Monday 6 April 2015

एक होता कार्व्हर - दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती !!!

आज-काल वृत्तपत्र उघडावे तर कोठे ना कोठे तरी शेतक्र्‍यांच्या आत्महत्यांच्या बातम्या वाचायला मिळतात आणि मन उदास होऊन जाते, नैराश्याने ग्रासून जाते आणि वाटते की कोणी तारणहार नाहीच का आमच्या बळीराजाला ? कोण काढणार आमच्या ह्या "माय-बाप- बंधू" अशा शेतकरी वर्गाला, ह्या विनाशाच्या गर्तेतून खेचून बाहेर आणि राखेतून उभारी घेणार्‍या फिनीक्स पक्ष्याप्रमाणे उंच आकाशात भरारी घ्यायला शिकविणारा आहे का कोणी खरेच? मानवाच्या अन्न-वस्त्र-निवारा ह्या मूलभूत गरजांचा खर्‍या अर्थाने पुरवठा कोण करतो ? तर हा शेतकरी - म्हणूनच "तो बळीराजा" आपला "माय-बाप- बंधू" आहे अगदी उचित आणि यथार्थ भूमिकेतून ....

पर्यावर्णाचा दिवसेंदिवस होत चाललेला र्‍हास, जमिनीचा शून्यावस्थेकडे झुकणारा कस, भरपूर पिकाच्या व उत्पादनाच्या हव्यासापायी केला गेलेला अनाठायी आणि अवास्तव रासायनिक खतांचा वापर, वेळी- अवेळी मनमानी करणारा पर्जन्यराज म्हणजेच पावसाची अवकृपा ह्या सार्‍या अनाकलीय परिस्थितीने शेतकरी पार हवालदील होतो आणि त्याच्या पिकाचा योग्य मोबदला न मिळाल्याने , पोटाची खळगी भरण्यासाठी  शेवटी कर्जाच्या अवाढ्व्य डोगराखाली पुरता पिचून जातो. माय जेवू घाली ना आणि बाप भीक मागू देईना अशा विचीत्र कोंडीत हा " बळीराजा" सापडतो आणि शेवटी "आत्महत्या" हे त्याच्यावरचे उपाय नाही जे जाणूनही , केवळ हतबल, अगतिक होऊन त्याच वाटेवर पाऊल टाकतो--

हे असेच चालत राहणार का ? आज ह्या विनाशाला आपण सारेच एका अर्थाने जबाबदार नाही आहोत का ? आज अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, संपूर्ण मानव जातच एका विचित्र वळणावर येऊन ठेपली आहे. कोठे तरी ह्या निसर्गावर कुरघोडी करून , निसर्ग-संपत्तीचाच विनाश करणार्‍या आत्मघातकी मार्गावरून परत मागे फिरायलाच हवे नाही का?  खरे तर मुळात आपली भारत भूमी ही कृषी प्रधान संस्कृतीची ! आपल्या थोर , विद्वान ऋषी-मुनींनी ह्या निसर्गाची शास्त्र-शुध्द पध्द्तीने जोपासना केली होती , त्याच आपल्या पूर्वजांनी दाखविलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण अशी मूल्ये चोखाळणार्‍या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करणे हाच एकमेव रामबाण उपायही आणि अंतिम तरणोपाय ही असावा असेच वाटते.

परंतु असे काही थोर भूमीपुत्र असतात , ज्यांना परिस्थितीपुढे हात टेकणे किंवा "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा , दोष ना कुणाचा " हे तत्त्व तर मुळीच मान्य नसते. उलट मानवाची जीजीविशा ही मानवाला सुखी, समृध्द जीवनाकडे नेणारी खरी गुरुकिल्ली आहे, "गरज ही सर्व शोधांची जननी आहे" हेच त्यांना ठाऊक असते. "अशक्य" हा शब्दच मुळी त्यांच्या शब्दकोशातच लिहायला जणू देव विसरला असतो. आणि असे हे महान जीवात्मेच मानव जातीला उध्दाराचा मार्ग दाखवितात आणि अलगद हाताला धरून बिकट वाटणारा यमघाट सहज , सोपा करूनही देतात - त्यांच्या परमात्म्यावरील अविचल श्रध्देने, अटळ, अडिग विश्वासाने - त्यांना संपूर्ण भरोसा असतो "तो कधीच आपल्या लेकरांना टाकीत नाही" आणि म्हणूनच ते आपल्या अथक प्रयासांनी मानवजातीला आशेचा किरण दावितात -
 "फिटे अंधाराचे जाळे , झाले मोकळे आकाश, दर्‍या-खोर्‍यांतून वाहे एक प्रकाश -प्रकाश !!!

अशाच समस्त मानव जातीला वरदान ठरलेल्या, ज्यांचे स्वत:चे आयुष्य संजीवनीदायक ठरावे असे भव्य-दिव्य ! उत्तुंग यशोगाथा आणि  कीर्तीगाथा ह्या शब्दांनाही जेथे मर्यादा पडाव्यात असे संशोधनांचे जनक म्हटल्यास वावगे ठरणार नाही असे ते डॉक्टर जॉर्ज कार्व्हर ! "राजहंस प्रकाशन" तर्फे प्रकाशित झालेले आणि  " वीणा गवाणकर लिखीत - "एक होता कार्व्हर" हे पुस्तक खरेच मला इतके प्रेमात पाडते ना की कितीही वेळा त्याचे वाचन केले तरी नव्याने ते अधिकच भावते, अधिकच नव-नवी दालने उघडून देते.





सर्वसामान्यत: आपण धार्मिक ग्रंथाचेच पारायण करतो पण मला तरी वाटते अशा महान विभूतींची चरित्र ही पाराय़ण करण्याचीच गोष्ट आहे आणि मला माझ्या ह्या छंदाचा म्हणा, वेडाचा म्हणा प्रचंड अभिमानही आहे. कदाचित ह्या करीताच महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 1981-82 चा ह्या पुस्तकास प्राप्त झाला असावा. 
आपल्या भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे हे पुस्तक आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

चला तर आढावा घेऊ या ह्या " एक होता कार्व्हर " ह्या पुस्तकाचा -- नव्हे नव्हे आपल्या दारी आणू या एक ज्ञानाची गंगा, समृद्धीची गंगा ! भगीरथाने भगीरथप्रयास करून भगवान शिवाच्या जटेतील गंगेला आपल्या पूर्वजांच्या उध्दारासाठी भारतभूमीवर आणले ही कथा आपण पुरांणामध्ये वाचतो ना अगदी तशीच ....
डॉक्टर जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर ह्यांनी सुध्दा आपल्या अथक प्रयासांनी हेच काम केले होते पण भारतवर्षात नव्हे तर अमेरीकेमध्ये !

"जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरीयसी" हे साक्षात श्रीराम प्रभुंचे उद्गार ... भले डॉक्टर कार्व्हर हे भारतमातेचे सुपुत्र नव्हते , परंतु त्यांनी आजीवन आपल्या आयुष्यात हेच ध्येय उरी बाळगले होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते सर्वस्वाने पाळलेही होते... जणू काही हेच सांगतात डॉक्टर कार्व्हर ह्यांचे हे  बोल " देशभक्ती ही कोणत्याही वर्णाची ठेकेदारी नाही. ती बंधनातीत आहे."

अमेरीकेतील मिसोरी राज्यातील "डायमंड ग्रोव्ह" ह्या पाड्यावर मोझेस कार्व्हर नावाचा एक जर्मन शेतकरी आपली पत्नी सुसान हिच्या सोबत राहात होता. त्याच्या घरी "मेरी" नावाची गुलाम निग्रो स्त्री होती जी त्याने ज. ग्रॅट्कडून ७०० डॉलर्संना विकत घेतली होती, त्याच्या पत्नीला सुसानला मदत व्हावी म्हणून. परंतु हे कार्व्हर दांपत्य कधीही तिला गुलाम म्हणून वागवीत नसत, उलट कुटूंबातील एका सदस्याच्या नात्याने वागवीत. तो १८६०-६२ चा काळ होता, जेव्हा गुलामांना पळवून विकायचा हा मोठा तेजीचा धंदा होता. अशाच एका टोळीने मेरीला आणि तिच्या दोन महिन्याच्या लहान मुलाला एका भयाण रात्री पळविले. त्या धाडीत मेरीची मोठी मुलगी जिव्हारी मार बसून मृत्युमुखी पडली. वाचला होता मेरीचा दुसरा मुलगा जिम. मोझेस कार्व्हर ह्या सुह्रुद मानवाने गावकर्‍यांच्या मदतीने मेरीची व तिच्या बाळाची सुटका करण्याचे बरेच प्रयत्न केले पण त्याच्या हाताला पूर्ण यश लाभले नाही. आपल्या शेताचा एक तुकडा आणि आपला उमदा घोडा ह्या उदार मनाच्या कार्व्हर्ने देऊ केला पण त्याच्या मोबदल्यात केवळ मिळाला तो मेरीचा २ महिन्यांचा मरणोन्मुख मुलगा - मेरी नाहीच मिळाली. सार्‍यांनीच ह्या २ महिन्याच्या बाळाची जगण्याची आशा सोडली होती. पण सुसान बाईंनी प्रयत्नांची पराकष्ठा केली आणि त्यांच्या ईशनियंत्याच्या म्हणजेच परमेश्वरावरच्या नितांत श्रध्देने बाळाचे प्राण वाचले. "एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा " येथे "तो" सुसानबाईचा बायबलाचा येशूबाप्प्पाच उभा ठाकला होता त्या अगाध विश्वासाला पाठबळ पुरविण्यासाठी!!!! " ईश्वरकृपेने सारं काही ठीक होईल" ह्या तिच्या मनीच्या भावाला तिच्या परमेश्वराने कधीच पडू दिले नाही... असाच असतो "तो" अनंत करूणामयी परमात्मा , परमेश्वर - ईश्वर ! आणि अशा ह्या दीन दुबळ्या जीवातून नव चैत्यनाला उभारी मिळाली - पुढे कार्व्हर दांपत्याने त्या बाळाला आपलेच "जॉर्ज कार्व्हर " नाव दिले आणि परमेश्वराने त्याला बहाल केले जातिवंत माळ्याचे हात ....

येथे श्रीगुरुचरित्रातील १८व्या अध्यायातील विप्र आपल्या पत्नीस उद्देशून म्हणतो तो भाग आठवला

पुरुष तिचा कोप करी । म्हणे प्रारब्ध प्रमाण ।।५०।। 

म्हणणे स्त्रियेस तये वेळीं । जें जें होणार जया काळीं ।
निर्माण करी चंद्रमौळी । तया आधीन विश्व जाण ।।५१।। 

विश्वव्यापक नाराय़ण । उत्पत्तिस्थितिलया  कारण ।
पिपलिकादि -स्थूळ जीवन । समस्तां आहार पुरवीतसे ।।५२।। 

’आयुरन्नं प्रयच्छ्ति’ । ऐसें बोले वेद्श्रुति ।
पंचानन आहार हस्ती । केंवी करी प्रत्यहीं ।।५३।। 

चौर्‍यायशीं लक्ष जीवराशी । स्थूल सूक्ष्म समस्तांसी ।
निर्माण केले आहारासी । मग उत्त्पत्ति तदनंतरें ।।५४।। 

रंकरायासी एक दृष्टीं । करूनि पोषितो हे सर्व सृष्टि ।।
(अर्थ- परमेश्वर -चंद्रमौळी - विश्वव्यापक नाराय़ण हा ८४ लक्ष योनीतले स्थूल, सूक्ष्म आदी समस्त जीव मिर्माण करण्याआधी त्यांचे आहार निर्माण करतो व रंक असो वा राव सर्वांना समान दृष्टीने पोषितो.)
त्याच भावाने ह्या लहानग्या बालकाचा जन्म, सांभाळ -प्रतिपाळ हा त्या "नाराय़णा" ने सुसान-मोझेस कार्व्हर पती-पत्नींकडून करविला असावा.
    
वीणा गवाणकर यांनी ह्या लहानपणी मुक्या असणार्‍या लहानग्या जीवाच्या छंदाचे इतके सुंदर निरीक्षण केले आहे ना .. वीणाताई लिहीतात की - या एकाकी,अबोल मुलाचा मित्रपरिवार -मुलखावेगळाच होता. रानावनातील झाडं-झुडपं,पक्षांची पिल्लं,डबक्यातले छोटे मासे हाच त्याचा गोतावळा. तो झाडा-प्राण्यांच्या संगतीत रमे. मनसोक्त गुणगुणत राही.
अगदी भान विसरून ! पोटावर पालथं पडून तासन् तास एखाद्या अंकुराचं किंवा वाळवीचं निरीक्षण करीत राही. त्याच्या या दोस्तांच्या सह-वासातून त्याला अनेक गोष्टी समजत. त्यांची दुखणी-खुपणी, आजारपणं कळत. त्यांच्या सहवासात झाडांना जणू जिव्हा फुटत, कान येत. आपल्या भाषेत त्यांची बोलणी चालत. तोही एक मग चालतं-बोलतं झाड बने. त्यांच्या सहवासात तन्मय होई. "

आणि परमेश्वराने त्याला बहाल केले जातिवंत माळ्याचे हात , जे यायगर नावाच्या कुशल जवाहिर्‍यारुपी बागवानाला जाणवले. आणि ज्ञात असलेल्या कार्व्हर कुटुंबाच्या सुरक्षित जगाला सोडून त्या दीन जीवाने
ज्ञाताकडून अज्ञाताकडे झेप घेतली कारण "दीनांचा नाथ - दीनानाथ " आता त्याच्या घरीच नव्हे तर त्याच्या आय़ुष्यालाही अवघे व्यापून उरला होता .... म्हणतात ना " देव दीनाघरी धावला " - तो असाच असावा नाही का ? एक जीवाने भरारी घेतली आणि सुरुवात झाली एका ज्ञानयात्रेला ...अंतिम श्वासापर्य़ंत अविरत चालणार्‍या ....

येथे पटकन नजरेसमोर तरळला तो जन्मत:च सूर्याला गिळ्य़ास झेपावणारा हनुमंत - आपण संकट्मोचन हनुमानाष्टकात म्हणतो ना - 
बाल समय रबि भक्षि लियो । तब तीनहुँ लोक भयो अँधियारो ।।
ताहि सों त्रास भयो जग को यः संकट कहु सों जात न टारो ।।

देवन आनि करी बिनती तब छाँडि दियो रबि कष्ट निवारो ।।
को नहिं जानत है जगमें कपि संकट्मोचन नाम तिहारो ।।१।।



-
म्हणजेच काय तर थोडक्यात
"अनंताचा वेध घेण्याची इच्छा असणे , हा हनुमंताचा प्रत्येक मानवाला जन्मत:च प्राप्त होणारा आशीर्वाद आहे.
                        -(संदर्भ - डॉक्टर अनिरूध्द जोशी लिखीत - श्रीमद्पुरुषार्थ: - द्वितीय खण्ड: - प्रेमप्रवास)


आणि अनंताचा वेध घेण्याची इच्छा असणे हीच वृत्ती आपल्याला कार्व्हर ह्यांच्या जीवनात ठायी ठायी बाणलेली दिसते असे वाटते,  कशी ?

 ते आता आपण पाहू या पुढील भागात-  डॉक्टर जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर  ह्यांच्या  जीवनातील प्रवासाचा पुढचा टप्पा न्याहाळताना -

-  क्रमश:


3 comments:

  1. एक होता कार्व्हर हे पुस्तक जबरदस्त आहे, डॉ. जॉर्ज वाशिंगटन कार्व्हर ह्यांच् हे जिवंत चरित्र एका मागून एक धक्के देत. काय व्यक्तिमत्व होत ते....जिद्द, चिकाटी आणि सकारात्मकतेचे भांडार. परमेश्वरावराची त्यांची असीम श्रद्धाच त्यांना ताकद पुरवत होती.
    सुनीतावीरा मस्तच पोस्ट, श्रीराम, अंबज्ञ.

    ReplyDelete
  2. एक रात्रीत कार्व्हर घडले नाही,लहानपणी ऐकलेल्या एका वाक्याने त्यांचे जीवन पार बदलून टाकले,ते वाक्य होते ”तुला जे जे शिकता येईल ते तू जरूर शिक,नंतर जे तू शिकला ते आपल्या लोकांना शिकव”.
    फार थोड्या लोकांना हि विचारसरणी उमगते,पण ज्याला उमगली तो जगाचा कायापालट करून टाकतो.
    श्रीराम, अंबज्ञ सुनीतावीरा...

    ReplyDelete
  3. एक होता कार्व्हर हे पुस्तक खूप छान आहे...👍👍
    त्यांच्या जीवनातील सर्व गोष्टी सांगितल्या आहेत

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog