Friday 24 April 2015

श्री आद्य शंकराचार्यविरचितं श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्‌ भाग - २ !!!

आता जाणून घेऊ  या  आदिमातेचे लाभेवीण प्रेम  ….


जगन् मात: मातस्तव चरणसेवा न रचिता 
न वा दत्तं देवि द्रविणम् अपि भूयस्- तव मया ।
तथा अपि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत् प्रकुरुषे 
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ।।

आई तुझ्या चरणांची सेवा मी कधीच केलेली नाही , तुझ्यासाठी एक कवडीसुद्धा खर्च केलेली नाही गं ! तरीदेखील माझ्यासारख्या अधमावार तु अनुपम स्नेह करतेस ह्याचे कारण एकच "कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. शरीराने ,मनाने , बुद्धीने कधीही तुझी भक्ती, सेवा, दान केले नाही तरीही तु माझ्यावर निरुपम प्रेम करतेस कारण मी कितीही कुपुत्र असलो तरी तु कुमाता नाही आहेस.


श्वपाक: जल्पाक: भवति मधुपाकोपम- गिरा 
निरातंको रंको विहरति चिरं कोटि-कनकै: । 
तव अपर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं 
जन: को जानीते जननि जपनीयं जपविधौ ।।

हे माते अपर्णे ! तुझ्या मंत्राचे एक अक्षर जरी कानावर पडले , तरी त्याचे फळ असे मिळते की अधम मूर्खदेखील अत्यंत मधुर वाणीने बोलणारा धाराप्रवाही वक्ता होतो, दरिद्री मनुष्यसुध्दा कोटयावधी सुवर्णमुद्रांचा धनी होऊन तो चिरकाल निर्भय होऊन जगतो.
हे अपर्णे आई, तुझ्या मंत्रातले एक अक्षर जरी कानावर पडले ना तर हे फळ मिळते तर मग जे कायम तुझा जप करत असतात त्यांना काय मिळत असेल आणि ते कोण जाणू शकेल !! हे कोणीही जाणूच शकत नाही.

आपत्सु मग्न: स्मरणं त्वदीयं,  
करोमि दुर्गे करुणार्णवेशि ।
नैतत् शठत्वं मम भावयेथा:
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति ।।

शंकराचार्य सांगतात की हे माय दुर्गे ! करूणार्णवे महादेवी !  मी शठ आहे (शठ म्हणजे कपटी , लबाड ) हे मला मान्य आहे, पण आई तू हे मान्य करु नकोस, तु मला शठ मानू नकोस.  भूक आणि तहान लागली की मगच बाळाला आईची आठवण येते, एवढेच मला समजते. म्हणून मी सदैव तुझा बाळच आहे.


आदि शंकराचार्य आम्हांला सांगतात की, आईकडे बाळासारखा लाडिवाळ हटट करा.तिचे आई म्हणून मातृत्व अनुभवा. तिच्यापुढे नेहमीच शरणागत बाळ रहा. कुठलेही तर्क- कुतर्क करू नका . आई म्हणून ती शक्ती रूपाने आहेच पण तिला शक्ती न म्हणता आईच म्हणा .तिच्या पुत्रांच्या शत्रूंची आई ती कधीच नसते तिथे ती दुर्गा रूपानेच असते ,त्या शत्रूंचा नाश करण्यासाठी असते.

जगदम्ब विचित्रं अत्र किं परिपूणा करुणा अस्ति चेन्मयि । 
अपराध- परंपरा-परं न ही माता समुपेक्षेते सुतम् ।

हे जगदंबे ! तुझ्या परिपूर्ण अकारण कारुण्याबाबत मला मुळीच विचीत्र वा आश्चर्य वाटत नाही, कारण माझी अपराध परंपरा चालू आहेच तरी देखिल तुझी माझ्यावर कृपा आहेच आणि अशा वारंवार अपराध करणार्‍या मुलाचीही माता कधीच उपेक्षा करीत नाही.

येथे लक्षात ठेवण्या सारखी एक महत्त्वाची गोष्ट जाणवते की आपण जी हाक आपल्या सद्गुरूला मारतो तेव्हा सदुगुरू त्या आईला हाक मारत असतो.. आपला एकमेव तारणहार तो परमात्माच असतो जो आपली हाक आदिमाते पर्यंत पोचवतो. म्हणून त्या परमात्म्याची, तिच्या पुत्राची कधीच उपेक्षा करता कामा नये.

मत्सम: पापी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि ।
एवं ज्ञात्वा महादेवि यथायोग्यं तथा कुरु ।।

हे महादेवी! माझ्यासारखा दुसरा कोणीही पापी नाही व तुझ्यासारखी दुसरी कोणी पापहारिणी , क्षमाशील नाही, हे जाणून आई तुला जे योग्य वाटेल तेच तू कर.
त्या आदिमातेकडे व परमात्म्याकडे sorry म्हणायची गरज नसते व thanks देखील म्हणायची गरज नसते. फक्त कायम thankful असावे लागते.

संदर्भ सूची :
       १. सद्‌गुरु डॉक्टर श्री अनिरुद्धसिंह जोशी ह्यांचे २८-०४-२०११ रोजीचे प्रवचन.
       २. मातृवात्सल्यविंदानम् अर्थात् मातरैश्वर्यवेद:
       ३. मातृवात्सल्य -उपनिषद् अर्थात् श्री स्वस्तिक्षेमविद्या.

No comments:

Post a Comment

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog