, तिच्या मागच्या कल्पनेचे श्रेय डॉ. कार्व्हरना द्यायला लोक विसरून गेले होते. डॉ. कार्व्हरना मात्र त्याचे वैषम्य वाटत नव्हते. श्रेय कोणी का घेईना, देशाला संकटकाळी आपला थोडाफार उपयोग झाला याचेच त्यांना समाधान . किती हा मनाचा उदारपणा ! कोठेही मान-सन्मानाची , प्रतिष्ठेची मनी आस नव्हती .

भुईमूगाच्या टरफलापासून जमीन भुसभुसीत बनवणारे खत तयार करता येते. त्या टरफलापासून जमिनीला सेंद्रिय खत मिळते. तिची प्रत सुधारते. हा आश्चर्य जनक  शोध डॉ. कार्व्हर ह्यांच्या  अफाट बुद्धीमत्तेतून लागला. एवढेच नव्हे तर  टरफलापासून बनवलेल्या कंडीशनरमध्ये आर्द्रता धारण करण्याची शक्ती अधिक असून नायट्रोजन, पोटॅश,फॉस्फेट यांचेही प्रमाण त्यात अधिक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जर्मनीहून आयात केल्या जाणाऱ्या पिटमॉस (Peat Moss) पेक्षा हे कंडिशनर अधिक उपयुक्त आहे.' हा शोध तर  खूप मोठे दान पदरात टाकता झाला त्यांच्या देशाच्या !

१८९९ सालीच त्यांनी भूसंधारणाची योजना मंडली होती. वनसंपत्तीची राखण व वृद्धी करणे आवश्यक कसे आहे हे सांगितले होते. परंतु ही योजना प्रत्यक्षात उतरायला `ग्रेट डिप्रेशन' ची आपत्ती यावी लागली. त्यानंतर सरकारने ती योजना १९३२-३३ काळी ती हाती घेतली.

पुढे सारे जग दुसऱ्या (१९४० च्या ) महायुध्दात गुंतलं होतं. विघातक शक्तीनी अवघ्या मानवतेला हादरवून टाकलं होतं. साराच तोल  पार ढासळला होता, आभाळच फाटले तर ठिगळ लावायचे तरी कुठे कुठे? असा अटीतटीचा प्रसंग सामोरे उभा ठाकलेला तरीही आपल्या प्रयासांनी आणि संशोधनाने हा तोल साधण्याचे कार्य डॉ कार्व्हर यथाशक्ती , यथामती पार पाडीतच होते, जराही विचलीत न होता, जराही न डगमगता ...

ह्या भयावह कालातही डॉ. कार्व्हर लोकांना आपल्या भूमीवर प्रेम करायला शिकवीत होते.तिच्याशी आपले नाते घट्ट बांधायला, जवळीक साधायला शिकवीत होते ! अलबामातील त्यांच्या बांधवांजवळ म्हणायला गेले तर तसे काहीच नव्हते. काही मिळवायचं म्हटलं तर लागणारी आवश्यक ती साधने सुध्दा हाताशी उपलब्ध नव्हती. त्यांच्या जवळ होत्या भरपूर `गरजा' जी काही तुटपुंजी साधने जवळ होती त्यांचाच उपयोग करून, त्या गरजांचा मागोवा घेत, डॉ. कार्व्हरनी किमया केली. हे सारं कुठून मिळवलं ?  

फक्त कापूस पिकवणं माहीत असलेल्या त्या रखरखीत जमिनीतून कापूस साम्राज्याला शह दिला होता. भुईमूगा आणि रताळी यांनी !


येथे आठवतो तो जॉर्ज वॉशिंगटन ह्यांचा एक प्रसिध्द quote आहे -

 " Start wherever you are, with whatever you have, make something out of it , never be satisfied."


खरेच किती सत्यात उतरवले त्यांनी हे बोल नाही. म्हणूनच म्हणतात "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले."

त्या काळी अमेरिका रंगाच्या बाबतीत जर्मनीवर अवलंबून होती. महायुद्धाच्या तणातणीत परस्पर संबंध बिघडले. जर्मनीकडून रंग मिळणे बंद झाले. अमेरिकेतील उद्योगधंद्यावर संकट कोसळले. अशा वेळी डॉ. कार्व्हरनी `वनस्पतीजन्य ' रंग तयार करून अमेरिकेला बहुमोल देणगी दिली.

२९ पकारच्या वनस्पतींच्या पाने,फळे,खोडे,मूळ भागांपासून ५०० प्रकारचे रंग तयार करण्याचा भीम-पराक्रम त्यांनी केला. हे रंग (Dyes) कापूस, लोकर, रेशीम,लिनन,चामडे यांवर वापरण्यासाठी होते. उत्तम प्रकारचे आणि टिकाऊही !  आणि मग साहजिकच रंग बनविणाऱ्या एका मोठया कारखानदाराने त्यांचा हा भीमपराक्रम पाहून, आपल्या उद्योगसमूहात येऊन काम स्वीकारण्याची विनंती केली. सुसज्ज प्रयोग शाळा बांधून देण्याचं आश्वासन दिलं व सोबत एक `कोरा' चेक ! अनेक वेळा घडले तेच याही वेळी घडले आणि फक्त परमेश्वराचीच बांधिलेकी मानणार्‍या कार्व्हर ह्यांनी चेक साभार परत गेला. सोबत रंगाच्या पाचशे सत्तावीस कृती चक्क फुकट - विनाशुल्क !

त्यांची नजर द्रष्टयाची होती. काळाच्या पुढचं त्यांना दिसत होतं असे म्हणटले तर चुकीचे ठरणार नाही असेच पुस्तक वाचताना जाणवते. त्यांनी त्या दृष्टीने आखलेल्या योजना, मांडलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवायला अडचण पडे ती आजूबाजूच्या लोकांमुळे .पण ज्या वातावरणात ते जगत होते, त्याने त्यांच्या आचरणाचे खरी किंमत होत नव्हती  भोवतालची परिस्थिती साथ देणारी नसली की, प्रतिकूल असली की `असामान्य कर्तृत्व' लोकांच्या नजरेसमोर यायला काळ जावा लागतो. तसंच काहीसं डॉ. कार्व्हर यांचं झालं होतं. अफाट मेहनतीनंतर डॉ. कार्व्हर यांनी त्यांच्या "डियर प्रयोगशाळेत " `कृत्रिम रबर' जन्माला घातले. स्वस्तात मुबलक रबर उपलब्ध होऊ लागल्याने अमेरिकन उद्योजकांना रबरासाठी दुसऱ्या देशांच्या तोडांकडं पाहण्याच कारण उरले नाही.

अशा प्रकारे  अनेक धडे घेतल्या नंतर मात्र " या जगात टाकाऊ असं काहीच नाही. सारे जपा. वेळेवर त्याचा उपयोग होतो" या प्रा. कार्व्हर यांच्या बजावण्यावर साऱ्या अमेरिकेनेच पाठपुरावा केला.

१९३७ च्या सुमारास प्रा. कार्व्हर व सुप्रसिद्ध उद्योगपती हेन्री फोर्ड यांची भेट झाली. जणू काही रथी-महारथींची भेट होती. एक होता उपेक्षित, दलित निग्रो समाजातला, तर दुसरा होता समाजावर प्रभाव टाकून असलेला धनाढ्य कोट्याधीक्ष ! तसे पाहिले तर एक उत्तर ध्रुव आणि दुसरा दक्षिण ध्रुव . परंतु एका समान धाग्याने दोघेही बांधले होते तो म्हणजे -  दोघांचाही श्रमप्रतिष्ठेवर विश्वास होता. प्रयत्नावर श्रध्दा होती.

`शाश्वत मूल्य पैशांच्या मोबदल्यात मिळत नसतात, किंबहुना पैशाच्या बदल्यात जे विकत घेता येतं त्याला `शाश्वत मूल्य म्हणत नाहीत.'
हेन्री फोर्ड यांच्या या विधानाचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. कार्व्हर !

मराठीत आपण एक म्हण वापरतो की "लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून" म्हणजे दोन्ही साठी भरपूर पैसा खर्चावा लागतो आणि येथे तर कार्व्हर ह्यांना पैशाचा संग न भावणारा ...

कार्व्हर पगार वाढ घेत नाहीत. संशोधनाचं मानधन घेत नाहीत, याचे अनेकांना आश्चर्य वाटे. डॉ. कार्व्हरांना मात्र लोकांना याचं का आश्चर्य वाटतं याचं गूढ वाटे.
 
ते म्हणत, "ईश्वरदत्त देणगीबद्दल मी लोकांकडून बक्षीस का घ्यावं ?" यावर "पैशाच्या मागे धावणारे आणि पैसा हेच सर्वस्व मानणारे "अर्थाचे दास"  म्हणत ""तुम्ही जर असे पैसे घेतले असलेत तर त्याचा विनियोग तुमच्याच बांधवांसाठी नसता का करता आला ?"

त्यावर कार्व्हरांचे उत्तर त्यांची पैशाविषयीची असंग्राह्य वृत्ती दाखविते "मी पैशाच्या मागे लागलो तर माझ्या बांधवांना विसरून गेलो असतो..."

थोडक्यात काय तर समाजाचे ऋण, बांधिलकी पुढे पैसा कार्व्हर ह्यांना दुय्यम दर्जाचा वाटे , त्यांच्या निष्ठा , देशावरचे प्रेम , मातृभूमीशी बांधिलकी ही अत्यंत घट्ट आणि उच्च प्रतीची होती. आणि म्हणूनच अशा ह्या मित्राला हेन्री फोर्ड  यांनी तसाच नजराणा भेट दिला.

उत्तमातील उत्तम वापरून `ग्रीनफील्ड' येथे `कार्व्हरभवन ' उभारलं गेलं. डॉ. कार्व्हरना किती आनंद झाला होता ! एक साधी इच्छा पूर्ण व्हायला किती काळ जावा लागला होता. वयाच्या ऐंशीच्या वर्षी कार्व्हर आपल्या घरात राहायला गेले. घरात पाऊल टाकताना ते क्षणभर थबकले. आईच्या स्मृतीने त्यांचे डोळे पाणावले होते ह्या महान विभूतीचे....किती हे मातृप्रेम !!!

१९३८ साली एका सभेत डॉ. कार्व्हरांचे व्याख्यान होते, एकाने डॉ. कार्व्हरांशी ओळख करून दिली.- "सॉक्रेटिसला आपण श्रेष्ठ तत्त्वज्ञानी समजतो, तो म्हणत असे की, मला एवढचं माहीत आहे की, मला काहीच माहीत नाही. आज त्या कसोटीला उतरणारी एकच व्यक्ती या जगात आहे, ती म्हणजे डॉ. कार्व्हर ! त्यांनाही काहीच माहीत नाही. त्यांचे आईवडिलच काय, पण त्यांची जन्मतारीखही त्यांना माहीत नाही. ज्ञानाच्या बाबतीत मते एवढंच म्हणतात की सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान परमेश्वराकडून त्यांना ज्ञान प्राप्त होते,"

 हे उद्गार सुचक आहेत ते जनमानसांत रुजलेल्या डॉ. कार्व्हरांविषयीच्या आदरभावाचे प्रतिक ! 
खरं म्हणजे कार्व्हर ह्यांची विचारसरणी पाहताना असे जाणवते की त्यांना आपल्या व्यक्तिगत पूर्वतिहासाचे काहीच वैषम्य वाटत नव्हते. त्यांनी आपल्या समाजाला अनेक प्रकारच्यादास्यत्वातून-आर्थिक, शैक्षणिक अशा विवीध स्तरांवर काही अंशी तरी मुक्त करण्यात यश मिळवलं होतं. त्यांना ना स्वत:च्या पूर्वजांचा ठाव ठिकाणा माहीत होता ना त्यांचं स्वत:चे नाव , कारण ते तरी स्वतःचं कुठं होतं ? पण भविष्यकाळ मात्र उज्ज्वल होता , "तो  " अनंत करूणामयी परमात्मा जणू ही उणीव भरून काढणार होता. इतिहासात त्यांना अढळस्थान मिळवून देऊन, त्यांच्या अफाट मेहनतीचे चीज करून !

रसायनशास्त्राच्या असाधारण वापराने त्यांनी अमेरिकेचे जीवनमान उन्नत केले. त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून १९३९ साली त्यांना `रूझवेल्ट पदक' अर्पण करण्यात आले. 

१९४० साली फ्रँकलीन डी. रूझवेल्ट यांनी टस्कगीला भेट दिली. त्या वेळी वृद्ध कार्व्हरना ते म्हणाले-
"तुम्ही एक थोर `अमेरिकन' आहात. तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेत जे घडवलं त्याने अवघ्या राष्ट्राला बळकटी मिळाली. शक्ती मिळाली.

खरंच, अशा गुणी माणसाची नियुक्ती करून देवानं स्वतःचं देवपण राखलं होतं. असे वीणा गवाणकर कौतुकाने उद्गार काढत्या झाल्या आहेत. खरेच मनापासून दाद द्यावी असे कुणाला वाटणार नाही सांगा बरे?  

त्यांच्याच शब्दातील हे मन विदीर्ण करणारे -
महानिर्वाण -

कशाचीच आस नव्हती. एका परेश्वराशिवाय कोणाची बांधिलकी नव्हती. एका भूमीखेरीच कोणाशीच जवळीक नव्हती. अखंड पोरके-पणानं त्यांची सावली सारखी सोबत केली होती....


स्वतःचं `काहीच' नसलेला हा मुक्तात्मा साऱ्या जगाला उधळून आता पंचत्त्वात निघाला होता.

टस्कगीनं मातीचं सोनं करणाऱ्या कार्व्हर ह्यांचा अखेरचा श्वास ऐकला 5 जून 1943.


मन सदगदीत होते - जो जन्मानंतर काही काळ मरणोसन्न अवस्थेत होता, ज्याच्या जगण्याची यत्किचींत आशाही जगाला नव्हती, ज्याला सुरुवातीचा काही काळ वाचाही नव्हती अशा त्या जीवाचा परमेश्वरावरील अचल , गाढ विश्वासाने किती अप्रतिम, शब्दातीत प्रवास भगवंतच "त्या"च्या अकारण कारुण्याने घडवून आणतो - अगाध तुझी
लीला -परमेश्वरा - धन्य तू आणि धन्य तुझा हा भक्त - शब्दातीत असणे वा अवाक् होणे काय हे शब्दश: अनुभवले वारंवार ---

खरेच प्रत्येकाने अवश्य वाचावे, आवर्जून एकदा तरी वाचावे असे हे अविस्मरणीय पुस्तक - "परमेश्वराने आम्हाला काहीच दिले नाही " अशी सतत अवास्तव ओरड करत फिरणार्‍या अभागी जीवाला जणू कार्व्हर ह्यांचे जीवन उत्तर देऊन सांगते "मानव जन्म हेच परमेश्वराचे अगाध देणे आहे , त्याची अपार लीला अनुभवून तर बघ , मातीचे सोने करणारा कर्ता , करविता "तो" एकच आहे , आता "त्या" ने दिलेल्या उपहाराचे "सोने" करायचे "त्याच्याच " कृपेने की "माती" म्हणून पायी तुड्वाय़चे हे तुझ्या हाती आहे. "
 डॉ. कार्व्हर - अखिल मानवजातीसाठी मानवी जीवन ही परमात्म्याने दिलेली  सर्वोच्च अमूल्य देणगी आहे आणि ती कशी स्विकारावी ह्याचे परखड पण वास्तव प्रात्यक्षिक देणारा - दीपस्तंभ !!!

1 comment:

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog