Tuesday 14 April 2015

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा शैक्षणिक दृष्टीकोन




मध्य प्रदेशातल्या महू गावी १४ अप्रिल १८९१ रोजी भारतमातेने आपल्या एका महान थोर , मानवतेला पूजणार्‍या सुपुत्रास जन्मास घालून आपल्या कुशीची धन्यता मानली जणू काही. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे ते भारतमातेचे महान सुपुत्र ज्यांनी देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा आजीवन जोपासली होती. त्यांचा सेवेचा वारसा आजही आम्हा भारतीयांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. 


भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून गौरविल्या गेलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. तुकाराम व कबीर हे बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय त्यांच्या आयुष्यावर प्रभाव निर्माण करते झालेले दिसतात.




डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. 

गलितगात्र झालेल्या समाजाच्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुल्लींग चेतवून मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत करण्यात डॉ. आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता म्हणणे चुकीचे ठरणार नाही असे वाटते. 

संत शिरोमणी तुकारामांचे " जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा" ह्या शिकवणीचा प्रत्यक्ष मानवी जीवनात ही पुरस्कार केला होता . म्हणूनच मला प्रामाणिकपणे वाटते की डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते. त्यांनी आपल्या स्वत:च्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. समाजातही ही मानवतेची मूल्ये बिंबवण्याचा, रुजवण्यासाठी अथक प्रयास केले आणि अफाट परिश्रम घेतले. त्यांनी मनुष्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ पणाला लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते, मानवतेची मूल्ये जोपासते . मग अशी ती व्यक्ती वंदनीय ना झाल्यास नवलच नाही का बरे?  

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे ह्याची सुज्ञ जाणीव बाबासाहेबांना होती. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पितो  तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते आपल्या समाज बांधवांना सांगत. 

प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे ह्यासाठी ते अटाटी करताना आढळतात. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की, तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावी. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. 

शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाजहितार्थ या ज्ञान घेतलेल्या मुलांना  आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडाता यावीत असे हे शालेय शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांनी ध्यानी घ्यावे. ह्या उदेश्य पूर्तीसाठी त्यांनी  पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९४६ साली करुन मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत. 

शिक्षण म्हणजे परिवर्तन, शिक्षण हे सामाजिक क्रांतीचे प्रभावी साधन आहे. व्यक्तीला जाणीव देते ते शिक्षण होय. ज्ञान उपयोगी असावे. शिक्षणाचा परिणाम शील आणि चारित्र्याची निर्मिती करण्यासाठी व्हावा अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती जी मानवी जीवनात खरोखरी शिरोधार्य करण्यासारखीच आहे. 

शिक्षण हे मूल्याधिष्ठित म्हणजेच उच्चतम नैतिक आचरण निर्माण करणारे असावे. असे आंबेडकर म्हणत, `शैक्षणिक तत्वज्ञान मनुष्याचे डोळे, हृदय आणि हात यांच्या अंतर्गत गुणवत्ता जोपासणारी प्रक्रिया संकल्पित करते. ते माणसाच्या अंगी मुरलेल्या शक्ती मुक्त करते आणि पशुतुल्य अस्तित्वाच्या पातळीवरुन  त्याग, विशुद्धता, सद्गुण आणि सात्विकता यांच्या पातळीपर्यंत ती उन्नत करते.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण आणि चारित्र्याला अधिक महत्त्व दिले. शिक्षण असून चारित्र्य नसेल तर त्या शिक्षणाची किंमत शून्य होईल, असे त्यांचे मत होते.सर्व प्रकारच्या विषमता दूर करण्यासाठी आणि सामाजिक लोकशाही प्राप्त करून घेण्यासाठी शिक्षण हा  राजमार्ग आहे. शिक्षणाचा हेतू लोकांचे नैतिकीकरण आणि सामाजिकरण करणे होय. सभ्यता आणि संस्कृती  यांचा शिक्षण हा पाया आहे असे डॉ. आंबेडकर यांनी जाहीर केले होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, लोकशाही यशस्वी करायची असेल तर जनता आणि समाज नैतिक मूल्याधिष्ठित शिक्षणाद्वारे संस्कारित असावा. लोकशाहीसाठी सुशिक्षित समाजाची अत्यंत गरज आहे. शिक्षित, नैतिक, मूल्याधिष्ठित समाजाची लोकशाही ही सर्वाधिक यशस्वी ठरू शकेल. त्यांच्या जीवनावर गौतम बुद्धांचा फार मोठा पगडा होता. याबाबत आपले विचार व्यक्त केले होते की माणसाच्या सर्व प्रश्नांचे मूळ अज्ञानात आहे. हे अज्ञान समजावे की ज्ञान असून अज्ञानी बनायचे हा खरा प्रश्न आहे.

खरेच आज थोडे जरी अपयश आले तरी मुले अगदी कोवळ्या वयात आत्महत्येसारखे अघोरी उपाय सर्रासपणे हाताळतात , तेव्हा वाटते जीवनात संघर्ष करणार्‍या अशा महान व्यक्तींचे जीवन चरित्र आपण एकदा तरी वाचायला हवे..

आजच्या ह्या आंबेडकरांच्या जन्मदिवशी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन .....   

No comments:

Post a Comment

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog