Monday 20 April 2015

परशुराम चरणौ पादसंवाहने नमामि ...






सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला । 
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥ 
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला । 
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ आरती० ॥ ४ ॥

आज परशुराम जंयती. दशावतारांची आरती म्हणताना आपण महाविष्णूच्या ह्या सहाव्या अवताराची महती गातो तो हा भगवान परशुराम !


अश्वत्थामा बलिव्र्यासो हनुमांश्च विभीषण:
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविन:।। 
- श्रीमद्‍भागवत महापुराण
जगातील सप्त चिरंजीवांपैकी एक म्हणून ज्यांचे माहात्म्य पुराणात गायिले जाते तो हा भगवान परशुराम !

हनुमान , बिभीषण , बळी , व्यास ह्यांसह भगवान परशुराम हा चिरंजीव म्हणून कल्पांतापर्यंत ह्या वसुंधरेवर कार्यरत राहील असे श्रीमद्‍भागवत महापुराण सांगते. 

महाविष्णूचा सहावा अवतार म्हणून गौरविला जाणार्‍या ह्या महान मातृ-पितृ भक्त परशुरामांचा जन्म एकोणिसाव्या त्रेतायुगात (महाभारतानुसार त्रेता व द्वापार युगांच्या संधीकालात) वैशाख शुक्ल वा शुध्द पक्षात तृतीया ह्या दिवशी भृगु ऋषींच्या कुळात जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता ह्यांच्या पोटी झाला. त्यांचे मूळ नाव राम होते , भगवान शिव-शंकराचे ते परम भक्त होते आणि त्यांच्या प्रदीर्घ तपश्चर्येनंतर त्यांना एक अमोघास्त्र प्राप्त झाले ज्याचे नाव परशु होते. पुढे परशु धारण करणारा म्हणून परशुराम ह्या नावाने ते ओळखले जाऊ लागले. परशुरामाच्या कथा रामायणात, महाभारतात व काही पुराणांत आढळतात. त्याच्या आधीच्या अवतारांसारखे त्याच्या नावाचे स्वतंत्र पुराण नाही. 

भीमकाय देह, मस्तकी जटाभार, खांद्यावर धनुष्य व हातात परशू अशी परशुरामाची देह्यष्टी होती असे वाचनात आढळते. 



अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: ।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।
ज्याच्या जिव्हेच्या अग्रावर चारही वेद नेहमी वास करून असतात,जो धनुष्य बाणाने सज्ज आहे, आणि त्याच मुळे जो शाप(वाणी ) आणि शर (बाण ) यांचा योग्य उपयोग करू शकतो. अर्थातच हा ब्राम्हतेजाने युक्त असा ब्राम्हण देखिल आहे आणि क्षात्रतेजाने परिपूर्ण असा क्षत्रिय देखिल आहे . ह्या वैशिष्ट्यांनी भृगुराज परशुरामाला गौरविले जाते , आणि म्हणूनच ज्याला शापादपि- शरादपि असेही संबोधतात. 

परशुरामाने स्वत:चा गुरु आणि पिता असणार्‍या जमदग्नी ऋषिच्या आज्ञापालनासाठी स्वत:च्या प्राणांहूनही प्रिय असणार्‍या रेणुकामातेचे मस्तक धडावेगळे केले होते आणि जमदग्नी आज्ञापालनाने संतुष्ट होतांच परत आपल्या मातेचे प्राण ही मिळवले होते. सदगुरुंच्या आज्ञापालनात शिष्याने  किती व कसे तत्पर असावे ह्याचे ह्या हून दुसरे श्रेष्ठ उदाहरण गवसणे केवळ अशक्यप्राय !!!
    
परशुरामाने स्वत:चे अवतार कर्तव्य पार पाडण्याकरिता मदांध राजांचे वध केले. परशुराम ह्या त्या काळचा विश्वातील सर्वश्रेष्ठ योध्दा गणला जात होता. त्याने एकट्यानेच हजारोंच्या संख्येने अस्णार्‍या शस्त्रसज्ज सैन्यदलांचे, सेनापतींचे व मदांध आसुरी वृत्तीच्या राजांचे कंदन केलेले होते. परंतु ह्या सर्वांमागे परशुरामाला कुठल्याही राजसत्तेची वा धनाची अपेक्षा जराही नव्हती. इतुका कर्तव्य कठोर भाव जपणे खरेच निव्वळ दुर्मिळच म्हणावे लागेल. परशुरामाने केवळ सत्तेने मुजोर झालेल्या उन्मत्त राजांना धडा शिकविला होता. मात्र हे सर्व युध्द कार्य करतेवेळी राजस्त्रिया, त्यांची अपत्ये व धर्मपालनात तत्पर असणारे राजे व राजवंशीय ह्यांना मात्र त्याने सदैव अभय दिले होते.    

त्यानंतर सत्यधर्मी कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाचा महाविष्णूच्याच हातून युध्दात क्षत्रियोचित मृत्यु यावा , ह्या त्याच्याच इच्छेप्रमाणे वध केला व पुढे तो तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. परशुराम आश्रमात नाही हे जाणून कार्तवीर्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी हैहयांनी जमदग्नीऋषींचे शिर धडावेगळे करून त्यांची हत्या केली. हा वृत्तान्त समजल्यावर परशुराम लगेच आश्रमात पोहोचला. जमदग्नींच्या शरिरावरील एकवीस जखमा पाहून त्याने तत्क्षणी प्रतिज्ञा केली की, `हैहय व इतर क्षत्रियाधर्मीयांनी केलेल्या या ब्रह्महत्येबद्दल शिक्षा म्हणून एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय करीन.' या प्रतिज्ञेप्रमाणे त्याने उन्मत्त झालेल्या क्षत्रियांचा नाश करावा, युद्ध संपल्यावर महेंद्र पर्वतावर जावे, क्षत्रीय माजले की, पुन्हा त्यांचा नाश करावा, अशा एकवीस मोहिमा केल्या. समंतपंचकावर शेवटचे युद्ध करून त्याने आपला रक्‍ताने माखलेला परशू धुतला व शस्त्र खाली ठेवले. अर्थातच हे ही करताना परशुरामाने सरसकट क्षत्रियांचा संहार न करता, दुष्ट-दुर्जन अशाच अंहकाराने माजलेल्या उन्मत्त होउन सामान्य जनांना पिडणार्‍या, बेधुंद मदांध अशाच क्षत्रीय राजांचा संहार केला होता. 

मला वाटते की म्हणूनच महर्षी वाल्मीकींनी परशुरामाचा मोठ्या आदराने उल्लेख  अधम अशा क्षत्रियांचा वध करणारा तो `क्षत्रविमर्दन' असे न म्हणता `राजविमर्दन' म्हणून केला आहे. तत्पश्चात् परशुरामाने आपले गुरुवर्य श्रीदतात्रेयांच्या सल्ल्यानुसार प्रायश्चित्त म्हणून १०८ तीर्थाटने केली आणि जिंकलेली पृथ्वी कश्यपास दान म्हणून अर्पण केली व पुढे तो तपश्चर्या करण्यासाठी गेला. 

नमस्कारातील अत्यंत श्रेष्ठ अशा पादसंवाहन नमस्काराचे भगवान परशुराम हे प्रणेता ऋषी आहेत. परशुराम भृगुऋषींची सेवा करतांना, पादसंवाहन करतांना गुरुभक्तीचे भाव त्यांच्या मनात दृढ झाले , जे अनेक वर्षांच्या सेवेने कदाचित शक्य झाले नसते. तेच गुरुंचे पाय चेपता चेपता त्यांच्या मनातील अनेक शंका दूर झाल्या व परशुरामांना आपल्या कार्याची जागृती झाली आणि म्हणून भगवान परशुरामाने पादसंवाहन हा श्रेष्ठ नमस्कार गणला आहे.

अशा ह्या सदैव वंदनीय, पूज्यनीय महान अवताराच्या अपार दिव्यत्त्व आणि अगाध मानवत्त्वावर एखादा चित्रकार भाळला नाही तरच नवल.... राजा रविवर्माही ह्या भगवान परशुरामाला आपल्या कुंचल्यातून साकारून धन्य धन्य झाले... ती ही महान कलाकृती ... 



आज परशुराम जंयतीच्या पावन दिनी अशा मानवी देह धारण करून वसुंधरेला पावन केलेल्या 
भगवत् स्वरुपाला त्यांनीच दाविलेल्या पादसंवाहन नमस्काराने शरण जाऊ या यापरती अन्य
इतिकर्तव्यता ती कोणती ?


संदर्भ ग्रंथ व् पुस्तक सूची -
१) मातृवात्सल्यविन्दानम् अर्थात् मातरैश्वर्यवेद:
२) श्रीमद्‍भागवत महापुराण
३) साईसच्चरित पंचशील परिक्षा प्रात्यक्षिक अभ्यासक्रम - संपूर्ण जीवनविकास


4 comments:

  1. तुमच्या ब्लाॅग पोस्ट्समध्ये वैविध्य आहे. तुमचं लिखाण बहु आयामी आहे. साध्या सरळ भाषेत तुम्ही अनेक पैलू व्यवस्थितपणे मांडता. खूप छान.लिहीत रहा.

    ReplyDelete
  2. Absolutely fantastic article Sunita Karande...You have taken all possible micro level references to reach out at full proof article...I am thankful to you for posting this article on auspicious day of Parshuram Jayanti.

    ReplyDelete
  3. Nathsamvidh, अप्रतिम लिखाण आहे परशुरामाचे गुणवर्णन वाचताना साक्षात परशुराम समोर उभे राहिले आहे असे मला वाटते.

    ReplyDelete
  4. खूप सुंदर लेख...आम्हाला महाविष्णुच्या राम आणि कृष्ण या अवतारांविषयी पुरेपुर माहिती असते पण त्याच महाविष्णुच्या परशुराम या अवताराविषयी मात्र खूप कमी माहिती असते जी तुमच्या लेखामुळे मिळाली....खूप मस्त...

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog