Saturday 4 April 2015

प्रेम आणि प्रेमरस ! कैवल्य आणि अनन्यभाव !!!


श्रीराम-हनुमंत म्हणजे साक्षात प्रेम आणि प्रेमरसाची भेट !
श्रीराम-हनुमंत म्हणजे साक्षात कैवल्याची व अनन्यभावाची भेट !!
श्रीराम-हनुमंत म्हणजे साक्षात चैतन्याची व महाप्राणाची भेट !!!




आज चैत्र पौर्णिमा म्हणजेच श्रीहनुमान पौर्णिमा ! आजच्या परमपावन दिवशी श्रीहनुमंताला जगत जननी सीतामाईचे पहिले दर्शन झाले अशोकवनात . हनुमंताला माता जानकीचा चरणस्पर्श लाभला आणि जो काया-वाचा -मनाने फक्त श्रीरामांचा दास झाला आहे अशा हनुमंताला जानकीमातेने "अष्ट सिध्दी नौ निधी के दाता " व्हाल असा आशीर्वाद दिला जे आपण हनुमान चलिसा मध्ये म्हणतो ही -
अष्ट सिध्दी नौ निधी के दाता ।  अस बर दीन जानकी माता ।
राम रसायन तुम्हरे पासा ।  सदा रहो रघुपती के दासा । । 


श्रीतुलसीदासविरचित "सुंदरकांड" म्हणजे तर फक्त प्रेम , प्रेम , प्रेम आणि प्रेमच !!!
  
            तुलसीदासांचे श्रीहनुमंतावरचे आणि हनुमंताचे त्याच्या श्रीरामावरचे प्रेम अगदी ओतप्रोत भरभरून वाहताना आढळते.



सदगुरु डॉक्टर अनिरुध्द जोशी हे त्यांच्या " श्रीमद्पुरुषार्थ: द्वितीय खण्ड: - प्रेमप्रवास " ह्या ग्रंथात म्हणतात - रामचरित्रात स्वत:च्या सामर्थ्याची जाणीव विसरलेला हनुमंत प्रवेश करतो , रामाला भेटतो , रामाचे दास्य प्रेमाने स्वीकारतो. हनुमंत म्हणजेच महाप्राण , महाप्रज्ञेचा पुत्रच. परंतु एकही प्रज्ञापराध न होऊ देणे हाच त्याचा धर्म. तो हनुमंत मात्र कधीही दु:खी झालेला दिसत नाही. उलट रामाचा दास राहूनही तो आज हजारो वर्षे प्रत्येक भक्ताचा आप्त देव होऊन राहिलेला आहे. हनुमंतही  ’बुध्दीमताम् वरिष्ठम्’ , निष्काम कर्मयोगी (किंवा रामकाम कर्मयोगी) स्रर्वश्रेष्ठ योगी व सर्वश्रेष्ठ भक्त होताच आणि आहेच, परंतु मर्यादायोग हे त्याचे वैशिष्ट्य होते आणि आहेच म्हणूनच ’सुंदरकांड’ म्हणजे मर्यादामार्गाची मूळभूमी.  
स्वत: महाप्रज्ञाच सीताच आम्हाला दाखवून देते की, "मी स्वत:च भक्तिरुपीणी, आनंददायिनी, योगमाया , ज्ञानशक्ती, व पतिव्रता (कर्मयोगिनी) असूनही मर्यादाभंग होताच मलासुद्दा अपार दु:ख व कष्ट भोगावे लागले."
मग सामान्य मानवांचा काय कथा सांगा ! मर्यादेचे पालन न करता प्रज्ञापराध केल्यास, स्वत: महाप्रज्ञाही जर दु:ख भोगते , तर सामान्य ताकदीच्या मानवाचे काय?

आपण सामान्य मानव साडेसातीच्या विळख्यात हेच प्रज्ञापराध म्हणजेच चुका करून सापडत राहतो आणि साडेसातीच्या नावाने त्रासून जातो, गांजून जातो. ह्या साडेसातीला तोंड देण्याचा रामबाण उपाय म्हणजेच हनुमान भक्ती. आणि सुंदरकांड पठण तर हनुमंत भक्तीचा सर्वोत्कृष्ट सोपा मार्ग.

एवढे का  बरे ह्या " सुंदरकांडाला" अनन्य साधारण महत्त्व हनुमंताने मिळवून दिले ते जाणून घेण्याचा प्रयास करू या चला तर मग-
सुंदरकांड म्हणजे हनुमंताचा सीतामाईच्या शोधासाठी एकट्याने श्रीरामेश्वर ते श्रीलंका एवढा मोठा अजस्त्र, अवाढव्य पल्ल्याचा, समुद्र उल्लंघून केलेला प्रवास!
हनुमंताची माता अंजना हिने त्याच्या लहानपणीच त्याचे सारे सामर्थ्य केवळ राम कार्यासाठी वापरले जावे ह्या हेतूने महान तपस्वी , ब्रम्हर्षी अगस्तींकडून बंधन घालून घेतलेले असते आणि त्याच्यावरचा उपाय हा जांबुवंताला माहीत होता. जेव्हा गीधराज जटायुबंधू संपाती कडून रावणाने सीतेला समुद्रावरून उड्डाण करून लंकेतच नेले आहे ही खात्रीदायक बातमी देतो , तेव्हा लंकेत जाण्याचे निश्चित ठरते आणि प्रत्येक वानर आपण योगमार्गाने किती उडून जाऊ शकतो ह्याचा अंदाज घेतो. परंतु एवढ्या दूरवर कोणी पोहचू शकत नव्हता.
जांबुवंताचे सत्यवचन व वीररस चेतविणारी वचने ऐकताच हनुमंताच्या सर्व शक्ती जागृत होतात आणि हनुमंत आपले सामर्थ्यशाली महाबलीस्वरूप प्रकट करतात आणि लंकेचा प्रवास सुरु होतो - तो कसा ह्याचे वर्णन म्हणजे "सुंदरकांड" 





हनुमंताची रामभक्ती आणि मर्यादामार्गावरचे आचरण आपल्याला भक्तीमार्गाचे खरे गमक समजावून देते पदोपदी-
⦁    श्रीरामाच्या कार्याची सुरुवात करतानाच हनुमंत सर्वांना नमस्कार करून , रघुनाथ श्रीरामास आपल्या हृदयी धारण करून अत्यंत प्रसन्न चित्ताने आनंदाने निघतो- कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला आपल्या इष्ट देवतेचे - आपल्या भगवंताचे स्मरण प्रसन्न चित्ताने स्मरण करणे हेच यशाचे मूळ गमक असते आणि तोच खरा विजयमंत्र असतो हे हनुमंत दाखवतो आपल्या आचरणातून.

⦁    वाटेत उड्डाण करणारा हा रामदूत आहे असा विचार करून समुद्र मैनाक पर्वताला सांगतो की तू हनुमंताचा थकवा दूर करणारा हो आणि त्याला तुझ्यावर विसावा घ्यायला विनंती कर. येथे ही हनुमंत अत्यंत विनयाने मैनाक पर्वताला हाताने स्पर्श करून नमस्कार करतो आणि श्रीरामांचे कार्य केल्याशिवाय मला कुठली विश्रांती ? असे म्हणून स्पष्ट पणे नकार देतो. आपल्या कार्य पूर्तीसाठी मार्गात आडवे येणार्‍या गोष्टींना कसा शांतपणे परंतु ठामपणे नकार द्यायचा असतो ह्याची ही शिकवण !!!
( सहज आठवला म्हणून गंमतीचा भाग येथे उल्लेखावासा वाटतो की बघा साधे रोजच्या दैनंदिन जीवनात वजन वाढले म्हणून आपण चालायला एक तास म्हणून जायचे ठरवतो आणि वाटेत थोड्या वेळाने कोणी भेटले की गप्पा मारत थांबतो किंवा अर्ध्या तासाने दम घेण्यासाठी काहीतरी खातो किंवा तहान भागविण्यासाठी शीत पेये पितो जे आपल्या एक तासाच्या चालण्याच्या मूळ हेतुला बाधक असते हेच आपण विसरतो. येथे जरूरी असते ती ह्याच चिकाटीची , जी आपला हनुमंत बाप्पा आपल्याला स्वत:च्या वागण्यातून शिकवितो.)

⦁    हनुमंताच्या बळ व बुध्दीची कसोटी घेण्यास देव ’सुरसा’ नावाच्या सर्पमातेस पाठावितात,जी हनुमंताला तू मला देवांनी दिलेला आहार आहे असे म्हणून गिळण्यासाठी आपला जबडा आ वासते. तेव्हा हनुमंत जराही न डगमगता आधी तिला माते म्हणून हाक मारून विनंती करतो की मी रामाचे कार्य करून सीतेची बातमी प्रभूंना सांगेन त्यानंतर तुझ्या मुखात प्रवेश करेन. पण जेव्हा ती सुरसा ऐकत नाही व काही केल्या हनुमंताला जाऊच देत नाही तेव्हा मात्र "तू मला गिळूव्ह शकणार नाहीस" असे उत्तर देतो. तिने एक योजना रुंद जबडा पसरताच हनुमंत दुप्पट मोठा होतो , तिने १६ योजने मुख मोठे केल्यावर हनुमंत ३२ योजने एवढा विशाल , मोठा होतो, पण तिने १०० योजमे मुख मोठे करताच , हनुमंत अत्यंत लहान रूप धारण करतो आणि तिच्या मुखात शिरून बाहेर निघून येतो परत आणि नतमस्तक होऊन तिचा निरोप घेतो.

"शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ " हा सहज धडा हनुमंत गिरवून घेतो आपल्याकडून -- म्हणून तो हनुमंत -"बुध्दीमताम् वरिष्ठाम् " गणला जातो.
येथे सुरसा माता अवाक् होते आणि प्रसन्न होऊन हनुमंताला उलट आशीर्वाद देते की " तुम्ही श्रीरामांचे सर्व कार्य कराल कारण तुम्ही बुधी व बलाचे निधान आहात."

येथे अशीच एक श्रीमद् आदीशंकराचार्यांची गोष्ट आठवते. अद्वैत सिध्दांत सांगणारे म्हणून काही लोक नेहमीच त्यांची कुचेष्टा करीत, असेच एकदा त्यांना त्रास देण्याच्या हेतूने शंकराचार्यांना येताना पाहून त्यांच्या वाटेत एक दारू पिऊन पिसाळलेला हत्ती सोडतात. अर्थात त्याच्या पासून  आपला जीव वाचविण्यासाठी शंकराचार्य एका गल्लीतील घरात पळ काढून आश्रय घेतात. हत्ती निघून गेल्यावर ते बाहेर पडतात तेव्हा हे टवाळ, कुटाळ लोक त्यांना प्रश्न विचारतात ," अहो तुम्ही नेहमी म्हणता हे ही ब्रम्ह, ते ही ब्रम्ह , सर्व काही ब्रम्ह . मग आता तो हत्ती सुध्दा ब्रम्ह नाही का? मग त्याला पाहून तुम्ही का पळालात? शंकराचार्य शांतपणे प्रत्युत्तर देतात ," हो तो हत्ती ही ब्रम्हच आहे , पण हे मला कळते , त्या हत्तीला नाही कळत. " हा असतो फरक. बुध्दीमान,चतुर वेळप्रसंगी शक्तीचा वापर न करता युक्ती वापरतात, बुध्दी वापरतात आणि स्व संरक्षण करतात.

⦁    पुढे समुद्रातील एक मायावी राक्षसी आकाशात उडणार्‍या जीवजंतूना त्यांची पाण्यात पडलेली सावली पाहून पकडत असे आणि ते उडू न शकल्याने पाण्यात पड्ल्यावर खात असे. हनुमंत तिचे ही कपट ओळखून तिला मारून समुद्रापार जातो."सावधपण ते पहिले" हा सावधानता बाळगण्याचा -दक्षतेचा अत्यंत महत्त्वाचा कित्ता घोटून घेतला जातो.

⦁    लंकेत अनेक पहारेकरी पहारा देताना पाहून हनुमंत अत्यंत छोटे रूप धारण करून रात्री नगरात प्रवेश घेण्याचे ठरवितो आणि रात्री श्रीरामांचे स्मरण करून एका लहान डासाचे रूप धारण करून लंकेत प्रवेश करतो.

⦁    पहारेकरीण लंकिनी राक्षसी जेव्हा अडविते की तू माझा अनादर करून निघाला आहेस. अरे चोरा, तुला माझे रहस्य माहीत नाही. जितके चोर आहेत ते माझा आहार आहेत. तेव्हा लंकिनीचे रहस्य जाणणारा हनुमंत तिला एक ठोसा मारून जमिनीवर पाडतो आणि तिला रक्ताची उलटी होते आणि ब्रम्ह्देवाच्या वराचे स्मरण होते. हनुमंताला तात म्हणून स्वत:चे पुण्य जाणून श्रीरामांच्या दूताचे दर्शन घेते आणि हनुमंताच्या अल्पशा सत्संगाबद्दल आभार मानून एका वैश्विक रहस्याचा उलगडा समस्त मानवजातीला करवून देते -
प्रबिसि नगर कीजे सब काजा । हृदय राखि कोसलपूर राजा ।
गरल सुधा रिपु करहिं । मिताई गोपद सिंधु अनल सितलाई ।।

( श्रीरामांना ह्र्दयात धारण करून सर्व काम करावे,ज्याने विषदेखिल अमृत होते व शत्रूदेखिल मैत्री करतो . समुद्र गायीच्या खुराच्या आकाराच्या खड्डयात सामावला जातो व अग्नीचा दाहकपणा दूर होतो.)
गरुड सुमेरु रेनु सम ताही । राम कृपा करि चितवा जाही।।
( ज्याला श्रीरामांनी कृपादृष्टीने पाहिले आहे, त्याच्यासाठी मेरू पर्वताची विशालता धूलिकणाप्रमाणे होते.)

⦁    येथेही परत हनुमंत श्रीरामांचे स्मरण करून अत्यंत छोटे रूप धारण करून लंकेत प्रवेश करतात. घराघरात जाऊन हनुमंत सीतेचा शोध घेतात. रावणाच्या महालातही शोध घेतात पण सीता कोठेच सापडत नाही. पुडःए श्रीरामप्रभुंचे एक स्वतंत्र मंदिर बांधलेले एक सुंदर घर हनुमंताला दिसते. श्रीरामांच्या आयुधांची चित्रे काढलेल्या त्या घराची अवर्णनीय शोभा आणि नवीन हिरवेगार तुळशी वृंदावन पाहून हनुमंताला हर्ष होतो साहजिकच, पण येथेही हनुमंत आनंदाने हुरळून जात नाही तर संयम ठेवतो, सबूरी धरतो आणि नीट बारकाईने शोध घेतो.

ही लंका तर राक्षसांचे निवासस्थान , मग येथे सज्जनाचा वास कसा काय? असा जिज्ञासा युक्त प्रश्न हनुमंताला पडतो.

बिभीषण झोपेतून उठताच रामनामाचे स्मरण करताना पाहूनच मग हनुमंत त्याच्या सज्जनपणावर शिक्कामोर्तब करतो. कारण कुणीही मला पाहत नसताना केवळ दांभिकपणा न बाळगता जो देवाचे स्मरण करतो तो खरा सज्जन असतो ही महत्त्वाची खूण हनुमंत चाचपून पहातो.

सज्जनांमुळे कार्याची हानी होत नाही ह्याचे भान बाळगून हनुमंत बिभीषणाची ओळखही करून घेतो.

येथे पण हनुमंत ब्राम्हण वेष घेऊन प्रथम बिभीषणाची ओळख करून घेतो आणि मगच खात्री पटल्यावर्च स्वत:चे खरे रूप उघड करतो. शांतीने कोणतेही कार्य कसे पार पाडावे, आततायीपणा किंवा घाई घाई न करता , सबूरीने कसे कार्य करावे ह्याची ही शिकवण !
बिभीषणासमोर आपल्या लाडक्या श्रीरामांचे गुणसंकीर्तन ही हनुमंत किती प्रेमाने करतो आणि श्रीरामांचे गुण गान करताना कसा प्रेममग्न होतो हे पाहून खरेच कंठ दाटून येतो. ज्या समोरच्या व्यक्तीने माझ्या देवाला , माझ्या श्रीराम प्रभुंना पाहिले देखिल नाही अजून पर्यंत एक वेळेला , त्या व्यक्तीला श्रीरामांच्या गुणांबद्द्ल पुरेपूर विश्वास देणे, अत्यंत ठामपणे आपल्या परमेश्वराचे एकेक गुण ठसविणे, पटविणे हे खरोखरीच खूप काही शिकवून जाते की गुणसंकीर्तन कसे असावे. स्वानुभव आणि पुरता आपल्या भगवंतावरचा विश्वास किती ठासून भरला आहे आणि किती उत्स्फूर्त पणे , प्रेमाने शब्दाशब्दांतून प्रवाहीत होतो हे खरेच खूप मंत्रमुग्ध करते मनाला.
" हे बिभीषणा ऐक ! प्रभुंची ही तर रीतच आहे की ते सेवकांवर सदैव प्रेम करतातच’"
 -   अहाहा काय ते प्रेम ,काय ते माधुर्य , काय तो आदर्भाव आणि विश्वास आपल्या श्रीरामांप्रती !!!

मी तरी कोठे मोठा कुलीन आहे? वानरे तर चंचल असून विधीहीन असतात. सकाळसकाळ कोणी आमचे नाव घेतले तर त्याला दिवसभर जेवण देखिल मिळत नाही , असा मी अधम असून सुध्दा श्रीरामांनी माझ्यावर कृपा केली असे स्पष्ट सांगताना कोठेही स्वत:चा कमीपणा हनुमंत लपवून ठेवत नाही, कोठेही फसवाफसवी नाही, लपवाछपवी नाही. मनाचा प्रांजळपणा- सत्याबाबत पारदर्शीपणा !!!!
 हे एवढेच सांगून न राहता असे सर्व जाणूनही जे अशा माझ्या स्वामीला शरण जात नाही, आणि विसरून जातात , ते का बरे भटकत फिरणार नाही? अशी परखड वास्तवाची जाणीवही न घाबरता करून देतात हनुमंत .

⦁    बिभीषणाकडून सीतेला शोधण्याचे रहस्य जाणून हनुमंत पुढे सीतामाईचा शोध घेतात आणि अशोकवनातील सीतामाई दिसताच मनोमन मनापासून तिला नमस्कारही करतात.

⦁    सीता माई दिसताच घाईने त्यांना भेटण्याचा कोणताही आततायी निर्णय हनुमंत घेत नाही तर योग्य उचित संधीची प्रतिक्षा करतात आणि सबूरीने तेथे रात्रीचे चार प्रहर लोटेपर्यंत वाट पहात बसतात.

⦁    सीतेची दु:खी अवस्था पाहून हनुमंताला दारूण दु:खच होते. तरीही रावण आपल्या वैभवाचे प्रदर्शन करीत येऊन सीतामाईला अत्यंत घृणास्पद वागणूक देऊन त्रास देताना पाहूनही कोठे ही आपले भान ढळू न देता अत्यंत शांतपणे फक्त बघ्याची भूमिका स्विकारतो. कोठेही उतावीळपणे आततायी निर्णय घेत नाही, जेणे करून पुढील कार्य कठीण होऊन बसेल ह्याची सभानता बाळगतो.

⦁    रावण निघून गेल्यावर त्रिजटा सीतेला समजावून निघून गेल्यानंतरच उचित संधीचा सुगावा घेऊन मगच हनुमंत श्रीरामांनी दिलेली अंगठी आधी स्वत: प्रकट न होता झाडावर बसूनच सीतेच्या हातात पडेल अशी खाली टाकतो.

⦁    सीतामाई श्रीरामांची अंगठी बघून आनंदीत तर होते पण लगेच्च कातरशंकेने हृदयी व्याकूळही होते ही तिच्या मनीची भाव अवस्था जाणून हनुमंत अत्यंत मधुर वाणीने श्रीरामांचे गुणवर्णन करू लागतात , जे ऐकून सीतेचे दु:ख पळून जाते आणि ती मन लावून ऐकू लागते आणि मग हनुमंत सुरुवातीपासूनची सर्व कथा सांगतात. आणि मग सीतामाई जेव्हा स्वत: होऊन कानांना अमृताप्रमाणे वाटणारी ही सुंदर कथा सांगणार्‍याने प्रकट व्हावे म्हणून सांगतात तेव्हाच हनुमंत आपले रूप प्रकट करतात.

⦁    अर्थात परपुरुषाकडे न पाहणारी सीता अनोळखी व्यक्ती पाहून तोंड फिरविते तेव्हा हनुमंत करुणानिधान श्रीराम प्रभुंची शपथ घेऊन आपण त्यांचे दूत असल्याचे सांगतो व स्वत: सत्य बोलत असल्याचे पटवून देतो. सीतने नर व वानरांची मैत्री कशी झाली हे विचारताच हनुमंत जशी भेट झाली होती ती कथा ही अत्यंत प्रेमपूर्ण आवाजात सांगतात आणि सीतेला विश्वास पटवितात की हनुमंत हा काया-वाचा-मनाने कृपासिंधु श्रीरामांचा दासच आहे.

⦁    रामप्रभुंचा भक्त जानून सीतेच्या मनात हनुमंताविषयी अगाध प्रेम निर्माण होते व त्याच्याकडे ती आपले मन मोकळे करून दु:ख सांगू लागते. श्रीरामांच्या विरहाने व्याकुळ झालेल्या सीतामाईला तेवढ्याच हळूवारणे अत्यंत कोमल आणि विनम्र वाणीने हनुमंत श्रीरामांचे तिच्यावर तिच्या दुप्पट प्रेम असल्याची समजवणूक काढतात. श्रीरामांचे लक्ष्मणासहीत क्षेमकुशल सांगून सीतेच्या विरहाने व्याकुळ असलेल्या श्रीरामांचा संदेशही सांगून धीर देतात. श्रीरामांचे प्रभुत्त्व चित्ती स्मरून चिंता सोडून देण्याचा प्रेमळ सल्ला हनुमंत देतात आणि श्रीरामांच्या अग्नीसम बाणांनी राक्षसांचे समूह पतंगाप्रमाणे जळून खाक होतील असे सांगून तिला धीर देतात आणि सबूरी धरण्याचा आप्तोपदेशही करतात.

⦁    हनुमंत सीतेला श्रीरामांना आपला ठावठिकाणा कळला असता तर त्यांनी उशीर केला नसता हे सांगून श्रीरामांची बाजूही समजावितात.

⦁    तसेच आपण त्याच क्षणी सीतेस नेण्यास  समर्थ असूनही श्रीरामांची तशी आज्ञा नसल्याने करू शकत नाही आणि काही दिवसांत स्वत: श्रीराम येऊन राक्षसांना मारून आपल्याला घेऊन जातील तोवर धीर धरावा , जे यश नारदादी मुनी त्रिलोकी गातील असे आश्वासनही देतात.

⦁    हनुमंताच्या दृढ आश्वासाने आश्वस्त झालेल्या सीतेला जेव्हा हनुमंताच्या लहान रूपाला पाहून बलवान राक्षसांशी वानर कसे लढणार ह्या विषयी आशंका येते तेव्हा स्वत:चे रणांगणावर अतिबलवान वीरांना भयप्रद ठरणारे मूळ रूप दाखवून हनुमंत सीतेची खात्री पटवितात. आणि तरीही स्वत:कडे कोणताही मोठेपणा न घेता आपल्या सर्व कर्तुत्वाचे श्रेय श्रीरामांमुळेच आहे हे ही स्प्ष्ट पणे सांगतात एका अत्यंत समर्पक उदाहरणाने - आई ! ऐक , वानर जरी प्रचंड बुध्दीमान व बलवान नसतात परंतु श्रीरामांच्या प्रतापाने अगदी छोटासा सर्पही गरुडाला खाऊ शकतो. --- किती किती किती हा श्रीरामांच्या चरणी आदरभाव, अपार प्रेम आणि आपल्या श्रीराम प्रभुंच्या- स्वामींच्या चरणी अनन्य शरणागती  !!!

⦁      हनुमंत आपल्या भक्ती, प्रताप, तेज आणि बल ह्यांनी संपन्न वाणीने सीतेच्या मनाला पूर्ण संतोष देतात आणि पटवून देतात की हनुमंताला फक्त श्रीरामच प्रिय आहे. किती कठीण आहे नाही एका अत्यंत दु:खी स्त्रीला जी आपल्या पतीच्या विरहाने व्याकुळ होऊन पाण्याविना माशाची अवस्था व्हावी त्याप्रमाणे तडफडत आहे तिला शांत करणे, तिच्या पतीच्या प्रेमाची, शौर्याची संपूर्णत: खात्री देऊन नि:शंक करणे --- हाच असावा प्रभुंच्या गुणसंकीर्तनाचा अपार आगाध महिमा --- नाम घेता मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे --- हे फक्त आणि फक्त केवळ एकमेवाद्वतीय हनुमंतच करू शकतो ...
आता सीतामाईकडून आशीर्वाद न मिळाला तरच नवल नाही का ह्या " सीताशोकविनाशिनी " अशा तिच्या पुत्राला म्हणजेच हनुमंताला जो एकाच वेळी सीतेचा पुत्र ही आहे आणि पिता म्हणून "तात" ही आहे -आदरणीयही आहे-

तर आता  अशाच मनोहारी, मनभावन , लोभस भक्ती-प्रेमाचे तेजाने तळपणारे अत्युच्च शिखराला गवसणी घालू या पुढील भागात....


- क्रमश:

2 comments:

  1. Khupach sundar lekh Sunitaveera... Hanumant bappachi olakh agdi konalahi samjel ashya sopya shabdat mandli ahe... pudchya urvarit lekhchi aaturtene vat pahat ahe... Ambadnya avdhi sundar ani imp mahiti dilyabaddal...

    ReplyDelete
  2. हरी ॐ सुनीता वीरा, " प्रेम आणि प्रेमरस ! कैवल्य आणि अनन्यभाव" ह्या विषयावरचे विवेचन खूप अभ्यासपूर्ण आहे, अम्बज्ञ.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog