Friday 17 April 2015

अनंत अनंतात तादात्म्य पावले.....


आरती अक्कलकोट श्री स्वामी समर्थांची

अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्था 
जय जय गुरुअवतारा पदीं ठेवी माथा || धृ ||

नृसिंहसरस्वती अवतारा संपविले
कर्दळीवनात जाऊनि तपाचरण केले 
नवरुपां धारण करूनि प्रगट पुन्हा झाले 
नाना नामे घेऊनि देशभ्रमण केले || १ || 

योगसिध्दीप्रभावे लीला तू करिसी 
धर्मा संरक्षूनि जनांसि उध्दरसी 
वाटे ब्रम्ह प्रगटले ह्या भूमीवरती |
दर्शन घेता मिळते चिरसुख मन:शांती || २ || 

आर्त भाविक साधक तुजसी शरण येता 
मार्गदर्शन करूनि होसी त्या त्राता 
सर्वांभूती ईश्वर बघण्या शिकविला 
अनन्यभक्तां रक्षिसी आश्वासन देता || ३ || 

परब्रम्ह गुरुदेवा कृपा करी आता 
शरण तुजसी मी आलो तारी अनाथा 
भुक्ति-मुक्ति सद्गति देई भगवंता 
गुरुराया अवधूता अवतारी दत्ता || ४ || 

अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्था 
जय जय गुरुअवतारा पदीं ठेवी माथा ||


अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८)

मराठी कॅलेंडर मध्ये आज श्रीअक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी अशी नोंद आहे. वास्तविक पाहता इसवी सन १८७८ मध्ये स्वामींनी समाधिस्त होऊन आपला सगुण साकार अवतार संपविला असे भासवले, परंतु आजतागायत प्रत्यक्षात स्वामी भक्तांच्या पाठीशी सतत उभे राहून, भक्तांना "हम गया नही जिंदा है " याच आपल्या अभिवचनाची प्रचिती सातत्याने  देत आहेत. 

" अनसूयो अत्रिसम्भूतो दत्तात्रेयो दिगंबरा | स्मर्तुगामी स्वभक्तानां उध्दरता भवसंकटात् ||" 

शरणागतवत्सल, प्रणतपाळ, भक्तवत्सल असा "तो  परमात्मा " आपल्या भक्ताने स्मरण करताच धावून येतोच , नव्हे नव्हे "तो" स्मरणासवेच प्रकटतो - अशी समर्थांची ख्याती भक्तगण आजही अनुभवीत आहेत आणि म्हणूनच आणि म्हणूनच येथे आवर्जून स्मरते  ती संत एकनाथांची अभंग रचना -

"तुज सगुण म्हणू की निर्गुंण रे सगुण निर्गुण तूचि गोविंदु रे" 

देहात राहून सगुण साकार स्वरूपाने विचरो वा निर्गुण निराकार बनून अनंतात विचरो सदगुरु हा कायम आपल्या भक्तांजवळच असतो. 

"तेज रुपाने आजही जागृत, स्वामी समर्थ महाराज समाधीत | माथा ठेवुनी साद घालिता झणी मिळतो प्रतिसाद, अवलिया स्वामी समर्थ महाराज, अवलिया स्वामी समर्थ महाराज" 

इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी प्रथम खंडोबाच्या मंदिरात  प्रकटून अक्कलकोटच्या भूमीला आपल्या वास्तव्याने पुनीत केले. स्वामी महाराजांच्या येथील बावीस वर्षांच्या वास्तव्यामुळे  अक्कलकोट गावाला एका वैश्विक तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाला. आपल्या वास्तव्य कालखंडात जगातील अनेक मान्यवरांना स्वामींनी मार्गदर्शन केले.  श्री चोळप्पा , श्री बाळप्पा, सुंदराबाई, सेवेकरी भुजंगा, श्रीपाद भट, स्वामी सुत, वामनबुवा यांसारख्या भक्तांनी  स्वामी सेवेस आपले सर्वस्व समर्पित करून "स्वामी चरणी जे जे विनटले भाग्यवंत जगी ते ठरले" या उक्तीचे सार्थक्य जनमानसाला पटवून दिले.

स्वामींच्या चरित्रात वाचताना जाणवते की स्वामींची शक्ती इतकी अगाध होती की -
"पळे पांगळा, पाही आंधळा | अचाट गुरु तुमची शक्ती | तव कृपेने स्वामी समर्था मुका जाहला वाचस्पती |". 
म्हणजेच गुरुमाय ही अचिंत्यदानी असते , भक्तांसाठी ती "भक्तकामकल्पद्रुम" असते ह्याची प्रचिती सातत्याने अनुभवाला मिळते.

 "स्वामी गुरूच्या दरबाराचा महिमा हो अति आगळा, झोळी रिकामी घेउनी कुणीही कधीच नाही परतला" अशी सद्गुरू स्वामी महाराजांच्या दरबाराची महती भक्त आनंदाने गात असत. 

दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जात. श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होत. म्हणजे दत्तावतार होय. 

स्वामी समर्थांनी समाजातील दुष्ट प्रवृत्ती नाहीशी करून तेथे सद्विचारांची पुनर्स्थापना केली. दुःखी, पिडीत लोकांवर कृपेचा वर्षाव केला. इच्छुक भक्तांना स्मरणात राहील असा अनुभव देऊन प्रेमबंधनाने आपलेसे केले. स्वामी समर्थांना श्रीमंत व गरीब सारखेच मानीत. त्यांना साधा भोळा भक्तीभाव आवडत असे. त्यांच्या अंतरी जनसामान्यांविषयी अपार प्रेम होते. स्वामी समर्थ अतिशय तेजःपुंज होते. कोटी सूर्याचे तेज त्यांच्या मुखावर विलसत असे. डोळ्यात अपरंपार कारुण्य होते. भक्तांवर संकट कोसळले तर त्या भक्ताचा अनन्यभाव स्वामींच्या ठायी असेल तर स्वामी अवश्य त्याचे निराकरण करीत. 

स्वामी समर्थ क्षणात अंतर्धान पावत व अचानक प्रगट होत. स्वामी गिरनार पर्वतावर गुप्त झाले व क्षणात आंबेजोगाई येथे प्रगट झाले. हरिद्वारहून काठेवाडातील जिविक क्षेत्रातील नारायण सरोवराच्या मध्यभागी सहजासन घालून बसलेले दिसले. तर पुढे स्वामींना पंढरपुरातील भीमा नदीच्या भर पुरातून चालत जाताना भक्तांनी पहिले.  स्वामींनी मंगळवेढे येथील बसप्पाचे दारिद्र्य नष्ट केले. त्याला सापाचे सुवर्ण करून दिले. त्या गावातील बाबाजी भट नावाच्या ब्राह्मण गृहस्थाच्या कोरड्या आडात पाणी आणले. पंडित नावाच्या आंधळ्या ब्राह्मणास डोळे दिले.

अक्कलकोटला मोरोबा कुलकर्णी नावाचा एक स्वामीभक्त होता. त्याच्या अंगणात श्री स्वामी समर्थ आपल्या सेवेकऱ्यांसह झोपले होते. मोरोबाच्या पत्नीस रात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागला. हा त्रास तिला असह्य झाला. ती तशीच विहिरीत जीव द्यायला निघाली. स्वामी समर्थ एकदम जागे झाले व सेवेकर्यांस म्हणाले, ''अरे, विहिरीवर कोण जीव देतेय पहा बर. त्या व्यक्तीस माझ्याकडे घेऊन ये !'' सेवेकरी विहिरीजवळ गेला तो मोरोबाची पत्नी विहिरीत उडी मारण्याच्या तयारीत दिसली. त्याने तिला स्वामी समर्थांपुढे आणले. त्यांनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. तिची पोटदुखी नाहिशी झाली. 

"जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव " ह्या न्यायाने भक्तांनी स्वामींना ज्या ज्या दृष्टीने पाहिले त्या त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.

हे सर्व चमत्कार नसून स्वामींच्या सहज लीला होत्या ज्या त्यांनी लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी केल्या.

स्वामींनी अक्कलकोटातील आपल्या वास्तव्यात जनजागृतीचे, समाजप्रबोधनाचे कार्य केले. सोवळे-ओवळे,रूक्षआणि कोरड्या कर्मकांडाबद्दल स्वामींना प्रचंड चीड होती. त्यामुळे ते वारंवार ह्या बद्दल लोकांच्या आचरणावर कोरडे ओढीत. आपण वाचतो की एकदा स्वामी चोळप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळतात.स्वामी म्हणतात-"जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे ! लक्ष केंद्रित करावं लागतं." खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच.चोळप्पाची सासू पारायण करत असते, तिला त्रास होतो. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात, निदान थोड्या वेळपर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते.

स्वामी मान्य करतात.पण समज सुध्दा देतात-"पारायण करताना खेळाचा आवाज ऐकु तरी  कसा येतो ? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताताना तर ती उच्च पातळीची हवी."

मला वाटते आपल्या सर्वांसाठी हे डोळ्यांत झणझणीत अंजनच घातले आहे स्वामींनी  !!!

दुसर्‍या कथेत आपण पाहतो की चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो.वामन बुवा स्वामींना पहातच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचे अन्न आणताना ,चोळप्पाची  सासू विरोध करते.पण स्वामी जुमानत नाही. स्वामी सांगतात:"पोथी नुसती वाचू नका आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं-ओवळं यांच्या जास्त नादी लागू नका.  
किती लाख मोलाचा  उपदेश आहे , नाही का बरे ? 

अर्थातच चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाशी तक्रार न करत्या तरच नवल,  पण चोळप्पा स्वामींच्या भक्तीत तल्लीन झाल्याने काही ऐकत नाही .

समाधीस्थ होण्याच्या आपल्या अंतिम समयी श्री स्वामी समर्थांनी भगवद् गीतेत साक्षात श्रीकृष्ण  भगवंतानी दिलेले वचनच आपल्या भक्तगणांना दिले होते -  

अनन्याश्चिंतयतो मां ये जना: पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥

''जे माझे अनन्य भावाने असे चिंतन, मनन करतील, त्या अनन्य भावाच्या चिंतनाची उपासना, सेवा मला सर्वस्व समजून अर्पण करतील त्या नित्य उपासना करणाऱ्या माझ्या प्रिय भक्तांचा मी सर्व प्रकारचा योगक्षेम चालवीन,'' असे त्यांनी आश्वासन भक्तांना दिले. 

म्हणजेच थोडक्यात काय तर भगवान् श्रीकृष्णाने दिलेली ही ग्वाही स्वामींनी आपल्या भक्तांना पुनश्च एकवार स्वमुखाने दिली . परंतु येथेही पुरुषार्थ करायलाच सांगितले आहे की तुला झे परमेश्वराने दिलेले कर्म् तू करीत रहा, मी सदैव तुझ्यासोबतच आहे. 
  
''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' असे अभिवचन देणाऱ्या अभयदाता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणीं कोटी कोटी लोटांगण आणि मानवी जीवनाचा हा जीवनयज्ञ त्यांनी दाखविलेल्या भक्तीमार्गावर चालून त्यांच्या चरणी समर्पित होवो  हीच आजच्या मंगलदिनी स्वामीचरणी प्रार्थना...

''अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद सद्गुरु  श्री स्वामी समर्थ महाराज की जय.''

'' अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त '' 

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ | 
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ |
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ | 
   

3 comments:

  1. हरी ॐ
    खरे आहे पोथ्या पुराणे उगाच नाही लिहिले गेले. कित्येक लोक अजुन गोष्टी म्हणूनच वाचतत. ते आचरणात उतर्विन्यासाठी सदगुरू कृपादृष्टी आणि आपला त्या कृपादृष्टि वर विश्वास असला म्हणजे ते आचरणात येण्यास वेळ नाही लागणार.
    श्री स्वामी समर्थ
    अंबज्ञ

    ReplyDelete
  2. Ambadnya... Khup apratim lekh Suneetaveera... punha punha vachavasa vatato... asech sundar lekh nehmi liha.... amhi aaturtene vat pahato... Ambadnya

    ReplyDelete
  3. Shreeram. Ambadnya. Makarandsinh and Dr. Diptiveera.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog